नवीन वर्ष सुरू झालं आहे. अनेकांनी नवे संकल्प सोडले असतील, त्यानुसार कामही सुरू झालं असेल. काहींनी गेल्या वर्षी केलेले, पण पूर्ण न झालेले संकल्प यंदा पुन्हा केले असतील. माझा गेल्या वर्षीचा संकल्प जरा हटके होता, ‘नो शॉपिंग’ अर्थात स्वत:साठी वैयक्तिक खरेदी न करण्याचा!

बरीच वर्ष असं करण्याचा विचार मनात घोळत होता, पण हिम्मत होत नव्हती. कारण एक वर्ष म्हणजे फार मोठा पल्ला आहे असं वाटत होतं. पण २०१६ च्या शेवटी शेवटी अनेक गोष्टी जुळून आल्या आणि अखेर मी धीर आणि धाडस करून संकल्प करून टाकला की २०१७ मध्ये स्वत:साठी नो शॉपिंग!

अर्थात त्यासाठी एक कारणही घडलं.. डिसेंबरमध्ये माझी ओळख पुण्यातल्या झोपडपट्टीतील एक विधवा आणि तिच्या वय वर्षे २ ते १५ दरम्यानच्या ४ मुलींच्या कुटुंबाशी झाली. त्यांची कहाणी ऐकून मन तर कळवळलंच, पण माणसं कशी, किती कमी पैशात जगतात याची बऱ्याच वर्षांनी खूप तीव्रतेने जाणीव झाली. गेली २८ वर्ष मी अमेरिकेत, तेसुद्धा अतिशय संपन्न अशा सिलिकॉन व्हॅलीमध्ये राहते. इथली गरिबी म्हणजे इतर देशांना विनोदच वाटेल. आपल्यासारख्या पराकोटीच्या गरिबीच्या गोष्टी इथे नावालाही नाहीत. त्यामुळे गरिबीबद्दलच्या जाणिवा पूर्णपणे गेल्या नसल्या तरी थोडय़ाशा बोथट नक्कीच झाल्या होत्या. दुसरीकडे अमेरिका म्हणजे चंगळवादाची परिसीमा! त्याला बळी पडून माझ्याही गरजा मी नकळत वाढवून ठेवल्या होत्या. पण या दोन्ही गोष्टींची मला तीव्रतेने जाणीव झाली या कुटुंबाच्या संपर्कात आल्यावर. तेव्हा, त्यांना मदत करण्याबरोबरच आपल्याही गरजा कमी करण्याचा मी निश्चय केला. आणि म्हणून हा वैयक्तिक खरेदी, शॉपिंग एक वर्षांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय मी घेतला. पण खरंच कसं गेलं २०१७ हे वर्ष माझ्यासाठी?

पहिले सहा महिने तर छानच गेले. मी माझ्यासाठी काही कपडे, त्या अनुषंगाने लागणाऱ्या इतर वस्तू, म्हणजे चपला, पर्सेस, दागिने असं काही म्हणजे काही घेतलं नाही. मॉलमध्ये पाऊलही टाकलं नाही. किंवा टाकलं तरी ते कोणासाठी काही भेटवस्तू घ्यायला, स्वत:साठी नाही. वर्तमानपत्रातील जाहिराती बघणं मी सोडून दिलं. ऑनलाइन शॉपिंगही- स्वत:साठी- बंद झालं. त्यामुळे इंटरनेटवरचा वेळ वाचला. तो वेळ काही पुस्तकं वाचण्यात घालवता आला. काही मोहाचे क्षणही आले. पर्सेस, हॅण्डबॅग्सचा मोठा सेल लागला. मला हव्या त्या ब्रॅण्डची, हव्या त्या रंगाची, स्टाइलची पर्स सेलवर होती. पण मी मोठय़ा मुश्किलीने स्वत:वर ताबा मिळवला आणि पर्स विकत घेतली नाही. मी स्वत:वरच खूश झाले. आपल्याला हे जमतंय असं वाटायला लागलं.

मग आला जुलै महिना. उन्हाळ्याची सुट्टी म्हणून आम्ही पेरूला गेलो आणि तिथे माझ्या संकल्पाला पहिला सुरुंग लागला. पेरूची अल्पाका लोकर जगप्रसिद्ध आहे- आपल्या पश्मीनासारखीच. अमेरिकेत अल्पाका स्कार्फ वगैरे अवाच्या सवा किमतीला विकतात. मग वाजवी किमतीत अल्पाका स्कार्फ घेता यावा म्हणून, शिवाय आपण काही तिथे नेहमी जात नाही. म्हणून, असं हो नाही करीत, स्वत:ला बरीच कारणं देत मी एक अल्पाका स्कार्फ विकत घेतलाच!

परत आल्यावर काही महिने बरे गेले. संकल्पाचं पालन सुरू होतं. पण संकल्पाला आणखी एक सुरुंग लागला. कारण माझी भारताची ट्रिप ठरली. त्यासाठी भेटवस्तूंची खरेदी करताना संकल्प बाजूला पडणं अपरिहार्य होतंच. माझी जीन्स फाटली होती. भारत-भेटीच्या खरेदीबरोबर जीन्स आणि अशाच अजून एक-दोन गोष्टींची खरेदी झाली- सेल पण होता चांगला. नाही, मी विसरले नव्हते संकल्पाबद्दल. पण जीन्स तर निकडीचीच होती. पण एकदा नियम मोडल्यावर काय, एकदा मोडला काय आणि दोन-तीनदा मोडला काय, असं मला वाटायला लागलं. आणि सुरू झाली माझीच घसरगुंडी!  मग भारताच्या ट्रिपमध्ये इकडे घेऊन यायला दोन चपला-जोड घेतले. कारण पुढची ट्रिप कधी होईल काय माहीत? साडय़ा आणि ड्रेसेसची खरेदी मात्र केली नाही. परतल्यावर एका अमेरिकन लग्नाला जायला म्हणून पुन्हा एक ड्रेस आणि सँडल्स घेतल्या! एकूण नोव्हेंबर महिना काही बरा गेला नाही. पुन्हा पुन्हा नियम मोडला गेला. त्यामुळे मीपण स्वत:वरच जरा वैतागले. म्हटलं जाऊ  दे, आपल्याला काही झेपत नाही हे! पण मग विचार केला की निदान या विकत घेतलेल्या गोष्टी हाताच्या बोटांवर मोजता येतायत. बाकीच्या कित्येक गोष्टींची इच्छा झाली तरी मी स्वत:वर बऱ्यापैकी नियंत्रण ठेवू शकले आहे. आता वर्ष संपलंय. तसं माझ्या लिस्टवर खरं तर फक्त एक गोष्ट आहे, ज्याची मला खरोखर गरज आहे. ते म्हणजे माझे आत्ताचे वॉकिंग शूज. अगदी जुने झाले आहेत आणि थोडं लाइनिंग फाटलंय, पण काम चालून जातंय. नवऱ्याला सांगावे का की तू घेऊन दे म्हणून. पण ती पळवाट झाली असती म्हणून गप्प बसले.

एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा इथे. गेल्या वर्षांत मला जर कोणी काही भेट दिली, तर मी ती घेतली. म्हणजे काही नवीन वस्तू मी न घेताही मला मिळाल्या. इतरांना भेटवस्तू देण्यासाठी मी खरेदी करीत होते. त्यामुळे शॉपिंगच्या अनुभवापासून मी काही पूर्ण वंचित नव्हते. दैनंदिन जीवनात लागणारे किराणा सामानसुद्धा मी विकत घेत होते. पण मागे वळून बघताना मला वाटतं की, माझा नेम पाळण्यात मी बऱ्यापैकी यशस्वी झाले. पण माझी घसरगुंडी मी सहज टाळू शकले असते. अल्पाका स्कार्फ किंवा चपला काय, माझं काही नडलं नव्हतं त्यामुळे. संकल्प वा नियम मोडण्याइतक्या या गोष्टी महत्त्वाच्या नक्कीच नव्हत्या. म्हणजे माझाच निर्धार कमी पडला. ते आता समजलं असल्यामुळे नवीन वर्षांचे    सेल्स लागतील, तेव्हा चांगली कसोटीची वेळ आली तरी मी डळमळणार नाही आणि माझ्या निश्चयाशी ठाम राहू शकेन, असा मला विश्वास वाटतो.

तशी मी मुळात फारशी खर्चीक नाही (म्हणजे असं मला वाटतं). शॉपिंगची मला फार हौस नाही. तरीही मी अनेक गोष्टी विकत घेत असते हे माझ्या लक्षात आलं. ज्या गोष्टी घ्यायची इच्छा झाली तरी केवळ माझ्या संकल्पामुळे त्या घेतल्या नाहीत त्यासुद्धा काही काळ गेल्यावर त्या घेण्याची इच्छाही गेली, म्हणजे मला तर आता आठवतसुद्धा नाहीत की कोणकोणत्या गोष्टी मला घ्याव्याशा वाटल्या! मग त्या न मिळाल्याची खंत वगैरे तर दूरच. गरज तर बहुतेक वेळा नसतेच, आपण केवळ आपल्या इच्छेसाठी गोष्टी घेत असतो. उगीचच वस्तूंवर वस्तू, कपडय़ांवर कपडे घेऊन  नुसता ढीग लावून ठेवतो.

एकुणात काय, गेलं वर्ष बरंच काही शिकवून गेलं : एक लक्षात आलं की, खरेदी ही बहुतेक वेळा इच्छित गोष्टींसाठी असते, गरजेसाठी नाही. कित्येक वेळा आपण आपल्या इच्छेलाच गरज समजून बसतो. या दोन्हीतला फरक समजून घेण्याचा विवेक आपल्याकडे यायला पाहिजे. आर्थिक सुबत्ता असेल तर मनात येईल ते लगेच विकत घेता येतं, त्यामुळे हा असा विवेक असणं अजूनच कठीण. मग असा काही तरी नेम वा संकल्प करणे हाच एक उपाय आहे तो विवेक जागृत करायला. आणि एकदा का तो जागा झाला की आपल्या गरजा कमी होतील.

एखादी वस्तू विकत न घेणं आणि ती विकत घेण्याची परिस्थिती नसणं यात खूप फरक आहे. केवळ खरेदी थांबवून आपल्याला गरिबांच्या दु:खाची अनुभूती येते असा माझा मुळीच दावा नाही. पण निदान त्याबद्दल विचार मनात आलं तरी आपण त्या दृष्टीने पहिलं पाऊल उचललं असं मानायला हरकत नाही. मग त्यापुढचा प्रश्न आहे- खरेदी न करून जे पैसे वाचले ते सेवाभावी संस्था किंवा गरजू लोकांना दान करावेत का? याचं उत्तर मला वाटतं प्रत्येकाने स्वत:चं स्वत:साठी शोधायचं आहे.

जाता जाता आणखी एक फायदा- आपण आपला उपभोगवाद वा चंगळवाद कमी केला तर पर्यावरणासाठीही ते पोषकच ठरेल. ‘नो शॉपिंग’ संकल्पाचे फायदे खूप दिसतायत, तोटा मात्र एकही नाही. मग काय, सोडणार का ‘नो शॉपिंग’चा संकल्प यंदासाठी?

मुग्धा बखले-पेंडसे

mugdha940@gmail.com

chaturang@expressindia.com