१९ जून ते २ जुलै १९७५ दरम्यान मेक्सिको शहरात पहिली ‘आंतरराष्ट्रीय महिला परिषद’ भरवली गेली होती, त्याच वेळी मेक्सिकोच्या दुसऱ्या टोकाला स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या विविध संघटना आणि गैरसरकारी स्वयंसेवी संस्थांनी ‘द ट्रिब्यून’ ही समांतर परिषद आयोजित केली होती. पुढील पन्नास वर्षांतील स्त्री चळवळीला दिशा देण्याचे काम या समांतर परिषदेने केले. मात्र आजही आक्रमक वंशवाद, संकुचित राष्ट्रवाद आणि युद्धखोरीचा प्रतिकार हे स्त्रियांच्या चळवळीपुढील गंभीर आव्हान ठरत आहे.

लॅ टिन अमेरिकेचा भाग असलेला मेक्सिको हा उत्तर अमेरिकेतील देश तिथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. मेक्सिको शहर या देशाची राजधानी आहे. स्त्रियांच्या चळवळीचा इतिहास या शहराशी जोडलेला आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने १९७५ आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केले. घोषणा तर झाली पण नेमके काय करायचे? दुनियेला स्त्रियांविषयीच्या भेदभावाची जाणीव करून देण्यासाठी कोणती धोरणे, कार्यक्रम आखायचे याचे चित्र स्पष्ट नव्हते. त्यातून सदस्य राष्ट्रांच्या सदस्यांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली. संयुक्त राष्ट्राच्या पुढाकारातून जागतिक पातळीवर पूर्णपणे स्त्रियांच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणारे संमेलन घेण्याचे ठरले. जबाबदारी मोठी होती. मेक्सिकोने तयारी दाखवली. या परिषदेसाठी निधी गोळा करण्याची सुरुवात इराणच्या राजकुमारी अशरफ यांनी केली.

१९ जून ते २ जुलै १९७५ या चौदा दिवसांत झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेला या आठवड्यात पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. मेक्सिको शहरातील ‘जुआन दे ला बरेरा व्यायामशाळे’त ही भव्य परिषद झाली. परिषदेमुळे जगातील कृतिशील विचारवंत, स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि विविध स्वयंसेवी संस्थांना आपापसात संवाद करण्याची, एकत्र येण्याची, संघटित होण्याची संधी मिळाली. स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या कार्यकर्त्या व संघटनांची साखळी तयार झाली.

संयुक्त राष्ट्राच्या १३३ राष्ट्रांची प्रतिनिधी मंडळे या परिषदेत सहभागी झाली होती, त्या मंडळांचे नेतृत्व स्त्रियांनी केले होते. ही नव्या युगाची सुरुवात होती. भारताच्या दहा सदस्य प्रतिनिधी मंडळात संसद सदस्य आणि ‘नॅशनल फेडरेशन ऑफ विमेन’च्या उपाध्यक्षा पार्वती कृष्णन आणि अर्थशास्त्रज्ञ देवकी जैन या सहभागी झाल्या होत्या.

पुढील दशकासाठी दिशा, धोरणं आणि कार्यक्रम ठरवण्याचे आव्हान परिषदेपुढे होते. समानता, शांतता आणि विकासकेंद्रित तीन उद्दिष्टे ठरवण्यात आली. संपूर्ण लिंगसमानता आणि लिंगभेदभावाचे उच्चाटन, विकासप्रक्रियेत स्त्रियांचा सामूहिक सहभाग. जागतिक शांततेसाठी स्त्रियांच्या योगदानासाठी ही परिषद असल्याचे जाहीर करण्यात आले. दुनियेतील सर्व राष्ट्रांचे मैत्रीपूर्ण संबंध आणि नि:शस्त्रीकरणावर परिषदेत भर देण्यात आला.

शिक्षण, रोजगार, राजनैतिक सहभाग अशा विविध विषयांवर परिषदेत चर्चासत्रे झाली. सदस्य राष्ट्रांच्या सरकारांना राष्ट्रीय धोरणं आणि लक्ष्य तसेच प्राधान्यक्रम तयार करण्याचे आवाहन परिषदेत विविध वक्त्यांनी केले. स्त्रियांच्या प्रगतीसाठी ‘आंतरराष्ट्रीय संशोधन आणि प्रशिक्षण संस्था’(INSRR) तसेच स्त्रियांसाठी ‘संयुक्त राष्ट्र विकास निधी’(UNFEM) स्थापन करण्याची गरज परिषदेत प्रथम व्यक्त झाली. तशा संस्था स्थापनही झाल्या. २०१० मध्ये या दोन्ही संस्था संयुक्त राष्ट्रांच्या अन्य दोन संस्थांसह विलीन करून ‘युनायटेड नेशन विमेन’ची स्थापना करण्यात आली.

परिषदेत स्त्रियांसाठी समानता, विकास आणि शांततेसाठी स्त्रियांच्या योगदानाविषयीचा ‘मेक्सिको जाहीरनामा’ प्रसिद्ध करण्यात आला. परिषदेच्या आग्रहामुळे महासभेने पाच महिन्यांनंतर १९७६ ते १९८५ महिला दशक जाहीर केले. लिंगभाव समानतेवर वैश्विक संवाद सुरू झाला. परिषदेच्या जाहीरनाम्याप्रमाणे सहभागी राष्ट्रांना आपली धोरणे आणि स्त्री-पुरुष समानतेसाठीचे प्राधान्यक्रम निश्चित करण्याचे आवाहन करण्यात आले. देशाच्या परराष्ट्र नीतीचा स्त्रियांच्या जीवनावर होणाऱ्या परिणामांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले.

‘जुआन दे ला बरेरा’मध्ये ही परिषद सुरू असतानाच मेक्सिको शहराच्या दुसऱ्या टोकाला स्त्रियांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या विविध संघटना आणि गैरसरकारी स्वयंसेवी संस्थांनी समांतर परिषद घेतली. ‘द ट्रिब्यून’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिषदेत संयुक्त राष्ट्र संघाने आयोजित केलेल्या परिषदेपेक्षा अधिक म्हणजे सहा हजार प्रतिनिधी उपस्थित होत्या. ‘ट्रिब्यून’च्या संयोजनात ‘यंग विमेन ख्रिाश्चन असोसिएशन’ (वायडब्ल्यूसीए )च्या निरीक्षक मिल्ड्रेड पार्सिंगर यांनी पुढाकार घेतला. स्त्रियांचा आवाज बुलंद करणाऱ्या या परिषदेने दोनशे विषयांवर चर्चा केली.

‘नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर विमेन’च्या संस्थापक बेटी फ्रीडन आणि कार्यकर्ती जॅकी सेबेलोस, ‘मेक्सिकन लेसबियन’ कार्यकर्त्या नॅन्सी कार्डेनास, ‘लेबर युनियन विमेन’च्या थेल्मा, ‘नॅशनल कौन्सिल निग्रो विमेन’च्या डोरोथी हाईट तसेच मेक्सिकन स्त्रीवादी कार्यकर्त्या एस्पेरांझा मार्टी अशा अनेक संघर्षशील आणि विचारी स्त्री कार्यकर्त्यांनी या समांतर परिषदेतील चर्चेत ऊर्जा निर्माण केली. मुख्य परिषदेत नसलेले आणि सरकारी प्रतिनिधींनी टाळलेले अनेक विषय ‘ट्रिब्यून’मध्ये चर्चिले गेले. विकास, शिक्षण, शांतता, आरोग्य, मानवी हक्क, वेश्या व्यवसाय, समलैंगिक संबंध, वंशभेद, वर्णभेद, वंशवाद आणि लिंगभेद अशा विविध विषयांवर ३६ बैठका घेण्यात आल्या. पुढील ५० वर्षांतील स्त्री चळवळीला दिशा देण्याचे काम या समांतर परिषदेने केले.

स्त्रीवादी चळवळीतील पाश्चात्त्य, समाजवादी तसेच वेगळेपणाने काम करणाऱ्या प्रवाहातील कार्यकर्त्या ‘ट्रिब्यून’ला उपस्थित होत्या. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रियांच्या सामूहिक हक्कांची सरकारवरील जबाबदारी आणि अंमलबजावणी तसेच स्त्रियांचे आर्थिक सक्षमीकरण, अन्नसुरक्षा अशा विविध विषयांवर समतोल चर्चा ‘ट्रिब्यून’मध्ये झाली.

विकसनशील देशांना औद्याोगिक राष्ट्रांकडून मिळणारी आर्थिक मदत स्त्रियांसाठी अनेकदा हानीकारक असते या मुद्द्याकडे ‘ट्रिब्यून’ने लक्ष वेधले. तंत्रज्ञानाच्या अतिरिक्त वापरामुळे शेती करणाऱ्या स्त्रियांना जगभर विस्थापित केले जाते. स्वस्त कामगार म्हणून स्त्रियांचे शोषण होते हा दुर्लक्षित असलेला मुद्दा पुढे आणला. लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्याच्या अधिकारा इतकाच समान वेतनाचा मुद्दा महत्त्वाचा आहे याकडे आणि स्त्री-पुरुष संबंधातील हिंसेकडे दुनियेतील स्त्रीवादी चळवळींचे लक्ष वेधण्यात आले.

मेक्सिकोचा जाहीरनामा आणि कृती आराखडा स्वीकारत असतानाच ‘ट्रिब्यून’ने स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात वसाहतवाद आणि नववसाहतवाद, परकीय कब्जा, झिओनिझम, वर्णभेद आणि सर्व वांशिक भेदभावाचा निषेध करण्यात आला. झिओनिझम (ज्यू वर्चस्ववावाद ) हा वंशवादाचीच निर्मिती आहे असे म्हणत बेटी फ्रीडन यांनी ‘झिओओनिझम’ची चर्चा मेक्सिको परिषदेला करायला लावली. ‘द ट्रिब्यून’ आणि मुख्य परिषदेचा एकमेकांशी संवाद होता. त्यामुळे पुढील काळातील झालेल्या जागतिक महिला परिषदा अधिक सक्षमपणे स्त्रियांच्या समस्यांशी जुळल्या गेल्या.

ट्रिब्यून’ समांतर परिषदेला भारतातून अहमदाबादच्या ‘सेवा’ संस्थेच्या इला भट आणि पत्रकार व कामगार नेत्या कृष्णा अहुजा पटेल उपस्थित होत्या. दोघींनीही परिषदेत भारतातील तळागाळातील स्त्रियांच्या प्रश्नांची मांडणी केली. ‘वुई आर पुअर बट सो मेनी’ या आत्मकथनात इला भट यांनी परिषदेच्या अनुभवाविषयी भारावून लिहिले, ‘परिषदेतल्या उत्साही वातावरणात पूर्वी कधीही ऐकिवात नसलेले जगभरातल्या स्त्रियांचे विविध प्रश्न समजून घेण्याची संधी मला लाभली. बोलिव्हियातल्या खाणींमध्ये काम करणाऱ्या कामगार स्त्रियांना, त्यांच्या मजूर संघटनेच्या हिंसक कार्यपद्धतीला आळा घालण्यासाठी द्यावी लागणारी लढत, मलेशियातल्या मळ्यांमधल्या मजुरांची घरांसाठीची मागणी, आफ्रिकेतल्या देशात स्त्रियांच्या योनिमार्गाची सुन्ता करण्याची भीषण प्रथा अशा अनेक गोष्टी मला नव्यानेच कळल्या. पाश्चिमात्य देशांतल्या गोऱ्या स्त्रियासुद्धा दरिद्री असू शकतात, याचा मला साक्षात्कार झाला. अमेरिकेच्या इतिहासाच्या नोंदीत आपल्या आक्रोशाची नोंद कुठेही नसल्याबद्दल तिथल्या कृष्णवर्णीय स्त्रियांना का खंत वाटते याचे कारण मला उमगायला खूप काळ जावा लागला. समान कामासाठी समान पगार मिळायला हवा ही स्त्रियांची मागणी मी समजू शकत होते. परंतु इंग्लंडमधल्या स्त्रिया गृहिणी म्हणून जे घरकाम करत होत्या त्यासाठी पगार मागत होत्या, हे माझ्या आकलनापलीकडलं होतं. आपल्या देशात घरकाम हे स्त्रीत्वाचे प्रतीक मानले जाते. या साऱ्या गोष्टी इतक्या वेगळ्या होत्या आणि इतक्या विचारप्रवर्तक होत्या! जगभरातल्या बायकांमध्ये सारखेपणा होता आणि प्रचंड भिन्नतासुद्धा होती. स्त्रियांना समान हक्क मिळावेत, हा नवा विचार माझ्या मनात रुजायला सुरुवात होऊ लागली होती. गरीब स्त्रियांना संघटित करून त्यांना वित्तपुरवठा करण्याच्या आमच्या प्रयत्नांबद्दल मी या परिषदेत बोलले. परिषदेच्या शेवटच्या दिवशी आम्ही तिघी, स्त्रियांना असलेल्या कर्जाच्या गरजेबद्दल बोललो. एस्थर आक्लू ही घानातली उद्याोजिका, निकाएला वॉल्श ही न्यू यॉर्कच्या ‘वॉल स्ट्रीट’वरील बँकर आणि ‘सेवा बँके’ची संस्थापिका आणि प्रमुख असलेली मी. आम्हा तिघींना स्त्रियांसाठीच म्हणून उभ्या करता येणाऱ्या जागतिक बँकेची कल्पना स्फुरली. त्याद्वारे जगभरातल्या स्त्रियांना कर्ज उपलब्ध करून द्यावीत अशी आमची कल्पना होती. निकाएलाने आमचं स्वप्न सत्यात परिवर्तित केलं. आज स्त्रियांसाठीची ही जागतिक बँक स्त्रियांना वित्तपुरवठा करणारी मोठी जोमदार शक्ती आहे.’ इला भट यांच्या या कथनात ‘ट्रिब्यून’च्या कामकाजाचे प्रतिबिंब उमटलेले आहे.

समांतर परिषदेने ‘झिओनिझम’विषयी व्यक्त केलेली चिंता भविष्यसूचक होती. इस्रायलने पॅलेस्टाईनविरुद्ध सुरू केलेले युद्ध, गाझा पट्टीतील हिंसाचार ‘झिओनिझम’ वर्चस्ववादाचा क्रूर आविष्कार आहे. ‘फ्रीडम फ्लोटीला फाउंडेशन’ची मॅडेलिन बोट घेऊन बारा साथीदारांसह सत्याग्रहाच्या मार्गाने निघालेल्या पर्यावरण कार्यकर्त्या ग्रेटा थनबर्ग म्हणतात, ‘‘आम्ही गाझाच्या त्या २३ लाख लोकांसाठी मरायला तयार आहोत, जे दररोज भूक, तहान आणि हत्याकांडात मरत आहेत.’’

बेटी फ्रीडन यांचा आणि मेक्सिकोतील पहिल्या समांतर आंतरराष्ट्रीय महिला परिषदेतील मैत्रीचा, करुणेचा, सहिष्णुतेचा, भगिनीभावाचा तसेच वंशवाद आणि युद्ध विरोधाचा विचार ग्रेटा पुढे नेत आहे. हा मानवतेचा प्रवास आहे. मॅडेलिन बोट इस्रायल सरकारने जप्त केली. ग्रेटा आणि तिच्या साथीदारांना ताब्यात घेतले. हा संघर्ष थांबणारा नाही. ११ जूनला पॅरिसमधील डाव्या संघटना आणि पॅलेस्टाईन समर्थकांनी हजारोंच्या संख्येने रस्त्यावर येऊन इस्रायलने ताब्यात घेतलेल्या मॅडेलिन बोटीवरील साथीदारांच्या सुटकेची मागणी केली. आम्ही गाझाच्या सोबत आहोत अशा घोषणा दिल्या. आक्रमक वंशवाद, संकुचित राष्ट्रवाद आणि युद्धखोरीचा प्रतिकार हे स्त्रियांच्या चळवळीपुढील गंभीर आव्हान आहे. रशिया- युक्रेन युद्ध थांबले पाहिजे. गाझा पट्टीतील हिंसाचार थांबो, पॅलेस्टाईनी स्त्रिया, मुले आणि जनतेच्या वाट्याला येणारी उपासमार, हत्याकांड संपो, हीच प्रार्थना.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

advnishashiurkar@gmail.com