शामल वेचलेकर

जीवनमरणाच्या सारिपाटावर प्रत्येक क्षणाला काही तरी घडत असतं. या रंगमंचावरील एका बिंदूपेक्षाही कमी असं प्रत्येकाचं अस्तित्व असतं. पण याची जाणीव बालपण, तरुणपण आणि प्रौढपणात होण्यात बरंच आयुष्य सरलेलं असतं. नियती प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळय़ा वेळी येऊन खूप काही शिकवत असते. कधी योग्य, तर कधी अयोग्य. पण हे समजण्याची आकलनशक्ती कोणत्या वयात येईल हे सांगता येत नाही. काही घटना या आयुष्याला वेगळेपणाकडे नेतात, हे मात्र खरं!

moong dal scrub for glowing skin
Skin Care Tips: मुग डाळीचा असा वापर कराल तर खऱ्या वयापेक्षा दिसाल लहान व तरुण; सुरकुत्या, पिंपल्सही होतील दूर!
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Sun transit in mesh surya gochar 2024
१ वर्षानंतर सूर्य-मंगळाची मेष राशीत युती, ‘या’ तीन राशींच्या लोकांना मिळेल बक्कळ पैसा? प्रत्येक क्षेत्रात मिळू शकेल यश

मुंबई शहरात झालेला गिरण्यांचा संप. अनेक कुटुंबांमध्ये त्या वेळच्या परिस्थितीनं खूप काही बदल घडवले. पैशाचं महत्त्व किती असतं हे समजून आलं. पैसा नसेल तर किती तरी समस्यांना सामोरं जाताना जिद्द ही एक शक्ती अनेकांप्रमाणे माझ्याही आयुष्याला वेगळं वळण देऊन गेली. प्रामाणिकपणा, सचोटीचे संस्कार कुटुंबातून होत असताना केवळ दहा रुपयाचं मूल्यही आपलं आयुष्य अडवू शकतं, ही वास्तवता परिस्थितीनं जाणवून दिली. ‘ऐपत नसेल तर कशाला शिकवायचं मुलींना’ या वाक्यानं पाठपुरावा केला. पूर्वी महानगर- पालिकेच्या शाळांतही दर्जेदार शिक्षण देणारे आदर्श शिक्षक असायचे. अकरावीनंतर टायपिंगचं शिक्षण घेतलं, पण मन रमलं नाही. शाळेतल्या शिक्षकांचा आदर्श डोळय़ासमोर होता. म्हणून दोन वर्षांचं ‘डीएड’चं शिक्षण घेतलं. ते गुणवत्तेच्या जोरावर शिष्यवृत्तीवर झालं. ताराबाई मोडक यांच्या शिशुविहार संस्थेतून शिक्षक म्हणून घडवण्यात तिथल्या शिक्षकांचा वाटा फार मोठा आहे. तिथेच पुढे शिक्षणाची जिद्द निर्माण झाली. पुढचा मार्ग खडतर होता. पण शिकवण्या, नोकरी करून उच्च शिक्षण घेताना स्वत:च्या पायावर उभं राहाण्याचा मार्ग मिळाला. प्रेरणा, आत्मविश्वास, श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व पटवून पुढे चालण्याचा मार्ग माझ्या आईनं मला आखून दिला. आपल्या आयुष्यात चांगली माणसं, चांगली वेळ, सातत्यानं केलेले प्रयत्न, यांचा विसर पडू न देता, पुढे जायची शिकवण मिळाली. त्यातून स्वावलंबन आणि अर्थार्जन यांची सांगड घालता आली. शिक्षणाचं महत्त्व अधिकाधिक पटत गेलं. मुलींनी तर शिक्षण घ्यायलाच हवं याबाबतचे विचार स्व-अनुभवातून पक्के झाले.

प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येत असतात. तसंच माझंसुद्धा होतं. शिक्षण, नोकरी करताना अनेकांचं मार्गदर्शन, सहकार्य मिळालं. त्यांचं स्थान कायमच हृदयात राहिलं. त्यांचं विस्मरण होणं शक्यच नाही. मात्र काही वेळेस आपल्या मार्गात अनेकांनी केलेले अडथळेही जीवनात खूप काही शिकवून गेले. प्रपंचाचा भार सांभाळताना जीवनसाथीच्या मोलाच्या मदतीनं नवी उभारी आणली. तेव्हा पुन्हा जीवनात काही तरी वेगळं करण्याची ऊर्मी निर्माण झाली. त्या वेळी आपले छंद-कला जोपासताना साहित्याच्या वाटेनं जाता आलं. विद्यार्थी-पालकांसाठी स्वतंत्रपणे लेखन करता आलं. वृत्तपत्रलेखनातून तयार झालेल्या स्तंभांतून स्वतंत्र पुस्तकं तयार झाली. काही काव्य पुस्तकांचं समीक्षण करता आलं. ‘शिक्षक कुणीही होत असतो, पण तुम्ही लिहिलेल्या पुस्तकांतून पुढील काही वर्षांसाठीचं मार्गदर्शन शिक्षक-पालकांना होत आहे,’ असा अभिप्राय जेव्हा ज्येष्ठ, अनुभवी वाचकांनी दिला, तेव्हा शिक्षकी पेशाचं कृतार्थ आयुष्य जगल्यासारखं वाटलं. आपण आपल्या विद्यार्थी-पालकांसाठी आदर्श आहोत, ही भावना खूप सुखावह असते. अनेक विद्यार्थी आणि पालकांचं अलोट प्रेम मिळत राहिलं. यातच नोकरीचा दीर्घ कालावधी कसा संपला ते कळलं नाही. त्यात मिळालेला आनंद, काही वेदनेचे क्षण चिरस्मरणीय ठरले. मात्र आजही, निवृत्तीच्या उंबरठय़ावरची काही वर्ष उलटली तरी काम केलेल्या काळातल्या हक्काच्या अर्थार्जनासाठी शिक्षण खात्यात वारंवार चकरा मारायला लागतात, हा मनस्ताप सहन करणं हाही जगण्याचा कटू अनुभव काही सांगून जाणारा.

नोकरीत कार्यरत असताना ‘विद्यार्थी हाच ईश्वर’ ही जाणीव सतत ठेवल्यानं आजपर्यंतचं आयुष्य चाललं आहे. चंगळवादानं, भोगवादानं, सामाजिक परिस्थितीनं माणसा-माणसांतलं आपलेपण संपुष्टात येत असतानाच करोनानं आपल्याला सावध केलं. अनेक कुटुंबांतल्या व्यक्तींनी आपल्या माणसांना गमावलं. त्यातून आम्हीही गेलो. आपल्या व्यक्तीचं अंत्यदर्शनही जेव्हा मिळत नाही, तेव्हा आयुष्याचं मोल काय आहे, हा विचार करायला भागवत ग्रंथ खूप काही शिकवून जातो.

आता मात्र ‘सावधान आणि समाधान’ यावर आपलं आयुष्य जगायला हवं, तेही स्वत:चा आनंद शोधत. समाजात अनेक वंचित घटक आहेत. त्यांच्याबरोबर का वेळ घालवू नये? आपल्या आयुष्यातला काही काळ हा निरागस बालकं, वृद्ध यांच्यासाठी देणं, त्यांना समाधानी बघणं, हे आपल्या मनालाही समाधान देणार असावं. आपल्या जगण्यातला आनंद इतरांना देताना आपलंही माणूसपण जपता यावं, हाच आयुष्याचा अर्थ या टप्प्यावर जाणवतो.