‘‘काल रात्री त्याचं आणि त्याच्या बाबांचं भांडण झालं. रात्री उशिरा घरी येतो. बाहेरूनच खाऊन येतो. मग अन्न वाया जातं. पुन्हा रात्री लवकर झोपत नाही. दोन-अडीच-तीनपर्यंत मोबाइल, नेटवर असतो. मग सहाजिकच सकाळी उशिरा उठतो. त्यावरून बाबा त्याला बोलतात मधून मधून. पण यावेळी ते जास्तच चिडले होते. त्यामुळे बरंच बोलले. मग धनूनेही उलट उत्तरं दिली. शब्दाने शब्द वाढत गेला. मग धनू रागाने ‘एवढं असेल तर मी घर सोडून जातोच,’ असं म्हणून रागाने घराबाहेर पडला. आम्हाला वाटलं येईल थोडय़ा वेळाने परत. पण रात्री काही तो आला नाही. उशीर खूप झाला होता त्यामुळे आम्ही कुणाला, त्याच्या मित्रांना वगैरे फोन करत बसलो नाही. पण सकाळीही धनू आला नाही त्यामुळे काळजी वाटतेय.’’ धनेश वय १५, नववीचा विद्यार्थी, त्याची आई मला सांगत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तिच्याशी बोलताना कळलं की धनेश हुशार आहे. शाळेत एक हुशार आणि मेहनती विद्यार्थी म्हणून सगळे ओळखतात. खूप बोलका नाही; पण तो अबोलही नाही. वडील खूप शिस्तीत वाढले होते आणि त्याच शिस्तीत मुलाला – धनूला वाढवू इच्छित होते. त्यामुळे बाप लेकाचे सारखे खटके उडत होते. बोलता बोलता धनूची आई म्हणाली, ‘‘धनू त्याच्या मामाचा खूप लाडका आहे. त्यांचं खूप छान पटतं. बरेचदा तो बाबांना म्हणतो की तुम्ही मामासारखे का वागत नाही? काय आहे की मामा त्याच्याशी इतकडच्या तिकडच्या बऱ्याच विषयांवर गप्पा मारतो. गप्पा मारता मारता धनू काय करतोय. त्याचे मित्र कोण कोण आहेत, त्याला पुढे काय शिकायचं आहे, त्याला काय आवडतं, काय आवडत नाही, त्याला गर्लफ्रेंड आहे की नाही-असल्या सगळ्या चौकशा करतो. धनूच्या ते लक्षात येतंही पण मामाची बोलण्याची पद्धत इतकी वेगळी असते की त्याला मामाचा राग येत नाही. धनूच्या बाबांचा स्वभाव थोडा गंभीर आहे. शिवाय स्वत:चा उद्योग असल्याने त्यात ते कायम बिझी असतात. आणि उद्योग म्हटलं की त्यात वर खाली असतंच त्याचा वेगळा ताणही असतो. शिवाय ते अनेकदा टूरवर असतात. मग जे काही दिवस ते  घरात असतात त्यात त्यांना धनूचं जागणं, उशिरा येणं वगैरे दिसत रहातं आणि खटकतही रहातं. धनूच्या वयाची बहुतेक मुलं अशीच वागतात हे मी त्यांना अनेकदा सांगितलंय पण यांना हे पटत नाही. त्याचं म्हणणं मुलांना शिस्तही असायलाच हवी आणि याच वयात लावायला हवी. पण त्यामुळे त्यांच्यात आणि धनूत अंतर पडतय, हे त्यांच्या लक्षात येत नाहीए. मला मान्य आहे की असं वागणं धनूलाच पुढे त्रासदायक ठरू शकेल. आत्ताच्या त्याच्या या वयात त्याला ते  कळत नाही. तसा धनू थोडा संवेदनक्षमही आहे. पण वेडंवाकडं काही करणार नाही याची आई म्हणून मला खात्री वाटते. पण अहो, आपण हल्ली काय काय भयंकर घटना ऐकतो म्हणून फार काळजी वाटतेय आम्हा दोघांना. म्हणून जरा रागवतो इतकंच.’’

‘‘मग मामाला फोन लावून पहा. दुसऱ्या शहरात असला तरी धनूला एवढा प्रवास करणं कठीण नाही.’’ मी म्हटलं. तेवढय़ात धनूच्या मामाचाच फोन आला आणि धनू तिथे असल्याचं कळलं. दोन दिवसांनी मामा स्वत:च धनूला घेऊन येणार होता. सर्वाची काळजी मिटली. पण तो आल्यानंतर त्याच्याशी बोलणंही गरजेचं होतं.

काही दिवसांनी मला धनेश-धनू भेटला. शांत होता आणि म्हणून मनमोकळेपणाने बोलला. त्याच्याशी बोलताना लक्षात आलं की त्याला बाबांच्या शिस्तीच्या कल्पना फारच जाचक वाटत होत्या. इतकंच नाही तर बाबांना आपण आवडत नाही, त्यांचे आपल्यावर प्रेम नाही, आपण त्यांना त्यांची ‘जबाबदारी’ वाटतो, असे काहीसे ग्रह त्याने करून घेतले होते. शिवाय त्यांच्या धंद्याविषयी बोलताना सारखे ‘हे मी तुझ्यासाठी करतोय धनू’, हे बाबांचे उद्गार त्याला खटकत असत. आणि हे सारे त्याच्या सहनशक्तीपलीकडे  गेले होते, त्याला सारं असह्य़ झाले होते. दोघांमध्ये विचारांची दरी पडलेली होती. आत्ताच ती सांधणे गरजेचे होते. अन्यथा ती कधीच भरून न येणारी, खोल झाली असती. त्यावर उपाय म्हणजे धनू आणि त्याचे बाबा दोघांशी बोलून, त्यांना एकमेकांबद्दल वेगळा दृष्टिकोन देऊन, वागण्यात -बोलण्यात योग्य तो बदल करणे गरजेचे होते.

अनेकदा आपल्याला जे भावनेच्या स्तरावर उत्कटतेनं वाटतं ते नेहमीच सत्य असतं असं नाही. एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या घटनेबाबत, एखाद्या प्रसंगामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट परिस्थितीवेळी कधी कधी आपण काही मतं, काही ग्रह करून घेतो आणि पटकन् प्रतिसाद देतो. काही वेळाने नंतर आपल्याला खरी परिस्थिती कळते आणि आपण ओशाळतो. चूक झाल्याची चुटपूट आपल्याला लागते. कधी कधी आपल्या भावना, आपली मतं किंवा आपली परिस्थिती आपल्यालाच नीट व्यक्त करता येत नाही. त्यानेही गैरसमज तसेच राहातात किंवा निर्माण होतात, वाढत जातात. काही वेळा एखाद्या भीतीमुळे, कसल्यातरी धास्तीमुळे आपण एखादी गोष्ट, कृती, विचार पटले तरी आचरणात आणत नाही. आवश्यक तो बदल आपल्या विचारात आणि वागण्यात करत नाही.

या साऱ्याची काही वेळेस मोठी किंमत द्यावी लागते. कधी नाती दुरावतात-तुटतात. कधी एखाद्या संकटाला आपण आमंत्रण देतो. कधी आपले भरून काढता येत नाही इतके मोठे नुकसान होऊ शकते. जवळच्या नात्यात तर मतभेदाची कारणे अनेक असू शकतात,  मात्र एकमेकांविषयी खोल विश्वास असावा लागतो. पण तोच अनेकदा कमी पडतो. म्हणूनच वेगळा उपाय म्हणजे आपण थोडा आपल्याच वागण्याचा, बोलण्याचा त्रयस्थ पण प्रेमळ नजरेने पाहून विचार करावा. आपण करतो – वागतो तसं आपल्याच प्रेमाच्या व्यक्तीने केले तर? ‘रोल स्विचींग’ किंवा ‘भूमिका बदलणे’ हा एक मस्त उपाय करता येतो.

म्हणजे धनूने बाबांच्या भूमिकेतून स्वत:ला बघायचे आणि बाबांनी धनूच्या जागी स्वत:ला कल्पून विचार करायचा. बाबा करत असलेला  उद्योग त्यात येणारे चढउतार, त्यातील ताणतणाव लक्षात घ्यायचा आणि बाबांनी आपले तरुणपणातले दिवस आठवायचे आणि आजच्या पिढीला थोडी सूट द्यायची.  दुसऱ्या व्यक्तीच्या वागण्यामुळे काही खटकणारे, सलणारे आपल्याला ‘ठीक आहे’ वाटू शकते. बोचणारे काही थोडे बोथट नक्कीच होतात. मग केलेला संवाद ‘सुसंवाद’ ठरू शकतो!

अंजली पेंडसे

manobal_institute@yahoo.co.in

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kathakathan by anjali pendse part
First published on: 07-10-2017 at 01:58 IST