कोल्हापूर : नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेच्या निकालातून येथील विद्या प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या शिष्यवृत्ती बॅचमधील चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
कोल्हापूरचा फरहान जमादार याची ऑल इंडिया रँक (AIR) १९१ आली असून यशवंत मंगेश खिलारी ४१४, सागर भामरे ५२३ आणि सिद्धार्थ तगड ८०९ या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. हे सर्व विद्यार्थी हे विद्या प्रबोधिनीच्या २०२३-२४ मधील मुख्य परीक्षा व मुलाखत शिष्यवृत्तीचे विद्यार्थी होत.
आणखी वाचा-बैलगाडीने जात राजू शेट्टी यांचा उमेदवारी अर्ज दाखल, ‘स्वाभिमानी’चे जोरदार शक्तीप्रदर्शन
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून विद्या प्रबोधिनी नागरी सेवा परीक्षांची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवत असते. निवासी तथा अनिवासी स्वरूपात ही शिष्यवृत्ती दिली जाते. याशिवाय परीक्षेच्या पूर्व, मुख्य आणि मुलाखत या टप्प्यांवर परीक्षार्थींना त्यांच्या गरजेनुरूप अध्ययन सहाय्य केले जाते.
मागील तीन वर्षात शंभरहून अधिक विद्यार्थ्यांना युपीएससी तयारी संदर्भातील ही शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. तर यंदा संस्थेच्या विद्यार्थ्यांनी अंतिम निकालात बाजी मारली आहे. चंद्रकांत पाटील यांनी सर्व यशवंतांचे अभिनंदन केले आहे.देशाच्या जडण घडणीत बिनीचे शिलेदार होऊ घातलेल्या या भावी प्रशासकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी ऊर्जादायी शुभेच्छा दिल्या आहेत.
कोल्हापूरमध्ये कमी खर्चाच्या बरोबरीने अलीकडे दर्जेदार मार्गदर्शन आणि इतर सोयी सुविधा यांची उपलब्धता होत असल्याने पुणे पाठोपाठ कोल्हापूरमध्ये यूपीएससीच्या तयारीसाठी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत आहेत. त्यामुळे लगतच्या काळात कोल्हापूर देखील या परीक्षांच्या तयारीसाठीचे महत्वाचे केंद्र ठरेल असे मत यावेळी प्रबोधिनीचे संचालक राजकुमार पाटील यांनी व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष राहुल चिकोडे यांनी यशवंतांचे अभिनंदन करत लवकरच सर्व यशवंतांचा सत्कार समारंभ तथा संवाद सत्र हा कार्यक्रम कोल्हापूर येथे विद्यार्थी व पालक यांच्यासाठी आयोजित केला जाणार असल्याचे कळविले आहे.