या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रत्येक दिग्दर्शकाची कामाची पद्धत वेगळी असते, माझी सुरुवात या स्पेसपासून होते. सेट किंवा लोकेशन हे कुठच्याही कथेचं एक मध्यवर्ती पात्रच बनून जातं. जिथे एखादा प्रसंग घडणार आहे ती जागा- म्हणजेच स्पेस दिसली, की त्यावर तो प्रसंग- मग नाटक असो, चित्रपट असो की टीव्ही- जिवंत होत गेला. ही जिवंत होण्याची प्रक्रिया कशी होते हा माझ्यासाठीही कुतूहलाचा विषय आहे..

एखादी गोष्ट सांगायची म्हटल्यावर- मग माध्यम कुठलंही असो- ती कुठे, कुठल्या ‘स्पेस’मध्ये घडतेय ही एक महत्त्वाची बाब आहे. माझी सुरुवात त्या ‘स्पेस’पासून होते. इथे ‘अवकाश’ शब्द न वापरता जाणून-बुजून ‘स्पेस’ शब्द वापरला आहे. ‘अवकाश’ म्हटलं की डोळ्यांसमोर एक पोकळी उभी राहते. ‘पैस’ म्हटलं तर खूप प्रचंड आणि वैश्विक असं काही तरी मनात येतं – पण ‘स्पेस’मध्ये डोंगर-दऱ्या, नद्या-समुद्र असतात, माणसं असतात, छाया-प्रकाशाचा खेळ असतो..

प्रत्येक दिग्दर्शकाची कामाची पद्धत वेगळी असते, माझी सुरुवात या ‘स्पेस’पासून होते. ‘आत्मकथा’ माझं पाहिलं नाटक. ते मला मिळाल्यावर मिनिटभर खूप आनंद झाला आणि पुढच्याच क्षणी प्रचंड भीती वाटली. आपल्याला जमणार आहे का ते? हा विचार मनात आला. कागदावर लिहिलेलं नाटक माझ्या ओळखीचं होतं, पण हेच नाटक जिवंत करण्यासाठी काही तरी एक आधार हवा होता, एक सुरुवात हवी होती, ती कुठे आणि कशी मिळेल याची कल्पना नव्हती आणि अचानक मला सेटचा मध्यबिंदू दिसला. मग त्याच्या भोवती साधारण सेटचा आराखडा दिसला आणि नाटक माझ्या डोळ्यांसमोर आकार घ्यायला लागलं.

त्यानंतर केलं सुहास जोशीबरोबर एकपात्री नाटक- लक्ष्मीबाई टिळकांचं ‘स्मृती-चित्रे!’ त्यात तर असंख्य स्थळे, एक प्रदीर्घ कालावधी, शिवाय प्रचंड उलथापालथ, घडामोडींनी भरलेली कथावस्तू. लक्ष्मीबाईंचं नाटय़पूर्ण जीवन उलगडून दाखवण्यासाठी -त्या काळात काही जण ज्याला चेष्टेने ‘ठोकळ्यांचं नाटक’ म्हणत असत- तसा सेट करण्यावाचून पर्याय नव्हता. पण प्रदीप मुळ्येने त्या सेटवर ठोकळ्यांच्या बरोबरीने एक खांब आणि एक महिरप उभी केली आणि त्या दोन उभ्या आडव्या रेषांतून अनेक प्रकारची ‘स्पेस’ निर्माण होऊ शकली- ज्यावर लक्ष्मीबाईंच्या आयुष्याचे अनेक पैलू दृश्य स्वरूपात साकार करता आले.

त्यानंतर मग सेट किंवा लोकेशन हे कुठच्याही कथेचं एक मध्यवर्ती पात्रच बनून गेलं. जिथे एखादा प्रसंग घडणार आहे ती जागा- म्हणजेच स्पेस दिसली, की त्यावर तो प्रसंग- मग नाटक असो, सिनेमा असो की टीव्ही- जिवंत होत गेला. ही जिवंत होण्याची प्रक्रिया कशी होते, हा माझ्यासाठीही कुतूहलाचा विषय आहे. काही वर्षांपूर्वी खासगी टीव्ही चॅनेल सुरू झाले आणि मालिका बनवण्याची प्रक्रिया बदलली. तिथे आपण पुढच्या काही दिवसांत काय सांगणार आहोत, काय-काय घडणार आहे हे आधी सांगावं लागतं. मला ते जमत नाही. आधी कथा, मग पटकथा, मग संवाद- हे मला अवघड वाटतं. मला लिहिताना समग्र चित्र एकदमच दिसतं.

‘लाइफलाइन-२’ या दूरदर्शन मालिकेचा एक सीन लिहितानाची आठवण लख्ख आहे. मी लिहायला लागले- ‘हॉस्पिटलचं आवार- एक गाडी येताना दिसते, पोर्चमध्ये थांबते..’ त्या गाडीत कोण आहे हे ती गाडी थांबेपर्यंत मला माहीत नव्हतं. पण उतरणारा माणूस दिसला आणि सीन आपोआप पुढे गेला! ‘लाइफलाइन-१’मध्ये मी विजयाबाईंची सहायक होते आणि ती संपूर्ण मालिका नानावटी हॉस्पिटलमध्ये घडली होती. पुढे ‘लाइफलाइन-२’ आम्ही मुंबईतल्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये केली. आता खरं वाटत नाही पण १९९५ मध्ये आम्ही ती मालिका के.ई.एम., गुरू नानक, लीलावती ही हॉस्पिटल्सशिवाय तारा गावातला एक आदिवासी पाडा – इतक्या ठिकाणी शूट केली! त्या सगळ्या ठिकाणी आमचे ‘डॉक्टर्स’- सचिन खेडेकर, नंदू माधव, आसावरी जोशी- नट न वाटता त्यांच्यातलेच वाटायचे. ते वातावरण, आजूबाजूला असलेले रुग्ण आणि मुख्य म्हणजे ती ‘स्पेस’ यामुळे त्यांना त्यांची व्यक्तिरेखा सापडायला, साकारायला मदत होत होती हे निश्चित. त्या मालिकेचे फक्त २२ भाग होते आणि त्यातले पहिले १३ सलग ४० दिवसांमध्ये शूट केले होते. त्यामुळे खऱ्या हॉस्पिटलमध्ये शूट करणं शक्य होतं. अर्थात त्याची वेगळी आव्हानं होतीच. खऱ्या रुग्ण आणि डॉक्टर्सना आपल्यामुळे त्रास तर होत नाही ना, याचं खूप दडपण असायचं, दुसऱ्या बाजूला शॉटमध्ये कुठे काही कमी पडलं, तर आपण त्याकडे दुर्लक्ष करून काम पुढे दामटत तर नाही आहोत ना, याबद्दल ही जागरूक राहायला लागायचं. या सगळ्यामुळे असेल कदाचित, पण पुढे वर्ष-दीड वर्ष चालणाऱ्या मालिका करायचं ठरल्यावर मी कथानक निवडतानाच ‘चित्रीकरणास सुलभ’ हा एकच निकष डोळ्यांसमोर ठेवला! शक्यतो एका घरात घडतील अशीच कथानकं लिहिली.

मी ज्या मालिका केल्या त्या बहुतेक खऱ्या घरांमध्ये शूट केल्या होत्या. साप्ताहिक मालिकेत, जेव्हा आठवडय़ाला एक किंवा महिन्याला चार एवढेच भाग करायचे असतात तेव्हा सेट बांधणं शक्य नसतं. अशा वेळेला उपलब्ध लोकेशन असतील तिथेच मालिका शूट करावी लागते, म्हणजेच प्रत्यक्ष लोकेशनवर शूट करणं भाग असतं. प्रत्यक्ष लोकेशनचा दुसरा अर्थ लोकांची घरं. कधी ती रिकामी असतात तर कधी त्या घरांमध्ये लोक राहत असतात आणि त्यांच्याबरोबरच आपण आपले सीन शूट करत असतो. ही अशी राहती घरं हे बहुतेक वेळा बंगले असतात. सहसा इमारत असत नाही. पण सुदैवाने जुहूमध्ये एक अशी इमारत होती, ज्यात एकाच कुटुंबातले तीन भाऊ राहत होते. ती लोकेशन सापडली त्यामुळे आम्ही एका इमारतीमध्ये घडणारी ‘४०५ आनंदवन’ करू शकलो.

लेखनाला सुरुवात करताना ही माणसं कुठे राहत असतील याच्याबद्दल एक अंधूक कल्पना असते. त्या कल्पनेप्रमाणे आपण पुढे जात राहायचं आणि मग त्याच्याशी मिळतंजुळतं घर शोधायला लागायचं हा शिरस्ता! राहत्या घरात शूट करणं कठीण असायचं पण शेवटी ते ‘राहतं’ असल्यामुळे त्याची मजा वेगळी असायची. त्या अस्सल घरात माझी पात्र अस्सलपणे वावरायची, अस्सल वाटायची. ‘झोका’ मालिकेत आनंद इंगळे एक ‘धनाढय़’ उद्योगपतीचा मुलगा झाला होता. मुळात ती कथाच उद्योगपती, व्यावसायिक अशा लोकांची होती. त्यासाठी एक श्रीमंत लोकेशन मिळणं गरजेचं होतं- थोडी शोधाशोध करावी लागली, पण आम्हाला जुहूमध्ये असा एक बंगला मिळाला, जिथे श्रीमंतीचा भपका नव्हता. एक ग्रेसफुल, अंडरस्टेस्टेड खरं ‘श्रीमंत’ घर होतं ते. नायक सुनील बर्वे तर तिथे वावरतच होता, पण आनंद इंगळे आणि शर्वरी पाटणकर त्या घरात येऊन-जाऊन असायची. ‘व्यक्तिरेखेचा अभ्यास’ या नावाखाली आम्ही तिघे जण कैक वेळा रात्री मलबार हिलवर ड्राइव्हला जायचो. ‘‘ही तुमची स्पेस आहे, इथे राहता तुम्ही..’’ असं सांगितलं की पुढची स्टोरी तेच ठरवायचे. एखाद्या बंगल्यासमोर थांबून ‘‘हे माझं घर..’’ असं म्हणायचे. आम्ही हे सगळं गमतीत करत असलो- किंबहुना हे करायला आम्हाला मजा जरी येत असली- तरी तो एक अभ्यासच होता. एका प्रसंगात सुनील आणि आनंद अत्यंत अघळपघळ, अजागळ कपडे घालून जिन्यावर बसून बोलत होते, तरीही दोघं श्रीमंतच दिसले. त्यांच्या ‘स्पेस’नी त्यांना एक श्रीमंत मन बहाल केलं होतं- जे त्यांच्या कपडय़ावर अवलंबून नव्हतं. पण त्याही आधी ते दोघं आणि शर्वरी एकत्र आले होते ते एका अशा मालिकेत की ज्या मधलं घर हे त्यातल्या माणसांपेक्षा काकणभर जास्तच लोकप्रिय झालं होतं- ‘प्रपंच’ मालिकेचं ‘आश्रय!’ त्याबद्दल पुढच्या भागात..

pamakulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व लाइफ इज ब्युटिफुल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pratima kulkarni article in loksatta chaturang
First published on: 26-05-2018 at 07:08 IST