डॉ. ऊर्जिता कुलकर्णी
कधीही, कोणत्याही बाबतीत गैरसमज झाल्यानंतर त्याचे पर्यवसान बऱ्याचदा वादांमध्ये होते. अशा वेळेस केवळ माझा मुद्दा कसा महत्त्वाचा, किंवा योग्य हे पटवून देण्याची चढाओढ लागलेली असते. कित्येकदा यातून काहीही साध्य होत नाही. मात्र आधीच असणारे गैरसमज अधिक वाढण्याची शक्यता जास्त असते. इथे जर यात कोणत्याही एका व्यक्तीने थांबण्याची भूमिका घेतली तर?
माणूस म्हणून आपलं थांबणं आपण विसरलो की गणितं किती बदलतात ना? यातला खरंतर गणित हा शब्दच थोडासा खटकणारा. कारण केवळ या एका शब्दाने नात्यांना कृत्रिम क्रिया, भावनाशून्यता प्राप्त होते. गणित सोडवायचं म्हणजे तिथे भाव-भावनांचं काय काम? त्यासाठी माहीत असलेल्या, शिकलेल्या किंवा नवीन पायऱ्या घेत ते सुटेल तसं सोडवणं, हा त्यातला मुख्य भाग. शिवाय गणितांची उत्तरं बऱ्याचदा ठरलेली असतात. त्या उत्तरापर्यंत पोहोचणे हा त्यातला कार्यभाग. त्यामुळे ते आपल्याला येईल त्या पायरीपर्यंत सोडवत राहणं, पुढे सुटत नाहीये असं वाटलं की ते चक्क सोडून देऊन, ते माझ्यासाठी नाहीये म्हणून पुढे चालत राहता येतं. नात्यांच्या बाबत मात्र, ना ठरलेले प्रश्न, ना ठरलेली उत्तरे! त्यामुळे त्यासाठी काही ठोकताळे ठरवता येत नाहीत. गणित आणि नाती यातला साधम्र्याचा भाग एकच, तो म्हणजे पुढे चालत राहणे.
मग यात थांबणं म्हणजे नेमकं कसं ते या गोष्टीच्या आधारे पाहूया. एकदा एका शिष्याने गुरूला विचारले, ‘‘ध्यानधारणेनंतर अत्यानंदाची अवस्था प्राप्त होते असं तुम्ही सतत सगळ्यांना सांगता. पण नेमकी कधी? मला त्या अवस्थेची अनुभूती घ्यायची आहे.’’ यावर गुरू इतकंच म्हणाले, ‘‘थोडंसं थांब, अजून वेळ यायची आहे, ती आली की तुला हा प्रश्नच पडणार नाही.’’ बरीच वर्ष सातत्याने याच मार्गात राहूनदेखील, शिष्याला काही त्या विशिष्ट अत्यानंदाची अनुभूती आली नाही. तेव्हा त्याने कंटाळून गुरूंची रजा घेतली, आणि ऐहिक आयुष्यात परतून तो आनंदाने जगू लागला. त्याच्या याआधीच्या व्रतस्थ आयुष्याचा त्याला संपूर्ण विसर पडला. अशाच वेळी, एके दिवशी त्याचे गुरू, त्याच्या घरी अचानक येऊन उभे राहिले. त्यांना समोर पाहताच, शिष्य आपसूक नतमस्तक झाला. काय करू, आणि काय नको, अशी त्याची अवस्था झाली. त्याने गुरूंची यथोचित सेवा, आदरसत्कार सर्व काही अगदी व्यवस्थित केले. गुरूंची निघण्याची वेळ झाली, तसे शिष्याला पुन्हा त्याच्या मूळ प्रश्नाचे स्मरण झाले. त्याने गुरूंना विचारले, ‘‘आता तरी सांगा ध्यानधारणेनंतर होणारा अत्यानंद म्हणजे काय?’’
त्या वेळेस गुरू हसून म्हणाले, ‘‘तुला हे ऐहिक आयुष्य जगताना जी अवस्था प्राप्त झाली, ती म्हणजे अत्यानंद! सर्व काही विसरून, तू आनंदाने, समाधानाने हे आयुष्य जगतोयस. यामध्ये कुठेही, तुझ्या मागच्या आयुष्याचे तुला स्मरण नाही, उद्या काय होईल याची चिंता नाही. एक गृहस्थ म्हणून, तू उत्तम पद्धतीने नुसतेच कार्य करत नाहीस, तर त्यात संपूर्णपणे, स्वत:ला विसरून, काळाला विसरून मग्न झाला आहेस. ही अवस्था तर तुला ध्यान इत्यादी साधना करतानाही कधी प्राप्त झाली नव्हती. गुरूंचे उत्तर ऐकून, शिष्याला आश्चर्य वाटले आणि रागही आला. त्याने प्रतिप्रश्न केला, ‘‘हेच जर होते, तर मी तुमच्याकडून दीक्षा घेतली, ध्यानधारणेच्या मार्गाला लागलो, तेव्हाच का नाही सांगितलेत? किंवा मी वेळोवेळी तुम्हाला याविषयी विचारले तेव्हाही का नाही सांगितले?’’
गुरू हसून इतकंच म्हणाले, ‘‘अरे, तुझं काही काळ तिथेही थांबणं गरजेचंच होतं. तिथे थांबून राहिलास, म्हणून तुला इथेही, थांबता आले आणि याची अनुभूती घेता आली. मुळात, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुझ्या कोणत्याही ठिकाणी, किती काळ, किती क्षण तू थांबतोस, यावर आहेत.’’
शिष्य पुढे म्हणाला, ‘‘हे असे होते, तर मग मी तिथेच उपासना करत का नाही राहिलो? तिथून निघून येण्याचा मार्ग का पत्करला?’’
यावर गुरू हसून म्हणाले, ‘‘कोणत्याही ठिकाणी थांबणे जसे गरजेचे, तसेच किती काळ, हेही महत्त्वाचेच. तुझा मूळ उद्देश अत्यानंदाची प्राप्ती म्हणजे काय हे समजावून घेण्याचा होता. तो तू साध्य केलासही, पण केवळ, तू योग्य वेळी तिथून बाहेर पडू शकलास त्याचमुळे. अन्यथा अजूनही, याच्या शोधात, दुखी, कष्टी राहून साधना करत राहिला असतास, ज्याचा काय उपयोग?’’
या छोटय़ाशा गोष्टीत बरेच सार दडलेले आहे. ही कथा, कोणत्याही गुरू-शिष्याची नसून, ती केवळ या मुद्दय़ाकडे लक्ष वेधले जावे, या उद्देशाने इथे सांगितलेली आहे. इथेही तेच तत्व, थांबण्याचे! गुरू-शिष्याची कथा म्हटल्यावर आपसूकच अधिक बारकाईने, यात नक्की काहीतरी दडलेले असणार, म्हणून सतर्क राहून, मनापसून वाचली जाते, आणि बुद्धी क्षण-दोन क्षण थांबून, अर्थात विसावा घेऊन, त्याचे पूर्ण आकलनही करू शकते, हे साधे प्रात्यक्षिक!
नात्यांच्या बाबतही, आपण हेच करून पाहिले तर? कारण या साध्या, सोप्या उपायाने कित्येक नात्यांच्या बाबत काही गरजेचे असे पलू समोर येतील. उदा. कधीही, कोणत्याही बाबतीत गैरसमज झाल्यानंतर त्याचे पर्यवसान बऱ्याचदा वादांमध्ये होते. अशा वेळेस केवळ माझा मुद्दा कसा महत्त्वाचा, किंवा योग्य हे पटवून देण्याची चढाओढ लागलेली असते. कित्येकदा यातून काहीही साध्य होत नाही. मात्र आधीच असणारे गैरसमज अधिक वाढण्याची शक्यता जास्त असते. इथे जर यात कोणत्याही एका व्यक्तीने थांबण्याची भूमिका घेतली तर? आता इथे ती भूमिका विविध प्रकारे असू शकते. म्हणजे, वाद घडतोय म्हणून बोलायचे थांबणे. किंवा काय घडलंय यापेक्षा समोरचा आता काय सांगतोय यासाठी, बुद्धीने घेतलेला ठेहराव, किंवा या विशिष्ट गोष्टीवर आत्ता बोलून काहीच उपयोग नाही, त्यामुळे हे थांबवणे उत्तम! किंवा समोरच्या व्यक्तीची भावनिक गरज ओळखून त्या व्यक्तीशीच वाद असेल, तरीही, त्याक्षणी मात्र, केवळ त्या व्यक्तीला बरे वाटावे म्हणून शारीरिक आणि मानसिक दृष्टीने तिथे थांबून राहणे, त्याच्या शांत होण्याची वाट बघणे किंवा काहीही न करता, तटस्थ म्हणून तिथे थांबणे.
या वादाला आता कोणतीही नावे देऊन बघितली तरीही हे योग्यच ठरणार. म्हणजे, जोडीदारासोबतचे वाद, मत्रीतील गैरसमज, कामाच्या, व्यवसायाच्या ठिकाणी होणारे मतभेद, वेगवेगळ्या पिढीतील लोकांमध्ये असणारी संपूर्ण वेगळ्या दृष्टिकोनामुळे असणारी विचारांमधली तफावत, अशा कोणत्याही बाबत हे पक्कं लागू होतंच. विशेषत: जिथे प्रेम हा नात्यातला आत्मा आहे, मूळ घटक आहे, तिथे तर हे फारच रामबाण औषध! उदा. माझ्याकडे साठीच्या जवळपासच्या दोन वृद्ध स्त्रिया येतात. त्या दोघीही छान मत्रिणी. काहीतरी फुटकळ गोष्टींवरून दोघींमध्ये गैरसमज झाले, आणि त्या दोघींनीही एकमेकींशी बोलणे बंद केले. दोघींचे वय पाहता त्यांना काहीही समजावून सांगण्याने ते दूर होतील असेही नव्हते. परंतु, गैरसमज असले तरीही त्या दोघी आपापसात वैरभाव ठेवून जगत नव्हत्या. त्यातील एकीवर खूप मोठा प्रसंग ओढवला, अशा वेळेस, तिने तिच्या त्या क्षणी अतिशय जवळ असणाऱ्या लोकांना याची माहिती दिली. दुसरी मत्रीण मात्र थेट तिच्यापाशी जाऊन पोहोचली. काहीही न बोलता केवळ तिच्यासोबत थांबून तिला आधार दिला. यातून त्यांचे गैरसमजही मावळले. पुढे कोण चूक, कोण बरोबर याचे निकालपत्र अर्थातच निघालेच नाही. इथे दोघींनीही काळासोबत एकमेकीला आणि त्यांच्या नात्याला दिलेला संयमी वेळ, त्यांना नात्यात थांबवून ठेवू शकला हे महत्त्वाचे!
आता इथे काहीजण असेही म्हणतील की, इतक्या चांगल्या मत्रिणी, तर गैरसमज बोलून मिटवून टाकायचे ना. अगदीच योग्य. पण कित्येकदा न बोललेले उत्तम, अशीही परिस्थिती असू शकते. किंवा सहज बोलून मिटणाऱ्या बाबी असतील असेही नाही. त्याही पुढे जाऊन बोलण्याने, त्यातही ते भावनावेगात असेल तर उपायाच्या ऐवजी अपाय होण्याची शक्यता जास्त. अशा वेळेस थांबलेले उत्तम! अर्थात, बोलून सुटणाऱ्या समस्यांसाठीसुद्धा कधी बोलणे उचित, हे समजणेही गरजेचे असते, त्यासाठी सुद्धा थांबणेच गरजेचे!
प्रत्येक वेळेस असे काहीतरी अतिशय उत्तम, किंवा दुर्दैवी घडेल आणि त्यानंतर आपणामधली दरी सांधली जाईल असेही घडता कामा नये. कौटुंबिक नात्यात हे हमखास दिसते. इथे मात्र थांबणे नसून, केवळ त्या त्या वेळेस उपस्थित राहून व्यावहारिक भाग साध्य करणे इतकेच काय ते अशा नात्यात उरलेले दिसते.
एका परिसंवादात, पंचविशीतल्या एका तरुणाने एक प्रश्न विचारला, ‘‘माझं एका मुलीवर प्रेम आहे. आम्ही खूप चांगले मित्र, पण तिचं माझ्यावर प्रेम नाही असंच ती म्हणते. मी हर तऱ्हेने प्रयत्न करून बघितला. परंतु तिचं मत बदलत नाही. इथे मी काय केलं पाहिजे?’’ काही नाती, किंवा आपल्या मनात त्याविषयी असणाऱ्या समजुती आणि प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी असते. जी गोष्ट या मुलाची, तशीच काहीशी थोडय़ाफार फरकाने इतर अनेक नात्यांत, म्हणजे, भाऊ-बहीण, पालक आणि मुलं, इत्यादी. अशा वेळेस नात्यांवर काम करणारी व्यक्ती म्हणून आपण एकटेच असू तर मात्र, कुठे थांबायचे हे कळणे गरजेचे. इथे मात्र थांबणे याचा अर्थ त्यावर खूप प्रयत्न करणे, मानसिक ऊर्जा खर्च करणे, हे थांबवणे महत्त्वाचे. आपली भावनिक गुंतवणूक किती, यावर थोडंसं थांबून, त्याचेही परीक्षण म्हत्त्वाचेच. नाही तर सगळेच एकतर्फी, त्यातून स्वत:कडे पाहण्याचा एकंदरीत दृष्टिकोन बदलू शकतो. आणि हे जास्त घातक असते. स्वत:कडेच; आपलेच सतत काहीतरी चुकत आहे, किंवा आपण कमी पडतोय, किंवा या नात्याला जे हवे आहे ते आपण देऊ शकत नाही, अशा पद्धतीने पाहिले जाते. अशा वेळेस तिथे एक ठळक रेषा आखून, त्याच्या अलीकडे थांबणेच जास्त हितावह ठरेल.
कारण अशा नात्यात, त्यावर कष्ट घेणारी ‘व्यक्ती’ हीच उरलेली असते. त्यामुळे असे नाते अट्टहासासाठी उगाच जिवंत ठेवण्यापेक्षा त्याला सोडून दिलेले उत्तम.
थांबणे याचा एक अर्थ म्हणजे समोरच्या व्यक्तीचे शांतपणे, कोणत्याही टिप्पणीची घाई न करता किंवा गरज नसलेला सल्ला न देता ऐकून घेणे, असाही होतो. कारण कित्येकदा कोणी तरी केवळ ऐकून घ्यावे हीच मानसिक गरज असते नाही का? तसेच कोणत्याही प्रकारे ढवळाढवळ न करता, जे चालले आहे ते पाहत राहणे असाही. हे विशेषत: एखादी व्यक्ती काही नवीन करू पाहत असेल, किंवा पालक आणि मुले यांच्यातही लागू करता येईल. इथे व्यक्तीला तिला अपेक्षित असणारे स्वातंत्र्यही मिळते आणि त्यासोबत एक मूक तरीही महत्त्वाचा असणारा आधारही! यात एखादी गोष्ट सांगावीशी वाटली तरीही त्यात आपण कुठेही हस्तक्षेप करतोय असे दिसले नाही तर ती व्यक्ती ते अगदी संपूर्णपणे नसले तरी काही अंशी नक्कीच मान्य करू शकेल.
थांबण्याची एक महत्त्वाची जागा, म्हणजे इतरांना सतत आपली बाजू समजावून सांगण्याचा, ती पोटतिडकीने मांडण्याचा प्रयत्न! नाही म्हणायला याचा एक खूप मोठ्ठा ताण सतत मनावर राहतो. शिवाय कोणाला, काय, कसे समजावून सांगावे लागेल याच विचारात राहावे लागते. अशा व्यक्ती बऱ्याचदा इतरांनी आपल्यामुळे दुखावले जाऊ नये या मताच्या असतात. परंतु, ते आपल्या हातात नाही, हेच बऱ्याचदा आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळे घडलेल्या प्रत्येक कृतीचे समर्थन करण्याची, घटनेविषयी सांगण्याची पुनरावृत्ती घडत राहते आणि तरीही आजूबाजूच्या व्यक्ती समाधानी नाहीत हे कटू सत्य म्हणा किंवा शल्य बोचत राहते.
आपले नात्यांमधील थांबणे कोणत्याही प्रकारचे असले तरीही, ते किती काळ आहे, योग्य व्यक्तीसाठी, योग्य काळासाठी, आणि योग्य प्रकारे आहे का, हे आपण वेळोवेळी पाहू शकलो, तर काही अतिमहत्त्वाची नाती हातातून सुटणार नाहीत आणि त्याचबरोबर केवळ लोढण्यासारखी असलेली कित्येक नाती गळून पडतील आणि तिथे काही नवीन नात्यांसाठी जागा तयार होईल.
urjita.kulkarni@gmail.com
chaturang@expressindia.com