माधुरी ताम्हणे – madhuri.m.tamhane@gmail.com

कोणतीही नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती असो, त्यात अडकलेल्या नागरिकांच्या मनात आपल्याला कुणीतरी लवकरात लवकर येऊन वाचवेल, हा विश्वास असतो. आपल्या धडाडीच्या कामानं असा विश्वास निर्माण केलेले ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण दला’चे (‘एनडीआरएफ’) जवान आपत्तीत सापडलेल्यांसाठी देवदूतासारखेच ठरतात. कायम सुसज्ज राहाणाऱ्या आणि आपत्तीची वर्दी मिळताच तडक बचावकार्यासाठी निघणाऱ्या या दलाविषयी आणि हेल्पलाइनविषयी..

‘आपदा सेवा सदैव’ या ब्रिदानुसार ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागा’ने आखलेल्या आपत्कालीन धोरणांची प्रभावी कार्यवाही करणारी केंद्रीय स्तरावरील यंत्रणा म्हणजे ‘एनडीआरएफ’ अर्थात ‘राष्ट्रीय आपत्ती निवारण दल’. हे दल केंद्रीय राखीव पोलीस दल, सीमा सुरक्षा दल, आसाम रायफल्स अशा सात सुरक्षा दलांच्या निवडक बटालियन्स मिळून बनलं आहे. महाराष्ट्रात ‘सीआरपीएफ’ अर्थात ‘केंद्रीय राखीव पोलीस दला’च्या पाचव्या पलटणीला ‘एनडीआरएफ’मध्ये परिवर्तित करण्यात आले आहे.

‘सीआरपीएफ’ या अर्धसैनिक दलातून जवान आणि अधिकाऱ्यांना सात वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर पाठवलं जातं. मानवी वा निसर्गनिर्मित आपत्तींचा सामना करण्यासाठी खास प्रशिक्षित अशी ‘एनडीआरएफ’सारखी ‘स्वतंत्र’ यंत्रणा असलेला भारत हा जगातील एकमेव देश आहे.

महाराष्ट्रातील राज्यातील ‘एनडीआरएफ’चे ‘सेकं ड इन कमांड’ सच्चिदानंद गावडे सांगतात, ‘‘राष्ट्रीय आपत्ती निवारण दलामध्ये प्रतिनियुक्तीवर येताच जवान आणि अधिकारी यांना आपत्तीप्रवण क्षेत्रातील कामाचं जागतिक अभ्यासक्रमावर आधारित शास्त्रशुद्ध प्रशिक्षण दिलं जातं. कारण ‘एनडीआरएफ’मध्ये आमच्या कामाचं स्वरूप पूर्णपणे बदलतं. इथे नियुक्त होताच आम्ही जवानांऐवजी बचावकर्मी होतो. उदा. आजवर सीमा सुरक्षा दलात काश्मीर वा अन्य ठिकाणी काम करत असताना शत्रूचा खातमा करणं हे माझं काम होतं तर इथलं माझं काम नागरिकांचे प्राण वाचवणं हे आहे. त्यासाठी वेगळं प्रशिक्षण आवश्यक असतं. प्रशिक्षण काळात पहिले चार आठवडे वैद्यकीय बचावकार्य शिकवलं जातं. उदा. जखमींना ड्रेसिंग कसं करावं, कृत्रिम श्वासोच्छ्वास  कसा द्यावा, वेळ पडल्यास गरोदर स्त्रीचं बाळंतपण कसं करावं, याचं सम्यक ज्ञान दिलं जातं आणि त्यासाठी उपयुक्त साधनं पुरवली जातात. भूकंपात वा अन्य वेळी एक किं वा अनेक इमारती कोसळल्या तर त्यांचं आरेखन (‘मार्ग’’) कसं करावं, उपकरणांच्या आधारे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचा शोध कसा घ्यावा, याचं प्रशिक्षण दिलं जातं. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रशिक्षणामुळे जपान आणि नेपाळ इथल्या भूकंपात भारतीय ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तसंच पूरपरिस्थितीत लोकांना वाचवण्यासाठी बोटींचा वापर कसा करायचा, ‘डीप डायव्हिंग’च्या तंत्रानं १५० फुटांपर्यंत खोल पाण्यात उतरून बुडालेल्या व्यक्ती आणि वस्तूंचा शोध कसा घ्यायचा, हे शिकवलं जातं. रासायनिक, जैविक, किरणोत्सारी अथवा आण्विक आपत्तीत कसं काम करायचं याचं मार्गदर्शन ‘भाभा अ‍ॅटॉमिक रिसर्च सेंटर’ (‘बीएआरसी’) आणि ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’तील (‘डीआरडीओ’) तज्ज्ञ करतात. त्यामुळे २०११ मध्ये जपान येथील फुकुशिमा अणुऊर्जा कें द्रात स्फोट झाला, तेव्हा ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी उत्तम कामगिरी केली. शिवाय उंच इमारतींमध्ये आग  लागल्यास आगीतून आणि धुरातून लोकांची सुटका कशी करायची, जंगलात, डोंगरदऱ्यांमध्ये कु णी हरवलं अथवा उंच कडय़ावरून पाय घसरून कु णी खाली पडलं तर दोरखंड आणि इतर साहित्याचा वापर करून बचावकार्य कसं करायचं तेही शिकवलं जातं. या प्रशिक्षणात जे प्रावीण्य मिळवतात त्यांची ‘मास्टर ट्रेनर’ या परदेशी अभ्यासक्रमासाठी निवड केली जाते. आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रशिक्षण आणि अनुभव यामुळे आमचे जवान आणि अधिकारी आपत्कालीन परिस्थितीत अत्यंत शांतचित्तानं बचावकार्यास निघतात. त्या वेळी आपत्तीचं स्वरूप, घटनास्थळाची नेमकी परिस्थिती, त्यानुसार उपाययोजनेची आखणी आणि साधनसामुग्रीची वाटणी, याचेच विचार प्रत्येकाच्या मनात असतात. आपण  लोकांचे जीव वाचवण्याच्या कामगिरीवर निघालो आहोत, याचं सुप्त समाधान, अभिमान आणि एक प्रकारचा उत्साह असतो,’’ असं सच्चिदानंद गावडे सांगतात.

‘एनडीआरएफ ऑन व्हील’ या संकल्पनेनुसार छावणीमध्ये दोन तुकडय़ा संपूर्ण गणवेश परिधान करून सदैव सज्ज असतात. आपत्कालीन घटनेची माहिती अग्निशमन दल, पोलीस वा हेल्पलाइनवरून नागरिकांनी थेट दिल्यास नियंत्रण कक्षाकडून सर्वप्रथम स्थानिक प्रशासनाकडे विचारणा करून घटनेची खातरजमा करून घेतली जाते. नंतर त्यांच्या छावणीत सायरन वाजतो. डय़ुटीवरील ‘एनडीआरएफ’च्या दोन्ही तुकडय़ा वैयक्तिक आणि बचावकार्यासाठी आवश्यक सामान घेऊन पंधरा मिनिटांत निघतात. महाराष्ट्राबाहेरून अशी वर्दी आल्यास दोन्ही तुकडय़ा नजीकच्या विमानतळावर पोहोचतात. तिथून हवाई दलाच्या विमानानं त्यांना ‘एअरलिफ्ट’ केलं जातं आणि आपत्तीग्रस्त क्षेत्रांत उतरवलं जातं. ‘एनडीआरएफ’च्या तुकडय़ा त्यांच्या खास गाडय़ांतून निघताना वाहतूक पोलिसांना ‘ग्रीन कॉरिडॉर’साठी विनंती करतात. जेणेकरून वाहतूक पोलीस मार्गातील अडथळे दूर करून या वाहनांसाठी रस्ता मोकळा करतात. दरम्यान ‘एनडीआरएफ’चे अधिकारी स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना घटनास्थळी  फ्लडलाइट्स, डंपर्स, जेसीबी, पोकलेन अशा यंत्रसामुग्रीची सोय करायला सांगतात. कोसळलेल्या इमारतीत अडकलेल्या माणसांच्या अवयवांवर दबाव पडून रक्ताभिसरण थांबतं. असा ‘क्रश अँड कम्पार्ट सिंड्रोम’ आढळल्यास जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्याची सूचना केली जाते. मात्र एकदा ‘एनडीआरएफ’चं पथक घटनास्थळी दाखल झाल्यावर ते अधिक वेगानं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं बचावकार्यास सुरुवात करतात.

सच्चिदानंद गावडे बचावकार्याची संपूर्ण माहिती देतात. ‘‘इमारत कोसळण्याच्या दुर्घटना अनेकदा घडतात. अशा वेळी सर्वप्रथम आमचं श्वानपथक आत जातं. आतमध्ये जिवंत माणूस आढळल्यास पथकातील कुत्री भुंकायला लागतात. आम्ही  तातडीने त्या भागात शिरतो आणि काही आवाज येतो का याची चाहूल घेतो. ‘लाइफ डिटेक्टर’ उपकरणाद्वारे आम्हाला ढिगाऱ्याखालून कु णाच्या हृदयाची धडधड ऐकू आली तर आम्ही  त्या दिशेला मोर्चा  वळवतो. त्यानंतर भिंतींना मोठी छिद्रं पाडून आमच्या जवळील प्रभावी कॅमेऱ्यातून आतली अवस्था पाहून पुढील कारवाई सुरू करतो. आमच्याकडे  ‘एअर लिफ्टिंग बॅग’ हे  उपकरण असतं. त्यात हवा भरली की ७२ टनांपर्यंत वस्तू उचलण्याची तिची क्षमता तयार होते. माझगावला कोसळलेल्या इमारतीत एका माणसाचा पाय कपाटाखाली अडकला होता. एअर लिफ्टिंग बॅगच्या साहाय्याने ते कपाट आम्ही वर उचललं आणि त्याखालून अलगद त्याचा पाय बाहेर काढला. महाड इमारत दुर्घटनेत एका ढिगाऱ्याखालून विव्हळण्याचा आवाज  येत होता. त्यावरून शोध घेत एक स्त्री आणि तिच्या मुलाला वाचवण्यात आम्हाला यश आलं. मात्र अर्धवट कोसळलेली इमारत  धोकादायक असते. ती कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने मृत्यूच्या सापळ्यात, स्वत:च्या सुरक्षेची काळजी घेत बचावकार्य पार पाडावं लागतं. भिवंडीतील दुर्घटनाग्रस्त जिलानी इमारतीचे ढिगारे उपसून लोकांना अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढण्यासाठी बचाव पथकं साठ तासांहून अधिक काळ कार्यरत होती. मात्र राडारोडा (मलबा) पूर्ण हटवल्यानंतर आणि अडकलेली सगळी माणसं जिवंत वा मृत सापडल्यानंतरच आमचं शोधकार्य थांबवलं जातं.गेल्या वर्षी बदलापूरला महालक्ष्मी एक्स्प्रेस पुराच्या पाण्यात अडकली होती. तेव्हा प्रवाशांनी गाडीतून आमच्या हेल्पलाइनवर फोन केले. आम्ही बोटी घेऊन तातडीने निघालो. पण त्या बोटी गाडीपर्यंत घेऊन जाण्यासाठी रस्ताच नव्हता. आमचे जवान बोटी आणि बचावकार्याचं इतर साहित्य खांद्यावर घेऊन तुफान पावसात डोंगर चढून गाडीपर्यंत एक तास पायी चालत गेले. त्यानंतर त्यांनी गाडीतील प्रवाशांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित स्थळी हलवलं. केरळमध्ये पूर आला तेव्हा एका गावातील घरात दोन वृद्ध माणसं अडकली होती. घराच्या चहुबाजूला पाणीच पाणी होतं. त्यांचा मुलगा दुसरीकडे अडकला होता. त्याने आमच्या हेल्पलाइनवर फोन करून हे कळवलं. आम्ही घटनास्थळी बोटीतून जाऊन त्या वृद्धांना वाचवलं. अशा प्रकारे सांगली, कोल्हापूर इथल्या पुरात १० हजार तर जम्मू-काश्मीरमधल्या पुरातून ८ हजार लोकांची आम्ही सुखरूप सुटका केली. बऱ्याचदा पत्रकार आमच्या हेल्पलाइनवर फोन करून अशा घटनांची वर्दी देतात. उदा. डोंगरी येथे इमारत कोसळली, बोअरवेलमध्ये एक लहान मुलगा पडला, या घटना पत्रकारांनी आम्हाला सर्वप्रथम कळवल्या. ’’असंही ते सांगतात.

‘एनडीआरएफ’चे बचावकर्मी जीव धोक्यात घालून नागरिकांना वाचवतात. मात्र हे करत असताना स्वत:चा बचाव करण्यासाठीही त्यांना प्रशिक्षण आणि योग्य साधनसामुग्री दिलेली असते. तरीही कधी कधी त्यांच्या जिवावर बेततं. ‘निसर्ग’ चक्रीवादळात पायावर झाड पडल्याने एका जवानाची पाच बोटं कापली गेली. तर विजेचा खांब डोक्यावर पडल्यामुळे एका जवानाच्या तोंडाला फ्रॅ क्चर झालं. मात्र ही अपवादात्मक उदाहरणं. ‘एनडीआरएफ’च्या तुकडय़ांची प्रशासन संपूर्ण काळजी घेतं. प्रत्येक तुकडीबरोबर स्वयंपाकी आणि धान्यसाठा असतो. शासनाकडून मिळालेल्या शाळा, सभागृहासारख्या जागेत वा तंबूत जवान आळीपाळीनं विश्रांती घेतात. कारण कधी कधी हे बचावकार्य अनेक दिवस चालतं. सांगलीच्या पुरात जवानांनी बारा दिवस काम केलं, तर तिवरे धरणफुटी, सावित्री पूल या दुर्घटनांत त्यांना दीर्घकाळ काम करावं लागलं. जागतिक स्तरावर चर्चिली गेलेली मोठी भूस्खलनाची दुर्घटना म्हणजे माळीण घटना. तिथे सलग आठवडाभर जवानांनी काम केलं. तिथल्या खचलेल्या डोंगराच्या राडय़ारोडय़ातून १५१ मृतदेह आणि

८ जिवंत माणसांना ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी शोधून बाहेर काढलं. माझगाव इमारत दुर्घटनेत ६० मृतदेह आणि ३० जिवंत माणसं, मुंब्रा इमारत दुर्घटनेत ७२ मृतदेह आणि ६२ जिवंत माणसं, तर भिवंडीतील जिलानी इमारतीतून ३८ मृत आणि २५ जखमींना बाहेर काढण्यात जवानांना यश आलं. बचावकार्याची मोहीम समाप्त झाल्यावर पोलिसांसह ‘एनडीआरएफ’चे बचावकर्मी या दुर्घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करतात तेव्हा जवानांसह सर्वाची मनं हेलावून जातात.

अशा मोठय़ा आपत्तींमध्ये प्राणी आणि मानवी मृतदेहांचा शोध घेणं आणि रोगराई पसरू नये यासाठी त्यांची तातडीनं विल्हेवाट लावणं याचं तंत्रशुद्ध शिक्षण घेतलं असलं तरी शेवटी जवानांच्या मनावर ताण येतोच. त्यांच्यासाठी  समुपदेशन कें द्र आहेच, शिवाय योग आणि ध्यानधारणा शिकवली जाते.

सच्चिदानंद गावडे म्हणतात, ‘‘आमचं काम जोखमीचं असलं तरी काही वेळा हृद्य घटना घडतात. नागपूरला पूरग्रस्तांची सुटका केल्यावर नागरिकांनी आमचा सत्कार केला. रक्षाबंधनासारख्या कार्यक्रमात आमच्या जवानांना स्त्रियांनी राख्या बांधल्या. सांगलीत एका आजीनं आमच्या जवानाचे हात कपाळाला लावून नमस्कार केला आणि म्हणाली, की पोरा देवासारखा धावून आलास रे! बस्स! असा मनापासून मिळालेला आशीर्वाद या कठीण कामासाठी आम्हाला ऊर्जा आणि प्रेरणा देतो.’’

‘एनडीआरएफ’ हेल्पलाइन क्रमांक
०२११४२४७००० / फॅक्स क्रमांक- ०२११४-२४७००८