प्रश्न :ओशो ,

नदी असणं किती विलक्षण आहे,

world penguin day facts in marathi
World penguin day 2024 : पेंग्विन्सदेखील करतात उपवास? जाणून घ्या या समुद्री पक्षांबद्दल रंजक माहिती
sea level rise
समुद्र वाढता वाढता वाढे; आपल्या आयुष्यावर काय परिणाम?
survival of marine species in danger due to ocean warming
विश्लेषण : महासागर तापल्याने प्रवाळ पडू लागलेत पांढरेफटक… जलसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात?
Heat wave in the state know where the heat wave warning is
राज्यात उष्णतेची लाट… जाणून घ्या उष्णतेच्या लाटेचा इशारा कुठे?

जणु तुमच्यासोबत नाचणं, गाणं,

आनंद लुटणं,

मग सागरापर्यंत पोहोचायचंय कुणाला?

कधीकधी मनात आस दाटून येते, पण मला माहीत नाही ती कशासाठी असते ती.

आम्हाला विश्वाच्या जाणिवेत

तुम्ही ओळखाल असं तुम्ही म्हणता

ते ऐकून खूप आनंद होतो.

पण, पुन्हा याचा अर्थ म्हणजेही

माझी कल्पनाच.

आणि कोणाला तिथे जायचंय,

हे आयुष्य विश्वास न बसण्याइतकं

विलक्षण असताना.

की मला खरा मुद्दाच समजत नाहीये का?

समजून घेतलं पाहिजे असं काही आहे का यात? कृपा करून मला उत्तर सांगा.

उत्तर :

माफ कर पण मला वाटतं, तुला यातला खरा मुद्दाच समजत नाहीये. हे आयुष्य सुंदर आहे, हे अस्तित्व विलक्षण आहे, हा क्षण आनंदाने ओतप्रोत भरलेला आहे; पण याहीपेक्षा अधिक असं खूप काही आहे. ही तर केवळ सुरुवात आहे आणि सुरुवातीलाच असं थांबणं याहून दुसरं दुर्दैव नाही. आणि कुठे तरी आत, खोलवर तुलाही हे जाणवतंय; नाहीतर हा प्रश्नच तुला पडला नसता.

तू म्हणतो आहेस, ‘‘नदी असणं किती विलक्षण आहे,  पण सागरापर्यंत पोहोचायचं कोणाला? मग मुळात हा प्रश्न तुझ्या मनात उमटलाच का? वरकरणी असं वाटतंय की तुला सागरापर्यंत पोहोचायचंच नाहीये- ही नदी सुंदर आहे, तिचं गाणं सुंदर आहे, तिचं नृत्य सुंदर आहे. पण ती समुद्रात विरघळते ना, तेव्हा ते अधिक मोठय़ा गाण्यात विरघळणं असतं. ती समुद्रात मिसळते, तेव्हा वैश्विक अशा गाण्यात, शाश्वत अशा नृत्यात मिसळणं असतं. नद्या येतात आणि जातात, सागर मात्र कायम असतो. आणि नदीचं ते नृत्य, तिचं गाणं, तिचं सौंदर्य समुद्रामुळेच तर असतं. ती नाचते, आनंदी होते; कारण प्रत्येक क्षणाला ती समुद्राच्या जास्त जवळ जात असते. हीच नदी जर वाळवंटात लुप्त होणार असेल, तर तिचं नृत्य नाहीसं होईल, तिचं गाणं थांबेल. ते एक मरणच असेल.

नदी अतीव सुखात असते, कारण ती समुद्राला मिळणार आहे हे तिला माहीत असतं. समुद्राशी पोहोचली की, नदी नाहीशी झाल्यासारखी वाटते खरी, पण खरं तर तिचे काठ तेवढे नाहीसे झालेले असतात- नदी असतेच. आणि हे काठ म्हणजे तरी काय, बंधनच. नदी नाचत होती, पण तिच्या पायात साखळदंड होते. ते काठ म्हणजे तिच्यासाठी तुरुंगच होता. नृत्य सुरूच राहील, उलट ते अधिक मुक्त होईल- ते इतकं विस्तीर्ण असेल की, तुला ते दिसणारही नाही कदाचित, कारण नदी कधीच नाहीशी होणार नाही, तिचा समुद्र होणार आहे..

तू महत्त्वाचा प्रश्न विचारला आहेस. कारण, प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला हा प्रश्न पडतो. सुरुवातच इतकी सुंदर असते की, बहुतेकांना वाटतं ते पोहोचलेच आहेत जिथे पोहोचायचं होतं तिथे आणि आता पुढे जाण्याची गरजच नाही. प्रत्येक आरंभाचं रूपांतर कधीही थांब्यात करायचं नाही, तर त्यातून आणखी नवीन आरंभ करायचा हे तुला लक्षात ठेवावं लागेल. आणि प्रवास तर नेहमी अमर्यादच असतो. त्यामुळे तुला जेव्हा केव्हा वाटेल की हीच ती थांबण्याची जागा, तेव्हा तू चुकत असशील, कारण अस्तित्व कुठेही थांबत नाही. ते सतत उमलत, पुढे जात राहतं. त्याला ना मर्यादा असते, ना सीमा! हे आपण नदीच्या दृष्टिकोनातून बघितलं- आणि तू तर नदी नाहीस, तू केवळ नदीकडे बघत आहेस- ती समुद्रात नाहीशी झाल्यासारखी वाटतेय. पण तू याच्या उलटही म्हणू शकतोस- समुद्र नदीत नाहीसा झालाय.

या देशातल्या महान द्रष्टय़ांपैकी एक कबीर. त्यांच्या तरुणपणी त्यांनी प्रथमच अनंतात विरघळणं, मिसळणं अनुभवलं, तेव्हा एक छोटीशी कविता केली- त्यातल्या दोन ओळी अशा आहेत :

दवबिंदू नाहीसा झाला महासागरात.

कबीर आता नाहीयेत. कबिरांनी शोधाचा आरंभ केला होता, त्यांना जे शोधायचं होतं सापडलंही; पण शोधणारा हरवून गेलाय. या ओळी सुंदर आहेत पण कबीर शेवटच्या घटका मोजत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या मुलाला, कमालला, बोलावलं आणि त्याला म्हणाले, ‘‘तू त्या दोन ओळींमध्ये बदल कर. मी खूप लहान होतो तेव्हा आणि माझ्यासाठी तो अनुभव नवीनच होता. ‘‘दवबिंदू महासागरात नाहीसा झाला, हे मी लिहिलं, पण मी लिहिलं होतं त्याच्याविरुद्ध काही तरी मला या पिकल्या वयात दिसतंय. तेव्हा त्यात बदल कर. लिही :

महासागर नाहीसा झाला

दवबिंदूमध्ये.’’

दोन्ही सत्य आहेत पण त्यातल्या दुसऱ्या ओळीला अधिक गहिरा ध्वन्यार्थ आहे. मानवच ईश्वराच्या शोधात असतो असं नाही. मानवच ईश्वरात विलीन होतो असं नाही;  ईश्वरही मानवाच्या शोधात असतोच. आणि जेव्हा ही भेट होते, तेव्हा असं म्हणणं अधिक अर्थपूर्ण होतं की, ईश्वर मानवात नाहीसा झाला. तुला याची जाणीव आहे; अन्यथा तुझ्या मनात हा प्रश्नच आला नसता.

महान सम्राट अकबराने त्याच्या ‘अकबरनामा’ या आत्मचरित्रात लिहिलेली एक घटना तुझ्या या प्रश्नाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. अकबर शिकारीसाठी जंगलात गेला होता आणि रस्ता चुकला. सूर्यास्त होत होता. तो एका झाडाखाली नमाज पढण्यासाठी बसला. नमाज सुरू असताना एक तरुण मुलगी त्याच्या बाजूने पळत गेली, त्याला जवळपास धक्का देऊन. तो काही बोलू शकला नाही पण अतिशय संतापला. पहिली गोष्ट म्हणजे नमाज सुरू असताना कोणाचंही लक्ष विचलित करायचं नसतं. आणि तो सामान्य नव्हताच, तो सम्राट होता. अकबराची नमाज अदा करून झाली. तो त्या मुलीच्या परतीची  वाट बघत बसला. ती परत आली. अकबराचा राग अजून शमलेला नव्हता. तो म्हणाला, ‘‘तू तर खूपच उद्धट आणि असंस्कृत दिसतेस. तुला दिसलं नाही मी नमाज अदा करत होतो ते आणि मी सम्राट आहे या देशाचा.’’ ती मुलगी म्हणाली, ‘‘मला माफ करा पण मला विचाराल तर मी तुम्हाला बघितलंच नाही. माझा तुम्हाला धक्का लागला असेल पण तुमचा स्पर्श मला झाला की नाही हेही मला आठवत नाही. कारण, मी माझ्या प्रियकराला भेटायला निघाले होते.  त्याच्या स्मृतींनी मला असं काही भारून टाकलं होतं की, मी माझ्यात नव्हतेच. मी काही जाणूनबुजून तुमचं चित्त विचलित केलं नाही. पण मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. मी माझ्या सामान्य प्रियकराला भेटायला निघाले होते आणि तुम्ही जगातल्या सर्वात महान प्रियकराची, देवाची, प्रार्थना करत होतात, तरीही तुमचं चित्त विचलित झालं, तुम्ही रागावलात, मला शिक्षा करण्यासाठी माझी वाट बघत बसलात. ती प्रार्थना नव्हतीच. नाही तर तुमच्या लक्षातच आलं नसतं, इथून कोणी गेलं हे, तुम्हाला त्याचा धक्का लागला हे. तुम्ही त्या सर्वोच्च प्रियकरासोबत खोल हरवून गेला असतात.’’ अकबर समजूतदार सम्राट होता. तो  मुलीला म्हणाला, ‘‘तुझं बरोबर आहे. तुझं प्रेम खरं आहे. माझी प्रार्थना खोटी,केवळ दिनचर्या.’’

जेव्हा नदी गात, नाचत निघते, तेव्हा ती तिच्या प्रियकराकडे, सागराकडे निघालेली असते. या क्षणाचं सौंदर्य अनुभवण्यात चूक काहीच नाही. पण लक्षात ठेव, हे सौंदर्य वाढत गेलं पाहिजे. आणि आत खोलवर तुझीही हीच इच्छा आहे. म्हणूनच तू म्हणतो आहेस, ‘‘पर्वा कोणाला आहे? कोणाला सागरापर्यंत पोहोचायचं आहे? कधी कधी खूप आसही वाटते.’’ ही आस कशासाठी आहे?- कारण हे नृत्य आणि आनंद सागरासाठीच आहे हे तू लक्षात घेत नाही आहेस. म्हणूनच तुला कशाची आस लागलीये हे तुला कळत नाहीये. ती तुझ्या हृदयातच आहे- सागराची आस!

तुला असं वाटतं का की, ही सीमा आहे? तुला वाटतं हे एवढंच आहे? तुला अचूक माहीत आहे सगळं. तू कितीही दडपत राहिलास, तरी तुझ्या आत्म्याला माहीत आहे की हे एवढंच नाही. हा केवळ आरंभ आहे- याला अंत समजू नकोस. खरं तर, अंत असा काही नसतोच. ही नेहमी सुरुवातच असते, अधिकाधिक उंची गाठायची, अधिकाधिक खोली गाठायची, अधिकाधिक जवळ पोहोचायचं. पण हा नेहमी आरंभच असतो. आणि हीच उदात्तता आहे आयुष्याची- तुम्ही कधीही पूर्णविरामाशी पोहोचत नाही, कारण पूर्णविराम म्हणजे मृत्यू. आयुष्यात स्वल्पविराम, अल्पविराम येऊ  देत कितीही पण पूर्णविराम नको कधीच. आयुष्य खुलं ठेव नेहमी. मग तुझं नृत्य अधिक समृद्ध होईल, गाणं अलौकिक होईल.

तुला यातली मेख समजत नाही आहे. तू किती छोटय़ा गोष्टींत समाधान मानतोस. एक आध्यात्मिक शोधक काहीशा विचित्र समतोलात कायम राहतो. त्याला जे काही मिळतं त्यात तो समाधानी असतो, तरीही आणखी मिळवण्यासाठी असामाधानाची भावना तो सोडत नाही. हा मुद्दा समजून घेणं कठीणच आहे. कारण, तो विसंगत भासतो. आपल्याला वाटतं की एक तर कोणी समाधानी असू शकतो किंवा असमाधानी. अर्थात आध्यात्मिक शोधक हे दोन्ही असतो. आयुष्याने जे काही दिलं आहे त्यात तो समाधानी असतो पण त्यापेक्षा खूप काही आणखी आहे हे माहीत असल्याने तो असमाधानीही असतो. भूतकाळासाठी समाधानी आणि भविष्यकाळासाठी असमाधानी. म्हणूनच, त्याला प्रत्येक क्षणाला काही तरी नवीन गवसत राहतं.

भाषांतर – सायली परांजपे

( ओशो -‘द रेझर’स् एड्ज्’ या पुस्तकातून साभार, सौजन्य -ओशो टाईम्स  इंटरनॅनशल / ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन)