scorecardresearch

Premium

मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : धीर धरी रे मना!

आत्महत्येचे विचार करणाऱ्याची इच्छा मृत्यूला कवटाळायची असेलच असं नाही. खरं तर त्याला मानसिक,शारीरिक वेदनेपासून तात्काळ सुटका हवी असते.

cha3 katha vyatha
संग्रहित छायाचित्र/लोकसत्ता

डॉ. शुभांगी पारकर

आत्महत्येचे विचार करणाऱ्याची इच्छा मृत्यूला कवटाळायची असेलच असं नाही. खरं तर त्याला मानसिक,शारीरिक वेदनेपासून तात्काळ सुटका हवी असते. त्या शरीर-मनाच्या तणावाच्या अवस्थेत त्याला आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही मार्ग दिसत नसल्यानं तो ती करतो. मनाच्या अशा हळव्या, संवेदनशील क्षणी आत्महत्येच्या दिशेनं जाणारी विचारांची उंच लाट संयमाच्या आणि ‘हेही दिवस जातील’ या विचारांनी थोपवली, थोडा धीर धरला, तर आत्महत्या होणारच नाहीत.

sun transit in aries or mesh these zodiac sign get happiness and money surya gocha
ग्रहांचा राजा सूर्य करणार मेष राशीत प्रवेश! ‘या’ राशींना मिळेल नशिबाची साथ; आयुष्यात होईल प्रगती, मिळेल भरपूर पैसा
Framework That Stunts Progress
जिंकावे नि जगावेही : प्रगतीला खीळ घालणारी चौकट
Health Special
Health Special : पॉझिटिव्ह पालकत्व म्हणजे काय?
Is fear omnipresent
‘भय’भूती : भीती सर्वव्यापी असते का?

आत्महत्या ही एक भावनिक, मानसिक आणि सामाजिकदृष्टया गुंतागुंतीची घटना आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीला अत्यंत दारुण ताणतणावाला सामोरं जावं लागत असेल आणि त्याचबरोबरच प्रतिकार करण्याची असमर्थता आणि अक्षमता असेल, तेव्हा ती समस्या जटिल होऊ शकते. त्या वेळी आपण या चक्रव्यूहातून कसं बाहेर यावं, हे एखाद्याला खरंच सुचत नाही. एखाद्या व्यक्तीला शारीरिक किंवा भावनिक वेदनांपासून मुक्त होण्यासाठी आत्महत्या हे एकमेव सुटकेचं साधन वाटल्यास आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही.

जीवन आणि मृत्यू यांच्यातल्या अंतर्गत संघर्षांचं वर्णन अनेक संज्ञा वापरून केलं गेलं आहे, ज्यात अंतर्गत वैचारिक भेद, द्विधा मन:स्थिती आणि आत्मघाती विचारांचा समावेश आहे. जीवन आणि मरण यांच्या कोंडीत सापडल्या गेलेल्या व्यक्तीचा मृत्यूकडे पाहाण्याचा दृष्टिकोन म्हणून आत्महत्येच्या कृतीचं वर्णन केलं जातं. अनेकदा सुप्त मन आणि जागृत मन यांतील विवाद व संवाद आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर नेमका कसा घडतो, हे एकसूत्री सिद्धांतात समजावणं कठीण आहे. प्राचीन मनोविश्लेषक सिगमंड फ्रॉईड ते आधुनिक काळातल्या ऐरॉन बेकसारखे विवेकनिष्ठ (कॉग्निटिव्ह) मानसशास्त्रज्ञ, यांच्या सिद्धांतातसुद्धा आत्महत्येच्या वागणुकीबद्दल एकमत वा एकवाक्यता दिसून येत नाही.

आत्महत्येशी निगडित प्रत्येक जोखीम घटकाचं वर्णन करताना वैद्यकीयदृष्टया काही प्रमाणात अचूकता जरी असली, तरी मानसिक वेदना आणि आत्मघाती वर्तन यांच्यातल्या प्रमुख संबंधांवर अधिक भर दिलेला दिसून येतो. या संदर्भात अमेरिकी मानसशास्त्रज्ञ एडविन श्नेडमन यांनी सांगितलेल्या आत्महत्येबद्दलच्या ‘क्यूबिक मॉडेल’ची संकल्पना महत्त्वाची ठरते. यामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती आत्महत्येचा विचार करत असते, तेव्हा मानसिक तीव्र दु:ख हा त्यांनी सुचवलेल्या तीन आवश्यक परिमाणांपैकी एक मानला जातो. त्यातील इतर दोन परिमाणं म्हणजे तणाव आणि मानसिक अस्वस्थता ही आहेत. मानसशास्त्रात आत्महत्येच्या वर्तनाचा मध्यवर्ती पैलू म्हणून क्यूबिक मॉडेल सैद्धांतिक व्याख्या प्रदान करतं, ती अशी, ‘व्यक्तीची एक सर्वसामान्य मानसिक वेदना असह्य तीव्रतेपर्यंत पोहोचते, तेव्हा त्यात लाज, अपराधीपणा, अपमान, एकटेपणा, संताप आणि भीती यांसारख्या प्रखर भावनांचा समावेश होतो. म्हणजेच, नैराश्यासारखे इतर मनोवैज्ञानिक घटक मानसिक वेदनेशी जेव्हा संबंधित असतात तेव्हा ते आत्महत्येसाठी महत्त्वाचा घटक ठरतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचं म्हटलं, तर मानसिक वेदना असल्याशिवाय आत्महत्या होणार नाही. आयुष्यात प्रेमभंग, प्रियजनांचा मृत्यू यांसारखे दु:खदायी प्रसंग घडत असतात, पण जेव्हा त्याबरोबर जर मनाला भिडणारी वेदना घोंघावत असेल, तर त्या व्यक्तींचा कल आत्महत्येकडे अधिक असतो. आत्महत्या केलेल्या वा तसा प्रयत्न केलेल्यांच्या प्रेरणांचा विचार करताना, आपल्याला हे जाणून घेणं आवश्यक आहे, की बहुतेक आत्महत्या तीव्र भावनांच्या कोसळत्या धबधब्याखाली होतात. त्या धबधब्याखालून  जोपर्यंत तुम्ही बाहेर पडत नाही, तोपर्यंत तुम्ही इतर कुठलाच सारासार विचार करू शकत नाही. साधक आणि बाधक निर्णयांचं गंभीरपणे मूल्यांकन व्यक्तीला करता येईल असे तर्कसंगत, तात्त्विक विचार अशा वेळी सुचतच  नसतात. माझा एक रुग्ण दीपक यानं अनेक वेळा आत्महत्येचे प्रयत्न केले आहेत. मात्र त्याच्या आयुष्याची दोरी बळकट असली पाहिजे, कारण आत्तापर्यंतचे त्याचे सारे प्रयत्न निष्फळ झालेले आहेत. पण गंमत अशी, की आत्महत्येच्या भावनेतून बाहेर आल्यानंतर आपण वाचलो आहोत याचं त्याला समाधान वाटतं. त्याला मी एकदा विचारलं, ‘‘तू आत्महत्येच्या प्रयत्नांत इतकं सातत्य ठेवतो आहेस, ते कसं बरं जमतं तुला?’’ त्याचं उत्तर खूप मनोरंजक वाटलं मला. तो म्हणाला, ‘‘मला अनेकदा असंच वाटतं, की मी या क्षणाला आत्महत्या करायलाच हवी. मनातल्या अस्वस्थ करणाऱ्या भावनिक गोंधळातून लगेच सुटका करून घ्यायलाच हवी. त्या वेळी धीर धरवत नाही. पण जर तुम्ही थोडा जास्त वेळ घेतलात आणि आयुष्यातल्या ओहोटीच्या वेळी स्वत:ला सांभाळलंत, तर कदाचित तुम्हाला भरतीचं वळण दिसण्याची शक्यता अधिक आहे. तुम्ही पुन्हा एकदा आनंदाचा उपभोग घेऊ शकता. माझा प्रेमभंग झाला म्हणून मी खूप भावुक होतो. तरीही मला पुन्हा एकदा प्रेमात पडायचं आहे, हा विचार कदाचित मला जिवंत ठेवत आहे.’’ याचा अर्थ अतीव दु:खातून सुटका करून घ्यायची जबर इच्छा होऊन दीपक आत्महत्येचा प्रत्न करत असला, तरी जगण्याच्या ऊर्मीची लाट दुसऱ्या बाजूनं त्याच्या मन:पटलावर धडकत असे.

   १८८० च्या दशकात फ्रेंच न्यूरोलॉजिस्ट ज्यूल्स कोटार्ड यांनी ‘कोटार्ड सिन्ड्रोम’चं प्रथम वर्णन केलं होतं. ही विशिष्ट विकृती इतर काही दुर्बल अशा मानसिक समस्यांसह दिसत असते. प्रामुख्यानं नैराश्य, स्किझोफ्रेनिया, अपस्मार किंवा सामान्य अर्धागवायू, ज्यात रुग्णाला आरशात दिसणाऱ्या स्वत:च्या भयानक, त्रासदायक दृश्यांचा उल्लेख आहे. (म्हणजे ज्यात रुग्णाला आरशात दिसणारं स्वत:चं प्रतिबिंब त्रासदायक वा भयानक वाटू शकतं.) एका पाश्चात्त्य तरुणीच्या भ्रामक विचारांचा आढावा इथे घेऊ या. तिची पूर्ण खात्री होती, की ती आधीच मेलेली आहे आणि लोकांनी तिचा मृतदेह पुरण्याची ती वाट पाहात आहे. तिला दात किंवा केस नाहीत आणि तिचं गर्भाशय विकृत झालं आहे. तिला दिसणारी ही तिची विद्रूप प्रतिमा तिच्या स्वाभिमानासाठी फारशी चांगली असू शकत नाही. गांगरून जाऊन तिला या भयानक विचारांपासून मुक्ती मिळवायची असते, तेव्हा आपण स्वत:लाच संपवून टाकून सुटका करून घ्यावी, असे विचार तिच्या मनात येतात. याचाच अर्थ दीर्घकाळापासून तुम्हाला सतावणाऱ्या काही बिकट समस्या आणि अनुभव तुम्हाला हताश करू शकतात. त्या वेळी कोणतेही पर्याय शिल्लक नसल्याची भावना तुम्हाला हतबल करते आणि त्या तीव्र भावनिक वेदनांपासून मुक्त होण्याचा मार्ग म्हणून आत्महत्या केली जाते.

आयुष्यात हताश करणारा कर्जबाजारीपणा वा कर्करोगासारख्या सहज बऱ्या न होणाऱ्या आजारांतील तडफड संपता संपत नाही, अशा वेळी काही व्यक्तींना हवी असते, ती या जीवघेण्या यातनांतून पटकन सुटका. त्यांना मरण हवं असतं, पण याचा अर्थ त्यांना आत्महत्या करायची असते असं नाही. एका अभ्यासात असं आढळलं, की बऱ्याच जणांचे आत्महत्येचे प्रयत्न मरण्याच्या इच्छेसाठी नव्हतेच, तर ते हतबल, अगतिक करणाऱ्या वेदना संपवण्यासाठीचे होते. तरुण संजयला आत्महत्येच्या प्रयत्नानंतर जे जाणवलं, ते तो व्यक्त करतो, ‘‘माझ्या आयुष्यात ज्या नकारात्मक गोष्टी घडत आहेत त्याचा ताण, त्या गोष्टी जाणून घेण्याचा माझ्या कुटुंबाचा प्रयत्न आणि मी त्यांना त्या सांगू शकत नाही याचा ताण माझ्या मनावर होता. खरं तर मला मरायचं नाही, पण या सर्व ताणांमुळे सतत आतून अस्वस्थ वाटायचं, मन उद्विग्न व्हायचं आणि आत्महत्येचा विचार मनात उसळी मारायचा.’’

वेदनामुक्त जगावं, हाच चाळिशीच्या आणि ऱ्हुमॅटॉइड संधिवातानं ग्रस्त असलेल्या श्रेयाचा हेतू होता. ती म्हणते, ‘‘असं नव्हतं की मला मरायचं होतं; पण मी माझ्या आजाराच्या ज्या असह्य वेदनांसह जगत होते, त्या सहन करू शकत नव्हते. मला तसं त्रस्त पाहून आईबाबाही खूप अस्वस्थ व्हायचे. तेव्हा मात्र मला असं वाटलं, की आपल्याला दु:खातून सुटण्याची तीव्र इच्छा आहे, पण मरणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही आपल्याकडे.’’

   जे लोक कठीण समयी आत्महत्येला एकमेव पर्याय मानतात त्यांना असं वाटतं, की त्यांच्या समस्या असह्य आहेत आणि त्यांचं निराकरण केलं जाऊ शकत नाही. त्यांना असं वाटतं, की त्यांनी कितीही पराकोटीचे प्रयत्न केले, तरी त्यांची बिकट परिस्थिती बदलणार नाही. त्यांच्या टोकाच्या भावनिक वेदनांची अनुभूती त्यांचे विचार विकृत आणि विघातक करू शकते. आपल्या आयुष्यात आलेली ती कठीण परिस्थिती कधी काळी बदलेल, यावर विश्वास ठेवणं किंवा समस्यांचं संभाव्य निराकरण करता येणं, आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांच्या प्रेमळ वा भावनिक आधाराशी  जोडलं जाणं त्यांना कठीण होतं. वैफल्यग्रस्त  असताना अनेक व्यक्ती नकारात्मक विचार रवंथ  करत बसतात. ते त्याच समस्येचा वारंवार विध्वंसक विचार करतात, मात्र त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्याकडे लक्ष देत नाहीत, साहजिकच खऱ्या तोडग्यापर्यंत ते पोहोचू शकत नाहीत.

 मानसिक वेदना किंवा मानसिक दु:ख व्यक्तीच्या अपराधीपणा, निराशा, भीती, नुकसान यांसारख्या नकारात्मक भावनांचा आंतरिक अनुभव आहे. हताश मानसिक स्थितीमुळे अनुभवास येणारी असहायता ही आत्महत्येसाठी ‘रेड सिग्नल’ मानली गेली आहे. आपल्यापैकी अनेक जण असं गृहीत धरतात, की आपल्या सध्याच्या नकारात्मक भावना आणि परिस्थिती भविष्यात कधीही बदलणार नाही, असं मानण्यात व्यावहारिक शहाणपणही नाही. त्यामुळेच दु:सह भावनेची उंच लाट पुन्हा मागे जाईपर्यंत मनाला आवर घालणं महत्त्वाचं आहे. आपण स्वत:ला संपवण्याच्या नादात जीवनातले तात्पुरते किचकट प्रसंग कायमस्वरूपी असल्याचं समजण्याचा अविचार करत असतो. ‘History teaches us that every problem has a life span. No problem is permanent.’ आत्मघातकी भावना ही बहुतेक कठीण प्रकरणांमध्ये चिरस्थायी स्थिती नसते. ही आत्मघाती भावना आणि विचार कालांतरानं कमी होत जातात. योग्य उपचारांचा पाठपुरावा आणि तुम्हाला त्रासदायक वाटणाऱ्या वातावरणातल्या गोष्टी बदलण्यासाठी तुमचे सक्रिय प्रयत्न महत्त्वाचे ठरतात. खरं पाहाता, तुमच्या मेंदूला योग्यरीत्या कार्यक्षम करण्यास मदत करण्यासाठी तुम्ही ज्या गोष्टी करायला पाहिजे त्या फार क्लिष्ट नसतात.

तुमच्या मानसिक वेदनांचा सामना करण्यासाठी तुम्ही नवीन कौशल्यं शिकू शकता. आपल्या समस्या नवीन प्रकाशात पाहू शकता. तीव्र वेदनादायक भावना हाताळण्याची आपली मानसिक क्षमता सुधारू शकता. आपले नातेसंबंध आणि आपलं सामाजिक समर्थन वाढवू शकता; परंतु जेव्हा तुम्ही निरर्थक विचारांच्या गर्तेत भ्रमिष्ट होता, तेव्हा ती फारच कठीण बाब होऊ शकते. म्हणून गरज पडल्यास व्यावसायिक मदत, योग्य औषधं घेऊ शकता.  धीर धरा, हार मानू नका. कठीण काळ कधीच टिकत नाही, पण कठीण, मजबूत लोक नेहमीच टिकतात.

pshubhangi@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mage rahilelyanchya katha vyatha dr shubhangi parkar mental physical pain stress suicide ysh

First published on: 05-11-2022 at 00:07 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×