आपण तक्रारीत जास्त रमतो.. तक्रार करणाऱ्याला समोर तक्रार ऐकून त्यात आनंद वाटणाराच कान हवा असतो.. आपण समजा त्यांची तक्रार ऐकून घेतली आणि त्यावर उपाय सुचवला किंवा तुम्ही उगाच तक्रार करताय, इतकं काही सगळं बिनसलेलं नाहीये, असं त्यांना सांगितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा तक्रार सांगतानाचा उत्साह क्षणार्धात लोपलेला असतो.. म्हणजे तक्रारीतच काय तो खरा आनंद!

गेल्या पावसाळ्यात आम्ही काही मैत्रिणी एका धबधब्यावर गेलो होतो.. वर्षांसहलीला.. थोडीशी उंच अशी टेकडी चढून वर गेलो.. आणि समोर पाहिलं, खळाळणारा, फेसाळणारा पांढराशुभ्र धबधबा कडय़ावरून झेपावत खाली कोसळत होता.. ‘‘वा!’’ असं म्हणणार इतक्यात एका मैत्रिणीनं म्हटलं.. ‘‘केवढं पाणी वाया चाललंय..’’ त्या मैत्रिणीकडे कुठल्या नजरेनं बघावं हेच कळेना, म्हणजे इतकं सुंदर दृश्य बघून तिला पाणीटंचाई आठवावी म्हणून तिची कीव करावी की इतकं सुंदर दृश्य बघूनही तिला वास्तवाचा विसर पडला नाही म्हणून तिचं कौतुक करावं? मनात आलं.. पाणीटंचाई वगैरे आहेच हो, पण निदान एक दिवस तरी निसर्गाच्या लीलांना मुक्त मनाने दाद नको का द्यायला? कधीतरी आपल्या तक्रारी दूर नको का ठेवायला?

taxpayers who have not linked aadhaar and pan till may 31 will get relief
दुप्पट उद्गम कर-भार ३१ मेपर्यंत शिथिल
Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
successfully test fired advanced missile Agni Prime from APJ Abdul Kalam Island
‘अग्नी-प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

पण आपला स्वभाव! आपण तक्रारीत जास्त रमतो.. म्हणजे सूर्य आग ओकतोय आणि पाऊस अजून पडत नाहीये.. तक्रार करावी अशीच गोष्ट आहे. पण किती वेळा तेच तेच म्हणणार? आणि तीच तक्रार किती वेळा करणार? आणि कुणाकडे? आपल्या हातात ना सूर्य झाकणं आहे ना पाऊस पाडणं आहे. हे सगळं आपल्याला कळतं पण आपण तक्रार करत राहतो.. तक्रार केल्यावरच बहुधा बरं वाटत असावं आपल्याला.. गम्मत सांगते, लहानपणी शाळेत जायचा मला इतका कंटाळा यायचा की दर दिवशी मी शाळेबद्दल, अभ्यासाबद्दल, बाईंबद्दल, मैत्रिणीबद्दल काही ना काही तरी तक्रारी करत बसायचे.. मी तक्रार करते म्हणून मला घरी राहण्याची संधी देतील इतके काही घरचे प्रेमळ नव्हते.. त्यामुळे तक्रारी करून झाल्यावर शाळेत जायचंच आहे हे मलाही माहीत असायचं, पण तरीही मी तक्रारी करायचे. त्यातच नंतर गम्मत वाटायला लागली..  पु.लं.नी म्हटलं होतं तसं.. आपला तक्रारीचा सूर हमखास पक्का लागतो.. माझ्या आजीची एक मैत्रीण होती. त्यांचं नाव होतं सत्यभामा. देवळातलं प्रवचन वगैरे झाल्यावर त्या आजीकडे यायच्या गप्पा मारायला. त्यांचं येणं आजीला फार काही आवडत नसे.. कारण सतत तक्रारी.. सून अशीच वागते, मुलगा तसाच करतो, नातवंडं अभ्यास करत नाहीत, घरकाम करणाऱ्या बाई वर वर केर काढतात. एक ना दोन! त्यावेळी माझ्याकडच्या एका गोष्टीच्या पुस्तकात एक गोष्ट होती.. त्या गोष्टीचं जे शीर्षक होतं तेच आजीनं त्यांचं नाव ठेवलं होतं.. ‘ भामाबाई भुणभुणे’! त्या आल्या की आम्ही मोठय़ा आवाजात ती गोष्ट शीर्षकासकट मोठय़ानं वाचायचो आणि खळखळून हसायचो. गम्मत म्हणजे, देवळात प्रवचनकारांनी ‘मन करा रे प्रसन्न’ हा अभंग जरी निरुपणाला घेतला असला तरी ती प्रसन्नता काही सत्यभामाबाईंच्या मनाला स्पर्शून जायची नाही.. इतकं सगळं प्रतिकूल घडूनही, दुष्काळात घरचे अन्नान दशेत मेले तरी, दुसरी बायको कर्कशा निघाली तरी, दारिद्रय़ाने दशावतार दाखवले तरी.. तुकाराम महाराज म्हणून गेले  ‘.. मन करा रे प्रसन्न.. सर्व सिद्धीचे कारण..’ आणि इथे आपल्या छोटय़ा छोटय़ा गोष्टींच्या तक्रारी..

सतत तब्येतीच्या तक्रारी सांगणाऱ्या व्यक्तींना तर काय म्हणावं कळत नाही.. त्यांचा दररोज नवीन अवयव दुखत असतो.. त्यांच्या डोळ्याची पापणीसुद्धा दुखू.. नव्हे ठणकू शकते.. कधी कधी तर भीती वाटते यांचं काही दुखलं नाही तरी हे तक्रार करतील.. कारण एकदा तक्रार करण्याची सवय झाली की तक्रार करावीच लागते, त्याशिवाय चैन पडत नाही.. अमिताभ बच्चन यांचा ‘पिकू’ हा चित्रपट आठवून बघा.. मलावरोध.. या म्हटलं तर सामान्य आजाराने ग्रस्त झालेला एक म्हातारा माणूस त्यांनी असा काही साकारलाय.. चित्रपटाच्या शेवटी शेवटी त्या म्हाताऱ्या माणसाबद्दल आस्था न वाटता त्याचा राग यायला लागतो.. कारण त्याचा चिडचिडा आणि तक्रारखोर स्वभाव! या सतत तक्रार करण्याच्या वृत्तीमुळे त्याचाही दिवस आनंदात जात नाही नि त्याच्या मुलीचं ऑफिसमधल्या कामात लक्ष लागत नाही.. तक्रार करणाऱ्याला समोर तक्रार ऐकून त्यात आनंद वाटणाराच कान हवा असतो.. आपण समजा त्यांची तक्रार ऐकून घेतली आणि त्यावर उपाय सुचवला किंवा तुम्ही उगाच तक्रार करताय, इतकं काही सगळं बिनसलेलं नाहीये, असं त्यांना सांगितलं तर त्यांच्या चेहऱ्यावरचा तक्रार सांगतानाचा उत्साह क्षणार्धात लोपलेला असतो.. म्हणजे तक्रारीतच काय तो खरा आनंद! अशा माणसांची कोण आणि कशी समजूत घालू शकणार? तक्रार करावी अशीच परिस्थिती असली तरीही त्यातूनही धीराने मार्ग काढणाऱ्या मंडळींच्या कथा यांना सांगून तरी काय उपयोग? पुत्रप्राप्ती झाल्यावरही गडावर मंडळी चेहरा पाडून उभी पाहिल्यावर शिवाजीराजांनी कारण विचारलं. ‘मुलगा झाला पण पालथा जन्माला आला’ असं उत्तर राजांनी ऐकलं. ‘‘अरे तक्रार कसली करताय. पालथा जन्माला आला.. मग पराक्रमाने पृथ्वी पालथी घालेल.’’ हा राजांचा आशावाद सतत तक्रार करणाऱ्याने समजून तरी कसा घ्यावा?

जसं भर्तृहरी म्हणतो की मौन हे अज्ञानाचं झाकण आहे तसंच सतत तक्रार हेही झाकण आहे का? आळस, कंटाळा, उपाय योजण्याच्या वृत्तीचा अभाव, आशा, प्रयत्न यांचा अभाव.. या साऱ्या गोष्टी झाकणारं तक्रार हे झाकण आहे का? वाकडय़ा अंगणाचीच तक्रार केली की मग नीट नाचता नाही आलं तरी चालतं.

‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असो द्यावे समाधान’ अशी वृत्ती असण्याचं कारण नाही. प्रत्येक गोष्ट आहे तशीच आनंदानेच स्वीकारली पाहिजे असंही नाही, एखादी गोष्ट मनासारखी नसेल तर तक्रार करणं अगदी स्वाभाविक आहे.. पण तक्रार करून किंवा प्रयत्न करूनही एखादी गोष्ट जर मनासारखी घडत नसेल तर मात्र ती शांतपणे स्वीकारली पाहिजे.. आमच्या स्नेही परिवारात एक आजी आहेत, दुर्दैवाचे दशावतार त्यांनी आयुष्यभर पाहिले.. किती सोसलं याला गणतीच नाही.. पण तरीही मन स्थिर, डोळे शांत, ओठावर हसू.. कधी कुठल्या गोष्टीची तक्रार नाही. त्यांना विचारलं, ‘‘इतकं सगळं सोसूनही ओठावर हे हसू कसं जपलंत?’’ त्या म्हणाल्या, ‘‘अगं, सुरुवातीला चिडले, संतापले, रडले, ओरडले .. मलाच का हे सगळं? मी काय चूक केली म्हणून देवानं मला हे दिलं? आदळआपट केली. पण नंतर लक्षात आलं. का? या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नसतं आणि तेव्हा जे समोर आहे ते विनातक्रार स्वीकारणं हाच पर्याय असतो.. स्वत:ची शक्ती, सहनशक्ती वाढवत गेले.. सगळं चांगलं होईल यावर विश्वास ठेवत गेले. विचारांची दिशा बदलली की दशाही बदलते याचा अनुभव घेतला. डोळे उघडे ठेवून अवतीभोवती बघायला लागले. परदु:ख शीतल म्हटलं तरी आता इतरांची दु:खं किती मोठी आहेत हे कळायला लागलं आणि मी माझ्या दु:खाबद्दल बोलणं बंद केलं. कधीही स्वत:च्या नशिबाबद्दल तक्रार करायची नाही असं ठरवूनच टाकलं. चपला नाहीत म्हणून तक्रार करणारा माणूस जेव्हा पायच नसलेल्या माणसाला पाहतो ना तेव्हा तो आपोआप समंजस, शहाणा होतो आणि आपली तक्रार त्याला क्षुल्लक वाटायला लागते. किंबहुना तो तक्रार करायचंच विसरतो.’’ आजी एका संथ लयीत बोलत होत्या. एखादी शांत नदी अनेक वर्षांचं अनुभव संचित पोटात घेऊन शांतपणे वाहात राहते, तसं आजीचं बोलणं होतं. बोलण्यात केवढी सकारात्मकता होती. आपली तक्रार ऐकवून दुसऱ्यालाही निराश करण्यापेक्षा आपल्या गप्पांतून समोरच्याला ऊर्जा कशी मिळेल याचाच आजींचा प्रयत्न होता.

खरंच आहे, तक्रार नकोच आणि केलीच तर त्या तक्रारीमध्येही एक सकारात्मकता हवी.. ती तक्रार दूर करण्यासाठी काय प्रयत्न करायला लागतील याचाही थोडासा विचार हवा. सावरकरांची ‘बालविधवा दु:स्थितीकथन’ शीर्षकाची कविता आठवली.. मुंबईच्या हिंदू युनियन क्लबने ‘विधवांची दु:स्थिती’ हा विषय काव्यस्पर्धेसाठी दिला होता, त्यात सावरकरांची कविता बक्षीसपात्र ठरली.. यात सावरकरांनी विधवांची दु:स्थिती काय आहे हे तर सांगितलंच, विधुरांना समाजाने दिलेलं झुकतं माप याविरोधीही आपलं मत मांडलं.. पण त्याबद्दल फक्त तक्रार न करता दु:स्थितीची सुस्थिती कशी करता येईल यासाठी उपायही सुचवले. जसं, ‘विद्यादाना द्यावे शाला स्थापोनी प्रौढ विधवाते’ किंवा ‘ज्या दीन बालविधवा द्या त्यांसि पुनर्विवाह संमतीला..’ किंवा ‘विधवा विदुषी व्हाया स्थापूनि अनाथबालिकाश्रमाते..’

थोडक्यात, एखाद्या गोष्टीबाबत तक्रार करणं हे स्वाभाविक आहे, पण त्या तक्रारीतून मार्ग काढून बाहेर पडणे हे मात्र असामान्याच्या कक्षेत पाऊल टाकणं आहे.. धबधब्यातून पाणी वाया जाण्याची तक्रार करणारे आपण आणि त्या धबधब्याच्या पाण्यापासूनच्या  वीज निर्मितीला  प्रोत्साहन देणारे विश्वेश्वरैय्या यात हाच कक्षेचा फरक आहे

धनश्री लेले

dhanashreelele01@gmail.com