लग्न या व्यवस्थेचाच गांभीर्याने विचार करायची वेळ आलेली आहे. खरं तर त्याची सुरुवात काही पिढ्या आधीपासूनच झाली आहे, मात्र आता युवा पिढी ‘आम्हाला लग्न नको, मुलं नकोत,’ हे स्पष्टपणे बोलते आहे. ही मानसिकता कशामुळे झाली आहे याचा विचार प्रत्येक व्यक्तीने करायला हवा, अन्यथा…
‘फिडलर ऑन द रूफ’ नावाचा एक नितांतसुंदर चित्रपट १९७१ मध्ये प्रदर्शित झाला. हा संगीतप्रधान चित्रपट जगभर नावाजला गेला. बॉलीवूडच्या असंख्य चित्रपटांचा बाप म्हणावा असा हा चित्रपट आहे. शोलेम आलेकेम या रशियाच्या लेखकाने १९०५च्या आसपास यिडिश भाषेत लिहिलेल्या एका कादंबरीवरून बेतलेला हा चित्रपट आहे. यातलं मुख्य पात्र ‘तेव्ये’. हा युक्रेनमध्ये राहणारा एक ज्यू गवळी आहे. हाइम टोपोल या अत्यंत प्रतिभावान कलाकाराने हे पात्र साकारलं आहे. १९०५ मध्ये म्हणजे १२० वर्षांपूर्वी, आपल्या तीन मुली प्रेमविवाह करणार म्हटल्यावर समाजाची आणि स्वत:चीही समजूत तेव्ये काढू शकत नाही त्याची ही गोष्ट. आजही हा चित्रपट बघताना डोळ्यांच्या कडा ओलावतात इतका सच्चेपणा त्यात आहे.
‘कट टू…’ १९८० मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट, ‘कर्ज’. शोमन सुभाष घईंची ‘पुनर्जन्म’ या विषयावरची गोष्ट. अप्रतिम गाणी, गिटार वाजवत सिमी गरेवालकडे खुनशी नजरेने बघणारा ऋषी कपूर, या सगळ्याच गोष्टी कायमच्या स्मरणात राहिलेल्या आहेत. यातलं एक विनोदी पात्र म्हणजे आपल्या लग्नाळू मुलीबद्दल रडत बोलणारा कॉलेज प्राध्यापक मुक्री. आपली मुलगी उजवण्यासाठीची त्याची केविलवाणी धडपड चित्रपटात मध्ये मध्ये ‘कॉमिक रिलीफ’ देत राहते. विषय तोच, मुलींचं लग्न.
आठवून बघा, ‘प्राइड अँड प्रेज्यूडिस’ सारखी गाजलेली ब्रिटिश कादंबरी असो, विविध भारतीय भाषांमधले असंख्य चित्रपट असोत, नाटकं असोत किंवा अनेक दैनंदिन मालिका असोत ‘लग्न’, या विषयाभोवती फिरत असतात. ‘शादीचा लड्डू’या एका विषयाने जेवढ्या कथा-पटकथा पुरवल्या आहेत, तेवढ्या व्यासांच्या महाभारतानेही पुरवल्या नसाव्यात. जणू काही माणूस जन्माला येतो, त्याचं लग्न होतं आणि तो मृत्यू पावतो. एवढ्या तीनच घटना त्याच्या आयुष्यात घडतात.
लग्न ही आयुष्याला कलाटणी देणारी सर्वात महत्त्वाची घटना असू शकते, किंवा खूप मोठा काळ होती हे मलाही कबूल आहे. दोन जीवांचं मीलन, दोन कुटुंबं एकत्र येणं, संसाराच्या वेलीवर नाजूक फुलं उमलणं वगैरे कविकल्पनांमुळे लग्न या एका गोष्टीला जेवढं ग्लॅमर प्राप्त झालंय तेवढं कदाचित कशालाच नसावं. पण एखाद्या गोष्टीचा फुगा जेवढा जास्त तेवढाच तो फुटतानाचा आवाज मोठा, तसं काहीसं आता झालंय. हल्ली मुलांना आणि विशेषत: मुलींना, लग्नच करायचं नसतं. जगभर हे दृश्य दिसतं आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही.
गेले काही दिवस हुंडाबळीच्या काही अत्यंत दुर्दैवी घटना विविध माध्यमांमध्ये ऐकायला मिळतायत. या घटना महानगरांमधल्याही आहेत आणि छोट्या गावांमधल्याही आहेत. कुणी आईवडिलांना दोष देणारेही आहेत. कुणी ‘प्रेमविवाहा’मुळे मुली बिघडतात म्हणणारेही आहेत. दोष देणं सोपं आहे. पण आपली मुलगी मारली जावी, तिला छळ सोसावा लागावा असं कुणाही आईवडिलांना वाटत नसतं आणि मुलगी तर सुखी संसाराची स्वप्नं रंगवतच एका अनोळखी घराला ‘आपलं’ घर मानायला तयार होते. आजही, २०२५ मध्येसुद्धा या घटना एवढ्या मोठ्या प्रमाणावर घडत असतील तर ‘लग्न’ या व्यवस्थेविषयीच विचार व्हायला हवा.
कळपात राहणाऱ्या मनुष्य प्राण्याला कधी तरी, आपली संपत्ती राखायला आपल्याच रक्ताचं मूल असायला हवं असं वाटलं. मग अर्थातच मुलाला जन्म देणारी बाई आपल्याच ताब्यात असायला हवी असं वाटलं आणि यातून ‘लग्न’ व्यवस्थेची सुरुवात झाली असं म्हणतात. इतिहासाचे अभ्यासक वि. का. राजवाडे यांच्या ‘भारतीय विवाह संस्थेचा इतिहास’ या पुस्तकाने खूप मोठा काळ खळबळ माजवली होती, कारण तार्किक मुद्दे जेव्हा भावनिक मुद्द्यांच्या आड येतात, तेव्हा ते चौकटीच्या बाहेर विचार करण्याची इच्छा नसणाऱ्या एका मोठ्या गटाला अडचणीत टाकू लागतात. पण ‘लग्न’ ही केवळ एक सोय होती, हे अनेक इतिहासकारांनी सांगितलं आहे. काही जुन्या लग्नपत्रिकांचे नमुने पाहिले तर ‘आमच्या चिरंजीव कन्येचा शरीरसंबंध अमुक एका मुलाशी निश्चित केला आहे’ असा मजकूर आढळतो. मामला अत्यंत सरळ होता. लग्न मनुष्य प्राण्याच्या प्राथमिक गरजा भागण्यासाठी आणि वंशवृद्धीसाठी केलं जात होतं. ‘लग’ या धातूचा अर्थ जोडणं. विवाह म्हणजे ‘वि’ आणि ‘वह’ या दोन धातूंचा संयोग, एका विशिष्ट मार्गाने आपलं आयुष्य वाहून नेणं, असे अनेक सुंदर शब्द या संयोगासाठी निर्माण झाले. पुढे मग सोयीनुसार कामाची विभागणी झाली. बायका एकामागोमाग एक मुलांना जन्म देत बराच काळ गरोदर असायच्या, अशा बाईला शारीरिक कष्टाची कामं करणं त्रासदायक व्हायचं. म्हणून पुरुष शिकार करून किंवा अन्न, वस्त्र, पैसा कमवून घरी आणायचे. हळूहळू ‘मिळवता तोच कर्ता’ ही भावना बळावत गेली. अधिकाराचा काटा पुरुषांकडे झुकायला लागला. ‘संतती’ याचभोवती ही व्यवस्था फिरत असल्यामुळे, एकापेक्षा अधिक बायका म्हणजे जास्त संतती, एकाच बाईला अनेक मुलं हे सर्रास दिसू लागलं. बायका त्या कर्त्या पुरुषावर वेगवेगळ्या कारणांनी अधिकाधिक अवलंबून राहू लागल्या. कुटुंब व्यवस्थेचा जो एक मूळ तोल साधलेला होता तोच पूर्णपणे ढासळला. मग चांगल्या मुलानं आपल्या मुलीला पसंत करावं म्हणून त्याला लाच दिली जाऊ लागली, ज्याला ‘हुंडा’ हे नाव पडलं. मुलासाठी लाच मिळते हे कळल्यावर आईवडीलही चेकाळले आणि मग हेही सर्वसंमत झालं. आपण ‘सौभाग्यवती’ झालो की आपल्या आईवडिलांची चिंता मिटते, समाजात त्यांना मान मिळतो, हे बघून मुलीही गप्प बसल्या.
‘सौभाग्यवती’ हा शब्दही कधी तरी कुणा मनुष्यानेच निर्माण केला आहे. बहुधा पुरुषानेच असावा. तोही गेल्या तीन-चारशे वर्षांतच. पुराणकाळातल्या कुठल्याही लिखाणात, सौ.कौसल्या, सौ. मंदोदरी असं लिहिलेलं मी तरी वाचलेलं, ऐकलेलं नाही. काहींच्या मते या शब्दाचा अर्थ थेट बाईच्या शरीराशी निगडित आहे, तर काहींच्या मते दैवाशी. नवरा असणं हे बाईचं ‘भाग्य’! मग तो कसाही असला तरी अस्तित्वात आहे. पुरुषांना काय, एक नाही तर दुसरी बाई मिळणारच आहे. येऊन-जाऊन मूल तर जन्माला घालायचं आहे तिनं, ते कुणीही घालेल. त्यात त्याचं भाग्य काय? ही मानसिकता कमी-अधिक प्रमाणात जगभर आहे.
मातृसत्ताक पद्धतीची काही अतिशय तुरळक उदाहरणं सोडली तर सर्वत्र ‘मुलीचं लग्न’ हा अत्यंत ज्वलंत विषय आहे. तो नाहीये असं म्हणणाऱ्यांनी स्वत:च्या आणि आपल्या आजूबाजूच्या ५० घरांच्या पलीकडचं जग बघावं. परिस्थिती बदललेली नाहीये. मग अशी ही बाई एकदा घरी आली की तिचा कुणीही, कितीही छळ केला, तिला मारलं, झोडलं, टोमणे मारले, तिच्या बापाकडून पुन:पुन्हा अधिकाधिक पैसा मागत राहिलं तर ती काय करणार? पण मग वैष्णवी हगवणेसारखी मुलगी, सौभाग्यवती म्हणायची का दुर्भाग्यवती? असा नवरा असं सासर मिळालं हे दुर्भाग्य तिचं. आणि ते मागतील तशी लाच द्यायला तिचे आईवडील तयार झाले हा त्यांच्यावर ‘लग्न’ या संस्थेचा असलेला पगडा म्हणावा का?
‘केंद्रीय गुन्हे नोंद ब्युरो’नुसार भारतात दररोज १७ स्त्रिया हुंडाबळी जातात, अशा हत्या पुढारलेल्या म्हणवणाऱ्या कुटुंबांमध्येही होतात. मग अशिक्षित, सामाजिकदृष्ट्या मागे पडलेल्या गटांबद्दल तर काय बोलायचं. जेव्हा जेव्हा जिथे एखादी स्त्री, मी नावामागे ‘सौ’ लावत नाही, मी माझं आडनाव बदललं नाही, असं म्हणते तेव्हा झुंडीच्या झुंडी तिच्या विचारांचं खंडन करायला धावतात. असंस्कृत भाषेत तिच्या बुद्धीचा, चारित्र्याचा समाचार घेतात. लगेच ती संस्कृतिभ्रष्ट, संस्कारहीन, धर्मभ्रष्ट, शीलभ्रष्ट आहे, इथपासून ‘काहीतरी फालतू स्त्रीमुक्तीच्या कल्पना घेऊन जगते’ इथपर्यंत सगळं बोललं जातं. पण स्वत:च्या नावाच्या संबोधनाबद्दल निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकालाच असायला हवं. आजही बायकामुलींना साधं आपल्या नावामागे उपाधी काय लावावी याचं स्वातंत्र्य नसेल, तर काळाच्या कोणत्या टप्प्यावर आहोत आपण!
काळ पुढे जातोय, स्त्री-पुरुषांनी एकत्र राहण्याची कारणं बदलत चालली आहेत. प्रजनन हे कारण आता राहिलं नाहीये. कित्येक तरुण मुली लग्न न करण्याचा पर्याय निवडू लागल्या आहेत. आपल्या आईवडिलांची ओढाताण होईल, हुंडा द्यावा लागेल, त्यानंतरही आपला छळ होणार नाही याची काही हमी नाही आणि याउपर आपल्या स्वातंत्र्यावर बंधनं येतील असं त्यांना वाटतंय. महाराष्ट्रासारख्या पुढारलेल्या राज्यात एका ज्ञातीला ‘लग्न कसं करावं’ याबद्दल काही नियम करावे लागले आहेत हे खूप बोलकं आहे. शिक्षणानं बाकी सगळं दिलं आपल्याला, मग ‘लग्न’ या महत्त्वाच्या गोष्टीबद्दल अधिक डोळसपणा का नाही दिला?
दोन माणसांचं एकमेकांवर प्रेम आहे, त्यांना एकमेकांबरोबर जास्तीत जास्त काळ राहावं, संसार करावा, मुलांना जन्म द्यावा, आयुष्य आनंदात जगावं असं वाटणं हेच फक्त लग्नाचं कारण असू शकतं, बाकी काहीही नाही. इथून पुढच्या काळात याशिवाय दुसऱ्या कोणत्याही कारणाने केलेली लग्न टिकणार नाहीत. घटस्फोटांचं प्रमाण वाढतंय याचा दोष फक्त तरुण पिढीला, किंवा कमावत्या मुलींना देऊन चालणार नाही. ‘श्रीमंत नवरा’ यापलीकडे मुलींना प्रेम आणि आदरही गरजेचा वाटतोय. एकटेपणा येईल की काय, म्हातारपणी कुणाची साथ असेल, लोक काय म्हणतील, हे विचार आता दुय्यम झाले आहेत. नात्यात पैसा आला की नातं संपलं.
१०० नकार पचवलेली मुलगी एकशेएकाव्या होकार देणाऱ्या मुलाशी मुकाट्याने लग्न करून, सौभाग्यवती अमुकतमुक होऊन नेटाने त्याच्याबरोबर संसार करते, हे दृश्य आता कालबाह्य झालं आहे हे मान्य करायलाच हवं. तरीही आम्हाला हेच समाजात दिसायला हवं असं ज्यांचं म्हणणं असेल, त्यांनी डोळ्यांवर कातडं ओढलं आहे, बाकी काही नाही. पुढच्या पिढीला ‘लग्न’ या व्यवस्थेची चांगली बाजू दिसली तरच ती लग्न करण्याच्या भानगडीत पडेल, नाही तर नाही. वेळीच सावधान… नाही तर आता इथून पुढे लग्नच होणार नाहीत!