म्हातारपणी एक विरंगुळा म्हणून केतकर काका-काकूंनी एक उपक्रम सुरु केला. तो उपक्रम म्हणजे अप्रसिद्ध लेखकांच्या एकांकिका सादर करण्याचा. त्यांच्या या उपक्रमामुळे त्यांना आणि त्यांच्यासारख्या ज्येष्ठांना एक वेगळेच समाधान मिळालं..
केतकर कुटुंब मुंबईत आमच्या शेजारी जवळ जवळ वीस-बावीस वर्षे राहत होते. त्यांच्या कुटुंबात आणि आमच्या कुटुंबातील संबंध इतके दृढ झाले होते की, जणू काही आमचे एकत्र कुटुंबच वाटावे; पण दोन वर्षांपूर्वी त्यांना मुंबई कायमची सोडावी लागली आणि ते नागपूरला राहायला गेले. त्यांचा एकुलता एक उच्चशिक्षित मुलगा नंतर अमेरिकेला नोकरीनिमित्त राहायला गेला आणि कायमचा तिकडचाच होऊन बसला. आता नागपूरच्या घरी केतकर काका-काकूच राहात होते. नागपूरला आमचे कोणीच इतर नातेवाईक किंवा परिचित राहत नसल्याने नागपूरला जाण्याचा योग आम्हाला कधीच आला नव्हता. तो योग मला गेल्या महिन्यात कर्मधर्मसंयोगाने आला आणि वेगळाच अनुभव घेऊन मी मुंबईला परतलो.
माझ्या ऑफिसचे काही काम असल्यामुळे मला अचानक नागपूरला तीन दिवसांसाठी जावे लागले. मी केतकर काकांकडे उतरण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना फोन केला. माझा फोन जाताच काका-काकूंना खूप आनंद झाला. त्यांनी मला चक्क बजावलेच, नागपूरमध्ये मी त्यांच्याकडेच राहायला हवे, अन्यत्र कुठेही सोय केल्यास खपून घेणार नाही. त्यांचा तितका माझ्यावर अधिकार होताच. गुरुवारी सकाळी मी नागपूरला पोहोचलो आणि दिवसभर माझी तेथील कामे उरकून संध्याकाळी केतकरांच्या घरी पोहोचलो. काका-काकूंनी माझे आनंदाने स्वागत केले. गेल्या गेल्या त्यांनी चहा-फराळाचे विचारले. मी म्हटले, बाहेर दोन-तीनदा चहा-खाणे झाले आहे. थोडी विश्रांती घेतो आणि मग चहा-फराळाचे पाहू. त्यांनी मला बेडरूम उघडून दिली आणि म्हणाले, ‘‘आता मस्त आराम कर. ही तुझी खोली. दार लावून घेतो काही लागले तर नि:संकोचपणे हाक मार.’’ रात्रभराचा रेल्वे प्रवास आणि दिवसभराची दगदग यामुळे बिछान्यावर पडल्यापडल्या माझा डोळा लागला. बराच वेळ झाला असावा मला काका-काकूंचा मोठमोठय़ाने बोलण्याचा आवाज बंद दरवाजातूनही ऐकू येत होता. मला वाटले दोघांचे काही तरी कशावरून तरी बिनसले असावे. मला मोठी चिंता वाटू लागली. अशा वेळी त्रयस्थाची अवस्था कशी होते याचा अनुभव माझ्या गाठीशी होता. मी दरवाजाजवळ जाऊन दरवाजा हळूच किलकिला केला, तितक्यात काकूंचे लक्ष माझ्याकडे गेले, काकू काकांवर जोरात ओरडल्या, ‘‘थांबा हो तुम्ही.’’ मी एकदम दचकलोच. माझ्याकडे पाहात काकू म्हणाल्या, ‘‘येरे, काही घाबरू नकोस. आमचे नेहमीचंच आहे.’’ मी दबकत बाहेर जाऊन बसलो. काकांनी तोंडासमोर धरलेले पुस्तक बाजूला सारले आणि मिस्कील हसले. काकू उठता उठता म्हणाल्या, ‘‘आता चहा, खायला करते, मग नंतर बाकीचे बघू.’’ त्यांनी हातातले पुस्तक बाजूच्या फळीवर त्यात खुणेची पट्टी ठेवून, ठेवून दिले आणि त्या स्वयंपाकघरात चहा-फराळ करायला गेल्या. काकांनीही पुस्तकात खुणेची पट्टी ठेवली आणि माझ्याशी गप्पा मारू लागले. मी आपला कावराबावरा होऊन संवाद रेटत होतो. थोडय़ाच वेळात काकू चहा- फराळाच्या बशा घेऊन आल्या. मला म्हणाल्या, ‘‘तुला काय वाटले, म्हातारा-म्हातारी का आणि कशावरून तावातवाने भांडतायेत, हो नं? अरे, ती एक मोठी गंमत आहे. हेच सांगतील.’’ चहा पिता पिता काका आणि काकूंनी जे काही सांगितले ते ऐकून मी थक्क झालो.
काका म्हणाले, ‘‘आमचे पूर्वीचे सर्व आयुष्य मुंबईत गेले. नागपूरला आल्यावर येथे रमायला थोडा वेळ लागला. ते अपेक्षितच होते, पण शंतनू अमेरिकेला गेला आणि आम्ही एकलकोंडे झालो. वेळ जाता जाईना, तसे आम्ही इथले काही ग्रुप्स जॉइन केले, तरीही भरपूर वेळ उरायचा आणि नंतर नंतर आमच्या लक्षात येऊ लागले की, आम्ही काहीना काही कारणावरून किंवा कारण काढून एकमेकांशी भांडतो आहोत. कारणे अगदी क्षुल्लक असायची तरीही भांडायचो.’’
‘‘आम्हाला एकीकडे कळायचे या भांडणात काही अर्थ नाही, मग आम्हाला प्रश्न पडायचा इतक्यातितक्या कारणावरून आपल्यात ही भांडणे का होतायत. आपले साधे संवाद, विसंवाद का ठरतायत, कारण आमची ती वेळ घालविण्यासाठी गरज ठरत होती. टीव्ही बघायचा पहिल्यापासून आम्हाला दोघांना कंटाळाच. पुस्तक आणून वाचून काढायचो, पण दृष्टी दगा देऊ लागली. शिवाय किती वाचणार? यातून मला एक कल्पना सुचली, मी हिला म्हटले, ‘आपल्यातील वादाचे रूपांतर संवादात झाले तर किती बरे होईल.’ ती म्हणाली, ‘असे कोडय़ात बोलू नका, तुमचा काय विचार आहे तो सांगा आणि भलत्यासलत्या कल्पना लढवू नका, आपल्याला झेपेल असेच काय ते आपण उद्योग करू या, नाही तर वादाचे रूपांतर संवादात करता करता वादावादीत व्हायचे’.’’
‘‘मी म्हटले, आधी कल्पना तर ऐक, जमले तर करू नाही तर सोडून देऊ. मी म्हटले, मी कॉलेजमध्ये असताना काही नाटकांतून कामे केली आहे. तूदेखील ऑफिसच्या गॅदरिंगमध्ये काहीबाही करायचीस, आपण एकांकिका बसवल्या तर? ती म्हणाली, ‘अहो, पण त्या करायच्या कुठल्या स्टेजवर?’ मी म्हटले, ‘अगं, स्टेजबीज काही नाही आणि थिएटरही नाही. आपण आपल्या घरातच त्या सादर करायच्या. आपले घर केवढे मोठे आहे, मुंबईसारखी खुराडी नाहीत काही. या हॉलमध्येच वीस-बावीस माणसे सहज बसू शकतील. त्या एकांकिकासुद्धा अशा, की ज्यात केवळ दोन ते तीनच पात्रे असतील. कुठेही माणसे अधिक तितका तिथे घोळ अधिक. ती म्हणाली, ‘ठीक आहे’.’’
‘‘मी दुसऱ्या दिवशी बाजारातून निवडून किती तरी एकांकिकेची पुस्तके घेऊन आलो. त्यातून एक-दोन पात्रेच असलेली पुस्तके बाजूला काढली आणि एक गोष्ट मनाशी पक्की ठरवली, नामवंत, प्रथितयश लेखकांची पुस्तके अजिबात विचारात घ्यायची नाहीत, कारण एक तर त्याचे प्रयोग बऱ्याच संस्था करत असणार आणि त्यांच्या प्रयोगांची परवानगी मिळवणे हे आम्हाला पेलणारे आणि परवडणारे नव्हते, म्हणून एक गोष्ट केली, त्यातून ज्यांचे अजिबात नाव झालेले नाही असे लेखक निवडून काढले. गंमत सांगतो, खूप चांगली कथानके असणाऱ्या एकांकिका आम्हाला मिळाल्या, पण लेखक मात्र अप्रसिद्ध होते, अप्रकाशित होते.’’
काका सांगत होते, नाटकांचे शुभारंभाचे प्रयोग बहुतेक वेळा शुक्रवारी केले जातात, पण आम्ही दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रवारी आमच्याच घरी एकांकिकेचा प्रयोग सादर करतो. आमच्या ज्येष्ठांच्या ग्रुपमधील ज्यांना आवड आहे अशांना घरी बोलवायचे आणि त्या दिवशी त्यांच्या समोर प्रयोग सादर करायचा आणि आमचा हा प्रयोग एकदम यशस्वी झाला. आता आमची मित्रमंडळी दुसऱ्या शुक्रवारची वाट पाहात असतात. काही वेळा त्यातील कोणी त्यात एखादी भूमिकाही आवडीने मागून घेतात आणि पार पाडतात. आमचा संपूर्ण महिना या नवीन उपक्रमामुळे भरगच्च कामाचा असतो. पाठांतर, संवादफेक, त्यात सुधारणा, अगदी जुजबी प्रॉपर्टी जमा करणे किंवा इथेच तयार करणे, कोणी नवीन भिडू असेल तर त्याच्याकडून काम बसवून घेणे. आमचा दिवस कसा जातो कळतदेखील नाही. कोणाशीही स्पर्धा नाही, हेवेदावे नाहीत, घरच्या कटकटी सांगायला वेळच नाही. एक पाठ आम्ही कसोशीने पाळतो, या व्यवहारात एका पैशाचीही देवघेव करायची नाही. नाही तर करायला जायचो विरंगुळा आणि होऊन बसायची डोकेदुखी, या वयात न परवडणारी.
मी नुसता ऐकतच बसलो. वेळ घालविण्याची इतकी सुंदर कल्पना या दोघांनी शोधून काढली होती. त्यांच्या कल्पकतेला दाद द्यावी तेवढी थोडीच. काका म्हणाले, ‘‘पोहे खा, चहा घेऊ. पुढे सांगणार आहे, ते सांगितल्यावर तर तू चाटच पडशील.’’ काकूंनी आणलेले पोहे मी फस्त केले आणि चहाचा कप हातात घेतला.
काका म्हणाले, ‘‘आम्ही बऱ्याच एकांकिका केल्या. मग माझ्या डोक्यात एक कल्पना आली, आपण ज्यांचे फार नाव नाही अशा लेखकांच्या एकांकिका केल्या. आता एक काम करू, त्या लेखकांचा शोध घेऊ आणि पुढची एकांकिका त्यांच्या समक्ष साकार करता येते का ते पाहू. ही माझी कल्पना सर्वानीच उचलून धरली. गेल्या शुक्रवारी जी एकांकिका आम्ही सादर करणार होतो त्या लेखकाच्या पुस्तकात दिलेल्या पत्त्यावर आम्ही पत्राने संपर्क साधला आणि संपर्क झालाही, कारण पत्ता फार पूर्वी छापलेला होता, पत्र मिळेल की नाही याबद्दल आम्ही साशंक होतो, पण त्यांना पत्र मिळाले. त्या पत्राद्वारे आमची कल्पना सांगून त्यांची संमती हवी म्हणून विनंती केली. नागपूरजवळच्या एका खेडेगावात ते गृहस्थ शिक्षकाच्या नोकरीतून निवृत्त होऊन आपले उर्वरित आयुष्य व्यतीत करत होते. आमचे पत्र वाचून त्या ऐंशी वर्षांच्या वृद्धाला किती आनंद झाला म्हणून सांगू. त्यांचे त्वरित उत्तर आले. ‘मी एक छंद म्हणून खूप लिखाण केले, काही एकांकिकाही लिहिल्या, त्या पदरमोड करून छापून घेतल्या आणि विक्रीला काही दुकानांतून दिल्या. पुढे त्यांचे काय झाले आजपर्यंत काही कळलेले नाही. कदाचित काहींनी त्या सादरही केल्या असतील, पण मला कळवायची तसदी कोणी घेतली नाही. तुम्हीच पहिले.’ त्या लेखकांनी लगेच आनंदाने लेखी परवानगी पोस्टाने पाठवली. आम्ही त्यांना ती एकांकिका बघायला येथे सन्मानपूर्वक आमंत्रित केले. त्यांना जाण्या-येण्याचे तिकीट पाठविले, शिवाय आमच्या घरीच मुक्कामाला राहण्याची विनंती केली. आमच्या आमंत्रणाचा मान ठेवून ते गेल्या शुक्रवारी येथे आले होते. त्यांच्या समोर आम्ही त्यांनी लिहिलेली एकांकिका सादर केली. भरल्या डोळ्यांनी ते त्यांच्या एकांकिकेचे सादरीकरण होताना पाहात होते. आमच्या ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे त्यांचा सत्कार केला. त्यांना इतका आनंद झाला म्हणून सांगू. त्यांनी आनंदाने मला मिठीच मारली. त्या दिवशी आम्ही दोघे अगदी भरून पावलो. तो सन्मानाचा अनुभव घेऊन तृप्त मनाने तो वृद्ध गृहस्थ परत आपल्या गावी गेला.’’
काकू म्हणाल्या, ‘‘आम्हाला सर्वाना याचा किती आनंद झाला म्हणून सांगू. केवळ आम्हा दोघा वृद्ध व्यक्तींचा एक विरंगुळा म्हणून सुरू केलेला उपक्रम एका लेखकाला त्याच्या वृद्धापकाळात खूप समाधान आणि आनंद मिळवून देणारा ठरला. या वयात आता आणखी काय हवे. तू मगाशी आमचे मोठमोठय़ाने होणारे आवाज ऐकत होतास ना, तो त्याचाच भाग बरं का! तुला काय वाटले, केतकर काका- काकू नागपुरात येऊन भांडत बसलेत होय रे. आता नवीन एकांकिका बसवायला घेतली आहे.’’ काका-काकूंनी एक पुस्तक माझ्या हाती दिले आणि म्हणाले, हा आता तुझा विरंगुळा. जरा बघ, आमचं कितपत पाठ झालंय आणि मीही त्यांच्यात काही वेळा पुरता का होईना सामील झालो.
gadrekaka@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व मनातलं कागदावर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Old age problems
First published on: 21-05-2016 at 01:05 IST