डॉ. ऊर्जिता कुलकर्णी

एखादी व्यक्ती आवडायला लागणे, त्यातून त्या व्यक्तीच्या गुण-दोषांसह, कोणत्याही तक्रारीशिवाय, तिला सातत्याने स्वीकारून पुढे चालत राहणे ही प्रेमाची आदर्श संकल्पना! प्रत्यक्षात मात्र तिचे जरासे परिकल्पनेसारखे उदात्तीकरण केल्यामुळे समस्या निर्माण होतात. व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्वीकारावे हे नक्कीच, परंतु त्याविषयी तक्रार करू नये, किंवा ‘ब्र’ही काढू नये, हे मात्र व्यावहारिक जगात शक्यच नाही!

प्रेम हा शब्द नुसता उच्चारला तरीही, कोणाच्याही चेहऱ्यावर आपसूक हसू उमटेल, तेही अगदी मनापासून! इतकी काय जादू आहे या शब्दाची? या एका शब्दाचं व्यापकत्व इतकं आहे, की यातून कुठल्याही नात्याची सुटकाच नाही किंबहुना नात्याची वीण घट्ट असण्यासाठी नितांत आवश्यक असणारी गोष्ट म्हणजे प्रेम!

प्रेमाची नेमकी व्याख्या करणं अवघड असेल, तरीही, एखाद्याविषयी प्रेम आहे म्हणजे, त्याच्याविषयी काळजी, माया, जिव्हाळा, स्नेह आणि आदर हे सगळंच त्यात अंतर्भूत आहे; म्हणण्यापेक्षा अपेक्षित आहे. इथे व्यक्ती आणि आजुबाजूच्या इतर निर्जीव, सजीव बाबी या सगळ्यांसाठी हेच आवश्यक तंत्र! एक विचित्र तितकाच सार्वत्रिक त्रिकालाबाधित निष्कर्ष, किंवा पाहणी म्हणजे, नात्यांची सुरुवातही प्रेमामुळे होते आणि शेवटही. आता इथे वरवरचे नातेसंबंध किंवा औपचारिक, व्यावसायिक नाती ही अर्थातच यातून वगळली जातील. तिथे या ‘अशा’ प्रेमाला जागाच नाही, किंवा त्याच्या असण्यानेच ही नाती उगाच क्लिष्ट होऊन जातात.

प्रेमाच्या बऱ्याशा छटा असतील, पण मूळ भावनेत बदल होत नाही. उदा. नुकतेच जन्माला आलेल्या बाळाचे आणि त्याचे आई-वडील यांच्यातले त्याक्षणी निर्माण होणारे प्रेम, याचे समीकरण, दत्तक मूल आणि त्याचे आई-वडील यांच्यातही तसेच असते, कदाचित काही काळ गेल्यानंतर ते विकसित होत असेल, परंतु प्रेमात प्रेमाच्या भावनेत बदल होत नाही. दोन व्यक्तींमधील सोबत राहताना असणारे प्रेम, सहवासाने निर्माण होणारे प्रेम, जोडीदाराबाबत असणारे प्रेम, भावंडांमधील प्रेम, स्नेही आणि आपल्यात असणारा जिव्हाळा, हेसुद्धा प्रेमच! प्रेम या शब्दाच्या इतर संकल्पनादेखील आहेत, परंतु एकाच लेखात ते सर्व काही मांडता येणे अशक्यच!

एखादी व्यक्ती आवडायला लागणे, त्यातून त्या व्यक्तीच्या गुण-दोषांसह, कोणत्याही तक्रारीशिवाय, तिला सातत्याने स्वीकारून पुढे चालत राहणे ही प्रेमाची आदर्श संकल्पना. प्रत्यक्षात मात्र तिचे जरासे परिकल्पनेसारखे उदात्तीकरण केल्यामुळे समस्या निर्माण होतात. व्यक्तीला तिच्या गुणदोषांसह स्वीकारावे हे नक्कीच, परंतु त्याविषयी तक्रार करू नये, किंवा ‘ब्र’ही काढू नये, हे मात्र व्यावहारिक जगात शक्यच नाही. त्या व्यक्तीबद्दल जे पटत नाही, आवडत नाही, सहन करता येत नाही, यापैकी काहीही; ते त्या व्यक्तीशी स्पष्ट बोलणे उत्तम. त्यातून दोन बाबी घडतात. एक म्हणजे, समोरच्या व्यक्तीला त्यात कुठे आणि कसा बदल करायला हवा हे स्पष्ट होते. आणि दुसरे, ती व्यक्ती प्रामाणिकपणे काय आणि कशात बदल करू शकत नाही हे आपल्याला स्पष्ट होते. यातून उगाच ठेवलेल्या अपेक्षा, न बोलल्यामुळे होणारे गैरसमज, आणि मुळात कोणा एकाचा अथवा दोघांचाही कोंडमारा होण्याचे टळते. शिवाय समोर आलेली उत्तरे त्या नात्यातल्या प्रत्येक व्यक्तीला मान्य आहेत की नाहीत हेही ज्याचे त्याला ठरवता येते.

‘प्रेम’ म्हटल्यावर दुसरे उदात्तीकरण त्यागाबाबत. प्रेम आहे म्हणजे त्यात त्याग असलाच पाहिजे याचेही स्तोम आजही कित्येकांच्या संकल्पनेत आहे. त्यातून आपणच आपली फसवणूक केल्यासारखी परिस्थिती कित्येकदा निर्माण होते. त्यामुळे आपण इतरांसाठी जे काही करतोय ते त्यांच्यापर्यंत पोचतंय का? हे पाहणेही महत्त्वाचेच. तसं नसेल तर आपण त्याची वेळोवेळी जाणीव करून देऊ शकतो. यातून आपल्या मनावर अचानक होणारे आघात टाळता येतील. उदा. पूर्वी मोठय़ा कुटुंबातल्या थोरल्या भावंडांना कित्येकदा आपले शिक्षण अर्धवट सोडून लहान भावंडांची पालन-पोषणाची जबाबदारी घ्यावी लागायची. परंतु ते बऱ्याचदा कर्तव्यभावना किंवा त्यागातून केले जायचे. त्याची जाणीव पुढील आयुष्यात इतर भावंडांना असेल तर उत्तमच; नाहीतर मनात कुढत राहणे, किंवा पश्चात्ताप करण्याखेरीज हातात काहीच उरत नाही.

आजही कित्येक घरात उत्तम शिक्षण असेल तरीही स्त्रिया आपले घर हीच गोष्ट केंद्रस्थानी ठेवणे पसंत करतात. ते स्वत:ला वाटते म्हणून, निवडीतून झाले असेल तर सुखदायीच ठरते. परंतु, स्वत:चे उत्तम भवितव्य बाजूला सारून केवळ त्याग किंवा कर्तव्य या भावनेने केले असेल, आणि त्याविषयी कशाला बोलायचे म्हणून सतत स्वत:चंच मन कायम दोलायमन स्थितीत राहत असेल, तर मात्र ती व्यक्ती आनंदी राहू शकत नाही. त्यातूनही, अशी बरीच वर्षे खर्च झाल्यानंतर, ‘तुला कोणी सांगितलं होतं असा निर्णय घ्यायला? तूच घेतलास!’ हे ऐकायला मिळाले तर मात्र, बऱ्याच स्त्रिया उन्मळून पडतात. त्यामुळे त्याग वगरे शब्दांमध्ये आपण अडकलो नाही तरच उत्तम.

प्रेमाकडेही इतर भावनांइतकेच तटस्थपणे पाहिले तर? तर आपल्याला यात पडणाऱ्या कित्येक प्रश्नांची उत्तरं सहज शोधता येतील. त्याआधी प्रेमाची जनमानसात असणारी व्याख्या बघूयात. आपल्या कुटुंबातील, महितीतील, नात्यातील व्यक्तींसाठी आपसूक येणारी ही भावना सोडल्यास, वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर खुणावणारे प्रेम कसे असते? कोवळ्या वयात, किंवा वयात येताना एखाद्या व्यक्तीचा एखादा गुण किंवा कला आवडते, जसं की एखाद्याचा छान आवाज किंवा कोणाचं खेळातलं उत्तम प्रावीण्य किंवा त्याचं दिसणं भावतं, म्हणजे आपलं त्या व्यक्तीवर प्रेम बसलंय हे वाटणं साहजिकच. आयुष्यात बरेच पुढे आल्यानंतर खरे तर ‘प्रेम’ आणि ‘निखळ आवड’ या दोन्हीतला फरक स्पष्ट व्हायला लागतो.

आणखी एक गोष्ट, प्रेम म्हणजे सवय, किंवा व्यसन नव्हे. एखाद्या व्यक्तीचा सततचा आवडणारा सहवास, त्याची होणारी सवय, म्हणजे प्रेम नक्कीच नाही. हे बऱ्याचदा एकतर्फी प्रेमात दिसून येतं. असं असलं तरीही सहवासातून फुलणारं प्रेम हे नक्कीच परिपक्व, त्यातल्या त्यात थोडसं डोळस म्हणावं असं असतं. कारण यात जास्त मोकळेपणा असतो.

आपण सगळेच ‘या’ विशिष्ट प्रेमाच्या, प्रत्येक वळणावर भेटण्याकडे डोळे लावून बसलेले असतो. ते मिळतेही, पण पुढे टिकत नाही, इतके ते क्षणिक असते का? वर म्हटल्याप्रमाणे त्याच्याकडे डोळसपणे पाहिले तर याचे उत्तर ‘नाही’ असे द्यावे लागेल. कारण प्रेम जर कालानुरूप योग्य प्रकारे हाताळलं गेलं, तर ते क्षणिक राहूच शकत नाही.

एकंदरीत नात्यांमधलं प्रेम पुसट होत जाण्याची, न टिकण्याची साधी कारणे बघू या.

*  प्रेमाच्या अवास्तव कल्पनेतून तयार झालेल्या कल्पनाविश्वाची आणि व्यावहारिक जगाची कुठेच सांगड घालता आली नाही, की ‘प्रेम ही संकल्पनाच अस्तित्वात नाही, किंवा ते निष्फळ आहे’ असे वाटू शकते. त्यातून प्रेमाबाबत उदासीनता येऊन, कालांतराने ते पुसट होते किंवा संपून जाते.

*  प्रेम आणि अपेक्षा यातून तयार होणारे मतभेद. यातही अपेक्षांच्या बाबत स्वत:विषयी किंवा इतरांना आपल्याविषयी असणाऱ्या अपेक्षांविषयी अनभिज्ञ असणे हा त्यातला गाभा आहे.

*  प्रेम हातातून निसटून जाऊ नये, थोडक्यात त्या व्यक्तीने आपल्याकडे पाठ फिरवू नये, म्हणून जाणीवपूर्वक घेतल्या जाणाऱ्या अवास्तव आणा-भाका किंवा वेगवेगळ्या गोष्टींबाबत बांधिलकीची दर्शवलेली तयारी.

* याचबरोबर ‘प्रेम आहे म्हणजे मी अमुक एक सहन करायलाच हवं’, या भावनेतून होत असलेला कोंडमारा.

*  सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘प्रेम म्हणजे मालकी हक्क’ हा विचार. यातून आपल्या सोबतच्या व्यक्तीभोवती मानसिक कुंपण बांधणे, त्या व्यक्तीचे व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेणे हे फारच मारक.

* प्रेमात व्यक्तीच्या आवडी-निवडी, मते, विचार, धारणा सगळेच गृहीत धरून पुढे चालत राहण्याची वृत्ती.

*  प्रेम टिकवण्यासाठी किंवा ज्या व्यक्तीवर प्रेम आहे, तिला न दुखवण्यासाठी म्हणून काही बाबी, घटना, त्या विशिष्ट नात्यात चालणार नाहीत, आवडणार नाहीत, म्हणून गोष्टी लपविणे, दडविणे. आजूबाजूला हे कोणत्याही नात्यात सहज बघायला मिळते. दडवण्यातून सुरुवात होऊन, सतत उलट-सुलट किंवा खरेपणाने न वागता, हळूहळू कावेबाजपणाने वागत राहणे, यातून प्रेमाची मूळ कल्पना नाहीशी होऊन त्या जागी केवळ याच गोष्टी वाढीस लागतात. त्या नात्याचा ताण तयार व्हायला लागतो आणि आपण आपसूक अशा व्यक्ती, नाती टाळतो!

हे झाले सर्व प्रकारच्या नात्यातल्या प्रेमाविषयी काही घटक. आता जोडीदार म्हणून राहताना, प्रेमाचे सुरुवातीचे मंतरलेले दिवस तसेच राहावे असे वाटत असेल, तर काही बाबी नेहमी पडताळून बघणे गरजेचे आहे. त्यात ढिलाई झाली तर मात्र नात्याला वेगळे स्वरूप येऊ शकते. यात घट्ट मत्र असणारे, लिव-इन मध्ये राहणारे, किंवा लग्न करून राहणारी जोडपी हे सगळेच आले.

ज्या अर्थी आधी कौतुक करणारी व्यक्ती आपल्याविषयी, आपल्या वागण्यातलं काहीतरी खटकतंय म्हणून काही बदल सुचवते, ते सतत सांगते तर त्याकडे आपण दुर्लक्ष न करता जरूर विचार करायला हवा. कारण कदाचित ती व्यक्ती आपल्याला अंतर्बाह्य़ ओळखून आपल्यावर प्रेम करणारी असते.

*  आपल्यामुळे समोरची व्यक्ती वारंवार दुखावली जात असेल, तर काहीच घडले नाही असे भासवून पुढे चालत राहणे, म्हणजे छोटय़ा जखमेचे रूपांतर मोठय़ा सतत ठसठसणाऱ्या  जखमेत करण्यासारखे आहे.

*  वागताना आपण आत्मकेंद्री, स्वार्थी होतोय का हेही तपासलेले उत्तम. बऱ्याचदा आपल्या आसपास सतत असणारं माणूस सवयीचं झालं की हा धोका असतो.

*  ‘प्रेम आहे’ म्हणताना ते प्रेम आणि आपल्या जोडीदाराच्या काही गरजा किती महत्त्वाच्या आहेत हे जर आपण मनात सतत जिवंत ठेवू शकलो, तर गैरसमज, किंवा दुर्लक्षित केल्याची भावना या गोष्टींचे अडथळे येत नाहीत.

*  सतत सोबत राहताना, एक न टाळता येण्यासारखी बाब, म्हणजे एकमेकांच्या दोषांची उजळणी! परंतु त्यातही, ती आपण कशा प्रकारे करतोय, त्याने समोरच्यावर काय परिणाम होतोय हेही लक्षात घ्यायला हवे.

*  सुरुवातीला ज्या पद्धतीने, व्यक्तीविषयी काय आवडते, काय भावते हे सतत वेगवेगळ्या पद्धतीने संगितले जाते, ते अचानक बंदच झाले, किंवा समोरून विचारणा होऊनही जोडीदाराला त्याबाबत फार काही स्वारस्य दिसलं नाही, तर संभ्रम निर्माण होतो. हे सतत घडायला लागले, की ‘जोडीदारचे आता आपल्यावर प्रेम नाही’, हे मनात अधोरेखित केले जाते. उदा. एखादी कला, काम याविषयीची प्रशंसा, चालण्या-बोलण्यातील विशिष्ट ढब, लकब याचे केलेलं कौतुक, आणि नंतर याचबाबतीत आलेली उदासीनता.

बऱ्याचदा आधी असणारी समीकरणे बदलल्यामुळेही काही जोडीदार गोंधळून जातात आणि मग ‘आपल्यात प्रेम आहे का’ हा प्रश्न पडण्यास सुरुवात होते. जसे की, आधी वारंवार होणारी भेटीसाठीची विचारणा, त्यासाठी थांबून राहणे, किंवा तुम्ही ‘नाही’ म्हणालात तरीही आग्रह करून भेटायला बोलावणे, किंवा स्वत: येणे. तुमच्या कामाविषयी समजून घेऊन त्याविषयी तक्रार न करणे. तुमच्याविषयी चुकूनही काहीही मनाला लागेल असे न बोलणे, बोलताना आदर बाळगणे, यात अचानक संपूर्ण बदल झाला, तर केवळ या वागण्यामुळे जवळ आलेला जोडीदार नक्कीच विचारात पडतो. हे सगळे वागणे तुम्हाला तुमचा जोडीदार हवा आहे किंवा त्याच्याविषयी तुम्हाला आदर आहे हे दर्शविणारे असते. तेही सतत, कोणत्याही प्रसंगी! अशा वेळेस आपसूक त्या जोडीदाराविषयी, त्याच्या वागणुकीविषयी विश्वास वाटायला सुरुवात होते. परंतु कालानुरूप हेच टिकले नाही, किंवा अगदी क्षणार्धात बदलावे तसे बदलले, सांगूनही यात बदल झाला नाही, तर नक्कीच प्रेमाबाबत शंका येऊ शकते.

आपल्या अपेक्षा, इच्छा याविषयी कोडय़ात न टाकता स्पष्ट बोलावे. आवडत नसलेल्या गोष्टी न दुखवता सांगाव्यात, पण हे सातत्याने करूनसुद्धा, जर त्याच प्रकारची वागणूक घडत असेल, तर चिडचिड होणे, राग येणे स्वाभाविक आहे. अशावेळेस जोडीदारकडून त्याचे वागणे सुधारण्याऐवजी, केवळ प्रतिक्रियांवर बोट ठेवले जात असेल तर ‘असे का?’ हे वेळीच समजून घेतलेले उत्तम.

*  जो नियम प्रेमात मी माझ्यासाठी ठेवलाय, तोच जोडीदारासाठी आहे का? यावर सतत स्वतला विचारणा करत राहावी. यातून बचावात्मक वृत्ती, किंवा घडलेल्या बाबींवर दुसऱ्या व्यक्तीवर बोट ठेवून पांघरुण घालण्याच्या स्वभावाला आळा बसतो.

*  प्रेमात अत्यंत मारक गोष्ट म्हणजे, समजून घेणाऱ्या जोडीदाराला सारखे त्याच भूमिकेत ठेवणे. त्यातून एकाच व्यक्तीवर प्रचंड ताण निर्माण होऊ शकतो.

*  मुळात आपण आणि जोडीदार ही एक घट्ट ‘टीम’ असते. त्यात कोणतीही इतर व्यक्ती, किती महत्त्वाची अथवा ती नात्याला किती मारक, हा विचार आपण प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. अर्थात, व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा न येऊ देता.

*  प्रेम पुसट होण्यामागे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे, जोडीदाराचा हवा तसा सहभाग किंवा पाठिंबा न मिळणे.

*  एकमेकांमधील सतत डोके वर काढणारा ‘अहं’सुद्धा बऱ्याचदा गरजेचा नसतोच. पण प्रेम असलेली व्यक्ती एकदा आपल्या मालकी हक्काची आहे असं वाटू लागलं, की तिथे याच्यामुळेच कित्येक प्रश्न निर्माण होऊ लागतात.

*  प्रेमाच्या बाबत जोडीदारच काय, पण इतर कोणत्याही नात्यात, माणूस म्हणून आपण जितक्या मनमोकळ्या पद्धतीने स्वत:चा, इतरांचा विचार करू, तितके ते नाते अगम्य न राहता, अत्यंत समृद्ध प्रवासासारखे होते. कारण प्रेम म्हणजे एकमेकांसोबत राहून आनंदाने, भरपूर जगणे! आणि हे अवघड नक्कीच नाही.!

urjita.kulkarni@gmail.com

chaturang@expressindia.com