कोणत्याही कार्यक्रमाचे नियोजन करताना ज्यांच्यासाठी हा अनुभव तयार केला जातो त्यांच्या गरजांना केंद्रस्थानी ठेवणं हे आदितत्त्व असतं, परंतु अनेकदा ढिसाळपणे केल्या जाणाऱ्या नियोजनामुळे कार्यक्रम कंटाळवाणे आणि एकसुरी होतात. प्रेक्षकांना कार्यक्रमाचा आस्वाद घेता येत नाही. म्हणूनच आवश्यक असतं, ‘अनुभव आयोजन’. वक्त्यांच्या आणि श्रोत्यांच्याही कायमचं स्मरणात राहील असं…

एक आटपाट नगर असतं. तिथली प्रतिष्ठित संस्था व्याख्यानासाठी एका वक्त्यांना बोलावते. कार्यक्रम सायंकाळी सात वाजता सुरू होणार असतो. प्रवासातले अडसर पार करून वक्ते साडेसहाला पोहोचतात. आधीच्या कार्यक्रमाला उशीर झाल्याने आपला समारंभ साडेसातला सुरू होणार असं सांगितलं जातं. ‘पावणेआठला तुमचं भाषण सुरू’ असा दिलासा दिला जातो. ७ वाजून ४० मिनिटांनी पडदा उघडल्यावर सारे आयोजक व्यासपीठावर येतात. फोटो काढून होतात. प्रत्येकाला दीपप्रज्वलन करायचं असल्याने दोन मोठ्या समया असतात. प्रास्ताविक सुरू करणारे पंधरा मिनिटं खातात. स्थानिक कलाकारांच्या कलाविष्काराची २० मिनिटं त्यात घुसतात. आता वक्ते अवाक झालेले. प्रेक्षक कंटाळलेले. ‘आता तुझी पाळी’ असं स्वगत वक्त्यांच्या मनात चालू असताना स्थानिक राजकीय नेते ‘एन्ट्री’ घेतात. त्यांचा सत्कार आणि मनोगत साजरं होतं. त्यानंतर पाहुण्यांचा परिचय करून देणाऱ्या बाई लांबड लावतात. प्रेक्षक उपहासाने टाळ्या मारतात. त्याने बाईंना स्फुरण चढतं. आणि रात्री ९ वाजून १० मिनिटांनी वक्त्यांचा संवाद सुरू होतो.

असा अनुभव व्यासपीठाच्या दोन्ही बाजूंना माझ्याप्रमाणे काही मित्रमंडळींना आला असणार. असं का होतं, या मानसिकतेचा विचार गंभीरपणे करण्याची गरज सामाजिक, सांस्कृतिक वर्तुळात व्हायला हवी. सुदैवानं ‘डिझाइन थिंकिंग’ नावाची एक पद्धती विज्ञानाने विकसित केली आहे. कार्यक्रम उरकणं, समारंभ ‘साजरा’ करणं यापेक्षा एक वेगळी भूमिका आहे ‘अनुभव आयोजन’ (Designing an experience). आपण ज्यांच्यासाठी हा अनुभव तयार करत आहोत त्यांच्या गरजांनाच केंद्रस्थानी ठेवणं हे आदितत्त्व. या अनुभवातून त्यांच्या विचार-भावना-वर्तनाची म्हणजे ‘विभावा’ची कोणती बाजू बदलायला हवी आणि कोणती सक्षम व्हायला हवी ही आयोजनाची पहिली पायरी. आमच्या ‘मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा’तल्या रुग्णांचा ‘डिस्चार्ज’ ही सर्व आरोग्य केंद्रामध्ये होणारी अपरिहार्य क्रिया. आम्हाला वाटलं की, हा प्रसंग किती यांत्रिक आहे. त्याचं बारसं करण्यात आलं ‘आंतरदीप समारंभ.’ ज्यांत निरोप द्यायचा आहे ते सारे व्यासपीठावर असतात. त्यांचं मनोगत असतं. स्वत:चा संकल्प म्हणजे उद्दिष्ट सांगायचं आणि ज्योत पेटवायची. त्यावेळी मंत्रध्वनीसारख्या ओळी मराठीतून म्हटल्या जातात. प्रत्येकाच्या हातावर दही ठेवलं जातं. आणि ‘डिस्चार्ज कार्ड’ वर या मित्राचे दोन फोटो असतात. भरती झाला तेव्हाचा आणि आताचा, अगदी ताजा. ‘मुक्तांगण’च्या प्रार्थना असतात. खऱ्या अर्थानं ‘शुभेच्छा कार्ड’ बनतं ते. भीती कमी होते आणि आशा गडद होते. विचारातील सकारात्मकता वाढते. सर्वांसमोर मनोगत व्यक्त करताना जबाबदारीचा अनुभव येतो.

त्याच दिवशी निरोप घेणारी ‘बॅच’ दाखल झालेली असते. त्या रात्रीच त्यांनी स्वत:च्या टीमला नाव दिलेलं असतं. ‘आंतरदीप’च्या सकाळी ते आपल्या संघाच्या नाव आणि चिन्हाचे बॅचेस तयार करतात. आणि ते कार्यक्रमाआधी येऊन मला आणि मुक्ताला (पुणतांबेकर) लावतात. ‘माहोल’ तयार होतो. माहोल अर्थात अवकाश. अनुभव आयोजनात ही ‘स्पेस’ कशी आकर्षक दिसेल असा विचार असतो. नाटकाचं जसं नेपथ्य असावं तसं दृश्य तयार करायचं. आपल्याकडचे कार्यक्रम त्याच त्या लांब टेबलांमध्ये आणि रांगेतल्या खुर्च्यांनी बांधलेले. तशीच एकसुरी भगभगीत प्रकाशयोजना.

अनेक महाविद्यालयांमध्ये आज देखणी प्रेक्षागृहे आहेत, पण वापरामध्ये नावीन्य नाही. पॉडकास्टसारखे कार्यक्रम, टीव्हीवरचे शोज किती छान अवकाश तयार करतात हे आज सर्व प्रेक्षक (खासकरून तरुण) रोज अनुभवत आहेत. हे सारं मुळात खर्चीक नसतं. पार्श्वसंगीताचा योग्य वापर हाही असाच मुद्दा. पाहुण्यांचा सत्कार आणि त्यावेळी (अचानक आणि उशिरा) वाजणारी सनई ही परंपरागत कल्पकतेची परिसीमा. गेली तीन वर्षं महाराष्ट्रातल्या वीसहून अधिक महाविद्यालयांबरोबर एक प्रकल्प राबवण्याची संधी मिळाली. उत्साहाने ‘डिझाइन विज्ञान’ शिकलेली त्याच महाविद्यालयामधली मंडळी परिसरात गेल्यावर प्राचार्य आणि कार्यकारी मंडळाच्या रोषाला पात्र झाली. का?… ‘असं कुठं फंक्शन होतंय का!’अशी करडी आज्ञाच झाली. बदल करताना काही ताठर वृत्तीचा सामना करायला लागतो. अशा लोकांचा दृष्टिकोन पोलादी असतो. दृष्टीचा कोन असं म्हटलं तर किमान ३५९ कोन उरतात की नाही. पण ही मंडळी आपल्या कोनाला ‘अंश’ नाही तर पूर्ण ‘वर्तुळ’ समजतात.

काही जणांनी मात्र खूप योजकता दाखवली. परिचय वाचून दाखवण्याऐवजी दोन मिनिटांच्या दृकश्राव्य फिती बनवल्या. काही जणांनी पाहुण्याची तपशीलवार माहिती आधीच समाजमाध्यमी गटांमध्ये प्रस्तुत केली. फुलांचे गुच्छ आणि कचकड्याची मानचिन्हं बाद केली. शाल-श्रीफळापासून फारकत घेतली. पाहुण्यांच्या आवडीचं एक पुस्तक (त्यांना विचारून) आणि अत्तराची कुपी देऊ लागले. त्या शहरातील प्रसिद्ध मिठाईचा पुडा देऊ लागले. रोपटं द्यायचं तर ते नेण्यास अवघड देऊ नये हा विचार आला.

बहुतेक सभागृहांमध्ये ‘प्रोजेक्शन स्क्रीन’ची व्यवस्था असते. त्याचा योग्य वापर करण्याची कल्पकता आता आयोजक दाखवू लागले. ज्यांनी मदत केली त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेचं देखणं पोस्टर स्क्रीनवर दाखवलं जाऊ लागलं. विद्यार्थ्यांनी ‘आभार स्टँडी’ तयार केलं आणि रटाळ आभार प्रदर्शन बंद झालं. कोणताही समारंभ तास-सव्वातासापेक्षा लांबवायचा नाही असं ठरलं. विद्यार्थ्यांची सरासरी एकाग्रता भंग व्हायच्या आत ‘अनुभव’ संपन्न व्हायला हवा.

‘पोडियमला सुट्टी’ नावाचा एक प्रयोग खूप यशस्वी झाला. पदवीदानासारखे औपचारिक समारंभ वगळता या ठोकळ्याची गरजच का भासावी?… हातामध्ये कागद न घेता, आत्मविश्वासानं उभं राहून किंवा फिरत का नाही बोलायचं? बसण्यासाठी वेगवेगळ्या उंचीच्या पायऱ्या का नाही वापरायच्या? अनुभव-आयोजन करताना तो समारंभ ‘विभाव’मध्ये कसा बसवायचा ते पाहूया. ‘भारतीय संविधाना’वरचा ‘टॉक शो’ असेल तर त्याचा कणा आहे वैचारिकता.

त्यामध्ये दृकश्राव्य भर काय घालता येईल बरं? चार्ली चॅपलिनचं ‘द ग्रेट डिक्टेटर’ स्वगत दाखवता येईल. बाबासाहेब आंबेडकरांचं भाषणही चालेल. त्या काळातील अनुबोधपट (Documentaries) सुद्धा मिळू शकतील. रंगमंचावर ‘संविधान तत्त्वं’ कशी दाखवता येतील. रंगसंगती तिरंग्याची करूया…असा विचारप्रवाह असायला हवा.

अंतिम वर्षाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ असतो भावनिकतेला साद घालणारा, पण तिथे विचारधन द्यायचं ते ‘वारसा’ या सूत्रावरचं. वार्षिक ‘क्रीडा महोत्सवा’चा उद्घाटन समारंभ कसा हवा तर ऊर्जावान वर्तनाची लयबद्ध मालिकाच! हा अनुभव काही मिनिटांचाच पण स्फुरणदायी. निरोप समारंभात अनौपचारिक गप्पांसाठी वेळ राखून ठेवायलाच हवा. आणि ‘संविधाना’ची माहिती घेऊन झाल्यावर त्याच्याशी संबंधित ‘व्हिडीओ लिंक्स’ फोनवरच्या ग्रुपमध्ये पाठवायला हव्यात.

थोडक्यात, आशयाच्या गणेशाभोवती इतर पैलुंचं मखर हवं. आणि तो अनुभव एककल्ली नको. त्याला तोल हवा. आणि लयसुद्धा हवी. फुलपाखराच्या पंखांमध्ये हे घटक आहेत तसे तलावातल्या पाण्याच्या वलयांमध्येही आहेत. ज्यांच्यासाठी अनुभव-आखणी सुरू आहे त्यांची सरासरी बौद्धिक क्षमता, भावनिक समज आणि सांस्कृतिक कल लक्षात घ्यायला हवा. आणि उपलब्ध वेळ यासाठीच वापरला जायला हवा. प्रत्येक क्षणाला किंमत असते हे सत्य पचनी पडायला वेळ लागतो. वक्ता असो व श्रोता किंवा कार्यक्रमाचे आयोजक; प्रत्येकाने स्वत:च्या जगण्यातला वेळ एका उद्दिष्टासाठी दिला आहे हे लक्षात घेऊन आखणी व्हायला हवी. हा आदर असणं अनुभव आयोजनाचा प्राणवायुच असतो.

‘आय.पी.एच. मनआरोग्य संस्थे’चा ‘वेध’ हा वार्षिक उपक्रम राज्याच्या अकरा शहरांमध्ये पसरला तेव्हा आमचे कार्यकर्ते वेळेची काटेकोर आखणी करायचे. घड्याळातला वेळ आणि भावनांचा खेळ यांची सांगड घालायची. मी पाहुण्यांशी संवाद साधायचो तो भाग अर्थातच ‘गद्या’ असायचा. ‘वेध’साठी रचलेली गाणी त्या त्या शहरातील स्वरचमूने सादर करणं हे पद्याचं केशर त्या गप्पा- श्रीखंडावर घालायचे. त्या गाण्यानेच पाहुण्यांचं स्वागत. सर्व प्रेक्षकांच्या हातात गाण्यांच्या पुस्तिका. संगीत म्हणजे आपोआप पसरणारी शिस्त. सगळे गायला लागले की ‘माहोल’ बनायचा. व्यासपीठावरचे पाहुणेही गाऊ लागायचे. पुढच्या संवादाला सन्मुख करणारं वातावरण तयार व्हायचं.

गेली चार दशकं विविध अनुभवांची आखणी करताना माझ्या सहाय्याला आलं आहे ‘कल्पनादर्शन’ अर्थात ‘Visualization’ चं तंत्र. संपूर्ण अनुभव मन:चक्षूंनी पाहायचा आणि त्यानंतर कागदावर उतरून काढायचा. तो अनुभव वास्तवात येईपर्यंत रोज. नंतर संघ म्हणून सर्वांनी असं करायचं. त्यातून वस्तुयादी तयार होतेच, पण सर्व भिडूंच्या कामाचा आवाकाही कळतो. त्या सर्व अडचणींचे ‘दर्शन’ करून घ्यायचे. कोणत्या प्रसंगी कोणता उशीर होऊ शकतो? झाल्यास पर्याय काय?

काही कार्यक्रमांमध्ये, वरवर विरोधी वाटणारे घटक एकत्र आणून तोल साधता येतो. अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहातल्या मुलांनी, ‘आजीआजोबांसोबत शेकोटी’ नावाचा एक अनुभव गुंफला होता. एक नर्तिका, एक जिमनॅस्ट, एक शरीरसौष्ठव खेळाडू आणि एक मॉडेल यांच्या एका ‘टॉक शो’ची रचना करताना त्याचं शीर्षक दिलं होतं, ‘Kind Mind In Sound Body.’ अशा शरीरांप्रमाणेच अनुभव प्रमाणबद्ध हवा. आशयावर भावनेची कुरघोडी नको. कंटाळा येऊ शकेल असे क्षण कोणते हे शोधून ते क्षण कसे काढता येतील हा विचार व्हावा. जेवणाचं ताट कसं भरलेलं, पण सारे घटक प्रमाणात. चटणीची मूद नसते आणि भाताची चिमूटही नसते.

कधी कधी एखादा मुद्दा पुनरावृत्तीने सांगायचा असतो. अशा वेळी सांगण्याची पद्धत बदलावी. माध्यम बदलावं. एखाद्या कंपनीच्या कार्यालयात गेलात तर त्यांचं बोधचिन्ह किती सफाईने किती ठिकाणी दृष्टीला पडतं पाहा. जे ठसवायचं ते ठासून सांगायलाच हवं असं नाही. दोन अनुभवांमध्ये एक ‘शुभ्र अवकाश’ (White Space) असतो. प्रत्येकाला विचार-भावना ग्रहण करताना उसंत हवी असते. अनुभवांचे गठ्ठे आदळत राहिले तर त्यातला अर्थ वाहून जाण्याची शक्यता जास्त असते. ‘वेध’मधल्या एका भावनिक सत्रानंतर मी प्रेक्षकांसमवेत मौन पाळण्याचा प्रयोग केला आहे. त्यानंतरचे त्यांचे प्रतिसाद अतिशय मौल्यवान होते. अनुभव-आयोजनात आत्मनिरीक्षणाचे क्षण पसरायला हवेत. हाच तर मनोरंजन (Entertainment) आणि ज्ञानरंजन (Edutainment) यातला फरक आहे.

अनुभव प्रभावी असेल तरच तो स्मृतीमध्ये कोरला जातो. टिकाऊ होतो. आकर्षकता म्हणजे बाह्य-झगमगाट नव्हे. त्या त्या अनुभवामध्ये सहभागी मनांच्या विचार-भावनांचे झोके एका लयीत वरखाली व्हायला हवेत. वाणीमध्ये आर्जवी लय असेल तर विचार खोल पोहोचतो. अनुभव-आयोजन करणाऱ्या सर्व गटाने ठरवायचं की समोरच्या समूहासमोर सशक्त अनुभव ठेवायचा आहे; आमची व्यक्तिमत्त्वे नव्हेत. ती विरघळून जाणंच श्रेयस्कर.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या तरुण पिढीवर काही संस्कारच होत नाहीत असं म्हणताना प्रौढ मंडळी त्याच त्या कार्यक्रमांची कर्मकांडे रचत राहतात. स्वत:च्या भावनांना उगवत्या पिढीच्या मनामध्ये डोकावण्याची संधी देत नाहीत. आणि तरुण मंडळी फक्त ‘इव्हेन्ट मॅनेजमेंट’ शिकतात. ‘टाइमपास’ रंजनासाठी आपलं कौशल्य पणाला लावतात. विविधता आणि विचित्रपणा यातला फरक विसरतात. दोन्ही तटांवर समंजस मनांची कमी नाही. त्यांनी एकत्र येऊन अतिशय गांभीर्याने आपली सांस्कृतिक-शैक्षणिक-सामाजिक दिवाळखोरी वेळीच रोखायला हवी.

असं गोवर्धन उचलायचं तर आपण गोपगड्यांनीच काठ्यांचे आधार लावायला हवेत. त्या वेळूमधूनच श्रीकृष्णाच्या बासरीचे सूर उमटणार आहेत.

anandiph@gmail.com