किंडरगार्टनच्या शाळेत शिकणारी सारा घरी आली ती कावरीबावरी होऊनच! तिच्या आईनं विचारलं, काय झालं म्हणून!  ‘‘आई स्टेपफादर म्हणजे काय गं?’’ साराच्या या प्रश्नावर तिची आई चमकलीच एकदम! हे असले शब्द हिला कसे काय कळणार या छोटीला..? पाश्चात्त्य देशातील शाळेत असली तरी..!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘‘का गं सारा? तुला कोणी काय म्हणालं?’’

‘‘नाही ममा, सोफिया सांगत होती, की ती वीकएन्डला स्टेपफादरकडे जाणार आहे. म्हणजे कोण गं? कोणी अंकल असतात का? ममा, अ‍ॅलिव्हिया म्हणाली, तिच्या घरीपण स्टेपमॉम येणार आहे. पण ममा, अ‍ॅलिव्हियाला आवडत नाही ती स्टेपमॉम..! ती म्हणाली, तिला तिची मम्माच आवडते.  तिची  ममा तिला ओरडते, मारते तरीसुद्धा तीच आवडते. तिला तिच्याजवळच राहायचं आहे, स्टेपमॉमजवळ नाही..! आणि ममा. अ‍ॅलिव्हिया ना खूप रडायला लागली एकदम..! ममा मी तिला म्हटलं.. ‘रडू नको! मलापण ग्रँडपा, ग्रँडमा आहे.  मी राहते त्यांच्याकडे कधी कधी..आय लव्ह देम. ’ तर ती जास्तच रडायला लागली. मम्मा, माझं चुकलं का?’’

साराचा चेहरा घाबराघुबरा दिसत होता. असले संवाद तिच्यापर्यंत फारसे पोचलेच नव्हते. सांस्कृतिक वेगळेपणामुळे आधीच भांबावलेली.. त्यात असले संवाद ऐकलेले!

साराच्या आईनं तिला समजेल अशा शब्दांत तिची समजूत घातली.. ‘अगं  हे असे अंकल, आँटी.. खूप चांगले असतात.. खूप केअर घेतात ते! सोफिया आणि अ‍ॅलिव्हियाला  हळूहळू आवडतील..! अ‍ॅलिव्हियाला तिच्या मम्माजवळ राहायला मिळणार नाही म्हणून रडत असेल ती! तू तिला काहीही विचारू नकोस.. सांगू नकोस..’’ साराला नेमकं काय आणि किती समजलं माहीत नाही.. पण विषय संपला तिथं!

साराच्या वयाचा तिचा एक मित्र. त्याची आई व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला, त्याच्या एका जवळच्याच भावाचा फोटो त्याला दाखवत होती. फोटोतल्या त्या छोटय़ाची ओळख सांगण्याआधीच, यानं साशंक होऊन  विचारलं, ‘‘इज ही माय स्टेपब्रदर’’ त्याची आई अवाक झाली. ‘‘नाही रे, ही इज युवर कझिन ब्रदर’’ आयुष.. तो इंडियात राहतो..’’

हे आणि असे विषय परदेशस्थ आई-वडिलांच्या गप्पांचे किस्से म्हणून सांगितले व ऐकले जातात! त्यावर चर्चा, आपली भारतीय कुटुंबव्यवस्था; भारतातपण हल्ली याचं प्रमाण वाढतंय.. आदी.

‘‘अगं..अनुजाच्या वर्गात (इयत्ता चौथीत) टीचर्सने  एक प्रोजेक्ट घेतलं. फॅमिली ट्रीसाठी, सख्खे आई-बाबा आणि दोन्हीकडच्या आजी-आजोबांचं आणि सांगू, एकटय़ा अनुजाशिवाय दुसरं कोणाचीच अशी रिअल फॅमिली ट्री नव्हती. अनुजानं भाव खाल्ला. घेऊन गेली सर्वाचे फोटो दाखवायला. ट्री छान डेकोरेट केला.. आर्टिस्टिक फोटो चिकटवले..’’ अनुजाची आई अभिमानानं सांगत होती. अनुजा साराच्याच शाळेतली!

गोजिरवाण्या भव्य घरात राहणारे, भारतीयांना भावणारे गोरे गोरे पान, सोनेरी केसांचे आई – वडील.. त्यांची तशीच गोबरी गोबरी गोड मुलं! भौतिक सुखं भरभरून उपलब्ध! पण आई वडील जन्मदाते असतीलच असं नाही.. त्या निष्पाप निरागस डोळ्यांच्या  कोकरांच्या डोळ्यांत एक उदास, हरवल्याची छटा दिसत राहते,‘डिअर, हे तुझे नवे डॅड.. नवी मॉम..! तुझे नवे भाऊ, बहीण.’ त्यांना सांगितलं जातं.  का कशासाठी, हे या अजाण बालकांना माहीत नसतं! अनेक बालके अशी संभ्रमात व असुरक्षित! बालपण चुरगळलेली! स्टेपमॉम/ डॅड म्हणजे नेमकं काय हे न समजणारी! आपलेच आईवडील हवेहवेसे वाटतात. शाळेत घरात फिरायला न्यायला, हट्ट करायला! आपले खरे आई – बाबा आपल्यावर खरं प्रेम करतात.. काळजी घेतात. आजारपणात सेवा करतात, रागावतात.. पण जवळ घेतात.. त्यांचा  स्पर्श हवाहवासा वाटतो.. एवढंच बालकांना हवं असतं! या निरागस भावबंधनात व (खऱ्या) आईवडिलांच्या प्रेमाच्या गाढ छायेत पंख फुलवायचे, उमलायचे; एवढंच मर्यादित विश्व त्यांचं!

पण कधीतरी, केव्हातरी हे गोड भावविश्व उसकटतं! एकमेकांना  (मुलांमुळे) बांधले गेलेले आईवडील विभक्त होतात..आई, तिच्या अहंकाराला चिकटून तर वडील, ‘गेली उडत..’ या गुर्मीत! तिचे आईवडील तिच्या पाठीशी, त्याच्या आईवडिलांचा त्याला पाठिंबा.! दोन्ही घराणी एकमेकांना नावं ठेवण्यात, दोष देण्यात धन्यता मानणारे! अपत्याचंपण ‘ब्रेन वॉशिंग..’! बालबुद्धीला काय कळणार यातलं! मग हक्कांची चढाओढ..! ‘आम्हीच चांगले आहोत’ हे दाखविण्याची केविलवाणी, पण जीवघेणी स्पर्धा! विशेषत: भारतीय संदर्भात! कारण हे चित्र केवळ परदेशापुरतं राहिलं नाहीये आता! भारतीय कुटुंबे.. या परदेशी पदपथावर अतिवेगाने आक्रमण करून, परदेशीयांना मागे टाकत आहेत.. सुधारणा, काळ बदलला, एकमेकांचं बिलकूल पटत नाही.. अनेक कारणे पुढं करत.. पती-पत्नी विभक्त होत आहेत.. त्याला सामाजिक मान्यता (तडजोड, इ.) मिळत आहे. काही ठिकाणी आत्यंतिक समस्या, दैवदुर्विलास, यामुळे पुनर्विवाह आवश्यक आहे. पण लंगडय़ा कारणांचं समर्थन व त्यात बालकांची होणारी होरपळ याकडे कितीजण गंभीरपणे बघतात?

विभक्त होणारे आई – वडील एकमेकांच्या उणिवा आणि दोष काढण्यात मग्न आणि अपत्याची फरफट! पण तीनही जीव तळमळत राहतात.. अपत्त्याचं एक पालकत्व.. दुसऱ्याकडे काही काळ सोपविण्याची त्रेधातिरपीट! मग त्या एकावर / एकीवर  प्रेमाचा वर्षांव.. चढाओढ! लेकराला मात्र दोघं एकत्रच हवे असतात.. अजाण वयात हे न पेलवणारे भावनिक ओझे. विभागले गेल्याचे! त्याचा परिणाम नकळत त्याच्या सर्वागीण विकासावर होतो.. असुरक्षितता, आत्मविश्वासाचा अभाव आणि बरंच बरंच काही!

एकमेकांचा विलक्षण द्वेष व राग करणारे आई-वडील आपल्या अपत्त्याच्या बाबतीत मात्र अतिशय हळवे व आयुष्यभर बांधलेले राहतात, असं मात्र दिसतं. अपत्याविषयीची नैसर्गिक ओढ, त्यांच्या उद्ध्वस्त आयुष्यात (जरी पुनर्विवाह झाला तरी किंवा अन्यथा) डोकावतच राहते. भावनांचा ज्वालामुखी धुमसत राहतो.

‘पूर्वीच्या काळी नव्हतं असं.. आता काळ बदललाय.. विज्ञान – तंत्रज्ञानाची भरारी, स्वातंत्र्याची ऊर्मी, वेगळी जीवनपद्धती अशा अनेक सबबी पुढं केल्या जातात. पण लहानग्यांना त्या कशा कळणार? त्यांना हवं असतं नैसर्गिक घरटं व नैसर्गिक देखरेख..! पण खरी आई किंवा खरे बाबा, आपल्याच अपत्याची, कोणा परक्याशी ओळख करून देतात, ‘‘बेबी, थोडं अ‍ॅडजस्ट कर. तुला आवडेल तुझा न्यू डॅड ऑर न्यू मॉम!’ विवाह मोडला (किंवा आता विवाहाविनासुद्धा) तरी मी आई म्हणून / वडील म्हणून अपत्याची किती काळजी घेतो हा अभिनिवेश धारण केला जातो.. सामाजिक सहानुभूती मिळवण्याची धडपड केली जाते!

बालकाच्या अजाण मनात साधा तार्किक प्रश्न येतो, ‘‘मॉम / डॅड मला न्यू सिच्युएशनशी अ‍ॅडजस्ट करायला सांगताहेत.. तर मग तुम्ही मोठ्ठे का नाही एकमेकांशी अ‍ॅडजस्ट करून घेत? या प्रश्नांचं उत्तर त्यांना कधीही मिळणार नसतं, पण सदैव त्यांच्या ओठावर एकच प्रश्न असतो, ‘मॉम / डॅड तुम्ही का नाही दोघांच्यात अ‍ॅडजस्ट करत? आपण सगळेच आनंदात एकत्र राहण्यासाठी..?

डॉ. अनीला गद्रे

aneelagadre@yahoo.co.in

 

 

मराठीतील सर्व मनातलं कागदावर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kathakathan by anila gadre
First published on: 06-05-2017 at 03:32 IST