मानवी आयुष्याचा आणि वस्त्रांचा एक भावनिक प्रवास असतो. प्रत्येक टप्प्यावर नवे साक्षात्कार घडवणारा! नातेसंबंध जोडणारा, नको तेवढा स्मरणीय तर कधी अविस्मरणीय! पूर्वीचा आदिमानव कसा जगत होता कोण जाणे वस्त्राशिवाय? वस्त्र वापरत नव्हता म्हणूनच तेव्हा तो रानटी असावा.. आपल्या आयुष्याची आणि वस्त्राचीही अशीच गाठ बांधलेली आहे.
माझ्या नव्या सुनेला शेजारी घेऊन गेले आणि घरी आल्यावर स्वभावानुसार यांनी टिप्पणी केलीच, ‘काय नव्या सुनेला दाखवायला गेली होतीस की काय? नवी साडी दाखवायला जातेस तशी?’
नव्या साडीची उपमा नव्या सुनेला दिलेली पाहून मला गंमतच वाटली. तेच निमित्त झालं आणि मनात वस्त्र आणि मानवी भावना एकत्र फेर धरू लागल्या. त्या झिम्म्यात कितीतरी गाणी कानांत घुमू लागली. ‘एक धागा सुखाचा’, ‘चिंधी बांधते द्रौपदी’, ‘आई मला नेसव शालू नवा’, ‘जरतारी लाल शाल जोडी’, ‘अरसिक किती हा शेला’, ‘धागा धागा अखंड विणू या’, ‘रेशमी सलवार कुरता जाली का’, ‘हवा में उडता जाये’ इ. इ.
प्रेमाचे धागे जसे अति ताणले की तुटतात, तसेच वस्त्राचे धागेही तुटतात. नंतर त्याला ठिगळं लावूनही ते वस्त्र किंवा नातं दोन्ही पहिल्यासारखं बनत नाही. एकदा तुटलं की ते तुटत जातं. वस्त्र आणि भावना कित्येक वर्षांपासून एकत्र नांदत आहेत. अगदी आदिमानवानं वल्कलं परिधान करायला सुरुवात केली तेव्हापासून! मानवाच्या प्रगतीबरोबरच वस्त्रनिर्मितीमध्येही क्रांती घडत गेली. प्रत्येक वस्त्राशी कुठलीतरी भावना कळतनकळत जुळलेली असते. मऊमऊ दुपटं पाहिलं की खुद्कन हसणारं बाळ डोळ्यासमोर येतं. खणाचं परकरपोलकं घालणारी चिमुरडी कधी वयात येते कळतही नाही. देहाबरोबर मनातही तारुण्याची भावना झळकवणारी ओढणी झुळझुळते तेव्हा वाऱ्यानं उडणारी ओढणी लाजऱ्या, भांबावलेल्या तरुणीचं प्रतिनिधित्व करते.
डोईवरचा पदर खानदानीपणा दर्शवतो. धुतलेले हात पुसण्यासाठी साडीच्या पदराशी लोंबणारं ‘कार्ट’ खोडकर वाटायला लागतं. नवी जरीची साडी आवर्जून सांगते, ‘आज सण आहे कोणता तरी मोठा’ तर स्वयंपाकाचा तेलकट तुपकट वास असलेला साडीचा बोळा सांगतो, ‘आज खूप कष्ट पडलेत नेसणारीला’. गार वारा झोंबू नये म्हणून तनुला लपेटून घेणारी शाल वृद्धत्वातली शालीनता परिधान करते. मऊ मऊ रजई सांगते, ‘आला हिवाळा.’
माझं नवीन लग्न झाल्यानंतरची एक गोष्ट आठवते, माझ्या सासूबाई नऊवारी लुगडं नेसायच्या. कधी ते धुण्याची वेळ माझ्यावर आली तर माझी फारच तारांबळ उडायची. साफ झटकून वाळत घालता यायचंच नाही. मला, नव्या नवरीला या गोष्टीचं खूप टेन्शन यायचं. वाटायचं, या अवघड पातळासारख्याच सासूबाई असतील का?
माझे वडील चौकटीच्या जाड कापडाची लुंगी घालत असत आणि नेसून कंटाळा आला की ती जुनी व्हायच्या आधीच टाकून देत असत. आई काटकसरी होती. ती त्या लुंगीचे तुकडे कापून उशाला अभ्रे शिवी. लहानपणी ती उशी डोक्याखाली घेतली की वडिलांच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलोय, असं वाटायचं.
शाळेचा गणवेश घालून शाळेत जाणारं पोरगं मला बिचारं बिचारं वाटतं. आईला सोडून, दप्तराचं ओझं घेऊन बाहेर पडलं की कोकरासारखं वाटतं.
वस्त्रावरून माणसं ओळखायची आता जणू सवयच जडली. खूप गोष्टींचा ‘मग’ उलगडा होत गेला. साधी माणसं साधीच वस्त्र घालतात. नखरेल स्त्रियांचे ब्लाऊजपण नखरेल असतात. गोंडे, जरीची लेस, घुंगरू वगैरे लावून आपला नखरेलपणा प्रदर्शित करतात. अर्धवट देह उघडा टाकणारी तरुणी, पाश्चात्त्यांची अंधानुकरण करणारी तरुणी मला नास्तिक वाटते. ही कधीच देवाला हात जोडत नसेल अशी उगीचच शंका येते.
माझ्या नवऱ्याला सणावारी रेशमी सोवळं नेसून पूजा करायला फार आवडतं. ते आवर्जून सणाला असं सोवळं नेसतात. सोवळं किंवा कद नेसलेली त्यांची मूर्ती घरातल्या सर्वानाच प्रसन्न करते. पितळेचे देव जणू चांदीचे बनतात, लाकडी देव्हारा चंदनी बनतो, साधीसुधी फुलं पण कमलपुष्पासारखी सुंदर दिसतात. वातावरण मंगलमय आणि सुगंधी बनतं. नक्कीच देवसुद्धा प्रसन्न होत असतील, असं वाटून देवाला हात जोडले जातात. हा असा सगळा सोवळं नेसल्याचा परिणाम! ही अशीच पूजा कधी मुलानं टॉवेल (धुतलेला का असेना) गुंडाळून केली तर ती करायची म्हणून करतो की काय असा भास होतो. आमच्याकडे देवाला दर पाडवा आणि दर दसऱ्याला नवीन वस्त्रे घालतात. देवपण वाट पाहत असतील या दिवसांची!
साध्या हातरुमालाची गोष्ट घ्या! कितीतरी प्रेमकहाण्या जुळल्या आहेत या रुमालावरून रुमाल स्वत: विणणं, त्यावर प्रिय व्यक्तीची आद्याक्षरं भरतकाम करून सजवणं, आपल्या नाजूक हातानं तो प्रियकराला देणं, वा वा किती रोमँटिकपणा करतो हा छोटा रूमाल!
आपल्या वस्त्रावर आपलं खूप प्रेम असतं. आपण वापरत असलेल्या चादरीवर, टॉवेलवर पण आपलं प्रेम असतं. माझी बहीण तिची चादर कुणी घेतली की खूप संतापायची. जणू समोरच्यानं खूप मोठा गुन्हा केलाय! ती देवाघरी गेली तेव्हा तीच चादर पांघरून गेली.
नवऱ्यानं घेतलेली पहिली साडी, मुलाच्या पहिल्या पगाराची साडी, आईची आठवण म्हणून जपलेली साडी, बाळाचा पहिला स्वेटर, लग्नातला सूट, अभिनयाचं कौशल्य दाखवण्यासाठी हळूच बाजूला झालेला स्टेजचा रेशमी पडदा, प्राण द्यावेत असं देशभक्तांना वाटणारा तिरंगा झेंडा! अशा किती तरी अगणित गोष्टी वस्त्रांबरोबर लगडल्या आहेत.
‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’, ‘फाटक्या वस्त्राला ठिगळं’, ‘वेष असे बावळा, परी अंतरी नाना कळा’, ‘सुखी माणसाचा सदरा’, ‘एकनूर आदमी दसनूर कपडा’ अशा किती तरी म्हणी माणसाच्या मनाजवळ जाणाऱ्या आहेत.
काश्मीरहून आईला मी साधीच शाल आणली, फारशी महाग नव्हती पण काश्मीरची आणि लेकीनं आणलेली म्हणून आईला तिचं फार कौतुक होतं. हसून म्हणायची, ‘किती थंडी असली तरी ही एकटी शाल मला पुरेशी होते’ यालाच म्हणत असतील का मायेची ऊब!
मानवी आयुष्याचा वस्त्रांबरोबर चालणारा हा भावनिक प्रवास! प्रत्येक टप्प्यावर नवे साक्षात्कार घडवणारा! नातेसंबंध जोडणारा, नको तेवढा स्मरणीय तर कधी नकळत अविस्मरणीय! पूर्वीचा आदिमानव कसा जगत होता कोण जाणे वस्त्राशिवाय? वस्त्र वापरत नव्हता म्हणूनच तेव्हा तो रानटी असावा. पुढे मानवाची आणि वस्त्रांचीही प्रगती होत गेली.
नववधूची वराशी लग्नात पक्की बांधली जाते ती वस्त्रगाठच! तशीच आपल्या आयुष्याची आणि वस्त्राचीही गाठ बांधलेली आहे. वस्त्राची ही साथ जन्मभराची असते. चितेवर देह जळताना आधी अंगावर आग घेतात ती आपली वस्त्रच असतात! नंतर आपला देह जळतो. पुन्हा पुनर्जन्माची नवी वस्र धारण करण्यासाठी! जन्ममृत्यू म्हणजे वस्त्रे बदलणे, याचा अर्थ मला आता खऱ्या अर्थानं समजला.
संग्रहित लेख, दिनांक 4th Jan 2014 रोजी प्रकाशित
धागा विणतो नाती
माझ्या नव्या सुनेला शेजारी घेऊन गेले आणि घरी आल्यावर स्वभावानुसार यांनी टिप्पणी केलीच, ‘काय नव्या सुनेला दाखवायला गेली होतीस की काय?

First published on: 04-01-2014 at 06:36 IST
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: My blog thread waves relationship