अनाथ मुलांच्या पुनर्वसनाच्या कामी गेली अनेक वर्षे कार्यरत असल्यामुळे अनेक अनुभव गाठीशी जमा झाले. कधी या अनाथ मुला-मुलींचे भावविश्व ढवळून काढणाऱ्या घटनांची साक्षीदार झाले, तर कधी अनाथ मुलींना मदत केल्यानंतर आलेल्या कटू अनुभवांनी खिन्न झाले. तर काही जणांनी जिद्दीने आपले अनाथपण सन्मानच्या आयुष्यात परावर्तित केले त्याचे समाधान मिळाले. आपल्यातल्याच या काही मुलांना ‘राहिले रे दूर घर माझे..’ असं म्हणायला लागू नये म्हणून, केलेल्या प्रयत्नातले हे काही अनुभव.
शासकीय बालगृह आणि अनुदानित बालगृहात असणाऱ्या अनाथ मुलांना अठरा वर्षांनंतर (अपवाद वगळता) तेथे राहण्याची परवानगी नाही. अशी हजारो मुले दरवर्षी बालगृहातून बाहेर पडतात. ज्यांना पालक आहेत किंवा कुणाचा आधार, आसरा आहे त्यांना आपले आयुष्य मार्गी लावण्याची संधी तरी असते, अन्यथा कुणाचेही पाठबळ नसलेली ही अनाथ मुले या जगात अक्षरश: फेकली जातात. मोलमजुरी करीत दिवस घालवतात किंवा परिस्थितीमुळे गुन्हेगारीच्या दुष्टचक्रात अडकतात. अनेक कोवळ्या मुली वाममार्गाला लागतात. बाल न्याय कायदा १९८६ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्य़ाच्या बालकल्याण मंडळाच्या अध्यक्ष म्हणून काम करीत असताना माझ्यासमोर अशी असंख्य उदाहरणे आली ज्यात मुला-मुलींच्या आयुष्याचा कोळसा झालेला मी पाहिला. पण अशीही उदाहरणे पाहिली ज्यांना योग्य पाठबळ मिळालं, शिक्षण मिळालं, आधार मिळाला आणि त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं. म्हणूनच आज गरज आहे ती शासकीय पातळीवर आणि सामाजिक पातळीवर या अनाथ मुलांना आधार देण्याची, त्यांना आपल्यात सामावून घेण्याची!
कोल्हापूरच्या पोलिसांनी लालदिवा वस्तीतील कुंटणखान्यावर धाड टाकून ४०-४२ मुलींना सोडवून राहण्यासाठी महिलाश्रमात आणून ठेवले होते. संबंधित मुलींचे पुनर्वसन कसे करावे, यासंबंधी मार्ग सुचवावा, असा आदेश मला देण्यात आला. त्या आदेशाप्रमाणे वेश्या व्यवसाय करणाऱ्या त्या प्रत्येकीशी मी दोन-तीन तास चर्चा केली. फसलेल्या, फसवलेल्या, घरातून पळून गेलेल्या, आई-वडिलांनी किंवा पतीने विकलेल्या, ‘देवदासी देवाची, मालकी गावाची’ या नात्याने वेश्या व्यवसाय करणाऱ्या या सर्व भगिनींची दु:खे ऐकून मन हेलावून गेले. यातील काही वेश्या तर कर्नाटकातील बालग्रामात लहानाच्या मोठय़ा झालेल्या. पण १८ वर्षांनंतर बाहेर पडल्यानंतर दलालाने त्यांना फसवून मिरजेच्या कुंटणखान्याच्या मालकिणीला विकले होते. सोलापूरच्या बालगृहात लहानाची मोठी झालेल्या एकीबरोबर तर बालगृहातून बाहेर पडल्यानंतर स्वत:ची दोन लग्ने झालेल्या पुरुषाने तिसरे लग्न केले. तिचा उपभोग घेतला आणि मुंबईतल्या बाजारात विकून टाकले.
सोलापूरला देवदासींचे सर्वेक्षण कसे करावे? याचे प्रशिक्षण देण्यासाठी मी जेव्हा गेले होते, त्या वेळी त्या बालगृहातील मुलीच सर्वाची जेवण्या-खाण्याची व्यवस्था बघत होत्या. त्यापैकीच एक रेणू. आई-वडिलांचा असाध्य रोगाने मृत्यू झाला होता. वयाच्या दुसऱ्या वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या देवदासीने तिला लहानाचे मोठे केले. ती वयात येण्यापूर्वीच, तिने तिच्या गळ्यात देव बांधून तिला देवाला सोडण्याचा घाट घातला, हे कळताच काही कार्यकर्त्यांनी तिला बालगृहात आणून सोडले. १८ वर्षांनंतर बालगृहातून बाहेर पडल्यानंतर, ज्या देवदासीला पाटलाने ‘ठेवली’ होती, त्याने रेणुचा मुलीसारखा सांभाळ करू, असे सांगून पुन्हा तिला देवदासीच्या घरी आणले. पाटलाची नजर वाईट होती. त्याने संधी मिळताच त्याचा डाव साधला, तिचा उपभोग घेतला आणि मुंबईच्या गोलपीठा बाजारात विकून टाकली. तिथून पळून जाण्याचा तिने प्रयत्न केला. पण मारहाण, जबरदस्ती यामुळे तिची सुटका झाली नाही आणि सरतेशेवटी मुंबईतील फोरास रोड, पुण्यातील दाणा आळी, मिरजेतील प्रेमनगर असे फिरत-फिरत शेवटी ती कोल्हापूरच्या डोंबार वाडय़ातील कुंटणखान्यात आली. तिचे म्हणणे एकच होते. ‘ताई इथून आम्ही जाणार कुठे? परत आमच्या कुंटणखान्याच्या मावशीकडेच जातो. जेथे आम्हाला राहायला, जेवायला मिळते. धंदा करावा लागला तरी मालकिणीकडून सुरक्षा मिळते. मालकीणच गिऱ्हाईक आणते. आम्हाला अन्न, वस्त्र, निवारा याशिवाय आणखी काय पाहिजे’, हे ऐकून मी अचंबित झाले. तिच्या पुनर्वसनासाठी काय करावे? हा प्रश्न माझ्यासमोर उभा राहिला.
अठरा वर्षे झाल्यानंतर बालगृहातून बाहेर पडलेली कुणीतरी अपर्णा नावाची मुलगी, मी समाज कार्यकर्ती आहे असे सांगितल्याने माझे घर शोधत आली. म्हणाली, ‘आपल्याला कुठलाही आसरा नाही, आई-वडील, भाऊ-बहीण कोणीही नसून चार वर्षांची असतानाच माझ्या आजीने बालगृहात ठेवले. आता १८ वर्षे पूर्ण झाल्याने मला संस्था सोडावी लागतेय. आपण मला आसरा दिला तर माझ्यावर फार फार उपकार होतील.’ तिचे बोलणे ऐकून मन हेलावले. तिला दुसऱ्या दिवशी घरी येण्यास सांगितले. तत्पूर्वी तिची संपूर्ण माहिती काढली. माझी मुलगी रेणू लहान होती. तिच्याबरोबर खेळण्यासाठी अपर्णा मला योग्य वाटली. अपर्णा उंचीने लहान, पण गोड चेहरा, राहणे टापटिपीचे व रेणूवर असलेल्या तिच्या प्रेमामुळे आमच्या घरात लगेच मिसळून गेली. रेणूला संस्कृत श्लोक, बडबड गीते, प्रार्थना तिनेच शिकवल्या. रेणूची पण तिच्यावर माया जडली. अपर्णा तिच्या सगळ्या चांगल्या-वाईट सवयींसह आमच्या घरात रेणूबरोबर चांगली रमली. पण तिला कायम कऱ्हाडच्या तिच्या संस्थेतून बाहेर पडलेल्या मैत्रिणींचा व तिच्या नवऱ्याचा दूरध्वनी यायचा. एकेदिवशी ते दोघेही पती-पत्नी आमच्या घरी आले व अपर्णाला आम्ही चार दिवस आमच्या घरी घेऊन जातो, अशी गळ घालू लागले. त्यांनी पत्ता दिला. त्यांची सर्व माहिती काढली. तिलाही बदल होईल म्हणून मी परवानगी दिली. आठ दिवसांनंतर येणारी अपर्णा एक महिना झाला तरी आली नाही. माझाही संपर्क होत नव्हता. महिन्याने अपर्णा सकाळी-सकाळीच घरी उगवली. हातात हिरव्या चुडा, गळ्यात मंगळसूत्र, जरीची साडी, एका नव्या नवरीचे तेज तिच्या चेहऱ्यावर होते. ‘माझे लग्न झाले. माझा नवरा काम करतो. घरी सासू-सासरे आहेत. मी सुखात आहे. मला रेणूची-तुमची खूप आठवण आली. म्हणून मी भेटायला आले. पण आपण कुठे राहतो, पत्ता काय याचा मात्र तिने अंदाज दिला नाही. त्याचे मला थोडे वाईट वाटले..पण ती आनंदात आहे यातच मी समाधान मानले.
तीन वर्षांनी अपर्णा दोन लहान मुलांसह माझ्याकडे आली. रडतच होती. ‘नवरा दारू पितो. मारहाण करतो आणि एका बाईला त्याने ‘ठेवली’ आहे. मला सध्या कोणताही आधार नाही. माझ्या लहान मुलांना ‘बालग्राम’मध्ये ठेवण्यासाठी मी गेले होते. त्यावेळी मला कळले की तुम्ही ‘बालन्यायाधीश’ असल्याने तुम्हीच मुलांना संस्थेत प्रवेश देता तेव्हा माझ्या मुलांना संस्थेत प्रवेश द्या. मी कोठेही हॉस्पिटलमध्ये काम करून पोट भरेन. तिची एकूण परिस्थिती पाहून मुलांना बालगृहामध्ये प्रवेश दिला. त्यानंतर एक, दोन, चार महिने ती मुलांना भेटायला आली. पण त्यानंतर मात्र ती बालगृहामध्ये मुलांना भेटायला परत कधीच आली नाही. अनाथ असल्यामुळे अपर्णा संस्थेत आली, वाढली. पण आज तिची मुलेही अनाथ म्हणूनच संस्थेत राहतात. त्यांचे भवितव्य काय? याची मला सतत चिंता वाटायची. हे दृष्टचक्र असेच चालू राहणार का याचे वाईट वाटते.
अर्थात बालगृहातून बाहेर पडलेल्या सर्वच मुलींच्या बाबतीत असे घडते असे नाही. काही अनाथ मुलींना महिलाश्रमात प्रवेश मिळतो. तेथे राहून काहींनी नर्सिग, शिवणकाम, टायपिंग, कॉम्प्युटरचे शिक्षण घेतले आहे. आज त्यातील नीलिमा, पौर्णिमा, श्रद्धा या अंगणवाडीत सेविका म्हणून काम करतात, तर पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयामध्ये कडक पांढऱ्या ड्रेसमध्ये असलेली नसिमा नर्सिगचे ट्रेनिंग घेऊन आता लग्न करून स्थिरस्थावर झाली आहे.

बालगृहात दंगेखोर- भांडखोर गौराशी एके दिवशी अचानक भेट झाली, ती माझ्या मुलीच्या लग्नाच्या वेळी. जेवणाची ऑर्डर देण्यासाठी एका केटररकडे मी गेले तर तेथे गौरा व तिचा नवरा भेटला. दोघेही मिळून केटरिंगचा व्यवसाय अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळतात. तिची दोन लहान चुणचुणीत मुलं सोबत होती. पुण्याच्या बालगृहातील रुद्राने तर पोलिसी गणवेशात मला रस्त्यातच सॅल्युट ठोकला. खरे तर मी तिला ओळखलेच नाही. रुद्रा अनैतिक संबंधातून जन्मलेली म्हणून रस्त्यावर टाकून दिलेली, बालगृहातच लहानाची मोठी झाली. बारावीपर्यंत शिकली. अंगापिंडाने मजबूत, सर्व खेळात प्रवीण, त्यामुळे पोलीस भरतीमध्ये लगेच तिची निवड झाली. आता पुण्याला ट्रॅफिक पोलीस म्हणून काम करते.
काही अनाथ मुलींचे विवाह अठरा वर्षांनंतर संस्थेनेच लावून दिले. त्यांचे माहेरपण, बाळंतपण सर्व काही केले जाते. पण किती जणांच्या नशिबी हे भाग्य आहे? अनेक जणी बालगृहात असेपर्यंत सुरक्षित आहेत. पण त्यानंतर पुढे काय? अनेक मुलींना पालक नसतात किंवा असले तरी ते त्यांना घ्यायला येतातच असे नाही. ज्यांना लग्नासाठी योग्य जोडीदार मिळाला नाही तर त्यांचेही आयुष्य अंधातरीच राहाते. अनेक १६-१७ वर्षांच्या मुलींना आपले पुढे काय होणार या विचारांमुळे नैराश्य आलेले मी पाहिले आहे.
बालन्यायाधीश म्हणून काम करीत असताना मी पाहिलं की बालगृहात मुलांना ठेवण्यासाठी किती तरी स्त्रिया यायच्या की ज्या पूर्वी महाराष्ट्रातल्या इतर बालगृहात लहानाच्या मोठय़ा झाल्या आहेत. प्रत्येकीची कथा वेगळी.
दु:ख वेगळे. त्याच मुली आपल्या मुलांना बालगृहात सोडतात. हे दृष्टचक्र कधी संपणार का? पिढय़ान्पिढय़ा हे असेच चालू राहणार? हा संशोधनाचा आणि मनाला वेदना देणारा विषय ठरतो आहे. अठरा वर्षांपर्यंत बालगृहात राहून बाहेर पडणाऱ्या केवळ मुलींच्याच वाटय़ाला हे दु:ख नाही तर मुलांच्याही वाटय़ाला अशाच प्रकारचे दु:ख आहे. अठरा वर्षे पूर्ण झाली की, कोणतेही कौशल्य हातात नसताना त्यांना बालगृह सोडावे लागते. शिक्षण बरे झाले असेल तर ठीक नाहीतर बऱ्याचदा ही मुले हॉटेल, कार्यालये येथे बिगारी कामगार म्हणून राबताना दिसतात. कितीही हुशार असले, शिकले तरीही नोकरी मिळवताना नाव, गाव, पत्ता, नातेवाईक, आधारकार्ड, रेशनकार्ड याची चौकशी केली जाते. ‘मुलगा बालगृहमध्ये राहात होता म्हणजे नक्कीच भानगडीची केस आहे.’ असा विचार करून सहसा कुणी नोकरी द्यायला तयार होत नाही. नशिबाने जरी नोकरीला लागला तरी इतर सहकारी तो बालगृहाममधून आलेला असल्याने त्याला कमी लेखतात. अशाने त्यांच्यात न्यूनगंड निर्माण होतो. कित्येक मुले तर नैराश्याला बळी पडतात. नाही म्हटले तरी बालगृहातील सुरक्षितता आणि अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पूर्ण होत असल्यामुळे तथाकथित सुखी जीवन आतापर्यंत त्यांच्या वाटय़ाला आलेले असते ते १८ वर्षांनंतर अचानक उद्ध्वस्त होते. कोणतेही कौशल्य नसल्याने काही मुले गुन्हेगारीकडे वळतात, तर काही मटका, बुकी, हातभट्टी, जुगाराचा क्लब चालविणे या धंद्यात पडतात. बरेचशे वेश्यांचे दलाल किंवा एजंटही होतात. अर्थात अशा धंद्यामागे कर्ता करविता धनी किंवा मालक वेगळाच असतो. परंतु अशा असहाय्य तरुण मुलांना हेरून त्यांच्या अंगातील रग, शक्तीचा उपयोग ते गुन्हेगारी, खंडणीची प्रकरणे याकामी करून घेतात. अशी ही समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाहेर फेकलेली मुले पोलीस रेकॉर्डवरती येतात आणि मग चांगली नोकरी, व्यवसाय यापासून कायम वंचित राहतात.
एका तुरुंग अधीक्षकाशी बोलताना, जाता-जाता अगदी सहज त्यांनी उल्लेख केला की, आमच्या कारागृहात असणारे अनेक गुन्हेगार पूर्वी बालगृहामध्ये होते. त्यांनी पूर्वी कोणताही गुन्हा केलेला नव्हता, परंतु बालगृहातून बाहेर पडल्यानंतर ते खंडणी, सुपारी देऊन खून, मादक द्रव्याची तस्करी, पत्नीची छळवणूक अशा विविध कारणांनी शिक्षा भोगत होते. अर्थात, काही ठिकाणी या तरुणांची चूक असली तरी अनैतिक धंदे करणाऱ्यांनी या मुलांचा सोयीस्कर उपयोग करून त्यांना सुपारी किलर केले गेले होते.
अनेकदा बालगृहामध्ये प्रेम, आस्था, राग-लोभ यापासून वंचित राहिल्याने संस्थेतून बाहेर पडल्यानंतर कसे वागायचे हेच त्यांना लक्षात येत नाही. कोणी थोडे प्रेम दाखवले तर ते त्यांच्यासाठी आपला जीवदेखील धोक्यात घालायला ते तयार होतात. त्याचाच गैरफायदा समाजातले निष्ठुर राजकारणी वा तथाकथित गुंड-दादालोक घेतात. तसेच पिता, भाऊ, दीर, पती या भूमिका कशा असतात, त्या भूमिकांची कर्तव्ये व हक्क काय आहेत? याचा अनुभवच नसल्याने बऱ्याच वेळेला पत्नीबद्दल संशय, गैरसमज, बाहेरख्यालीपणा यांनाही ते बळी पडतात.
त्यातलाच एक गणू. एड्स जनजागृती प्रबोधन व एड्सग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम करीत असताना, एके दिवशी गणू घाबरत- घाबरतच माझ्याकडे आला. गणूची आई बालकल्याण संकुलाच्या दारातच त्याला व बहिणीला, तो चार वर्षांचा असताना सोडून गेली होती. ती विधवा असल्याने तिला पुनर्विवाह करायचा होता. पण होणाऱ्या नवऱ्याला मुलांची अडचण नको होती. गणू व तिची बहीण बालगृहातच वाढली. १८ वर्षांनंतर गणूची बहीण नियमाप्रमाणे संस्थेतून बाहेर पडली. त्यानंतर दोन वर्षांनी गणू बाहेर पडला. बहिणीचा शोध घेणाऱ्या त्याने खूप प्रयत्न केला. पण तो निष्फळ ठरला. बहिणीला ओळखणाऱ्या एका बाईने ती मुंबईत डान्स बारमध्ये काम करीत असल्याचे सांगितल्याने गणूने मुंबई गाठली. रात्री मुंबईच्या सगळ्या डान्स बारच्या बाहेर तो बहिणीची वाट पाहत बसायचा आणि दिवसा रेल्वे स्टेशनवर हमाली करून पोट भरायचा. नातेवाईकही नसल्याने अखेर निराश होऊन तो पुन्हा कोल्हापूरला आला. कष्टाळू असल्याने छोटी-मोठी कामे करून, दुसऱ्यांची रिक्षा चालवून आपले पोट भरू लागला. पण लग्नासाठी त्याला कुणी मुलगी द्यायला तयार होईना. मुलगी बघायला गेले की तिचे आई-वडील, त्याचे नातेवाईक, गाव, शेती, मालमत्ता याची चौकशी करायचे. ‘मी अनाथ आहे. पण स्वत: कमावतो. मला हुंडा, पैसा-अडका काही नको, तुमच्या मुलीला मी सुखात ठेवीन’ असे कितीही कळकळीने सांगितले तरी कोणीही त्याला मुलगी द्यायला तयार नव्हते. सरतेशेवटी नैराश्यग्रस्त गणूची पावले लैंगिक गरजांसाठी वेश्यावस्तीकडे वळली. शेवटी-शेवटी तर तो कुंटणखान्याच्या मालकिणीचा एजंट होऊन वेश्यांना गिऱ्हाईक पुरवण्याचे काम करू लागला. नंतर अचानक तो वारंवार आजारी पडू लागला. त्याचे रक्त तपासले तेव्हा कळले की तो तो एच.आय.व्ही.चा शिकार झाला होता. औषधोपचारामुळे पाच-सहा महिन्यांमध्ये गणूच्या तब्येतीत बरीच सुधारणा झाली. त्याला आपली उपजीविका चालवण्याइतकी मजुरी मिळू लागली. माझ्याशी बोलताना कायमच नशिबाला दोष देत राहिला. देवाने आम्हाला अनाथ का केले? माझी बहीण जिवंत आहे की नाही, हेही मला समजत नाही. नावाला जरी आई-वडील दिले असते तरी लग्न करून सुखी झालो असतो. आता एकटा जीव सदाशिव. मृत्यूची वाट बघत दिवस ढकलायचे.. असे बरेच गणू या समाजात वावरत आहेत. कारण बऱ्याच मुलांच्या वाटय़ाला अशा प्रकारेच असुरक्षित, घरपण नसणारे जीवन वाटय़ास आले आहे.
मात्र काहींनी आपले आयुष्य खूप चांगल्या प्रकारे मार्गी लावले त्यांचे अनुभव आदर्शवत आहेतच. कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलामध्ये उपअधीक्षक पदावर काम करून निवृत्त झालेल्या व्ही. बी. शेटे यांचे उदाहरण बोलके आहे. वयाच्या चौथ्या वर्षी ते बालकल्याण संकुलात आले. तेथेच वाढले, शिकले. १८ वर्षांनंतर कष्टाने बी.ए.पर्यंत शिक्षण घेऊन बालकल्याण संकुलातच नोकरीला लागले व तेथूनच निवृत्त झाले. संस्थेत वाढलेली मुले जेव्हा संस्थेतच काम करतात तेव्हा त्या मुलाच्या गरजा, त्यांच्या समस्या ते लवकर समजून घेऊ शकतात व तळमळीने काम करू शकतात. म्हणूनच शेटे यांनी आपल्या एका मुलाचे लग्न बालगृहातीलच एका अनाथ मुलीबरोबर अत्यंत थाटामाटात करून दिले. मुलाच्या संसारवेलीवर आता एक फूलही उमलले आहे. पत्नी, सून-मुलगा, नातू असा भरगच्च सुखी संसार बघून समाधान वाटते. आजही ते अनाथ मुलांच्या अडचणीत त्यांच्यामागे उभे राहतात.
अशीच कथा डॉ. सुनीलकुमार लवटे यांची. लहानपणीच बालगृहात दाखल झालेल्या लवटेसरांनी हिंदी विषयात पीएच.डी. करून एका सुप्रसिद्ध महाविद्यालयामध्ये प्राचार्यपदी अत्यंत यशस्वीपणे काम करून आता निवृत्तीनंतर पत्नी, मुले, सुना, नातवंडे यांच्यासह सुखाने जीवन व्यतीत करण्याचा आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. माझा विद्यार्थी विजय सराटे. अनाथ असलेला विजय देवरुखच्या मारुती मंदिरात लहानाचा मोठा झाला. बी.ए. झाल्यानंतर एम.एस.डब्ल्यू.च्या शिक्षणासाठी कोल्हापूरला ‘सायबर’ या संस्थेत दाखल झाला. त्या वेळेला दिवंगत परदेशीसर, सुनीलकुमार लवटे, शेटेसर यांनी त्याला मदत करून त्याची राहण्याची, जेवणाची सोय करून दिली. परंतु, त्याचे राहण्याचे ठिकाण व कॉलेज जवळजवळ १० किलोमीटरवर होते. त्याच्याकडे कोणतेही वाहन तर नव्हतेच पण दररोज बसने येण्या-जाण्याइतके पैसेही गाठी नव्हते. अशा स्थितीत तो माझ्याकडे आला. तेव्हा आवळे नावाच्या गृहस्थांशी बोलले. त्यांनी लगेच आपल्या मृत तरुण मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ विजयला सायकल घेऊन दिली. सायकल प्रदान सोहळा कोल्हापूरच्या कमर्शिअल बँकेत श्यामराव शिंदे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी विजयने केलेल्या भाषणामुळे अनाथांच्या समस्या ऐकून सर्वाचे डोळे पाणावलेच व अनेक जण खडबडून जागेही झाले. विजय, मूळचाच कष्टाळू, सौजन्यशील व अभ्यासू. आपल्या स्वभावाने त्याने कॉलेजमध्ये प्राध्यापकांची मनेही जिंकली. चांगल्या मार्काने तो एम.एस.डब्ल्यू. झाल्यानंतर दोन-तीन ठिकाणी नोकरी करून सध्या मुंबईत विरारच्या संस्थेत (बालगृह व महिलाश्रम) येथे अधिवक्ता म्हणून काम करीत असून, आजूबाजूला असणाऱ्या व स्वयंसेवी संस्थांनी चालवलेल्या बालगृह महिलाश्रम यांचा तो सल्लागार आहे. विजयने बालगृहात वाढलेल्या एका मुलीबरोबर विवाह केला असून, सध्या तो सुखी संसार करतो आहे.
अशीच कथा संभाजी व केरबा यांची. बालगृहातून बाहेर पडल्यावर या दोघा भावांना कोल्हापूरच्या शाहू कॉलेजच्या डॉ. दाभोले यांनी माझ्या आईकडे पाठविले. संभाजीला माझ्या आईने आपला मुलगाच म्हणून वाढविले. माझ्या आईजवळ राहत असताना त्याने आय.टी.आय.चा रेफ्रिजरेशनचा दोन वर्षांचा डिप्लोमा केला व आता एका मोठय़ा दूध संस्थेमध्ये तो नोकरी करीत असून, सुखा-समाधानाने राहतो आहे.
अशी ही मुले अनाथ म्हणून वाढली खरी, पण ज्यांना आधार मिळाला त्यांनी आपले आयुष्य सावरले व आपल्याबरोबर इतर मुलांचेही सावरले. आजच्या स्वातंत्र्य दिनी आपणही शपथ घेऊ या अनाथ मुलांना निदान त्यांच्या अनाथपणाची जाणीव करून देणार नाही. समाजात समावून घेऊ. तरच आपला समाज, आपला देश सशक्त बनेल.
(या लेखातील मुलामुलींची नावे व गावांची नावे बदलली आहेत.)
साधना झाडबुके – sadhana.zadbuke@gmail.com

Concession for students to attend school due to highest temperature in state
विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सवलत… काय आहे शालेय शिक्षण विभागाचा निर्णय?
Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
Law College Student Attendance
विधी महाविद्यालय विद्यार्थी उपस्थिती : ७५ टक्के उपस्थितीच्या नियमाच्या अंमलबजावणीचे आदेश देण्याची न्यायालयाला मागणी
Over thousand children are reunited with their families in a year with help of Railway Security Force
ताटातूट झालेल्या मुलांना पुन्हा मिळालं घर! रेल्वे सुरक्षा दलामुळे वर्षभरात हजारहून अधिक मुलांची कुटुंबीयांशी पुनर्भेट