माणूस कोणाच्या तरी नियंत्रणात असेल तर त्याच्यावर कसलीही जबाबदारी उरत नाही. मग लोकांना त्यांच्या स्वत:च्या खेळकरपणाचीही भीती वाटू लागते, ‘नियंत्रण हरवण्याची’ भीती वाटू लागते. तुमच्यातलं मूल मेलं की तुमच्यातली विनोदबुद्धी नष्ट होऊन जाते : तुम्ही मनापासून हसूच शकत नाही, तुम्ही आयुष्यातल्या छोटय़ा गोष्टींचा आनंदच घेऊ शकत नाही. तुमचं आयुष्य विस्तारण्याऐवजी आक्रसत जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माणूस चमत्कारिकरीत्या आजारी असतो : त्याला लोकांवर नियंत्रण मिळवायचं असतं. लोकांवर नियंत्रण ठेवल्यामुळे त्याचा अहंकार सुखावतो. तो कोणी तरी विशेष आहे असं त्याला वाटू लागतं- आणि दुसरीकडे त्याला स्वत:लाही कोणी तरी नियंत्रित केलेलं हवं असतं, कारण, तो कोणाच्या तरी नियंत्रणात असेल तर त्याच्यावर कसलीही जबाबदारी उरत नाही. या सगळ्या कारणांमुळे खेळकरपणा गुदमरून जातो, अगदी सुरुवातीच्या टप्प्यावरच तो खुडला जातो आणि मग लोकांना त्यांच्या स्वत:च्या खेळकरपणाचीही भीती वाटू लागते, ‘नियंत्रण हरवण्याची’ भीती वाटू लागते.

ही भीती म्हणजे काय असते? ही भीती इतरांकडून रुजवली जाते. कायम नियंत्रणात राहा, कायम शिस्तीत राहा, तुमच्याहून मोठय़ांचा नेहमी आदर ठेवत राहा. धर्मगुरू, आई-वडील, शिक्षक जे काही सांगतील त्याचं पालन करा- तुमच्यासाठी योग्य काय हे त्यांना बरोबर कळतं. तुमच्या स्वभावाला त्याचं म्हणणं मांडण्याची परवानगी कधीच मिळत नाही. हळूहळू तुम्ही तुमच्यात मरून गेलेलं मूल तुमच्यासोबत बाळगायला लागता. तुमच्यातलं मूल मेलं की तुमच्यातली विनोदबुद्धी नष्ट होऊन जाते : तुम्ही मनापासून हसूच शकत नाही, तुम्ही आयुष्यातल्या छोटय़ा गोष्टींचा आनंदच घेऊ शकत नाही. तुम्ही इतके गंभीर होऊन जाता की, तुमचं आयुष्य विस्तारण्याऐवजी आक्रसत जातं.

ख्रिश्चन धर्म हा जगातला सर्वात मोठा धर्म का आहे याचा विचार मी नेहमी करीत आलो आहे. यामागचं कारण क्रॉस आणि सुळावर चढलेला येशू आहे अशा निष्कर्षांप्रत मी पुन:पुन्हा आलो आहे. किती दु:खद, किती गंभीर; साहजिक आहे. सुळावरचा येशू आणि आपल्यात काही तरी साम्य आहे, असं लक्षावधी लोकांना वाटत आलं आहे. ख्रिश्चन धर्माचा प्रसार बराच अधिक झाला याचं कारण आहे त्यातलं गांभीर्य, त्यातलं दु:ख. आपली चच्रेस आणि मंदिरं, मशिदी आणि सिनेगॉग यातलं गांभीर्य कमी झालं तर मला आवडेल. लोक फक्त दु:खं व्यक्त करण्यासाठी तिथे जातात. काही तरी मागायला तिथे जातात. ही स्थळं आणखी खेळकर झाली पाहिजेत. हास्याने व आनंदाने भरून गेली पाहिजेत. त्यामुळे मानवतेचा आत्मा अधिक निकोप, अधिक सर्वागीण, अधिक एकात्मिक होईल. तुमचा क्रॉस खांद्यावर बाळगायची काही गरज नाही. तो टाकून द्या खाली. मी तुम्हाला शिकवण देईन ती नृत्य करण्याची, गाण्याची, खेळण्याची.

आयुष्य, आयुष्याचा प्रत्येक क्षण एक मौल्यवान निर्मिती झाली पाहिजे. तुम्ही काय निर्माण करता याला महत्त्व नाही- तो केवळ समुद्रकिनाऱ्यावरचा वाळूचा किल्ला असेल- पण तुम्ही जे काही कराल ते तुमच्यातल्या खेळकरपणातून आणि आनंदातून उमललं पाहिजे. तुमच्यातलं लहान मूल कधीच मरू देऊ नका. त्याचं पालनपोषन करत राहा आणि ते नियंत्रणाबाहेर वगरे जाईल अशी भीती कधीच बाळगू नका. ते कुठे जाईल? आणि ते नियंत्रणाबाहेर गेलं तरी काय बिघडतं? नियंत्रणाबाहेर जाऊन तुम्ही काय करू शकता? तुम्ही वेडय़ासारखं नाचू शकता, वेडय़ासारखं हसू शकता; तुम्ही वेडय़ासारख्या उडय़ा मारू शकता किंवा पळू शकता. लोकांना वाटेल तुम्हाला वेड लागलंय असं, पण ती त्यांची अडचण झाली. जर तुम्हाला यातून आनंद मिळत असेल, तुमच्या आयुष्याला यातून पोषण मिळत असेल, तर काहीच बिघडत नाही. बाकीच्या जगासाठी ती अडचण असली तरी त्याने काहीही बिघडत नाही.

ओशो, द रिबेलियस स्पिरिट, टॉक #१७

************************************************************************************************************

आपण सगळेच अपरिचित

तुम्ही एकटेच जगत असता हे सत्य तुम्ही स्वीकारलंच पाहिजे. तुम्ही गर्दीत असलात तरी जगत असता ते एकटेच. तुम्ही तुमच्या पत्नीसोबत असाल, प्रेयसीसोबत असाल, मित्रासोबत असाल, पण ते त्यांच्या एकटेपणात एकटे आहेत आणि तुम्ही तुमच्या एकटेपणात एकटेच आहात आणि दोन माणसांचं एकटेपण एकमेकांना स्पर्श करीत नाही.

तुम्ही एखाद्यासोबत वीस वर्ष राहा, तीस वर्ष राहा, पन्नास वर्ष राहा- त्याने काही फरक पडत नाही, तुम्ही एकमेकांसाठी अपरिचितच असता. तुम्ही कायम एकमेकांसाठी अनोळखीच राहणार. आपण सगळे अनोळखी आहोत हे सत्य स्वीकारा; तुम्ही कोण आहात हे आम्हाला माहीत नाही आणि मी कोण आहे हे तुम्हाला माहीत नाही. मी कोण आहे हे मला स्वत:लादेखील माहीत नाही, तर तुम्हाला कसं माहीत असेल? पण लोक गृहीत धरतात की, पत्नीने पतीला ओळखलं पाहिजे, पती असं गृहीत धरतो की, पत्नीने पतीला जाणून घेतलं पाहिजे. प्रत्येक जण असा वागतो की, सगळ्यांना मन वाचण्याची कला अवगत आहे आणि त्याने त्याच्या गरजा, त्याच्या अडचणी बोलून दाखवण्यापूर्वीच समोरच्याने त्या ओळखल्या पाहिजेत. त्याने काही तरी माहीत करून घेतलं पाहिजे, तिने काही तरी जाणून घेतलं पाहिजे- त्यांना काही तरी माहीत असलं पाहिजे. हे सगळंच निर्थक आहे.

तुम्हाला कोणीही ओळखत नाही, तुम्ही स्वत:देखील नाही. त्यामुळे एखाद्याने तुम्हाला जाणून घ्यावं, अशी अपेक्षा ठेवू नका. हे मूळ स्वभावातच नाही. आपण सगळे अनोळखी आहोत. कदाचित आपण योगायोगाने भेटलो आणि सोबत आहोत; पण आपला एकटेपणा त्यात आहेत. हे विसरू नका, कारण, तुम्हाला यावर काम करावं लागणार आहे. ते केलं तरच तुमची सुटका आहे, तरच तुम्ही मुक्त होणार आहात; पण तुम्ही याच्या बरोबर उलट वागत आहात – तुम्ही एकटेपणा विसरण्याचा प्रयत्न करीत आहात. बॉयफ्रेण्ड, गर्लफ्रेण्ड; सिनेमाला जाणं, फुटबॉल मॅच बघायला जाणं; गर्दीत हरवून जाणं, डिस्कोत जाऊन नाचणं, स्वत:ला विसरून जाणं, दारू पिणं, अमली पदार्थाची नशा करणं. काहीही करून हा एकटेपणा मनाच्या जागृतावस्थेपर्यंत पोहोचणार नाही यासाठी आटापिटा आणि तिथेच तर सगळी मेख आहे.

तुम्हाला तुमचा एकटेपणा स्वीकारावाच लागतो. तो तुम्ही काहीही केलं तरी टाळू शकत नाही आणि त्याचं स्वरूप बदलण्याचाही कोणताही मार्ग नाही. ते तुमचं खरंखुरं वास्तव आहे. हा एकटेपणा म्हणजेच तुम्ही आहात.

ओशो, फ्रॉम अनकॉन्शसनेस टू कॉन्शसनेस

सौजन्य : ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशन

ओशो टाइम्स इंटरनॅशनल

www.osho.com

भाषांतर – सायली परांजपे

मराठीतील सर्व ओशो म्हणे.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Osho philosophy part
First published on: 08-12-2018 at 00:10 IST