आजच्या पितृप्रधान कुटुंबात ‘बालक-प्राधान्य’ लयास गेले आहे. कुटुंबामध्ये पती-पत्नीच्या भांडणाचा प्रश्न असो, कुटुंबाच्या संपत्तीचा प्रश्न असो, आई-वडिलांच्या करिअरचा प्रश्न असो, आईला बेघर करण्याचा प्रश्न असो, इथे मुलांचा कुठेच विचार नाही. स्त्री-पुरुषांनी लग्न करून-सवरून ते जमले-टिकले तर मग त्यामध्ये मुलांना राहायला द्यायचा विचार आहे. ‘अपत्यांसाठी तत्काळ नि पहिला निवारा’ या निसर्गमूल्याची जाणीवच उरलेली दिसत नाही. बालकांची हेळसांड आणि माता-मूल नात्याच्या झालेल्या हानीमुळे आपल्या जीवनातील नैतिक स्थिती ढासळली आहे. त्यातून सावरण्यासाठी आजच्या बालकदिनानिमित्ताने ‘बालकप्रधान’ समाजाची मागणी लावून धरावी लागेल.
मानवी संस्कृतीने आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक शोध लावले. त्याचबरोबर समाज व्यवस्थेतही आपल्या सोयीप्रमाणे बदल केले. ‘माता-मूल’ हे अगदी नैसर्गिक जडणी-घडणीतील सस्तन प्राण्याचे कुटुंब आहे, जे फक्त माणसानेच आपल्या गरजेप्रमाणे विस्तारित नेत पहिल्या प्रथम माता-प्रमुख कुळव्यवस्था आणली आणि नंतर विविध कुटुंबपद्धती आणल्या. माणसामध्ये, अन्य सस्तन प्राण्याप्रमाणे प्रजोत्पादनासाठी विशिष्ट ठरीव कालखंड नसतो. म्हणजेच अपत्य संख्या मर्यादित ठेवण्याची जबाबदारी, निसर्गाने स्त्री-पुरुषांच्या बुद्धीवर सोपविलेली आहे. त्यातही जन्मानंतर बालकाच्या मेंदूच्या पूर्ण विकासाच्या काळानुसार स्त्रीच्या मातृअवस्थेचा काळ प्रदीर्घ आहे. या दीर्घ काळात स्त्रीने पुन्हा गर्भवती राहण्याने, तिच्या अपत्यसंगोपनाच्या कामात अडथळा येणे स्वाभाविक होते आणि विवाह प्रथा नसल्याने ‘पिता’ या अर्थाने पुरुषाचा परिचय झालेला नव्हता. पण याकरिताच जणू, निसर्गाने एक शारीरिक वरदान स्त्रीला दिलेले आहे नि ते म्हणजे वय वर्षे ४५ नंतर ती रजोनिवृत्त होते.. आणि कोणत्याही प्राणीजातीत नाही, पण फक्त मनुष्यजातीत ‘आजी-पालकत्वाचा’ जन्म होतो.
आजीच्या या भूमिकेचा शोध १९९९ मध्ये अमेरिकी मानववंशतज्ज्ञ डॉ. निकोलस जोन्स यांनी उत्तर टांझानियामधील आदिम अवस्थेत राहणाऱ्या ‘हादसा’ जमातीच्या अभ्यासातून जगासमोर आणला. ही आजी म्हणजेच स्त्रीची माता, ही पुढे आपल्या मुलीची मुले सांभाळते आणि यामधूनच उद्भवली ती माता, आजी, मावशा, बहिणी यांची एकत्रित मातृप्रधान कुळव्यवस्था! ही मातृकुळे, शेकडो शतके स्त्रीला तिच्या अपत्य संगोपनात आधारभूत ठरली.
वास्तविक नवजात पिढीला जगविण्याचा विचार निसर्गातून सुरू होऊन, तो मातेकडे येऊन थांबतो. त्यापुढील जबाबदारी मातेला पेलता यावी म्हणून निसर्ग त्याकरिता विस्मयकारक शारीरिक, बौद्धिक क्षमतांनी मातांना परिपूर्ण करीत असतो. पशु-पक्ष्यांबाबत निसर्ग ही काळजी घेताना दिसतोच, पण मनुष्यप्राण्यातसुद्धा गर्भार स्त्रीच्या गर्भाशयात बाळासाठी मऊ अस्तराची गादी, बाळाभोवती त्याच्या संरक्षणासाठी राखलेले पाणी, नाळेद्वारे मातेचा अन्नरस बाळाला मिळण्याची व्यवस्था, बाळ जन्माला आल्यावर मातेला बाळाच्या पोषणासाठी येणारे दूध, त्यामध्ये बाळाच्या संरक्षणासाठी असणारी रोगप्रतिकार पिंडे, हे सर्व पाहता, माणसाचे याबाबत कसलेही योगदान नसताना निव्वळ निसर्गाकडून घेतली जाणारी ही प्रत्येक खबरदारी, निसर्गाला नवजाताची असणारी काळजी दर्शविते. पुढेसुद्धा बाळाच्या जन्मानंतर त्याच्या संगोपनासाठी मातेमध्ये ममत्वाची भावना निर्माण करणारी हार्मोन्स रक्तात सोडण्याचे काम निसर्गत: होत असते. या सर्व घटनांचा अर्थ एकच आहे नि तो म्हणजे बालकाच्या गर्भाशयातील जडणघडणीपासून ते, बालक पूर्ण स्वावलंबी होईपर्यंत निसर्गाने, नवजाताला आणि त्याला वाढविणाऱ्या मातेला प्राधान्य क्रमांकावर ठेवलेले आहे.
आज ‘बालक-प्राधान्य’ हे नैसर्गिक तत्त्व इतर सस्तन प्राण्यांत जसेच्या तसे टिकून आहे. मानव जातीमध्ये मातृ-संस्कृती असेपर्यंतसुद्धा ते टिकून होते. पण मग, विवाहप्रथा स्वीकारल्यानंतरच्या सुमारे ४ हजार वर्षांच्या पितृसंस्कृतीच्या वाटचालीत हे तत्त्व कितपत टिकून राहिलेले आहे? कुटुंबात, शाळेत, समाजात म्हणजे बालकाचे जिथे जिथे वास्तव्य किंवा संचार आहे, त्या ठिकाणी बालकाला केंद्रस्थानी ठेवून किती सुविधा, नियम-कायदे आणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे?
आपल्या देशामध्ये छळित आणि दुर्लक्षित, निष्प्रेम वाढलेल्या बालकांची संख्या लक्षणीय आहे. म्हणजे गर्भधारणेपासून अगदी काळजीपूर्वक निपज व तरतुदी करून निसर्गाने आपल्या हाती सोपवलेल्या नवजात मानवी अर्भकाची, पुढे ही अशी दुर्दशा होण्याचे कारण काय आहे? आज आपल्याकडे अशा पीडित बालकांसाठी अनेक संस्था कार्य करीत आहेत. हा त्या त्या बालकाच्या पुनर्वसनासंबंधीचा उपाय आहे. जो महत्त्वाचा आहे. पण पुनर्वसन म्हणजे, त्या समस्येचे निर्मूलन नाही, हे लक्षात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. फक्त काही दुर्लक्षित बालकांचे पुनर्वसन एका बाजूला होत राहील. पण सर्व छळित बालके या पुनर्वसनात येऊ शकत नाहीत. शिवाय नव्याने बालके छळाला बळी पडणे, हेसुद्धा या पुनर्वसन कार्याने थांबणार नाही. बालकांच्या छळाची कारणे वेगळीच आहेत. बालकांच्या समस्यांचे निर्मूलन करायचे असेल, तर त्यांच्यावर अशी स्थिती आणणाऱ्या कारणांचा शोध घ्यावा लागेल आणि त्या कारणांमधून अशा बालकांची आपल्याला पहिल्या प्रथम सुटका करावी लागेल. ही कठीण गोष्ट आहे, हे खरच. कारण त्या कारणांमध्ये स्त्री-पुरुषांचे हितसंबंध आणि विशेषत: पुरुष सत्तेचे स्वार्थ गुंतलेले आहेत. तरी मानवजातीला विनाशापासून वाचवायचे असेल, तर ती कारणे आपल्याला माहिती करून घ्यावी लागतील. त्यापैकी जे अगदी मुळाशी दडपले गेलेले प्राचीन आणि म्हणून पहिले कारण म्हणावे लागेल, ते म्हणजे नांगराच्या नव्या शेतीतंत्रामुळे जो पितृकुल व्यवस्थेचा सुमारे ३-४ हजार वर्षांपूर्वी उदय झाला, त्यामुळे मातृकुळातील आजी, मावशा, भाऊ, मामा यांच्या अखंड प्रेमाचा स्रोत खंडित होऊन ‘माता-मूल’ या नैसर्गिक नात्याचे संरक्षण करणारा आधारवड कोसळला. निसर्गतत्त्वाप्रमाणे, स्त्रीचे मूल हे कोणत्या पुरुषापासून आहे, हे महत्त्वाचं नाही, तर त्या मुलाचे नीट संगोपन करून सकस, जोमदार पिढी घडवणे, हे सर्वोच्च महत्त्वाचे
असते. मातृकुळात, विवाह प्रथा नसल्यामुळे ती तंतोतंत या निसर्गतत्त्वावर उभी होती.
कोणत्याही पुरुषापासून होणारे स्त्रीचे मूल मातृकुळात स्वीकारले जाणे, ही स्वाभाविक बाब होती. मातृकुलातील स्त्रियांची स्त्रीला असणारी मदत ही कोणत्याही अटी-तटीवर नव्हती. स्त्रीला बाळंतपणात किंवा आजारपणात, आई, आजी, मावश्यांकडून जिव्हाळा, विश्रांती, सेवा उत्स्फूर्त प्रेमातून मिळत होती. बाळाच्या अपमृत्यूमध्ये या रक्तसंबंधी नातलग स्त्रियांचा स्त्रीला मानसिक आधार मिळत होता आणि मातेचा अकाली मृत्यू झाल्यास तिच्या अपत्यांना आधार देणारे आणि त्यांचे ममतेने संगोपन करणारे अनेक हात मातृकुळात होते. अर्थात ‘अनाथ’ किंवा ‘परित्यक्ता’ वगैरे कल्पनांनी मातृसंस्कृतीला स्पर्श केलेला नव्हता, हे स्पष्टच आहे.
पितृसंस्कृतीत हेच सर्व फासे आपल्याला उलटे फिरलेले दिसतात. प्रत्येक स्त्रीच्या अपत्याला त्याचा पिता दाखवता आला पाहिजे, नाही तर ते मूल अनैतिक, हा विवाहाचा पहिला महत्त्वाचा दंडक राहिल्यामुळे, स्त्री-पुरुषाच्या विवाहबाह्य़ संबंधांतून गेल्या चार हजार वर्षांत
जन्मलेली जगातील अब्जावधी बालके कुटुंबाच्या बाहेरच टाकली गेली. विवाह रूढ झाल्यावर जन्मलेल्या अशा असंख्य मुलांना पिता तर नाहीच मिळाला, पण हक्काची माताही अनेकांना गमवावी लागली. नैसर्गिक नैतिकतेला बसलेला हा मोठा धक्का म्हणावा लागेल. त्यातून त्या बालकांना प्राप्त झालेली गरिबावस्था, शिवाय त्यांच्या मातांवर लादल्या गेलेल्या वेश्या व्यवसायाबरोबर, महिलाश्रम, बालकाश्रम, अनाथाश्रम, भटकी, बेघर, भिकारी बालके, व्यसनी-गुन्हेगार, कामगार बालके हे या व्यवस्थेचे दुष्परिणाम आपण कायमचे हाती घेऊन बसलो आहोत. अनैसर्गिक पद्धतीने माणूस घडविण्याचा एक प्रवास यातून केव्हा सुरू झाला, हे कळलेच नाही. यामधून मातृसंस्कृतीत अज्ञात असणारा, कुटुंबबाह्य़ असा एक स्त्री-पुरुषांचा समाज पुढील काळात उभा राहिला. मातेविना आनंददायक बालपण हरवलेली आणि एकूण ममतेचा स्पर्श गमावलेली ही बालके पुढे प्रौढपणात आपल्या कुटुंबीयांना प्रेम देण्यात कमी पडत गेली. साहजिक पुढील मानवी पिढय़ांत निष्प्रेम किंवा छळित मुलांची संख्या वाढत गेली आणि अनाथाश्रम हे वेश्या व्यवसायाप्रमाणे पितृसंस्कृतीचे अविभाज्य अंग झाले.
खुद्द विवाहित माता-पिता असणाऱ्या कुटुंबात तरी ‘माता-मूल’ नात्याची काय परिस्थिती होत गेली? भारताबद्दल बोलायचे झाल्यास पतिगृहात प्रवेश केलेल्या स्त्रीला (अपवाद वगळता) स्वत:ला प्रेम, सेवा, विश्रांती, आधार मिळण्याऐवजी सासू, सासरे, दीर, नणंदा, पती यांच्या आज्ञा मानीत त्यांना सेवा आणि विश्रांती किंवा आधार देणे, हे तिचे पहिले कर्तव्य झाले. पडेल ते काम करीत राहणे, मिळेल ते अन्न पत्करणे किंवा उपाशी राहणे, मुलगा होईपर्यंत मुले जन्माला घालणे आणि वाटय़ाला येणारे अपशब्द, अपमान गिळणे, या सर्व अटी-शर्तीने वागल्यास त्या स्त्रीचे त्या घरातील अस्तित्व मान्य केले जाऊ लागले. नाही तर तिला घराबाहेर काढणे वा तिची आत्महत्या\ हत्या हे ठरलेलेच होते आणि आजही आहे. साहजिक पहिल्या प्रथम ‘स्वत:चा बचाव’ करणे हा पितृसंस्कृतीत स्त्रीच्या कंठाशी आलेला मुद्दा झाला. वैवाहिक कुटुंबात, अशा रीतीने मातेच्या छळाची परंपरा निर्माण झाल्याने, ती माताही आपल्या अपत्यांना पुरेसा वेळ देऊ न शकणारी, अतिश्रमामुळे अपत्यांना ममत्व देण्याच्या शारीरिक-मानसिक स्थितीत नसणारी, वेळप्रसंगी परिस्थितीचा राग मुलांवर काढणारी, अशी घडत गेली. तिला व तिच्या मुलांना सावरणाऱ्या जुन्या काळातील तिच्या आई, मावश्या, बहिणी आपापल्या पती कुटुंबात अडकल्या गेल्यामुळे, पिता लाभणाऱ्या मुलांचेही प्रश्न मातेबरोबर हळूहळू उभे राहू लागले, ते अगदी आजच्या माता-पिता नोकरीला जाण्याच्या काळात घरात एकाकी, असुरक्षित आणि टी.व्हीसमोर वाढणाऱ्या बालकांपर्यंत!
एकूणच पितृ-प्राधान्य असणाऱ्या कुटुंबातील ‘बालक-प्राधान्य’ कधीचेच लयास गेलेले आज आपण पाहत आहोत. कुटुंबामध्ये पती-पत्नीच्या मतभेदाचा, भांडणाचा प्रश्न असो, कुटुंबाच्या संपत्तीचा प्रश्न असो, आई-वडिलांच्या महत्त्वाकांक्षेचा, करिअरचा प्रश्न असो, आईला बेघर करण्याचा प्रश्न असो, इथे मुलांचा कुठेच विचार नाही. कुटुंब\ घर हे जणू त्यांच्याकरिता नाहीच आहे. स्त्री-पुरुषांनी लग्न करून-सवरून ते जमले-टिकले तर मग त्यामध्ये मुलांना राहायला द्यायचा विचार आहे. ‘अपत्यांसाठी तत्काळ नि पहिला निवारा’ या निसर्ग-मूल्याची जाणीवच आपल्यामध्ये आता उरलेली दिसत नाही. पाळणाघरे, अनाथाश्रम, रिमांड होम्स ही अभिमानाची केंद्रे बनून, त्यांना देणग्या देऊन ती व्यवस्था मजबूत करण्यात आपण मग्न आहोत.
म्हणून इथे पहिल्या प्रथम एक सत्य मान्य करून पुढे गेले पाहिजे की, विवाह हा ‘पुरुषाचे पितृत्व’ निश्चित करण्यासाठी आणला गेलेला एक उपाय आहे. ती काही स्त्रीला स्वास्थ्य-सुरक्षा व मदत देण्याची आणि बालकाला पिता मिळवून देण्याची सोय नव्हती. याचा अर्थ असा की, ‘पुरुषापासून मूल होते’ हे समजल्यावर निसर्गाने बेतून दिलेले ‘माता-मूल’ नाते मानवाकडून संकुचित केले गेले, त्याचे महत्त्व ‘पितृत्वा’च्या महत्त्वापुढे गौण ठरविले गेले. किंबहुना त्या नात्याला तोडण्याचा प्रयत्न खूप सहज शक्य झाला. जर कुटुंबातच मुलांचा विचार नाही तर तो समाजात कुठून येणार? म्हणून मुलांसाठी जाणीवपूर्वक बनवलेली क्रीडांगणे फारशी नाहीत, शाळा पुरेशा नाहीत वा वर्गात बसायला जागा नाही, प्रवासाची सुरक्षित साधने नाहीत, आरोग्य वा स्वच्छतेच्या सुविधा नाहीत आणि मुलांसाठी जे काही आहे ते चिंताजनक आहे. म्हणजे शाळेत पक्षपात आहे, वर्गात त्यांची फजिती करण्याची वृत्ती शिक्षकांत आहे, अपमानास्पद शिक्षा आहेत, त्यांच्याप्रति निष्काळजीपणा आहे, असुरक्षितता आहे, त्यांच्या मनोरंजनाची माध्यमे हिंसक आहेत, बालकांचे अपहरण आहे, खंडणीसाठी किंवा अंधश्रद्धेने त्यांच्या हत्या आहेत. त्यांचे गुन्हेगारीकरण आहे, लैंगिक शोषण आहे. हे सर्वसाधारण सर्वच गरीब-श्रीमंत, सुशिक्षित-अशिक्षित वर्गातील मुलांसंबंधीचे वास्तव आहे. या अशा आजारी वास्तवात वाढणाऱ्या बालकांपासून ते तरुणांपर्यंतच्या आयुष्यात त्यामुळे, आज मानसिक प्रक्षोभ आणि निष्ठुरता ही स्वाभाविक प्रवृत्ती झालेली आहे. त्यातून वाढलेली हिंसक, अस्थिर वृत्ती आणि बलात्कारापासून ते दहशतवादापर्यंतचे सर्व प्रश्न मानवी समाजात उभे ठाकलेले आपण पाहतो. ही आजची गोष्ट नाही, हे दुष्परिणाम गेली काही हजार वर्षे रुजले जाऊन, ते भोगत आणि त्यावर आधार केंद्राद्वारे वरवरचे उपाय योजित आपण आज इथवर आलेलो आहोत. मातृकुळातील ममत्वाला माणूस पारखा झाल्याचे हे पहिले थेट परिणाम म्हणावे लागतात, जे आज आपल्या लक्षात येणेसुद्धा अवघड झालेले आहे. इथे असेही लक्षात येते की, ज्या ज्या समाजात किंवा संस्कृतीत स्त्रीची ससेहोलपट आहे, तिथल्या बालकांचे प्रश्न अधिक गंभीर आहेत आणि म्हणूनच ते ते सर्व समाज अस्वस्थ आणि अशांत दिसतात. जसा आजचा अतिरेकी टोळ्यांचा समाज आहे.
म्हणून ‘माता-मूल’ हे निव्वळ नैसर्गिक जवळिकीचे नातेच नाही तर तो एक आणि एकत्र विचार आहे. तो विचार एकमेकांपासून वेगळा होत नाही आणि तो विचार एकमेकांपासून वेगळा न करणे हीच खरी संस्कृती आहे. माता व मूल यांच्या शारीरिक जोडणीतून त्या दोघांचे जीवन आणि भविष्य एकमेकांशी जोडलेले असते. याबाबत, डॉ. नॉर्मन डोईज आपल्या ‘दि ब्रेन दॅट चेंजेस इट सेल्फ’ या पुस्तकात नोंदवतात, ‘‘अर्भकाच्या मातेच्या शब्दांचा नाद, तिचा आवाज, हे अर्भकाच्या मेंदूच्या उजव्या भागात स्वीकारले (रिसीव्ह) जाऊन, पुढे ते अर्थरूपात प्रोसेस होत असते. मातेच्या मेंदूच्या उजव्या भागाद्वारे, अर्भकाच्या मेंदूचा उजवा अर्धा भाग हा अशा रीतीने विकसित होताना, शब्दाचे अर्थ जरी अर्भकाला समजले नाहीत, तरी मातेचे सूर, तिच्या चेहऱ्यावरील भाव आणि तिचे हावभाव यावरून नि:शब्द भावना जाणण्याचा मेंदूचा विकास अर्भकाच्या जन्मानंतर पहिल्या १६ ते १८ महिन्यांत होत असतो.’’ डॉ. डोईज म्हणतात, ‘‘ज्या बालकाला तान्ह्य़ा वयातच माता गमवावी लागते, त्याच्यामध्ये नि:शब्द भावना ओळखण्याच्या व हाताळण्याच्या कौशल्याचा कायम अभाव राहतो. त्यामुळे तरुणपणात दुसऱ्या व्यक्तीच्या भावनेशी जोडून घेण्यात, ते बालक आपल्या आयुष्यात अपयशी ठरते.’’
दुसऱ्या महायुद्धात, रेने स्पित्झ या संशोधकाने दोन प्रकारच्या अर्भकांचा अभ्यास केला. मातांबरोबर तुरुंगात असणारी अर्भके आणि माता गमावलेली अर्भके, जी अनोळखी आयांच्या देखरेखीखाली वाढत होती. तो म्हणतो की, ‘‘मातेशिवाय असणारी ही मूले बौद्धिक विकासात कमी पडत जातात. ती मागेपुढे अस्वस्थपणे झुलत राहतात, हाताच्या निर्थक हालचाली करतात. आजूबाजूला त्यांच्याशी बोलणाऱ्या व्यक्तींना ती कोणताही प्रतिसाद देत नाहीत. त्यांच्या नजरेत काही तरी गमावल्याचे मोठे दु:ख भरलेले असते.’’
या संशोधनाच्या पाश्र्वभूमीवर तपासल्यास आपल्या देशात स्त्रीचे तान्हे मूल, तिला शिक्षा म्हणून पतीने आपल्या ताब्यात ठेवणे, हा तर अगदी स्त्री-छळाचा ‘लोकप्रिय’ प्रकार आहे. एरवीसुद्धा मातेचा अपमान किंवा तिला मारहाण डोळ्यादेखत पाहावी लागणारी बालके कोणत्या परिणामांतून तरुण वयात प्रवेश करीत असतील याची कल्पना येते. मातेच्या सान्निध्यात तिच्या विनाअट (४ल्लूल्ल्िर३्रल्लं’) प्रेमाबरोबरच तिचा स्पर्शसुद्धा बालकांचा विकास घडविणारा असतो. याबाबत डॉ. थेरेसा क्रेन्शाव म्हणतात, ‘‘मातेने बालकाला जवळ घेऊन कुरवाळण्यामुळे एन्डोर्फीन हे हार्मोन बालकाच्या मेंदूकडून रक्तात सोडले जाते, ज्याचा उपयोग बाळाचे कोणतेही दु:ख व भीती शमविण्यासाठी होत असतो. मातेच्या स्पर्शात बालकाच्या आत्मविश्वासाची सुरुवात असते. त्याचप्रमाणे या स्पर्शाने ऑक्सिटोसिन या ममत्वाच्या होर्मोनची बालकामधील पातळी वाढते. बालकाच्या बाबतीत ‘प्रेमाचा स्पर्श’ ही त्याला माणूस म्हणून घडविणारी त्याच्या आयुष्यातील पहिली घटना असते. या स्पर्शाच्या उणिवेमुळे, बालकाच्या व्यक्तिमत्त्वामध्ये त्रुटी राहतात.’’ म्हणून या स्पर्शाला डॉ. क्रेन्शाव ‘टी टॉनिक’ संबोधतात. एखादे बालक जन्मत:च सोडून दिले गेले आणि ममत्वाच्या स्पर्शापासून कायम अनभिज्ञ राहिले, तर त्याचा परिणाम हा त्याच्या मेंदूच्या काही पेशी नष्ट होण्यामध्ये होतो, असेही डॉ. क्रेन्शाव नोंदवतात. यावरून माता-मूल सान्निध्याचे महत्त्व लक्षात येते.
हे प्रेम, हा हळुवार स्पर्श गमावलेल्या भटक्या, बेघर, अनाथ बालकांना त्यांच्या व्यथा, वेदना, अपमान व्यक्त करता याव्यात, असे जवळचे कोणीही नसते. मनाच्या आतून असणारा एकटेपणा त्यांना आयुष्यभर छळत राहतो. बालपणीच मातेअभावी, आत्मविश्वास निर्माण न झाल्यामुळे त्यांना महत्त्वाकांक्षा नसते, कोणतीही मोठी स्वप्ने नसतात. अन्य सुखवस्तू बालकांच्या तुलनेत अशा अनैसर्गिक संस्कारात वाढलेल्या बालकांतून निर्माण झालेले स्त्री-पुरुष हे मानसिक, बौद्धिक, आर्थिक विकासात कायम मागे असतात. किंबहुना, मातेच्या किंवा तत्सम ममत्वाच्या व्यक्तीअभावी प्रेमभावनेची संवेदना गमावलेले हे तरुण अस्वस्थ राहून, ते समाजकंटकांच्या हाती पडल्यास, हिंसक किंवा विकृत निपजण्याचा संभव वाढतो. साहजिक सामाजिक स्वास्थ्य आणि सुरक्षितता यासंबंधीचे प्रश्न समाजात उभे राहतात.
याचा अर्थ प्रगल्भ, दर्जेदार, सकारात्मक स्त्री-पुरुषांच्या जडणघडणीसाठी बालक-बीजाची निकोप जोपासना महत्त्वाची आहे. बीजाच्या रुजण्यात मातीचे असणाऱ्या महत्त्वाइतकेच, बालकांच्या मातेचे महत्त्व आपण मानवी जीवनात प्रस्थापित करायला हवे आहे. माता-पिता दोघेही बालकाला प्राप्त झाल्यास उत्तमच, आजच्या स्त्रियांना मिळणाऱ्या विविध संधींचा त्या घेत असलेला फायदा कुटुंबालाही मिळत असतो. त्यामुळे पुरुषांचीही या पुढच्या काळात समाजातली, कुटुंबातली भूमिका महत्वाची ठरणार आहेच पण किमान माता बालकाला लाभणे हा तर त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे.
पिता माहीत नाही, म्हणून जी मुले पितृव्यवस्थेने अनौरस ठरवलेली आहेत, त्या सर्वाना आईबरोबर सन्मानाने जगता येण्यास आपण प्राधान्य दिले पाहिजे. संबंधित पिता त्याची काळजी घेत नसेल, तर त्या बालकाचा खर्च तरी किमान त्या पित्याने देणे त्यास बंधनकारक केले गेले पाहिजे. हा खर्च न दिला गेल्यास तो दखलपात्र गुन्हा ठरवला जाऊन त्या पित्यावर फौजदारी कारवाईची तरतूद पाहिजे. बालकावरील कोणताही अन्याय हा अशा प्रकारे गंभीरपणेच घेतला गेला पाहिजे. घरातील आई-मुलांचा, पुरुष स्वत:च्या वर्तनाने वा व्यसनाने छळ करीत असेल, तर अशा पुरुषांना घराबाहेर वेगळ्या संस्थेत दाखल केले गेले पाहिजे. जी माता कष्ट करून आपल्या तुटपुंजा वेतनात मुलांचे पोषण-शिक्षण करीत असते, तिला पतीकडून धोका असल्याच्या सबबीखाली घराबाहेर काढून, चालवली जाणारी महिला आधार केंद्रे म्हणजे बालकविरोधी आणि पुरुषधार्जिण्या उपाययोजना आहेत. त्याऐवजी जो कुटुंबीयांचा छळ करतो, त्या पुरुषांसाठी सुधार केंद्रे हवीत. मातांना अपत्यांपासून दूर करणारी ही शासन पुरस्कृत महिला केंद्रे, पुरुषाचा बेजबाबदारपणा वाढविणारी आणि मातेविना राहणाऱ्या त्यांच्या बालकांना पित्याच्या भीतीमुळे घरातून पळवून लावणारी आहेत. ज्यातून गुन्हेगारीचे चक्र नव्या जोमाने फिरतच राहते. आज बालकांवरच उलटणारे जे जे कायदे, संस्था, परंपरा अस्तित्वात असतील त्यावर पुनर्विचार केला गेला पाहिजे. अपवादात्मक शारीरिक-मानसिक गंभीर आजार असणारी माता वगळता वयाच्या १५ वर्षांपर्यंत मुलगे आणि मुली या मातेबरोबरच राहतील, असा नि:संदिग्ध कायदा असायला हवा. पुरुषाच्या कोणत्याही व्यक्तिगत फायद्यासाठी मातेचे सान्निध्य, तिचा सहवास आणि तिच्या प्रेमापासून अपत्यांना दूर करणे, हासुद्धा दखलपात्र गुन्हा ठरवला गेला पाहिजे. ज्या बालकांनी अपघातात किंवा आजारपणात पिता गमावलेला आहे किंवा पित्याने ज्यांना झिडकारले आहे, अशा ‘मदर-ओन्ली-फॅमिलज्’साठी समाजाने आणि सरकारने त्या कुटुंबातील बालकांना अन्न-वस्त्र, शिक्षणापासून सर्व सुविधा सहजपणे मिळू देण्याचा संवेदनशील प्रयत्न केला पाहिजे. अनावश्यक मुले जन्माला येऊ न देणे, हा जन्मलेल्या मुलांना दिलेला पहिला न्याय होईल. यातून बालकप्रधान व्यवस्थेचा जाहीरनामा खालीलप्रमाणे मांडता येईल. १) बालकाचा मातृसान्निध्याचा अधिकार कायदेशीर व्हावा.
२) बालकाच्या उत्कृष्ट विकासासाठी जनन नियंत्रण हवे. ३) बालकाला तातडीची व दर्जेदार वैद्यकीय सेवा हवी. ४) बालकाची पहिलीपर्यंतची शाळा त्याच्या राहत्या ठिकाणीच हवी. ५) मुलांचा अपमान, त्यांना देण्यात येणारी छळात्मक वागणूक याबाबत स्वतंत्र न्यायालये राखून कडक शिक्षा, तिची अंमलबजावणी त्वरित हवी. ६) माता-पित्याच्या वेगळे होण्यात मुलांचा ताबा
१५ वर्षांपर्यंत आईकडे असण्याचा व बापाने आर्थिक आधार बाहेरून देण्याचा नि:संदिग्ध कायदा हवा.
नुकतीच भारतात घडलेली दुर्दैवी घटना, या विषयासंदर्भात बोलकी आहे. गुवाहाटीमध्ये राहणाऱ्या एका शाळकरी मुलीचा तिच्या सावत्र बापाने केलेला छळ, तिला कोंडून केलेली मारहाण आणि तिचे लैंगिक शोषण आणि त्यात सख्ख्या आईचा कोणताही न मिळालेला आधार, यामुळे ती मुलगी १४-१५ व्या वर्षीच घरातून कोणी एका ड्रायव्हर पुरुषाचा आधार घेऊन पळाली. आई-वडिलांचे प्रेम न अनुभवलेली ही मुलगी, घराबाहेर स्वत:ला जगविण्यासाठी आधार आणि पैसा शोधत राहिली. पैशाकरिता कित्येक पुरुषांशी ती संबंध ठेवून राहिली. त्यातून वर्षांच्या अंतराने तिला लहान वयात झालेल्या दोन मुलांना नाइलाजाने पुनश्च आपल्या आई व सावत्र बापाकडे ठेवून ती खर्चाच्या विवंचनेत घराबाहेर पडली. ताटातूट झालेल्या या माय-लेकरांमध्ये प्रेम-ममत्वाचे बंध पुढे कधी निर्माण झालेच नाहीत. उलट भक्कम आर्थिक आधारासाठी पुरुष बदलणाऱ्या आईबद्दल तिच्या मुलांमध्ये तिच्याबद्दल अविश्वास आणि तिरस्कार निर्माण झाला. माता-मुलांमधील संबंध इतके निष्प्रेम व संशयास्पद होत गेले की त्याचे पर्यवसान अखेर स्वत:च्या मुलीला मातेने जिवानिशी मारण्यामध्ये झाला. या घटनाक्रमाने हादरलेला संपूर्ण भारतीय समाज तिचा दुष्ट माता म्हणून निषेध करीत आहे, कारण तेच फार सोपे आहे. पण या मातेला स्वत:च्या बालिकावस्थेत जो छळाचा नि असुरक्षिततेचा प्रवास एकटेपणाने करावा लागला, त्याकडे संवेदनशील होऊन पाहिल्यास, स्वत:च्या आईचे हक्काचे प्रेम व सहवास न मिळाल्यामुळे मुलगे जसे गैरमार्गाकडे, व्यसनाकडे सहज वळू शकतात तशी एखाद्या मुलीचीही संवेदनहीन, निष्ठुर माता बनू शकते आणि त्यातून तिची पुढील पिढीसुद्धा बरबाद कशी होते, हे जर जाणता आले, तर प्रश्न सोडविण्याचा मार्ग त्यातून दिसणार आहे.
या स्थितीला स्त्री किंवा पुरुष मूलत: जबाबदार नाहीत, तर त्यांना चुकीच्या नैतिक मूल्यांतून वाढविणारी ही व्यवस्था जबाबदार आहे. पण ती व्यवस्था पुढे नेणारे स्त्री-पुरुषच तर आहेत. स्त्रीने किंवा पुरुषाने पालक म्हणून अपत्यांना समजून न घेणे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांचा छळ करणे हे बालपणात त्यांना त्यांच्या पालकांकडून व समाजाकडून काय वागणूक मिळालेली आहे, त्यावर बहुतांशी अवलंबून आहे. थोडक्यात, स्त्री-पुरुषांचे व्यक्तिमत्त्व, वर्तन-वृत्ती या सर्वाचे मूळ त्यांच्या बालपणात गुंतलेले असते. म्हणून बालकांस अधिक महत्त्व देण्याची पावले जर आपण वेळीच उचलली नाहीत, तर समाजातील दुर्दैवी घटना निव्वळ कायदे आणि चर्चा करून टळणार नाहीत.
आपण पुरुषप्रधान व्यवस्थेचा एक प्रयोग गेली सुमारे चार हजार वर्षे करून पाहिला, पण तो करताना बालकांची हेळसांड आणि माता-मूल नात्याच्या झालेल्या हानीमुळे आपल्या जीवनातील नैतिक स्थिती मात्र रसातळाला गेली. आज यामधून जर आपल्याला सावरायचे असेल तर त्याकरिता यापुढे अशा ‘बालकप्रधान’ समाजाची मागणी आपल्याला सतत लावून धरावी लागणार आहे.

मंगला सामंत 
mangalasamant20@gmail.com