काही दिवसांपूर्वी विचारपूस करावी म्हणून एका मित्राला फोन केला. ‘‘काय सुबोध, कसं चाललंय?’’ असं विचारलं मात्र, तो एखाद्या धबधब्यासारखा कोसळू लागला. म्हणाला, ‘‘अरे, काय सांगू, ३०-४० वर्षांपूर्वी नवीन घर बांधलं तेव्हा हौस आणि शोभा म्हणून घराभोवती, ४-५ कुंड्यांमध्ये फुलझाडं लावली होती. बघता बघता ही हौस केव्हा व्यसनात रूपांतरित झाली, माझं मलाच कळलं नाही. आज माझ्या घरात लहान-मोठ्या वनस्पतींची संख्या ४००च्या वर गेली आहे. त्यांची निगा राखण्यात कसा आणि किती वेळ निघून जातो, कळत नाही. आता माझंही वय त्र्याहत्तरच्या पुढे गेलंय. आता नाही रे झेपत हे सगळं. बरं, मदतीला कुणी घ्यावं, तर त्याच्या हिशेबानं चालावं लागतं. तो केव्हाही येतो आणि त्याच्या मनात येईल तोपर्यंत काम करत बसतो. मग मला माझी सर्व कामं सोडून त्याच्या मागेच फिरावं लागतं. अगदी त्रासून गेलोय रे, पण मोह सुटता सुटत नाही. बरं, या नादापायी मित्रांबरोबर गप्पागोष्टी करायला वेळ मिळत नाही, की पुस्तकं वाचायला वेळ मिळत नाही, की कुठला दुसरा छंदही जोपासता येत नाही. अगदी कुठं बाहेरही पडता येत नाही. घरातच अडकून पडायला झालंय. काय करावं?’’
वरील प्रसंग लिहित असतानाच मला नुकतीच झालेली एका मित्राची भेट आठवली. सुट्टीचा दिवस होता म्हणून तोही निवांत होता. कारण त्याचा नोकरी करणारा मुलगा, सून आणि शाळेत जाणारी नातवंडंही घरीच होती. मी येताच त्यानं माझं स्वागत केलं व तो मला त्याचा वावर असलेल्या भल्या मोठ्या चार खोल्या दाखवू लागला. त्याला यांत्रिक कामाची आवड आणि मेकॅनिकल इंजिनीअर म्हणूनच निवृत्त झाल्यामुळे त्यानं वेगवेगळी लहान-सहान यंत्र गोळा केली होती. एखाद्या ‘वर्कशॉप’मध्येच आल्यासारखं वाटत होतं. तो मात्र मला उत्साहानं ते यंत्र केव्हा घेतलं, कसं मिळालं इत्यादी माहिती सांगत होता. मी सहजच मनात आलं म्हणून त्याला विचारलं, ‘‘तुझी पण कमालच आहे, पण काय रे, तू या वयातही तुझा हा छंद जोपासतोय, तुला झेपतं कसं काय हे?’’
मी जणू काही त्याच्या दुखऱ्या नसेवरच हात ठेवला होता. तो पटकन उसळूनच म्हणाला, ‘‘अरे, कसली कमाल बाबा. दररोज घरच्यांची बोलणी खातोय. कधी ही बोलते, कधी मुलगा बोलतो. मुलगा तर स्पष्टच म्हणतो, बाबा, आता सोडा हा छंद. आमच्या बरोबर वेळ घालवा, नातवांबरोबर खेळा. आता हळूहळू हे सर्व कमी करा. घरचे थेट बोलत नाही, पण मला माहीत आहे, त्यांना काय म्हणायचं आहे ते. आता मला हे सर्व आवरलं पाहिजे. त्यांना त्यांची कामं काही कमी आहेत का?’’
पहिल्या प्रसंगातल्या त्या मित्राचं त्याच्या बागेविषयीचं दु:ख ऐकत असताना आणि दुसऱ्या प्रसंगातील त्या मित्राची ती ‘कार्यशाळा’ (छंद म्हणून गोळा केलेला यंत्रांचा/अवजारांचा तो पसारा बघून मला ‘कार्यशाळा’ हाच शब्द लिहायचा मोह इथे आवरता येत नाहीये.) बघत असतानाच मला एका तिसऱ्याच मित्राची नुकतीच झालेली भेट आठवतेय.
माझा हा बालपणीचा मित्र, जयंता. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेला, असं म्हणायला काहीच हरकत नाही. मला चांगलंच आठवतंय, ज्यावेळी संपूर्ण शाळेचे विद्यार्थी पायपीट करत अन् सर्व शिक्षक सायकलवरून शाळेत येत तेव्हा हा जयंता शाळेत कारमध्ये बसून येत असे आणि बरोबर एक गडीही असायचा दप्तर उचलायला. आजही तो भेटतो अनेकदा. एक दिवस माझ्या कामानिमित्ताने जयंताच्या फॅक्टरीवरून जाणं झालं. तो असल्यास भेटूनच पुढे जावं, या विचाराने आत गेलो. दारातून आत शिरताच समोरच त्याचं काचेचं केबिन दिसलं. तो होताच तिथे. दृष्टादृष्ट झाली आणि त्याने उजवा हात उंच करून मला आत येण्याचा इशारा केला. मी आत गेलो. बघितलं, जयंता त्याच्या भल्या मोठ्या टेबलावर कपाटातल्या फायलींचा गठ्ठा उघडून बसला होता आणि त्यातले काही कागद सरसरत्या दृष्टीने बघून फाडून टेबलाखालच्या केराच्या टोपलीत टाकत होता.
विचारलं असता म्हणाला, ‘‘आता माझं वय झालंय आणि शरीराच्या काहीबाही कुरबुरीही सुरू झाल्यात. मुलगा अमेरिकेलाच स्थायिक झालाय अन् तो इथे परत राहायला येण्याची अजिबात शक्यता नाही. मग हा फॅक्टरीचा पसारा कोण बघणार? म्हणून मीच आता आवरासावर करतोय. एक एक उत्पादन बंद करतोय. उगाच आपल्यामागे मुलांना त्रास नको. अरे, आता पैलतीर दिसू लागलाय, आवर-सावर नको का करायला?’’ मग त्याने हातचं काम थांबवलं आणि माझ्याशी निवांत गप्पा मारू लागला. काही वेळाने मी माझ्या घराकडे निघालो, पण माझ्या डोक्यात जयंताचे ‘ते’ शब्द, ‘आता पैलतीर दिसू लागलाय, आवरसावर नको का करायला?’, थैमान घालू लागले. किती मोठं जीवनाचं दर्शन आणि किती गहन अर्थ दडलाय या वाक्यात.
या विचारांतूनच मला आपल्यापैकी प्रत्येकाच्याच जीवनात कधी न कधी अनुभवलेला आगगाडीचा प्रवास आठवला. आपण आगगाडीत बसतो आणि आपला प्रवास सुरू होतो. प्रवास जर लांबपल्ल्याचा असेल, तर आपण आधी गुपचुप बसलेलो असतो, मग हळूच कुठलंसं पुस्तक काढतो अन् वाचू लागतो, कंटाळा आला की ते पुस्तक तसंच ठेवतो, मग जेवणाची वेळ झाली की डबा काढतो, जेवतो आणि तो डबाही वरच कुठे तरी ठेवतो. अशा प्रकारे प्रवास सुरू झाल्या-झाल्या ज्या वस्तू आपल्या सामानात व्यवस्थित ठेवलेल्या असतात, त्या हळूहळू बाहेर निघून इकडे तिकडे पसरू लागतात. पण आपलं स्थानक जसजसं जवळ येऊ लागतं, तसतसं आपण आपल्या सामानाची बांधाबांध करू लागतो आणि स्थानक येताच खाली उतरतो.
जयंतासारख्या सुज्ञांना सामानाची आवरसावर केव्हा करावी हे बरोबर कळतं, पण माझ्या दुसऱ्या मित्रांप्रमाणे सगळ्यांनाच ते भान नसतं आणि म्हणूनच ते आपला फापटपसारा वाढवतच राहतात. मला एक अगदी अलीकडचाच प्रसंग आठवला. माझा एक मित्र होता, ज्याचं नुकतंच वृद्धापकाळानं निधन झालं. या मित्राला त्याच्या तारुण्यापासूनच लेखन/वाचनाची आवड होती. त्यामुळे त्याच्या मोठ्या खोलीतील कपाटं पुस्तकांनी अगदी ओसंडून वाहात होती. त्याचं स्वत:चं प्रकाशित साहित्यही बरंच होतं. या मित्राला त्याच्या पुस्तकांचा आणि प्रकाशित साहित्याचा सार्थ अभिमान होता. असायलाही पाहिजेच म्हणा. त्याच्या हयातीत त्याचं मन दुखू नये याची काळजी त्याच्या कुटुंबीयांनी घेतली. पण मित्राचं बारावं-तेरावं होताच त्या सामानाची त्यांना अडगळ वाटू लागली आणि ते त्या सामानाची विल्हेवाट लावायच्या मागे लागले.
आपली आवड म्हणून जोपासलेल्या गोष्टी आपल्यानंतरच काय हयातीतही इतरांना अडगळ वाटू नये याची काळजी प्रत्येकाने वेळीच घेतली तर त्याचं मानसिक ओझं नक्कीच होणार नाही.
एकूण काय, तर पैलतीर दिसू लागताच आवरसावर करू लागलेलंच बरं!
vinoddmuley@gmail.com