डॉ. ऊर्जिता कुलकर्णी
नात्यांविषयी विचार करताना समोरच्या माणसांकडून येणाऱ्या प्रतिसादांचा, प्रतिक्रियांचा सखोल विचार होणे गरजेचे आहे. कारण यांचा अगदी थेट संबंध वैयक्तिक आनंद, समाधान आणि पर्यायाने नात्यात ओतावीशी वाटणारी ऊर्जा, त्यात वाटणारा रस या सगळ्याशीच आहे. कशी द्यावी प्रतिक्रिया दुसऱ्याला न दुखावता आणि तरीही आपला हेतू साध्य करणारी?
‘‘काय उत्तर द्यायचं व्हाट्सअॅपवर डॉक्टर? मी कितीतरी वेळा हिला सांगितलंय की उत्तर म्हणून ‘ङ’ नको पाठवत जाऊस, त्यातून तुला अजिबातच पुढे बोलायचं नाहीये असं वाटतं.’’ माझ्या समोर बसलेल्या जोडगोळीपैकी ‘तो’ त्याची बाजू मांडत होता. विचार करायचा झाला तर अगदीच निरुपद्रवी वाटावं असं हे ‘ङ’अक्षर, पण एखाद्या वेळेस समोरच्या अगदी जवळच्या किंवा माहीत असलेल्या व्यक्तीकडून प्रतिसादादाखल, किंवा आपण जे बोलतोय त्यावर प्रतिक्रिया म्हणून वाचावं लागलं तर ते अक्षरश: अंगावर कोसळल्याची भावना कित्येकांनी अनुभवली असेल.
तर आजचा मुद्दा, प्रतिक्रिया आणि प्रतिसाद! जवळ जवळ सारख्या वाटणाऱ्या दोन्ही पूर्ण भिन्न बाबी, तरीही एकमेकांमध्ये अंतर्भूत असलेल्याच. एक साधा विचार करू या. आपल्याला कशा प्रतिक्रिया आवडतात? तसेच कशा प्रकारे प्रतिसाद मिळालेला आवडतो? याचं एक सरळ उत्तर म्हणजे ‘छान’! आता या ‘छान’मध्ये नक्की काय येत असावं बरं? छान म्हणजे सकारात्मक किंवा प्रोत्साहन मिळेल या पद्धतीने, ऐकल्यानंतर मिळाल्यानंतर आपण आनंदी होऊ अशा. पण याही पुढे जाऊन काही प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद विचार करायला लावणारे या गटातही येतात. किंवा काही म्हणजे केवळ, त्याकडे तटस्थपणे पाहून सोडून द्यावेत असेही. काही नकोशा, मनाला चटका लावणाऱ्या, त्रासदायक किंवा चीड आणणाऱ्याही असतात.
या सगळ्याच यादीत, वैयक्तिक आपल्याला जर, ‘छानच’ प्रतिक्रिया, प्रतिसाद आवडत असतील, तर त्याची दुसरी बाजू, म्हणजे इतरांचेही तसेच असणार किंवा आहे, हे डोक्यात घट्ट टाकून ठेवू या. आता यातली एक गंमत अशी, की एखाद्या वेळेस, काही व्यक्तींना अशा प्रतिक्रिया देताना, ‘‘मला यात काही वावगं वाटत नाही किंवा यात काय?’’ असं वाटू शकतं, तर त्याच वेळेस त्याच्या दुसऱ्या बाजूला असणाऱ्या व्यक्तीसाठी मात्र हे असंच असेल असं नाही.
असाच दुसरा सोपा प्रश्न म्हणजे, हे एकांगी असू शकेल का? उदा. एखादं नाटक, चित्रपट बघितल्यानंतर त्याविषयी जे सांगायचंय, तिथे कमीत कमी ते ऐकणारे आणि त्यावर चर्चा करणारे तरी कोणीतरी लागतेच, अगदी सोशल मीडियावरसुद्धा नाही का? म्हणजेच प्रतिक्रिया, प्रतिसाद यांच्या दोन टोकाला दोन प्रवृत्ती हे तर नक्कीच. मग त्या प्रवृत्ती, मानसिकता समसमान, थोडय़ाफार सारख्या, अगदीच भिन्न, अशा कुठल्याही असू शकतील. काही बोलके प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया बघू या-
खूप कष्टपूर्वक वजन कमी केलेल्या व्यक्तीने विचारावे की ‘काय? मस्त फरक पडलाय ना माझ्यात?’ आणि समोरून उत्तरादाखल, कुत्सित हसणं यावं किंवा टर उडवली जावी, तर विचारणारी व्यक्ती नुसतीच खट्ट होत नाही, तर कदाचित आपल्या प्रयत्नांकडेच साशंकतेने पाहायला लागते.
संवाद ही मुळातच महत्त्वाची भावनिक गरज असलेल्या व्यक्तीची एखाद्या जात्याच अबोल व्यक्तीशी गाठ पडली, आणि तिथे प्रतिक्रियेदाखल, ‘‘ हं.. बरोबर.. ठीकच.. चालेल.. नको.. कदाचित.. बघू..’’ अशी तुटक उत्तरे म्हणजे, बोलणाऱ्या व्यक्तीसाठी शिक्षाच नाही का?
एखादे महत्त्वाचे काम किंवा अभ्यास, किंवा काहीही जीव ओतून केले आणि पलीकडून केवळ ‘काही चांगलं नाहीये किंवा सुधारणेला भरपूर वाव आहे किंवा सगळंच चुकलंय,’ असं काहीसं आलं, तर त्यासाठी झिजणाऱ्या व्यक्तीला त्यात रस न उरणं स्वाभाविकच. हे बऱ्याचदा बॉस आणि त्यानंतरची असणारी फळी यांच्यात किंवा पालक, शिक्षक आणि मुलं यांच्यात सहज दिसतं.
नात्यांविषयी विचार करताना या सगळ्या प्रतिसादांचा, प्रतिक्रियांचा सखोल विचार होणं गरजेचं आहे. कारण यांचा अगदी थेट संबंध वैयक्तिक आनंद, समाधान आणि पर्यायाने नात्यात ओतावीशी वाटणारी ऊर्जा, त्यात वाटणारा रस या सगळ्याशीच आहे. त्यातही सातत्याने तेच ते होत राहिल्यास, काही निष्कर्ष सहज काढले जातात. इतकंच नव्हे तर तीच सत्य परिस्थिती आहे हे आपलंच मन आपल्याला बजावून सांगायला लागतं.
-‘‘काहीही केलं तरीही माझ्या घरची मंडळी माझ्याबाबत कधीही समाधानी असणारच नाहीत.’’
-‘‘नवीन काम बघायला हवंय, आताच्या कामात कंटाळा येतो, कारण कितीही आणि कसाही बदल केला तरीही इथे माझी किंमत कोणालाच नाही.’’
-‘‘माझं म्हणणं नेहमीप्रमाणेच कानाआड होणार आहे, कशाला बोला.’’
-‘‘या चच्रेला काही अर्थच नाही, यातून केवळ भांडणं होतील, मला ती वादावादी, मतभेद नकोसे झालेत. त्यापेक्षा गप्प बसणं उत्तम.!’’
ही काही त्यातून निघणाऱ्या ठाम निष्कर्षांची उदाहरणं.
प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देताना आपण काही बाबींचा आपसूक विचार करतो. त्या बाबी म्हणजे या व्यक्तीचं आणि माझं नातं काय? एकमेकांशी निगडित हुद्दा, सामाजिक स्तर काय? म्हणूनच फार काळ एकत्र असणारी, एकत्र काम करणारी माणसं एकमेकांशी बोलताना, बोथट होऊन जातात. सुरुवातीचा मुलामा गळून पडतो आणि केवळ रुक्ष शब्दांची, भावनांची देवाणघेवाण असं स्वरूप होऊन जातं. त्यात एकमेकांना ओळखतोय हे एक गृहीतक होऊन जातं. किंवा पहिली भीड चेपली आहे, आता हवं तसं बोलायला हरकत नाही हे ही होते. त्यातही आपल्याकडे अजूनही ‘हाताखाली’ काम करणाऱ्या सर्वच व्यक्तींची यामुळे पिळवणूक होताना सर्रास दिसते. नाही का?
इथे आता एक मुद्दा प्रकर्षांने उपस्थित होईल, तो म्हणजे, ‘‘नुसतंच छान छान म्हणून कसं भागेल? प्रामाणिक प्रतिक्रिया द्यायला नको का? त्याशिवाय बदल कसा घडणार?’’ संपूर्ण मान्य! पण आपण सगळेच एक महत्त्वाचं विसरून जातो, की ते देण्याची पद्धत काय आहे, किंवा असावी? अगदी साधं उदाहरण सांगता येईल. जेवणात मीठ कमी पडलं तर , ‘मीठ कमी आहे.’ अशा शब्दांनी सुरुवात करण्याऐवजी ‘‘नीट झालंय सगळंच, पण थोडंसं मीठ कमी आहे इतकंच.’’ यानेही तेच पोचेल जे सांगायचंय. हेच एकंदरीत कार्यालयीन किंवा इतर घरगुती कामाबाबत, वागण्याबाबत, किंवा घडलेल्या घटनांबाबत. तिथे हेच पथ्य पाळलं तर? आता इथे दुसरा मुद्दा असाही येईल की, कार्यालयीन कामाबाबत प्रत्येक वेळेसच हे शक्य नाही, तिथे वेळा पाळणं आत्यंतिक गरजेचं असतं, त्याहीपेक्षा जास्त जे काम जसं ज्या पद्धतीने हवं तसंच होणं अपेक्षित असतं. तिथे असं सगळ्यांच्या मनाचा विचार करत बसणं केवळ अशक्यच! ठीकच, शंभर टक्के बरोबर. परंतु कदाचित त्याचमुळे आपण सगळेच सतत विशिष्ट तणावाखाली राहतोय किंवा काहीतरी कमतरता असल्याची सतत जाणीव ठेवून जगतोय का? अर्थात हा केवळ त्यातला एक मुद्दा! यावर लिहायचं म्हणजे बरंच सखोल लिहावं लागेल. पण तरीही अशाही ठिकाणी चांगल्या प्रतिक्रिया देणं हे संपूर्णपणे नाकारता येणारच नाही किंवा कदाचित त्यातून जास्त चांगल्या प्रकारे काम होऊ शकेल.
आता प्रतिक्रियांच्या दुसऱ्या टोकाचा विचार करू या.
एकंदरीत प्रतिक्रिया आणि प्रतिसाद आपण कसे घेतो? हा खूपच महत्त्वाचा मुद्दा. माणूस म्हणून आपल्या सगळ्यांचीच एक निकड असते ती म्हणजे आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणावं, कौतुक करावं, किंवा सतत आपलंच काहीतरी चुकतंय, आपल्यात बरीच वैगुण्य आहेत याची जाणीव करून देऊ नये, वाईट वाटेल असं बोलू नये, वागू नये. याची सुरुवात खरे तर आपलीच आपल्यापाशी होते! म्हणजे आपले स्वत:विषयी असलेले सारासार विचार करून, आत्मभान जपत तयार झालेलं मत. असं मत खूपच डोळस असतं आणि ते मिळणाऱ्या प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद यांना सहसा बळी पडत नाही. त्यामुळे कोणाशीही कोणत्याही प्रकारे असलेलं नातं या प्रतिक्रिया, प्रतिसाद याभोवती घोटाळत रहातच नाही. अशा वेळेस आपल्याला क्षणिक आनंद, दु:ख, वाईट वाटणं, हिरमोड होणं, प्रोत्साहन मिळणं, उत्साही वाटणं इत्यादी सगळ्या भावना नक्कीच येतात, परंतु सतत त्याचाच विचार हे घडत नाही. कारण इथे मिळणाऱ्या प्रत्येक प्रतिक्रिया, प्रतिसादाला एक वैयक्तिक मत, किंवा टिप्पणी असंही पाहता येतं. शिवाय कदाचित वागताना किंवा कामात कदाचित आपल्याकडून काहीतरी अपुरं राहिलेलं असू शकतं त्यावर काम करणं गरजेचं आहे हेही लक्षात घेऊन आपण त्यावर काम करू शकतो. इथे आपण या प्रतिक्रिया आणि प्रतिसाद या जाळ्यात म्हटलं तर अजिबातच अडकत नाही, परंतु त्या मोलाच्या समजून त्याकडे पाहू शकतो. हे करणं अवघड आहे का? अजिबातच नाही. आयुष्यातला एक मोठ्ठा खेळ कायमचा काढून टाकला तर अगदी सहज साध्य असंच हे आहे. ‘‘समोरून ही अशी प्रतिक्रिया, प्रतिसाद आलाय तर आता मी अमुक तमुक पद्धतीने त्याला उलटा प्रतिसाद किंवा प्रतिक्रिया देईन.!’’ हाच तो खेळ. यात खूप जास्त मानसिक ऊर्जा खर्च होते, शिवाय जे चालू आहे, जे महत्त्वाचं आहे, आणि त्याही पेक्षा व्यक्ती, नातं या साऱ्यांपेक्षा मग ती प्रतिक्रिया, प्रतिसाद हेच महत्त्वाचं वाटायला लागतं.
याला लागून असलेला दुसरा पलू म्हणजे, प्रत्येकच प्रतिसाद, प्रतिक्रिया म्हणजे त्या व्यक्तीचं एकंदरीत वागणं, किंवा स्वभाव असं न गृहीत धरता ते त्या वेळेपुरतं ठेवलं तर उत्तम.
आपल्या कुटुंबातील व्यक्ती, स्नेही, आणि इतर संपर्कातील व्यक्ती, यांची साधारण स्वभाव वैशिष्टय़ं आपल्याला माहीत असतात. त्यामुळे सगळ्याच बाबी, ‘असं बोलायला नको होतं, किंवा हे चुकलंच’ या सदरात न ठेवता, त्या व्यक्तीच्या इतर वेळेच्या वागण्यानुसार ठरवणं जास्त सोपं नाही का?
काही प्रतिक्रिया, प्रतिसाद हे खूपच अनपेक्षित असे येतात आणि आघात करून जातात. त्यावेळेस त्यावर विचार करत राहण्यापेक्षा, त्या व्यक्तीशी प्रत्यक्षात बोललेलं उत्तम. कारण बऱ्याचदा आपलं शारीरिक, मानसिक आरोग्य, काही नवीन जडलेल्या व्याधी, किंवा आयुष्यात झालेली स्थित्यंतरे यानेही अचानक विचित्र वाटतील अशा प्रतिक्रिया येऊ शकतात.
प्रतिक्रिया, प्रतिसाद यांचं एक नेहमीचं रणांगण म्हणजे, सोशल मीडिया. इथे केवळ व्यक्ती समोर नाहीये, किंवा उत्तराला प्रतिउत्तर म्हणून मांडलेलं शब्दांचं जंजाळ याला काहीच अर्थ नसतो. किंवा बऱ्याचदा तिथेच होणाऱ्या कौतुकाच्या वर्षांवालाही तितकासा अर्थ असेलच असं नाही.
हे सगळं टाळण्याचा अजून एक सोपा उपाय म्हणजे, काय प्रतिसाद, प्रतिक्रिया खटकतात हे जिथे शक्य आहे तिथे तिथे त्या त्या व्यक्तीस सांगून बघितलं तर? ते अनेक वेळा सांगायला लागेलही, तरीही त्यातून बदल घडण्याची शक्यता असू शकते. आणि बदल नाहीच घडला तर मात्र आपण त्यावर, त्या एकंदरीत नात्यावर, व्यक्तीवर सखोल विचार करू शकतो. शिवाय ज्या व्यक्तीकडून प्रतिसाद, प्रतिक्रिया अपेक्षित आहे, त्या व्यक्तीशी योग्य प्रकारे वेळ देऊन आपण बोललोय, चर्चा केलीये की केवळ जाता जाता थोडक्यात सांगून वेळ निभावलीये हे नक्कीच बघायला हवं.
प्रतिक्रिया, प्रतिसाद देण्याची घाई, यानेही बऱ्याचदा विचित्र परिस्थिती निर्माण होतात. त्यामुळे समोरच्याला व्यक्त होण्यासाठी पुरेसा वेळ दिलाच पाहिजे. उत्तम, सुदृढ नाती असतात तेव्हा खरे तर एकमेकांची उडवलेली टर, केलेली गम्मत जम्मत, एखादी रुक्ष प्रतिक्रिया, एखादा जहाल प्रतिसाद हे त्या मानाने खटकत नाही. कारण तिथे नातं महत्त्वाचं असतं.
महत्त्वाचं म्हणजे मला लोकांनी जसं वागवावं, माझ्याशी जसं बोलावं, जसं प्रेम करावं, प्रोत्साहन द्यावं इत्यादी वाटतं तसंच माझंही वागणं आहे का? हा कळीचा प्रश्न आत्मपरीक्षणासाठी अगदीच योग्य.
या सगळ्या नकोशा प्रतिक्रिया, प्रतिसादांबाबत एक छान पथ्य पाळता येतं. ते म्हणजे जास्त स्पष्टीकरण देण्याचं टाळणं, याचाच दुसरा अर्थ, आलेली प्रतिक्रिया, प्रतिसाद पूर्णपणे मान्य करणं. उदा. एक पाच वर्षांची चिमुरडी मातीचा पोपट तयार करत होती. त्यात तिने पोपटाच्या चोचीला चक्क काळा रंग दिला. तिच्या आजूबाजूला असलेल्या मोठय़ा मंडळींनी तिला हर तऱ्र्हेने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु तिने दिलेलं उत्तर म्हणजे, ‘‘हो , ठिकंय.. पोपटाची चोच लाल असते, पण माझा पोपट कुठे खराय? त्यामुळे त्याची काळी असली तरीही चालेल..!’’ या उदाहरणाकडे प्रतिकात्मक नक्कीच पाहता येईल!
शिवाय एखादी प्रतिक्रिया आपल्याला अयोग्य वाटतेय, प्रतिसाद पुरेसा वाटत नाहीये, तिथे एकदा आपलीही मानसिकता तपासून बघायला हरकत नाही. जसा चश्मा तसे रंग, या न्यायाने आपलाही चश्मा बदलण्याची गरज असूच शकते ना! प्रतिसाद आणि प्रतिक्रिया या बाबत, योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने ते देता येणं हे खरं कौशल्य.
urjita.kulkarni@gmail.com
chaturang@expressindia.com