पर्सिव्हल एव्हरेट हा अमेरिकी लेखक ४० वर्षांपासून लिहितोय. पण गेल्या वर्षांपासून वेगवेगळय़ा कारणांसाठी चर्चेत आहे. त्याच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीवरील ‘अमेरिकन फिक्शन’ हा सिनेमा यंदा ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या गटात होता. त्या चित्रपटात तिरसट लेखकाची भूमिका बजावणारा जेफ्री राइट हा देखील सर्वोत्तम अभिनेत्याच्या स्पर्धेत होता. पर्सिव्हल एव्हरेट या लेखकाची सारी तुच्छतावादी वैशिष्टय़े या अभिनेत्याने चपखल उतरविली आहेत. हा बहुआयामी लेखक अनेक क्षेत्रांत वावरतो. वर्षां-दोन वर्षांमागे खूपविक्या लेखकांसारख्या कादंबऱ्या रचतो. ‘डॉ. नो.’ ही जेम्स बॉण्ड मालिकेतील पहिली कादंबरी. एव्हरेटच्या गेल्या वर्षी आलेल्या ताज्या कादंबरीचे ‘डॉ. नो.’ हेच शीर्षक होते. पण कहाणी भलतीच. त्याच दरम्यान म्हणजे फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रकाशन उद्योगाने ‘जेम्स’ या त्याच्या आगामी कादंबरीसाठी आगाऊ पाच लाख डॉलर रक्कम मोजल्याची बातमी चर्चेत होती. काय आहे हे ‘जेम्स’ प्रकरण? तर ‘अ‍ॅडव्हेन्चर्स ऑफ हकलबरी फिन’ या मार्क ट्वेन यांच्या कादंबरीचे ‘जिम’ या हकलबरी फिन याच्या काळय़ा जोडीदाराच्या नजरेतून नवरूपांतर. कादंबरीचे शीर्षक ‘जिम’ नाही तर ‘जेम्स’च. पर्सिव्हल एव्हरेट यांच्या कादंबरीतील गोरी पात्रेच या हकलबरीच्या मोठय़ा वयाच्या काळय़ा सहकाऱ्याला जिम संबोधतात.

मार्क ट्वेनच्या कादंबरीत काळी जादू करण्यात (किंवा ती करता येत असल्याचे भासविण्यात) पटाईत असलेला वॉटसनबाईंचा निग्रो-गडी जिम हा आपल्याला गुलाम म्हणून दुसरीकडे विकण्यात येणार असल्याच्या माहितीने पोबारा करतो. आपल्या प्यालेबाज वडिलांच्या जाचाने हकलबरी फिन स्वत:चीच हत्या झाल्याचे भासवत घर सोडतो. पुढे हक आणि जिम यांची मिसिसिपीतील मुशाफिरी यांनी ही कादंबरी पुढे सरकत जाते.

T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
lokmanas
लोकमानस: वालचंद हे मराठीच होते..
loksatta editorial Shinde group bjp dispute over thane lok sabha seat
अग्रलेख: त्रिकोणाच्या त्रांगड्याची त्रेधा!
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!

हकलबरीच्या निवेदनातून पुढे गमजाच-गमजा करीत चालणारी ही १८८५ सालात अमेरिकेत प्रकाशित झालेली कादंबरी ‘ग्रेट अमेरिकन नॉव्हेल’ म्हणून संबोधली गेली. तिच्याच उपवाटांमधून अमेरिकी कादंबरीला आकार आला, असेही मानले जाते. वंशभेदकारी विशेषणे आणि शिवराळ भाषा या कारणांसाठी तिच्यावर शतकभर टीकाकारांचा भडिमार झाला. कादंबरी वर्णद्वेषविरोधी असल्याचा दाखलाही दिला गेला. तरी प्रामुख्याने ‘निग्गर’ या शब्दावरून रान उठलेच.

वेगवेगळय़ा वादांत ताऊन सुलाखूनही मार्क ट्वेनचे टॉम सॉयर आणि हकलबरी फिन हे कु-पुत्र बाल-कुमार साहित्यात अजरामर अवस्था टिकवून आहेत. केवळ आपल्यासाठीच विचार केला, तर हकलबरी फिनचा मराठी अनुवाद ‘भटकबहाद्दर’ या नावाने जानेवारी १९६६ मध्ये आला. भा. रा. भागवतांनी तो केला होता. नवकथा शिलेदारांपैकी गंगाधर गाडगीळांनी धाडसी चंदू हा ‘हकलबरी फिन’वरून मराठी भूमीत उतरवला, तर आघाडीचे गंभीर मराठी कादंबरीकार अवधूत डोंगरे यांनी ‘टॉम सॉयर’ आणि ‘हकलबेरी फिन’ यांची साहसे आजच्या काळानुरूप भाषेत हल्लीच अनुवादित केली आहेत. पैकी भा. रा. भागवतांचे ‘भटकबहाद्दर’ हे जुन्या पुस्तकांच्या बाजारात भरपूर मौल्यवान मानले जाते. त्याच्या सुस्थितीतल्या मोजक्या प्रती संग्राहकांकडेच उपलब्ध आहेत. भा. रां.नी अनुवाद केलेल्या मूळ कादंबरीच्या तपशिलातील हककडून जिमची ओळख कशी करून देण्यात आली आहे पाहा. ‘ वॉटसनबाईंचा तो निग्रो गडी जिम? त्याच्याजवळ हाताच्या मुठीएवढा एक केसांचा गुंडा होता. एका बैलाच्या चार नंबरच्या पोटातून काढला होता म्हणे तो. तो गुंडा घेऊन जिम जादू करीत असे. तो म्हणे, यात भूत आहे आणि त्याला सगळं कळतं.’ पुढल्या आणखी एका प्रकरणात, ज्याचे शीर्षक ‘निगर जिम वाद घालतो’ असे आहे, त्यात हक म्हणतो. ‘मी जिमला पुस्तकातलं काय काय वाचून दाखवलं. राजांबद्दल, डय़ुक लोकांबद्दल, अमीर उमरावांबद्दल. अन् ते ऐकताना जिमच्या डोळय़ांची गटाणी बुबुळं बाहेर आली.’

आता या निगर गडय़ाला पर्सिव्हल एव्हरेट यांनी सुशिक्षित आणि वाचता-लिहिता येऊ शकणारा गडी बनवून त्याला कथेचा निवेदक बनवले आहे. म्हणजे कथेचा हिरो आणि मिसिसिपीतील धाडसांचा हिरोदेखील काळा जिमच आहे. निवेदक बदलल्याने मूळ कथेला मिळणारी कलाटणी कशी आहे, हे पाहण्यासाठी पुढल्या काही दिवसांत या ‘जेम्स’ कादंबरीला खूपविकी होण्यापासून कुणी रोखू शकत नाही.

यापूर्वी तीनेक डझन कादंबऱ्या-कथासंग्रह आणि एक बालसाहित्याचे पुस्तक लिहिणारे पर्सिव्हल एव्हरेट हे स्वत: आफ्रिकी-अमेरिकी असले, तरी बालपण गौरवर्णीय अमेरिकी श्रीमंतांच्या वरताण (फक्त ४५ हजार चौरस फुटांच्या घरात) गेले. घरातील बहुतांश सारेच डॉक्टर असताना यांनी मात्र कलेकडे ओढा ठेवला. चित्रकलेवरच्या त्यांच्या कथा (द बिग पिक्चर) आणि कादंबऱ्यांमधून गोऱ्यांना ‘आपल्याच’ वाटणाऱ्या भाषेत लिहिण्याचा त्यांचा लेखनव्यूह स्पष्ट होऊ लागेल. तोच त्यांच्या ‘एराशर’ कादंबरीमध्ये डोकावला आहे आणि ‘अमेरिकन फिक्शन’ या चित्रपटात ठळक झाला आहे.

‘जेम्स’ या कादंबरीत मात्र पर्सिव्हल यांनी ‘सारस्वतांनो माफ करा थोडासा गुन्हा करणार आहे.. ’ असा पवित्रा घेतल्याचे – आणि त्यांचा जेम्स ही काळेपणाची ‘तळपती तलवार’ असल्याचे या कादंबरीच्या कनातीआड डोकावणाऱ्यांना दिसले आहे. हा ‘जेम्स’ सुशिक्षित आहे. काळी जादू भंपक असते, हे तर त्यालाही माहीत आहेच पण ‘बायबल’ हे शोषकांचे हत्यार ठरले आहे, अशा मतापर्यंतही तो आलेला आहे. वाचनाची बेहद्द आवड असलेला हा जेम्स अमीर-उमरावांच्या कहाण्यांपेक्षा त्या काळात नवे असलेल्या ज्याँ-जॅक रूसो, व्हॉल्टेअर आणि जॉन लॉक यांची पुस्तके त्याने (न्यायाधीश वॉटसन यांच्याकडे गुलाम म्हणून काम करत असल्यामुळे, त्यांच्या अभ्यासिकेची सफाई करता-करता) वाचलेली आहेत, गुलामगिरीबाबत झालेले चिंतन त्याला माहीत आहे.. त्यामुळेच तो स्वस्थ बसणार नाही. पुस्तकांतून तो नोंदी काढतो आहेच. या नोंदी तो इतर गुलामांपर्यंत पोहोचवतोही आहे. पण कादंबरी संपता-संपता कदाचित, मालकाचा खून करून, धड पैसा न देणाऱ्या त्याच्या मालमत्तेला आग लावून इतर गुलामांची मुक्ततासुद्धा या जेम्सने केलेली असू शकते! 

 हा इतका वेगळेपणा असूनसुद्धा मुळात पर्सिव्हल एव्हरेट हे मार्क ट्वेनप्रमाणेच खुसखुशीत भाषेत लिहिणारे. शिवाय ‘हकलबरी फिन’मधले काही ढोबळ प्रसंग  त्यांनी ‘जेम्स’च्या नजरेतून आणलेले आहेतच. त्यासाठी हकलबरीची पारायणे आणि स्वत: मिसिसिपीची मुशाफिरी कैकदा केल्याचे अलीकडेच एव्हरेट यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. काळय़ा जिमच्या नजरेतून उतरलेली हकलबरी फिन पुढल्या काही आठवडय़ांचे जागतिक कुतूहल असणार आहे. तोवर पुस्तकांतील कुतूहल असलेल्यांनी मिळाली तर ‘जेम्स’ वाचा नाहीतर भा. रां.च्या अनुवादातला भटकबहाद्दर शोधा. किंवा सहज जमेल अशा डोंगरे यांच्या नवअनुवादाची चव चाखा. वेळ व्यर्थ जाणार नाहीच, शिवाय आता या वाचनातून पर्सिव्हल एव्हरेटच्या ‘जेम्स’साठी पार्श्वभूमी तयार होईल!

हेही वाचा: पर्सिव्हल एव्हरेट यांना लेखक म्हणून जाणून घेण्याचा सर्वोत्तम सहज मार्ग ‘अमेरिकन फिक्शन’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने तेवीस वर्षांपासून त्याचे मुख्य धारेत येण्यात, खूपविका लेखक बनण्यात काय कारणे झाली, त्याची चर्चा करणारा लेख. 

https:// shorturl. at/ dHJNY

लेखकांना एकाच पुस्तकामुळे दणकून श्रीमंत करणारी जी आंतरराष्ट्रीय पारितोषिके आहेत, त्यातले एक ‘डब्लिन लिटररी अ‍ॅवॉर्ड’. नुकतीच या पारितोषिकासाठी लघुयादी जाहीर झाली आहे. बुकरमध्ये जसा अनुवादासाठी वेगळा आणि स्वतंत्र लेखनासाठी वेगळा असा सवतासुभा असतो, तसा इथे नसतो. यंदाची लघुयादीतील विविधता आणि पारितोषिकांची भक्कम रक्कम बघण्यासाठी पाहा.

https:// shorturl. at/ AJSW0

मोहम्मद नसिहू अली हा घानातील संगीतकार आणि लेखक. त्याच्या नावावर या देशातील कडव्या इस्लाम धर्मातील माणसांचे जगणे असलेला एक कथासंग्रह नावावर आहे. न्यू यॉर्कर साप्ताहिकाने त्याचे अकथनात्मक लेखन यापूर्वी छापले आहे. पण ताज्या अंकात ‘अल्ला हॅव मर्सी’ ही कथा वाचायला मिळते. ही गोष्ट मदरशातील शिक्षण आणि काका-पुतण्यांच्या व्यवहारावर आहे. 

https:// shorturl. at/ aloV1