गणेशोत्सवाच्या काळात कोणत्या गोष्टीला मागणी असू शकते आणि ती पुढे वाढू शकते याचं भान ठेवलं, की त्यातून मोठा उद्योग सुरू होऊ शकतो हे सिद्ध करून दाखवलं आहे ‘स्टेपिंग स्टोन एंटरप्रायझेस’च्या संस्थापिका आणि मालक दीपाली भाटकर यांनी. चॉकलेट मेकिंगची त्यांची आवडच चॉकलेट मोदक करण्यास कारणीभूत ठरली आणि यातूनच मुंबईतच नव्हे तर कोकणातही आपला उद्योग वाढवण्यास मदत झाली. लाखो मोदक आणि लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या या व्यवसायामुळे त्या उद्योजिका झाल्या. त्यांच्याविषयी.
विघ्नहर्त्यां श्री गणरायाच्या आगमनाचे दिवस जवळ येताच, अवतीभवती उत्साह आणि चैतन्य संचारते. बाजारपेठा, मॉल्स, सगळीकडे नवनवीन, कलाविष्कारांची रेलचेल दिसू लागते. कलात्मक आराशी, नावीन्यपूर्ण गणेशमूर्ती, मूर्तीसाठीचे खरे-खोटे दागदागिने, आपल्या आवडत्या बाप्पाच्या स्वागतासाठी कसबी कलावंत आणि हौशी ग्राहकांची एकच लगबग सुरू होते. अर्थात या सर्वात बाप्पाचा नैवेद्य तरी अपवाद कसा असेल. नैवेद्याच्या पारंपरिक पदार्थाच्या जोडीला दरवर्षी काही नवकल्पनांचीही भर पडलेली दिसते. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ‘चॉकलेट मोदक’.
‘ब्राऊनक्यूब’ चॉकलेट हे ब्रँडनेम असलेले चॉकलेट ड्रायफ्रुट मोदक आणि चॉकलेट मोदक खास गणेश उत्सवाच्या काळात बाजारपेठेत आणण्याचे ‘स्टेपिंग स्टोन एंटरप्रायझेस’ या उद्योगाचे हे सलग चौथे वर्ष. २०१६ च्या आंतरराष्ट्रीय महिलादिनी, यशस्वी स्त्री उद्योजिका म्हणून गौरवल्या गेलेल्या दीपाली भाटकर, या महिला उद्योजिका ‘स्टेपिंग स्टोन एंटरप्रायझेस’च्या संस्थापिका आणि मालक आहेत. सोशॉलॉजी विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेल्या दीपालींना, सुरुवातीपासूनच काही तरी नावीन्यपूर्ण व्यवसाय करण्याची इच्छा होती. मध्यंतरीच्या काळात शारीरिक दुखापतीमुळे, त्यांना काही काळ घरीच राहावं लागलं, मात्र २०११ च्या सुमारास त्यांनी नव्याने या चॉकलेट उद्योगात शिरकाव करण्याचं ठरवलं. त्यांचं माहेर आणि सासर दोन्ही घरं मोल्डिंग रबर पार्ट्स उद्योगातील स्वतंत्र उद्योजक आणि व्यावसायिक असल्याने, दीपालींच्या उद्यमी उपक्रमाला सर्वतोपरी पाठिंबा मिळाला आणि फलस्वरूप त्यांनी आपला स्वतंत्र उद्योग सुरू केला. दीपालींना ‘चॉकलेट मेकिंग’ची आवड होतीच आणि अगदी सुरुवातीपासूनच जी गोष्ट करण्यात रस आहे त्या क्षेत्रातच नावीन्यपूर्ण तऱ्हेचा मोठय़ा प्रमाणावरील व्यवसाय करण्याची त्यांची मनीषा होती.
प्रारंभालाच त्यांना शिपिंग कॉर्पोरेशनच्या कार्यालयातून ३० किलो चॉकलेट्स बनवण्याची संधी मिळाली आणि अर्थात अवघ्या चार दिवसांत त्यांनी ती यशस्वीरीत्या पार पाडली. आत्मविश्वास वाढला तसं त्यांनी यात नवीन प्रयोग करायचं ठरवलं. तो प्रयोग होता चॉकलेट मोदकांचा. ‘चॉकलेट मोदक’ची संकल्पना अजमावण्यासाठी त्यांनी उद्योग स्थापनेच्या वर्षीच सर्व परिचितांकडील गणपतीला स्वत: बनवलेल्या चॉकलेट मोदकांचा नैवेद्य दाखवला, साहजिकच दीपालींच्या चॉकलेट मोदक संकल्पनेला मौखिक प्रसिद्धी मिळण्यास मदत झाली. अर्थात व्यवसायात उतरल्यानंतर खप वाढवण्यासाठी नातेवाईक किंवा परिचित यांच्यावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत: मेहनत घेऊन थेट अपरिचित ग्राहकवर्ग शोधणे हे दीर्घकालीन फायद्याचे ठरते, हा त्यांचा स्वानुभव आहे.
‘ब्राऊनक्यूब’ ब्रँडअंतर्गत दीपाली वर्षभर चॉकलेट्सच्या वेगवेगळ्या आकारांतील, स्वादांतील उत्पादने बनवतात; पण वर्षभराच्या उलाढालीतला मोठा वाटा गणेशोत्सवातील चॉकलेट आणि ड्रायफ्रुट मोदक या उत्पादनांतून पूर्ण होतो. गेली तीन वर्षे गणेशोत्सव काळात त्यांच्या चॉकलेट आणि ड्रायफ्रुट मोदकांनी जवळपास पूर्ण मुंबईतील बाजारपेठेत स्थान मिळवले आहे. ‘हायपर सिटी’, ‘अपना बाजार’सारख्या मोठय़ा साखळी दुकानांतून (चेनस्टोर्स) त्यांनी मोठा ग्राहकवर्ग निर्माण केला आहे. गणेशोत्सवाच्या आधी महिना-दीड महिना नवनवीन परिसरांत जाऊन ग्राहक, दुकानदार शोधणे, मोदकांचे नमुने पोहोचवणे, जुन्या ग्राहकांकडून मागण्या मिळवणे, कच्चा मालाची आगाऊ खरेदी करणे या सर्व कामांमध्ये स्वत: दीपाली पूर्ण लक्ष घालतात. अगदी आजही विपणनाचे (मार्केटिंग) काम दीपाली स्वत:च करतात. या वर्षीच्या गणेशोत्सवात त्यांच्या मोदकांनी कोकण बाजारपेठेत प्रवेश करून श्रीवर्धन, कुडाळ, कणकवली, सावंतवाडी इथल्या ग्राहकांनाही आकर्षित केले आहे. दीपालींचे सासर, माहेर कोकणातलेच, साहजिकच कोकणात, स्वत:च्या कारखान्यात बनवलेल्या मोदकांची विक्री करण्याचे समाधान त्यांच्यासाठी फार मोलाचे आहे.
या वर्षी दोन्ही प्रकारच्या मोदकांच्या अकरा आणि एकवीस मोदक असलेल्या जवळपास ६००० खोक्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी त्या सज्ज आहेत. ही उलाढाल बहुदा ५.५० लाखांच्या जवळ पोहोचेल, असे त्या आत्मविश्वासाने सांगतात. गेल्या तीन वर्षांचे उलाढालीचे आकडे पाहता, दरवर्षी मोदकांच्या मागणीत १५ ते २० टक्क्यांनी वाढ होत असल्याचे त्यांच्याशी बोलताना समजले. पुढील वर्षीच्या गणेशोत्सवात, महाराष्ट्रातील इतर मोठय़ा शहरांतील बाजारपेठातलाही ग्राहक मिळवण्याचा त्यांचा इरादा आहे.
वरवर पाहता या उद्योगाच्या प्रगतीचा प्रवास सुरळीत दिसला तरी हा उद्योग पुढे नेताना, रोजच्या रोज अनेक लहानमोठय़ा अडचणींना तोंड द्यावे लागलेच. मुख्य म्हणजे खाद्यान्न उद्योगात नेहमीच उधारीवर तयार पदार्थाचा पुरवठा करावा लागतो. हा कालावधी कमीत कमी १५ ते ३० दिवसांचा असतो. या काळात कर्मचाऱ्यांचे पगार, वापरलेल्या कच्च्या मालाची किंमत, नवीन उत्पादनासाठी कच्च्या मालाची खरेदी, कारखान्याचे आवर्ती स्वरूपाचे खर्च (रिकिरग एक्स्पेन्सेस) या सगळ्यासाठी फिरत्या भांडवलाचे सतत नियोजन करावे लागते, ही तारेवरची कसरत सांभाळणे फार फार जिकिरीचे असते. ‘‘गेल्या चार-पाच वर्षांत क्वचितच एखाद्या दुकानदार, ग्राहकाने मालाचा पुरवठा होताच तत्काळ पैसे दिले असतील, मागणी (ऑर्डर) मिळवण्यापेक्षा, मालाच्या वसुलीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागते,’’ दीपाली सांगतात. दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मागणीचे आकडे वाढत असले तरी अकस्मात नुकसानीचे, फसवणुकीचे अनुभवही हमखास येतात. त्यांनी दोन अनुभव सांगितले. दोन वर्षांपूर्वीच्या गणपती उत्सवाच्या काळात एका वितरकाने जरुरीपेक्षा जास्त मोदकांचे बॉक्स नेले आणि विक्री न झाल्याने अध्र्याहून अधिक माल काही दिवसांनी परत आणला. गणेशोत्सव संपल्यानंतर अचानक परत आलेले मोदक कसे आणि कुठे विकणार, हा प्रश्नच निर्माण झाला. गेल्या वर्षीच्या गणेशोत्सव काळात झालेल्या विक्रीची वसुली करण्यासाठी नव्याने नेमलेल्या कर्मचाऱ्याने वसुलीची रोख रक्कम घेऊन पोबाराच केला.
दीपालींच्या मते, या पाश्र्वभूमीवर सरकारी, निमसरकारी, खासगी कार्यालये येथे मोठय़ा प्रमाणावर विक्री होते, किंमतही चांगली मिळते आणि वसुली करणेही सोपे जाते, शिवाय अशा ठिकाणच्या ग्राहकवर्गासाठी पदार्थ बनवताना कसब आणि कल्पनाशक्ती दोन्हीही वापरल्याचे समाधान मिळते. या उद्योगाच्या उभारणीसाठी दीपालींनी संपूर्णपणे स्वत:कडचाच निधी गुंतवला. सुदैवाने सर्व पैसा सत्कारणीही लागला, परंतु असे न करता नवीन उद्योगांना सवलतीच्या दरात मिळणाऱ्या सरकारी कर्ज योजना तसेच महिला विकासाच्या सरकारी मदत योजना, सरकारी वित्तसंस्थांकडून मिळणारे कर्ज या सगळ्यांचा आधार घेऊन उद्योगउभारणी केली, तर धंद्यात येणाऱ्या टोकाच्या आर्थिक अडचणीच्या वेळी तग धरून उभे राहणे शक्य होते, शिवाय घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी मेहनत अधिक जोमाने केली जाते आणि या सर्वाचा फायदा कठीण काळात मन:स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी होतो, असा कळकळीचा सल्ला दीपाली होऊ घातलेल्या युवा नवउद्यमींना देतात.
दीपालींच्या मुंबईतील मालाड पश्चिमेकडील ‘ब्राऊनक्यूब चॉकलेट’ या छोटेखानी ‘शॉप’मधील काचेमागे विसावलेले सौम्य रंगाचे चमकदार क्लासी वेष्टन असलेले मोदकांचे खोके पाहताना हे सर्व विश्व एका सामान्य घरातील, या प्रकारच्या व्यवसायाची कोणतीही पाश्र्वभूमी नसलेल्या, सुशिक्षित, मराठमोळ्या स्त्रीच्या मेहनत आणि चिकाटीतून उभे राहिले आहे, हे क्षणभर खरेच वाटत नाही.
आत्तापर्यंतच्या वाटचालीत प्रत्येक पावलावर पती समीर सदैव आपल्या पाठीशी असल्याचे, किंबहुना फक्त आणि फक्त पतीच्या आणि सासर-माहेरच्या सर्वथैव पाठिंब्यामुळेच आजवरचा प्रवास सुसह्य़ झाल्याचे, समीर यांची भक्कम साथ, सासूबाईंची मदत आणि मुलगी आदिती हिच्या डोळ्यांतील कौतुक याशिवाय हा उद्योग उभारणं अशक्य होतं, दीपाली भावुक होऊन सांगतात.
२०११ मध्ये उद्योगाच्या सुरुवातीच्या काळात दीपालींच्या मदतीला फक्त एक कर्मचारी होता. आज तीच संख्या आठवर पोहोचली आहे. अशा प्रकारचा खाद्यान्न उद्योग पूर्णपणे कामगारांच्या मेहनतीवर पुढे जातो, तेव्हा त्यांना वेळोवेळी समजून घेऊन, वेळप्रसंगी त्यांच्यावर विश्वासून स्वत: मदत करून त्यांना समाधानी ठेवणे गरजेचे आहे या वास्तवाची त्यांना पूर्ण जाण आहे.
या उद्योगात शिरण्याआधी दीपालींनी चॉकलेट-मेकिंगचे लहानमोठे कोर्सेस केले होते. आज उद्योगात बऱ्यापैकी जम बसला असला तरीही चॉकलेटच्या दुनियेत नवीन कोणते ट्रेंड येत आहेत? ग्राहकांना नवीन काय देता येईल? असलेल्या उत्पादनांत कोणते आगळेवेगळे बदल करता येतील? हे जाणून घेण्याच्या जिज्ञासेने दीपाली आजही चॉकलेट-मेकिंग नव्याने शिकण्यास उत्सुक असतात. नुकताच त्यांनी मुंबईच्या एस.एन.डी.टी. महाविद्यालयातून अशाच प्रकारचा एक अभ्यासक्रम पूर्ण केला. २०१६ च्या आंतरराष्ट्रीय महिलादिनी दीपालींना महाराष्ट्रातील यशस्वी महिला उद्योजक म्हणून पुण्यनगरी महिला सन्मान पुरस्काराने गौरवले गेले, तो प्रसंग त्यांच्यासाठी खूपच आनंदाचा होता; पण याहीपेक्षा मुलीच्या कर्तृत्वाचा असा कौतुक सोहळा पाहताना आपल्या आईवडिलांच्या डोळ्यांत आलेले आनंदाश्रू पाहणे हा दीपालींसाठी सर्वात मोठा गौरव होता.
आगामी काळात स्वत:चे कॉफी शॉप सुरू करण्याचा दीपालींचा मानस आहे. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर, ‘‘मला कॉफी फार आवडते आणि जे मला आवडते त्याचाच मोठय़ा प्रमाणावर व्यवसाय, तोही वेगळ्याच स्टाईलने करण्याचे माझे ध्येय आहे.’’ तेव्हा नजीकच्या भविष्यात चॉकलेट मोदकांप्रमाणे दीपालींच्या कॉफीचा दरवळही सर्वदूर पसरणार यात शंका नाही.
गीता सोनी
geetadsoni1971@gmail.com