सगळं संपलं की काहीच राहत नाही. अशा संपण्यापेक्षा आपण दु:खी आयुष्य जरी जगलो तरी ती नक्कीच मरून जाण्यापेक्षा चांगली निवड असेल. कारण त्या दु:खाच्या सांदरीतून आयुष्य सुखाच्या छोटय़ा का होईना, चांदण्या पाठवलेच. खात्रीने. त्यामुळे रडकं, निराश, रागीट, वेदनेचं का होईना. पण जगणं निवडू या. एकदा का ‘आयुष्याला’ निवडलं की पुढचं सगळं आयुष्यच बघेल. खात्रीनं. फक्त ती आधीची एक निवड, कितीही अवघड, अशक्य वाटली तरी करूया.
परवाच माझी एक मैत्रीण सांगत होती, नैनितालला ‘नैनिताल लेक’ नावाचं एक तळं आहे. ते तळं, एका विशिष्ट मोसमात सर्व लोकांसाठी बंद ठेवतात. म्हणजे ‘त्या’ काही दिवसांत तुम्ही ते तळं लांबून पाहू शकता, पण जवळून नाही. कारण त्या तळ्याचं पाणी म्हणे ‘त्या’ विशिष्ट दिवसांत एका विशिष्ट रंगाचं होतं आणि त्या रंगाच्या पाण्याकडे बघून खूप लोकांना म्हणे आत्महत्या कराविशी वाटते. त्या पाण्याच्या रंगातलं काहीतरी तुम्हाला मृत्यूच्या जवळ घेऊन जातं. म्हणूनच त्या पाण्याच्या रंगाकडे तुम्हाला जवळून पाहू दिलं जात नाही.. आता खरं-खोटं माहीत नाही, पण मला हे सगळं गूढ वाटलं. ‘त्या’ दिवसांमध्येच नैनितालला जाऊन ते तळं बघू या असं असोशीनं वाटलं. हिरवट रंग असतो म्हणे ‘त्या’ दिवसामध्ये ‘त्या’ पाण्याचा.. माझा माझ्या जीवनेच्छेवर पूर्ण विश्वास आहे. मी सहज पाहू शकेन त्या हिरवट पाण्याकडे, असं एका क्षणी ठामपणे वाटलं खरं, पण दुसऱ्याच क्षणी वाटलं, असं काय जागं करीत असेल ते पाणी.. त्याचा तो हिरवट रंग.. एखादं शापित तळं असल्यासारखं ते तळं, ते जे काही जागं करतं ते सगळ्यांच्याच आत असतं की काहीच माणसांच्या आत असतं.. म्हणजे खून करेपर्यंत प्रत्येक माणूस तुमच्या-माझ्यासारखाच असतो आणि कोण्या एका ‘त्या’ क्षणी तो खुनी होतो तसंच असेल का आत्महत्येचं पण? आपला जीव संपवायचं धाडस आणि काही वेळा या धाडसाचंच आकर्षण.. हे सगळ्यांच्याच आत असतं सुप्तपणे आणि आसपासच्या परिस्थितीने डिवचलं जाऊन जागं होतं की, काहीच लोकांमध्ये असतं..?
नायगारा धबधबा पाहण्यासाठी तिथे एक छोटी फिल्म दाखवली जाते. तो धबधबा प्रत्यक्ष पाहिल्यावर कित्येक लोकांना त्यात उडी घ्यावीशी वाटलेली आहे. काहींनी ती घेतलीसुद्धा आहे. त्यानंतर क्वचित एखाद जण वाचलं आहे.. काही जण लुप्त झाले आहेत. हे सगळं त्या फिल्ममध्ये पाहिल्यानंतर मी जेव्हा तो खळाळ कोसळणारा नायगारा प्रत्यक्ष पाहिला, तेव्हा मलाही त्यांनी तीव्रपणे त्याच्याकडे बोलावलं! त्याच्या त्या कोसळण्यावरून नजरच हटेना माझी. भारून गेल्यासारखं व्हायला लागलं. भवतालचं भान सुटायला लागलं. तो खळाळ आवाज.. ते कोसळणं.. तो आवाज.. ते कोसळणं. भवतालाशी असलेलं बांधलेपण सुटता सुटता खूप शांत वाटायला लागलं आतून. हा शांतपणा वेगळा होता. सभोवतालापासून अल्लद तुटत तुटत समोरच्या पाण्याशी एकतान होता होता येत चाललेला तो शांतपणा आणि एका क्षणी मला वाटलं. मी सहज घेऊ शकेन आत्ता उडी! तो विचार मनात येताक्षणी झपकन् आतमध्ये काहीतरी हललं आणि क्षणात मी परत आले. अचानक भवतालाशी जोडली गेले. काही वेळापूर्वी न दिसणारी आसपासची माणसं दिसली. त्यांचा आवाज. माझा त्या कठडय़ावरचा हात. समोरचा धबधबा. मी. मायदेशातले माझे जिवलग. अशा अनेक सेफ्टी दोरांनी मला मागे खेचलं. मी एक खोल श्वास घेतला आणि कठडय़ाला घट्ट पकडून पाहत राहिले, पण आता धबधब्याकडे टक लावून पाहण्याची हिंमत नाही केली. फारच जीवघेणा प्रेमिक होता तो. माझा माझ्यावरचा ताबा सुटवणारा.. त्याच्या डोळ्यांत हरवून कधी नकळत माझा हात त्याच्या हातात गेला असता हे माझं मलाच कळलं नसतं!
माझे एक स्नेही कुणाला तरी सांगताना मी ऐकलं होतं, ते टकमक टोकावर उभे होते तेव्हा सभोवताल इतकं विहंगम होतं की, त्यांना तिथून उडी घ्यावीशी वाटत होती.
नायगारा एकटक बघणारी मी किंवा टकमक टोकावरचे माझे स्नेही, उडी घ्यावीशी वाटणारे.. आम्ही दोघंही त्या उडी घ्यावीशी वाटण्याक्षणी दु:खी नव्हतो. उलट अत्युच्च आनंदातच होतो. समोरच्या सुंदरतेचं काय करावं हे न कळून त्यातच विलीन होऊ या, असं वाटवणारी ती असोशी त्या क्षणी आम्हाला जीव द्यायचा नव्हता तर समोरच्या भव्यतेला काहीतरी करून कवटाळायचं होतं. ते ईप्सित होतं ज्यामुळे जीव जाणार होता.. हे वेगळं नाही का? का हा आत्महत्येचाच विचार ?
माझी एक मावशी होती. फार मनस्वी. माझ्या आईची जिवाभावाची मैत्रीण. एका पारंपरिक मारवाडी कुटुंबातली. कलाकार मनाची. खानोलकरांच्या कविता तोंडपाठ म्हणणारी. खूप वाचणारी. त्यावर मनापासून बोलणारी, लिहिणारी, पोटातून समोरच्यावर प्रेम करणारी. लग्नानंतर एका पारंपरिक घरातून दुसऱ्या पारंपरिक घरात गेली. खानोलकरांची पुस्तकं जाऊन हातात फक्त स्टोव्ह राहिला. मी लहान असताना कित्येकदा ती आईकडे राहायला यायची. एकदा ती आली तेव्हा तिने मला सांगितलं की तिच्या पोटात बाळ आहे. मग ती मला म्हणायची, ‘‘पोटाला कान लाव, बघ बाळाचा आवाज येतो की नाही?’’ मला यायचाच नाही. मध्येच म्हणायची, ‘‘पोटाला हात लाव, बघ बाळाने लाथ मारली.’’ मी हातातला खेळ टाकून जीव खाऊन धावायची आणि तिच्या पोटाला हात लावायची. तोपर्यंत बाळाने लाथ मारणं थांबलेलं असायचं. मला तिच्याबरोबरचे हे खेळ खूप आवडायचे. जाता-येता मी तिच्या पोटाला कान आणि हात लावत बसायचे. एकदा मी शेल्फवर उंचावर ठेवलेलं थंड पाणी घ्यायला गेले होते आणि ते सगळं पाणी डोक्यावर सांडून घेतलं होतं तेव्हा ती खूप छान खळाळून हसली होती आणि मला पोटाशी ओढून माझं भिजकं, झिपरं डोकं तिने खसाखसा पुसून दिलं होतं. मला ती खूप आवडायची. आई म्हणते माझ्या आणि तिच्या दिसण्यात, हातवाऱ्यात साम्य आहे. थोडय़ा दिवसांनी तिला एक गोड मुलगा झाला. आई आणि मी कधीतरी तिच्याकडे जायचो. तिचं संपूर्ण घर आता अजिबात आठवत नाही. फक्त एक मोठा दिवाण आणि एक खूप छोटंसं स्वयंपाकघर आठवतं. तिचं बाळ दोन-तीन वर्षांचं असताना एक दिवस आईला फोन आला, स्टोव्हचा भडका उडून मावशी जळली आहे. आई आम्हाला आजीकडे सोडून तिच्याकडे गेली. मला सारखं ते तिचं छोटंसं स्वयंपाकघर आणि तिथे उडालेला भडका दिसत राहिला. मावशीने डोकं पुसून दिलं होतं तेव्हा तिच्या अंगाला छान वास आला होता. तो आठवत राहिला. मावशी गेली. त्यानंतर मी आईला कुणाकुणाशी बोलताना ऐकलं, मावशीच्या घरी गॅस होता. ती जळली तेव्हा रात्रीचा एक वाजला होता. इतक्या रात्रीचा मावशीने
स्टोव्ह का पेटवला? ‘बाळाचं दूध गरम करायला,’ असं जळलेल्या पण शुद्धीवर असलेल्या मावशीने आईला उत्तर दिलं होतं. तेव्हा आई तिला म्हणाली, ‘‘घरात गॅस असताना स्टोव्ह कशाला?’’ तेव्हा मावशी आईकडे एकटक नुसतीच पाहत राहिली होती. मावशी पंधरा दिवस हॉस्पिटलमध्ये होती. सगळ्यांना वाटलं, वाचणार. नंतर अचानक तिची तब्येत ढासळायला लागली. तेव्हा तिने एके दिवशी आईला सांगितलं. ‘‘माझ्या बाळाची काळजी घे. शनिवार-रविवार त्याला तुझ्याकडे नेत जा.’’ नंतर नंतर मावशी भ्रमात जायला लागली. मध्येच म्हणायची, ‘‘उगीच केलं गं हे.. मला वाचव.. बाळाला मोठं झालेलं पाहायचं आहे.’’ मग संबद्ध असंबद्धात बोलत राहिली, ‘‘जेवायला माणसं आली आहेत. श्रीखंड फ्रीजमध्ये आहे.’’ म्हणायची. तिचा मृत्यू स्पष्ट दिसायला लागल्यावर त्यांच्या धर्माच्या प्रथेनुसार तिची आई आणि काकू तिच्या हॉस्पिटलच्या खोलीत मंत्रोच्चार करायला लागल्या. ‘‘ॐ नमो हरि अन्ताणम्.. ॐ नमो हरि अन्ताणम्’च्या मंत्र्यांनी तिची खोली भारून गेली. मावशीच्या अंगावर भाजलेल्या रुग्णांच्या अंगावर ठेवतात तसा पिंजरा ठेवलेला होता. त्या पिंजऱ्याच्या आत तिचा फडफडणारा पक्षी. तिची आई म्हणाली, ‘‘बाळा डोळे मिटून चिंतन कर, तुला भगवान दिसतील.’’ मावशीला एव्हाना श्वास लागलेला होता. त्यातूनच ती कसंबसं म्हणाली, ‘‘हो आई, मला गाभारा दिसतो आहे.. दिसतो आहे मला गाभारा.. पण तिथे मूर्तीच नाही आहे.. आई, गाभाऱ्यात मूर्तीच नाही..’’
आपल्या सगळ्यांच्या आत एक तळं असतं. नैनितालच्या तळ्याच्या हिरवट रंगाचं आणि एक गाभारा पण असतो. प्रत्येकाच्या गाभाऱ्यात त्याच्या त्याच्या आवडीची मूर्ती. कुठल्याशा एकटय़ा क्षणी वाटून जातं. गाभाऱ्यात नाहीच आहे मूर्ती आणि मग तळ्याचं हिरवं पाणी बोलवायला लागतं. तेव्हा असतो निवडीचा क्षण. मी हे लिहीत असताना आत्ता कित्येकांच्या आयुष्यात हे निवडीचे क्षण समोर उभे असतील. त्या सर्व एकटय़ा क्षणांना सामोरे जाणाऱ्या त्या एकटय़ा जिवांना, त्या एकटय़ा निवडीच्या क्षणी काहीतरी हाती मिळू दे. त्या क्षणी त्यांना भीती वाटू दे.. मरणाची.. थोडासा चटका बसला तरी किती दुखतं.. कुठून येतं जाळून घ्यायचं बळ?.. थोडंसं खरचटलं तरी खूप दुखतं.. कुठून येतं ट्रेनखाली लोटण्याचं बळ? गोळ्या झाडण्याचं.. नसा कापण्याचं.. कुणाचाच गाभारा पूर्ण अंधारलेला कसा असेल? कुठून तरी तिरीप येतच असते. ती त्या निर्मम निवडीच्या क्षणी दिसत नाही.
दोनच दिवसांपूर्वी एका मैत्रिणीच्या जवळच्या मित्रांनी स्वत:ला संपवलं. चारच दिवसांपूर्वी तो तिला भेटला होता तेव्हा आनंदी होता. ‘सगळं छान आहे’ म्हणणारा तो चार दिवसांनी स्वत:ला संपवतो. ती दिवसभर फाटून रडत होती. आता ‘‘का रे केलंस’’ सारखे प्रश्न तरी कुणाला विचारायचे? कुणावर रागवायचं? त्याला त्याच्या आतलं हिरवं पाणी खुणावत असताना त्याने एक फोन जरी फिरवला असता, एक जरी हाक मारली असती कुणाला.. एकटे सगळेच आहेत. नवरा-बायकोसारख्या जवळच्या नात्यात, पण आज मधनंच हाक मारून ‘आहेस ना..’ विचारावंसं वाटतं. पण मग विचारायचं तसं.. मारायचा हाका.. इतकंही झाकोळलेलं नाही सगळं. आपल्या ‘आहेस ना..’ ला ‘हो’ म्हणणारं एकही कुणी नसतं..? असं नसेल. ते असणारं बघायचं नाही असं ठरवून त्या असलेल्याला दुखावून निघून जाणारे हे रुसलेले जीव.. एकटे. दु:खी. मान्य. अनेक न सुटणाऱ्या प्रश्नात गुरफटलेले. मान्य. पण उत्तर चुकतं आहे.. नक्कीच!
या चुकलेल्या उत्तरातून बचावलेले कितीतरी जण पाहिलेत. एका मैत्रिणीने झोपेच्या गोळ्या घेतल्या. वाचली. आज एका गोड मुलाची आई आहे. खूप सुखात आहे. एका मित्राने नस कापली. वाचला. आज अतिशय उत्तम लिहितो आहे.
 साऊथ कोरियात सगळ्यात जास्त आत्महत्या होतात, असं कळलं. एका आत्महत्येतून बचावलेला साऊथ कोरियन मुलगा आता फार महत्त्वाचं काम करतो आहे. नॅशनल जॉग्राफिक या चॅनलवर ‘टॅबू’ नावाचा एक कार्यक्रम असतो. त्या कार्यक्रमातल्या एका भागात या कोरियन माणसाच्या कामाविषयी माझ्या मित्राने पाहिलं. हा कोरियन माणूस डिप्रेशनचा त्रास होणाऱ्या अनेक युवक-युवतींबरोबर एक शिबीर करतो. त्या शिबिरात तो त्या सगळ्यांना मृत्यू ‘जगायला’ लावतो. स्वत:चं मृत्युपत्र लिहायला लावतो. मग त्यांना कॉफिनमध्ये बंद करून काही क्षण ठेवलं जातं. तो कॉफिनमधला अंधार त्यांना खूप काही शिकवून जातो. त्याचं शिबीर कित्येक आयुष्य संपवणाऱ्यांना परत आयुष्याकडे आणतं आहे..
सगळं संपलं की काहीच राहत नाही. अशा संपण्यापेक्षा आपण दु:खी आयुष्य जरी जगलो तरी ती नक्कीच नक्कीच मरून जाण्यापेक्षा चांगली निवड असेल. कारण त्या दु:खाच्या सांदरीतून आयुष्य सुखाच्या छोटय़ा का होईना, चांदण्या पाठवलेच. खात्रीने. त्यामुळे रडकं, निराश, रागीट, वेदनेचं का होईना. पण जगणं निवडू या. एकदा का ‘आयुष्याला’ निवडलं की पुढचं सगळं आयुष्यच बघेल. खात्रीनं. फक्त ती आधीची एक निवड, कितीही अवघड, अशक्य वाटली तरी करूया.
 कुसुमाग्रजांच्या कवितेतली एक ओळ आठवते. त्यांनी ती वेगळ्या संदर्भानी, व्यंगाने लिहिली.. पण मला ती शब्दश म्हणायची आहे.. ‘गाभारा सलामत तो देव पचास!’