आरती कदम

कुणी महाभागाने तिचा नसलेला न्यूड व्हिडीओ व्हायरल केला आणि नवऱ्याने घटस्फोटाची नोटीस दिली, मुलांना तिच्यापासून तोडण्यात आलं. हा व्हिडीओ माझा नाही हे सांगण्यासाठी ती तीन वर्ष झगडत राहिली..  पण अखेर ती जिंकली, तो व्हिडीओ तिचा नाही हे पोलीस तपासात सिद्ध झालं. पण.. नवऱ्याने तिला कुटुंबात स्वीकारायला नकार दिलाय. जिंकूनही हरलेल्या तिला या व्हिडीओमागचा सूत्रधार शोधण्याच्या निर्धारामुळे जगण्याचा आधार सापडलाय.

Pimpri, Kiwale, pimpri mnc,
पिंपरी : किवळेतील दुर्घटनेनंतर पालिकेला जाग; होर्डिंगधारकांना दिला ‘हा’ इशारा
IAS officer awanish sharan share mpsc examination preparation tip
“इतकंही कठीण नाही” UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द प्रसिद्ध IAS नं दिल्या टिप्स
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा

आपण पवित्र आहोत, हे सिद्ध करण्यासाठी अग्निपरीक्षा दिल्यानंतरही सीतेचा रामाने त्यागच केला. समाजाच्या मानसिकतेमुळे असो वा अन्य काही, बाकी उरलं ते तिचं हतबल, एकाकी होणं! पण आजही ना ‘ती’च्या परिस्थितीत बदल घडला, ना ‘सोडून’ देण्याच्या पुरुषी वर्चस्वात! म्हणूनच स्त्रीचं असहाय होत राहणं सीतेचं बोट धरून थेट केरळच्या शोभापर्यंत येतं. पुन्हा एकदा त्याचीच उजळणी होते आणि एकाकी शोभा, पुरुष आणि नवरासत्ताक जगात बळी ठरते..

सीतेवर ही वेळ आली, कारण तिला रावणाने पळवून नेलं, पण शोभाच्या बाबतीत रावण ठरला तो आधुनिक तंत्रज्ञानाचा विकृत वापर. कुणा एका महाभागाने एका स्त्रीच्या नग्न देहाचा व्हिडीओ समाजमाध्यमातून व्हायरल केला. दुर्दैव असं की, त्या स्त्रीचा चेहरा होता शोभाचा. या घटनेची कोणतीही शहानिशा न करता तिच्या नवऱ्याने या तीन मुलांच्या आईला सरळ ‘टाकून’ दिलं. ती पोटतिडकीने सांगत राहिली, हा माझा व्हिडीओ नाही, पण तिच्या आवाजाला ‘ऐकणारं’ कुणीच नव्हतं. एक आयुष्य, एक कुटुंब यामुळे उद्ध्वस्त होतंय याची जाणीवही नसलेल्या हजारो, लाखो लोकांनी तो सहा मिनिटांचा व्हिडीओ चवीने चघळला आणि फॉर्वर्ड करण्यातला विकृत आनंदही मिळवला.

आपलं कुटुंब, मुख्यत: मुलं आपल्यापासून दूर जाताहेत यापेक्षा आपल्या मुलांच्या मनात आयुष्यभरासाठी नको तो सल राहून जाईल, मुलं समाजात मान उंच करून जगू शकणार नाहीत, या विचाराने हतबल झालेली शोभा मात्र संतापाने, उद्वेगाने आणि त्याहीपेक्षा आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात खणखणीतपणे उभी राहिली. आपला नवराही आपल्यावर विश्वास ठेवत नाही ही कोणत्याही स्वाभिमानी स्त्रीसाठी सलणारी गोष्ट, यातून मार्ग एकच, या कलंकातून स्वत:ला सहीसलामत बाहेर काढणं. ‘‘हा व्हिडीओ माझा नाही. शहानिशा करा.’’ असं सांगत तिने थेट पोलिसांमध्ये तक्रार केली. तिची तक्रार पोहोचली सायबर गुन्हे विभागाकडे. तपास सुरू झाला आणि तब्बल तीन वर्षांनंतर तो व्हिडीओ तिचा नसल्याचं जाहीर झालं. पण या तीन वर्षांनी तिचं सगळं काही तिच्यापासून हिरावून नेलं. कुणा एका विकृताने केलेले चाळे तिचं, तिच्या मुलांचं, कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करून गेले.

इंटरनेट, स्मार्ट मोबाइल्स आल्यापासून शोभाची ही शोकांतिका अनेकींची झाली आहे. २०१७ च्या आकडेवारीनुसार जगातल्या सात अब्ज लोकांपैकी सुमारे तीन अब्ज म्हणजे ५४ टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात. त्यातले दोन अब्ज समाजमाध्यमांचा म्हणजेच सोशल नेटवर्किंगचा वापर करतात. म्हणजे ३७ टक्के लोक तर चार अब्ज लोक मोबाइल फोनचा वापर करतात. म्हणजे ६६ टक्के लोक. इतके  लोक याचा वापर करत असल्याने याचा उपयोग जसा चांगल्या गोष्टींसाठी झाला तसा विकृतांकडून अनेकांना छळण्यासाठीही झाला. अगदी भारतातही सायबर गुन्हे सर्रास सुरू आहेत म्हणूनच ‘सायबर सेल’ची स्वतंत्र स्थापना करण्यात आली. ईमेल, चॅट, मोबाइल, व्हाईस कम्युनिकेशन, ब्लॉग, चॅट लॉगच्या माध्यमांचा जीवघेणा गैरवापरही सुरू झाला. अत्यंत कठोर, जीवघेणी, अपमानास्पद शेरेबाजी, थेट धमकी, लैंगिक कॉमेंट्स, स्टाकिंग, ट्रोलिंग, बुलिंग आणि यावर कडी म्हणजे अश्लील व्हिडीओज्, फोटो पाठवणे, पॉर्न साइट्स पाठवणे, फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्याच्या धमक्या देणे, याचे अनेक जण बळी आहेत. त्यातच आणखी एक प्रकार, जो आत्तापर्यंत अनेकांना माहीतही झाला आहे, तो म्हणजे ‘रिव्हेंज पोर्न’. एखाद्या तरुणीने प्रेमाला नकार दिला किंवा त्या दोघांमध्ये काही कटू घटना घडली, घडल्या तर तिचे नग्न फोटो वा व्हिडीओ व्हायरल करून सूड उगवायचा. असंख्य तरुणी अगदी देशा-परदेशात याला बळी पडल्या आहेत. काहींचे फोटो स्वत:चे होते तर काहींचे मॉर्फ केलेले, घडवलेले. केरळमधली शोभा साजू याचाच एक बळी. पण तो सूड होता का, अजून तरी काही उघडकीस आलेलं नाही. हे कृत्य कोणी केलं, का केलं याचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. तिच्या नवऱ्याच्या फर्ममधल्या एका कर्मचाऱ्याने २०१५ ला तो व्हिडीओ शेअर केला एवढंच हाती आलंय. आणि त्याला अटकही झालीय, पण तो तयार कुणी केला याचा तपास सुरू आहे. आणि त्याला शिक्षा व्हायलाच हवी हा शोभाचा निर्धार आहेच.. पण या तीन वर्षांत खूप काही घडून गेलंय तिच्या आयुष्यात!

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कसलाही विचार न करता तिच्या नवऱ्याने सरळ न्यूड व्हिडीओ व्हायरल केला हे कारण दाखवत तिला घटस्फोटाची नोटीस दिली. आणि स्वत: आपल्या तीनही मुलांना घेऊन वेगळा राहू लागला. पंधरा वर्षांखालची ही मुलं आईपासून वंचित झाली. आपल्या मुलांना ती बघू शकत होती, पण भेटू शकत नव्हती. शाळेतून सायकलवरून येणारी मुलं तिला  तिच्या भाडय़ाच्या घरातून कधी कधी दिसायची. कधी मग तीच शाळेच्या गेटवर जाऊन उभी राहायची, मुलं निदान दिसावीत म्हणून. पण ते फारच क्षणिक असायचं. शेवटी एकदा असह्य़ झाल्यावर मात्र कुटुंब न्यायालयात तिने मुलांना भेटण्याची परवानगी मागितली. तिला ती देण्यातही आली. शनिवारी ती या मुलांना भेटायला लागली खरी, पण पुन्हा एक तडाखा बसला. मुलीने तक्रार केली, आई आम्हाला छळते म्हणून. पुन्हा तिला मुलांपासून तोडण्यात आलं. शोभाचं म्हणणं, ‘माझ्यापासून मुलांना दूर करण्यासाठी मुलीकडून हे वदवलं गेलंय..’ आज शोभा एकटी आहे. पण तिला मुलांचीच काळजी आहे, ती पहिल्यापासून म्हणत आली. ‘‘माझ्या मुलांनी गर्वाने म्हटलं पाहिजे ही आमची आई आहे. म्हणूनच माझ्यावरचा सगळा कलंक मी मिटवणार आहे. त्यासाठी शेवटपर्यंत लढणार आहे.’’ या एप्रिल महिन्यामध्ये तिने पुन्हा आपली केस रिइन्व्हेस्टिगेशनसाठी आणि या व्हिडीओचा मूळ कर्ता शोधण्यासाठी दाखल केली. केस कोचीचे शहर पोलीस साहाय्यक आयुक्त के. लालजी यांच्याकडे आली. त्यांनी थेट केंद्राकडेच मदत मागितली. आधुनिक तंत्रज्ञानाची मदत आणि फॉरेन्सिक लॅबने तिचे मूळ फोटो आणि व्हिडीओची तुलना केली. आपल्या शरीरावरील खुणा दाखवण्यासाठी तिला महिला मेडिकल अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आलं. पूर्ण तपासणीनंतर त्यांनी जाहीर केलं की त्या व्हिडीओमधील स्त्री आणि शोभा यांच्यात साम्य नाही. या व्हिडीओतील स्त्री शोभा नाही.

निकाल स्वच्छ आणि स्पष्ट होता.. शोभा निष्कलंक बाहेर पडली आहे, पण..

रामाने स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर सीता वनात राहायला गेली खरी पण नंतरच्या काळात  तिची दोन्ही मुलं, लव-कुश, तिच्याबरोबर होती. आणि आज राम सीतेचं नाव एकत्र घेतलं जातं.  शोभाच्या नियतीने मात्र ते सुख तिच्याकडून हिरावलं.. आज तिची मुलं तिच्याबरोबर नाहीत, नवऱ्यानेही तिला स्वीकारायला नकार दिला आहे.. आणि भविष्याबद्दल ती अनभिज्ञ आहे..

.. पण तरीही ती लढणार आहे, ज्या कोणी हे अधम कृत्य केलं त्याला धडा शिकवायचा दृढ्निश्चय तिने केला आहे. तो निश्चयच तिच्या जगण्याचं आता कारण ठरला आहे..

arati.kadam@indianexpress.com

chaturang@expressindia.com