पीएच.डी. करता करता पहिलं फूल संसाराच्या वेलीवर फुललं. मग वाटलं थिसीसचा विषयच बदलावा! आमचा लेक्चर्सचा टवाळखोर ग्रुप उत्साहाने सूचना द्यायला पुढे आला. माझी जीवश्चकंठश्च मत्रीण म्हणाली, ‘‘तू मुलाचे लंगोट किती वेळा बदलतेस, किती वेळाने बदलतेस, त्यांची धारणाशक्ती किती मि.ली. असते यावर संशोधन कर. अगं, या तुझ्या संशोधनाने तू जगभरातल्या ताज्या, पुस्तकी आयांना एक वरदान ठरशील! तुझा प्रबंध जगभर गाजेल..’’
‘‘पी एच.डी. हॅज अ टेंडन्सी टू लिगर ऑन!’’ मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूटचे डायरेक्टर मला मित्रत्वाचा सल्ला देत होते. त्यामुळे का असेना, वयाच्या चाळिशीच्या आसपास असतांनाही मी फी वगरे भरून पीएच.डी. करायचा पुन्हा एकदा निश्चय केला होता. त्यांचा सल्ला खोटा ठरवायचाच असं ठरवलं होतं. मला अशी मधूनमधून डॉक्टरेट करायची हुक्की येत असते. मागे अशी कधी बरं आली होती? हां! मुंबईत नुकतीच लग्न होऊन आले होते. काखेत अजूनही मास्टर्स डिग्री सर्टििफकेट आणि डोक्यावर ती जगप्रसिद्ध चौकोनी काळी पदवीदान समारंभाची टोपी फुरफुरत होती. जिथे नोकरी मिळाली तिथल्या लोकांनी एका वर्षांच्या आतच जादा स्टाफ म्हणून उचलबांगडी केली. घरी येऊन घरातल्या एकुलत्या एका काळ्या ट्रंकेवर बसून (तेव्हा आमच्याकडे बसायला तेच एक आसन होते.) अश्रू ढाळले आणि पुन्हा दुसरी नोकरी शोधली. ती मिळाली कॉलेजात लेक्चरर म्हणून. काही दिवस सुखाचे गेले आणि फतवा आला, की पीएच.डी. करा नाही तर स्टॅच्यू.. स्टँड.. स्टिल.. पॉज. नो प्रमोशन, नो इन्क्रीमेंट. पुन्हा फी भरली. पीएच.डी.. करा!
पीएच.डी. करता करता पहिलं फूल संसाराच्या वेलीवर फुललं. मग वाटलं थिसीसचा विषयच बदलावा! आमचा लेक्चर्सचा टवाळखोर ग्रुप उत्साहाने सूचना द्यायला पुढे आला. मुलाच्या
बारशाला नाव काय ठेवावं याचे जे अनाहूत शेकडो सल्ले येतात त्यापेक्षाही जास्त कुचकट सल्ले पीएच.डी. कुठल्या विषयात करावी याबद्दल
आले. माझी जीवश्चकंठश्च मत्रीण म्हणाली, ‘‘तू मुलाचे लंगोट किती वेळा बदलतेस, किती वेळाने बदलतेस, त्यांची धारणाशक्ती किती मि.ली. असते यावर संशोधन कर. त्याचा टाइम-मोशन स्टडी कर. अगं, या तुझ्या संशोधनाने तू जगभरातल्या ताज्या, पुस्तकी आयांना एक वरदान ठरशील! तुझा प्रबंध जगभर गाजेल. कदाचित एखादा नॅपीवाला तुला स्पॉन्सरही करेल.’’
वेलीवरची फुलं मोठी होऊ लागली. त्यांच्या शाळेत माझ्या चकरा वाढू लागल्या. त्यांचे होमवर्क मी करू लागले. वेलीवरची फुलं आनंदाने डोलू लागली. त्यांच्या शाळेतल्या बाई मला समजावू लागल्या, मुलांना कसं रागावू नये, त्यांच्यावर कसं अभ्यासाचं दडपण आणू नये. त्या निरागस (की बेरकी?) जिवांचं बाल-मानसशास्त्र कसं पदोपदी लक्षात घ्यावं. इकडे मलाच मानसोपचारतज्ज्ञांकडे जायची वेळ आली होती. मुलांचे अभ्यास घेताना त्यांच्या थोबाडीत मारायला हात शिवशिवत होते. मला त्या तज्ज्ञांना विचारायचे होते की, ते कसे बांधून ठेवायचे आणि डोकं कसं ठिकाणावर ठेवायचं. तेव्हा ठरवलं आता थिसीसचा विषय बदलायचा. पूर्वीची ‘छडी लागे छमछम्, विद्या येई घमघम्’पद्धत कशी हल्लीच्या होमवर्कने काचलेल्या आयांना आरोग्यदायक आहे, हे सिद्ध करायचं आणि तमाम मायमाऊली मंडळींना सुखाचा श्वास घ्यायला द्यायचा.
मागच्या आठवडय़ात एक म्युझियम पाहायला गेले होते. तिथे अनेक प्रकारच्या पगडय़ा शो केसेसमध्ये ठेवलेल्या होत्या. िशदेशाही, पेशवाई, मवाळ, जहाल, कर्नाटकी वगरे. पगडय़ा घालणारी डोकी केव्हाच इतिहासजमा झाली होती. बोहारणीने त्यावर चहाचा एखादा लहान चमचासुद्धा दिला नसता! पण एक महाशय जाड िभगाचा चष्मा चढवून त्यावर पीएच.डी. करत होते. मी दोन मिनिटं उभं राहून शांतता पाळली आणि माझ्या पूर्वीच्या तमाम पीएच.डी. संकल्पांना तिलांजली दिली. घरी येऊन होती नव्हती ती सर्व सर्टििफकेटं काढली. त्यावर एक कणकीचा मोठ्ठा गोळा ठेवला आणि समोरच्या समुद्रात फेकून आले.
वा! काय हलकं हलकं वाटतंय!
tejaswinipandit@ymail.com
संग्रहित लेख, दिनांक 24th Aug 2013 रोजी प्रकाशित
माझी पीएच.डी.
पीएच.डी. करता करता पहिलं फूल संसाराच्या वेलीवर फुललं.
First published on: 24-08-2013 at 01:02 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Majhi ph d