सनातन धर्मशास्त्रानुसार कुठलाही जीव निव्वळ जैविक प्रक्रियेमुळे नाही, तर त्याच्या पूर्वसंचितानुसार जन्म घेत असतो. हे गृहीतक एकदा स्वीकारलं, की मी का जन्माला आलो? याच परिस्थितीत माझा का जन्म झाला? वगैरे प्रश्नांची उत्तरं जरी पूर्णपणे पटली नाहीत तरी त्यांचा स्वीकार करणंच सोईस्कर वाटायला लागतं.
पुढचा जीवनप्रवास ज्याच्या त्याच्या कुवतीप्रमाणे उपलब्ध ज्ञान, स्वत:चे श्रम आणि संबंधितांचं सहाय्य यांच्या आधारावर सुरू राहतो. मधल्या काळात अपेक्षित यशाच्या अभावी वा अनपेक्षित घटनांमुळे विचलित व्हायलाही होतं आणि दैव, योगायोग यावर विश्वास ठेवावासा वाटू लागतो. अर्थात ही त्याची अगतिकता असते. ज्याला नियतीचा कौल ओळखता आला, तो मात्र स्वबळावर प्रगती करतो आणि हेच त्याचं कर्मसंचित वा क्रियमाण समजलं जातं.
या स्वकर्तृत्वाच्या काळात त्याला आपल्या जीवन तत्त्वज्ञानाची जाण होते आणि त्यालाच स्वानुभवांची जोड देऊन आयुष्याचा अर्थ तो शोधू लागतो. सर्वसाधारणपणे ही प्रक्रिया सहज वा नकळतही होत असते.
मला आयुष्याचा अर्थ अशाच पद्धतीनं लागत गेला आहे. तरुणपणापर्यंत जन्म आणि प्राप्त परिस्थिती गृहीतच धरली होती. फक्त भविष्याचाच विचार काही विशिष्ट संदर्भात केला जात होता. आशा आणि उमेदीचा काळच असतो तो म्हणा! प्रौढ वयात मनासारख्या गोष्टी घडत नसताना, तसंच तुलनात्मकदृष्टय़ा आपली प्रगती झाली नसल्याचं भान आल्यावर वैषम्य जरूर वाटू लागलं. वाढलेलं वय, धाडसाची भीती आणि सांसारिक जबाबदारीमुळे आहे ते जीवनमान टिकवून ठेवण्याकडेच प्रवृत्ती राहिली. उतारवयात सर्वसाधारणपणे क्रियाशील राहण्याची, बुद्धीचा वापर करण्याची क्षमता कमी झालेली असते, त्यामुळे भक्तिभाव वाढू लागला.
जन्माला येण्यामागे नियतीचा काहीही हेतू नाही आणि आयुष्याला काही अर्थ नाही, अशी भावना कधीच होऊ दिली नाही. आयुष्याला अर्थ आपणच मिळवून द्यायचा असतो. भगवद्गीतेतही सांगितलं आहे, की प्रत्येकाला जन्म मिळालाय तो काही तरी विधायक करत राहण्यासाठीच. कर्मापासून आजन्म सुटका नाही. आपण आयुष्यात अर्थ शोधू लागतो आणि तो मिळत नसल्याच्या भावनेमुळे जीवन निर्थक वाटू लागतं. मिळालेलं जीवन जगत राहणं हाच आयुष्याचा मूलभूत अर्थ आहे.
बालवयात आणि अजाणत्या अवस्थेत हा प्रश्नच पडत नाही. जीवनाला सतत नियत कर्माची, बौद्धिक विकासाची वा उपासनेची जोड दिली, तर निर्थकतेची भावना जवळपासही येत नाही. आहे त्या जीवनात आनंद शोधावा, समाधानी असावं आणि शांतचित्तानं जगत राहावं हाच आयुष्याचा खराखुरा अर्थ आहे असं मला वाटतं. सर्व दीर्घायुषी व्यक्तींचा हाच अनुभव आहे. बालक आयुष्याचा विचार करत नाही, ते फक्त जीवन जगत असतं. तशीच जीवनपद्धती जर सर्वानी स्वीकारली तर आयुष्याला अर्थ काय, हा प्रश्न पडणार नाही. अर्थात याला उमेदीचा काळ आणि नोकरीधंद्यातील व्यवहार यांचा अपवाद असावा.
हे मान्य करून जगणं वाटतं तितकं सोपं नक्कीच नाही. आजच्या स्पर्धात्मक युगात विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे सातत्यानं बदलणाऱ्या परिस्थितीत आपण कितीही ठरवलं तरी मन:शांती, सुखसमाधान आणि आनंद मिळतच राहील याची शाश्वती नाही; पण सकारात्मक दृष्टिकोन, निरपेक्षबुद्धी आणि संतुलित आरोग्य राखलं तर जीवन सुसह्य होऊ शकेल आणि आयुष्याला आपल्यापुरता तरी अर्थ लाभेल.
शेवटी गतजन्मापेक्षा प्रगत अवस्थेत जिवाची शिवाशी भेट व्हावी आणि या आयुष्यातलं संचित पुढील आयुष्यासाठी मिळावं, हाच मला लागलेला आयुष्याचा अर्थ आहे!
ghaisasshriram@gmail.com