scorecardresearch

Premium

पालकत्व : आईची शाळा

मूल पाच वर्षांचं होईपर्यंत त्याचं अधिकाधिक शिक्षण घरातच ‘आईच्या शाळेत’ होत असतं.

पालकत्व : आईची शाळा

तृप्ती जोशी-कुलश्रेष्ठ
मूल पाच वर्षांचं होईपर्यंत त्याचं अधिकाधिक शिक्षण घरातच ‘आईच्या शाळेत’ होत असतं. आईच्या वागण्यातल्या लहानमोठय़ा गोष्टी मुलं टिपत असतात, लक्षात ठेवत असतात. हाच काळ असतो त्यांना ‘सशर्त लाड’ केले जाण्याची सवय लावण्याचा, सर्व पदार्थ खायला शिकवण्याचा, घरातल्या कामांची ओळख करून देण्याचा आणि लहानमोठय़ांचा आदर करायला शिकवण्याचाही..

बाळ झालं की मार्गदर्शन करायला आजी, आई, सासू, वेळोवेळी डॉक्टर सगळेच असतात. हळूहळू, सहा महिन्यांनी हा टप्पा संपत जातो. बाळंतपणापासून सगळं सुखरूप पार पडावं म्हणून जमलेला सारा गोतावळा आपापल्या पूर्वायुष्यात परत जातो. बाबा ऑफिसमध्ये मग्न होतात, आईही ऑफिसला जाते; पण तिचं स्वतंत्र आईपणही सुरू होतंच. मग सहा महिन्यांच्या बाळाचा प्रवेश होतो तो आईच्या शाळेत!

abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
farah khan reacts to troll who criticised her
“गणपतीसमोर चपला घालू नकोस…”, ट्रोलरच्या कमेंटला उत्तर देत फराह खान म्हणाली…

‘शाळा म्हणजे शिकणं’ असं समीकरण आपल्या मनात घट्ट असल्यामुळे मी पहिल्या पाच वर्षांसाठी नाव दिलं, ‘आईची शाळा’. पूर्वी ही आई-आजी-आजोबा-आत्या-काका-काकू अशा सर्वाची शाळा असायची. पण आता बहुतांशपणे ती ‘आईची शाळा’च उरली आहे. इतक्या वर्षांच्या समुपदेशनाच्या अनुभवात मला बऱ्याच पालकांकडून खूप नवनवीन शिकायला मिळालं. ती उदाहरणंही पाहाण्यासारखी.

‘आईच्या शाळे’चं उद्दिष्ट असतं समाजाचे नियम बालकाला शिकवणं, शारीरिक क्षमता तयार करणं, स्वावलंबन शिकवणं आणि मुख्य म्हणजे समाजात मिसळण्यासाठी तयार करणं. हे सारं ऐकायला सोपं आणि नेहमीच्या जगण्यात स्वाभाविक असल्याचं वाटतं; पण अवघड काम असतं ते. कारण संवाद साधायला आवश्यक असणारी भाषाच आधी बालकाला येत नसते. त्यामुळेच आई आणि मुलांमध्ये एक वेगळी भाषा तयार होते.

अबोलीची ‘माऊ’ ऊर्फ मायरा सहा महिन्यांची झाली. ‘आता तू आरामात एकटी तिला सांभाळू शकशील,’ असं म्हणून आई आणि सासू निघून गेल्या. अबोलीलाही वाटलं, की जमून जाईल आपल्याला. पण मायराला आतापर्यंत सतत सगळय़ांमध्ये राहायची सवय झाली होती. त्यामुळे सर्व जण निघून गेल्यावर आता आजूबाजूला कोणी दिसलं नाही, की ती कावरीबावरी व्हायची आणि रडायची. अबोलीची खूपच धावपळ व्हायची. मायरा झोपल्यावर किती कामं करणार आणि तिची झोपही चिमणीची. मग हळूहळू अबोलीनं मायराला एकटी असताना थोडी बालगीतं ऐकायला लावून दिली. मधूनच स्वयंपाकघरातून ती ‘आई आहे’ अशी हाक देऊन मायराला आश्वस्त करायची. मायराची तिच्या खेळण्यांशी मैत्री करून दिली. या ठिकाणी अबोलीनं मायराला परिस्थितीशी जुळवून घेण्याचं- म्हणजेच समायोजनाचं अप्रत्यक्ष प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. बहुतेक वेळा पालक अशा रडणाऱ्या बाळाला शरण जातात आणि बाळाजवळ कुणीतरी बसेल, त्याच्याशी कुणीतरी खेळेल, अशी सोयही करून देतात. अबोलीनंही असं केलं असतं, तर त्यातून परिस्थितीशी मिळतंजुळतं घेण्याचा मायराचा पहिला धडा राहूनच गेला असता.

हल्ली या पहिल्या काही वर्षांत प्रत्येक मूल त्याच्या आई-बाबांसाठी ‘प्रिन्स’ किंवा ‘प्रिन्सेस’ असतात. त्यामुळे त्याचा किंवा तिचा शब्द यायचा अवकाश, ती मागणी पूर्ण केली जाते. शिवाय सध्याच्या काळात घरात कमावणारे जास्त आणि अवलंबून असणारे कमी अशी परिस्थिती अनेक मध्यमवर्गीय घरांतही आहे. त्यामुळे आई-बाबा एखाद्या गोष्टीला नाही म्हणाले, की दोन्ही बाजूचे आजी-आजोबा आपला बटवा उघडून नातवंडांना वाट्टेल ते घेऊन द्यायला तयार असतात. हळूहळू मुलाला हे आपले लाड नसून तो आपला हक्कच आहे, असं वाटायला लागतं. ती धारणा हळूहळू पक्की होते. लहानपणीच्या सगळय़ा मागण्या या तुलनेत कमी खर्चीक असतात. पण जसजसं मूल मोठं होतं तसतशा त्यांच्या मागण्यांचा आर्थिक बोजा वाढत जातो आणि पालकांसाठी ती डोकेदुखी ठरायला सुरुवात होते. यात बहुतांश वेळा महागडे व्हिडीओ गेम, लॅपटॉप, विशिष्ट मोबाइल सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, बाइक आणि पॉकेटमनी या गोष्टी असतात. किशोरवयीन अवस्थेत मुलांनी या गोष्टी मागितल्या की संघर्ष सुरू होतो, पण त्या वेळी पालक हे ठार विसरून जातात, की हा जो मागण्यांचा वटवृक्ष फोफावला आहे, त्याचं बीज आपणच कळत-नकळत पेरलं आहे आणि त्याला खतपाणीही घातलं आहे. त्यामुळे ‘आईच्या शाळे’त असताना मुलांच्या गरजा पूर्ण कराव्यात, पण वाट्टेल त्या मागण्या नाहीत, हे लक्षात घेण्याची गरज आहे. तसंच हेच वय असतं, जेव्हा त्यांना वाटाघाटीची कौशल्यं शिकवावी लागतात. जाहिरातीसारखं ‘अटी व शर्ती लागू’ हे मुलांना पहिल्यापासून सांगावं. सईच्या घरी रोज जेवणात असणारे सगळे पदार्थ, भाज्या खाणं सक्तीचं आहे. सईच्या ते अंगवळणी पडलं आहे. कारण रोज नीट जेवण केलं आणि भाज्या खाल्ल्या तर रविवारी तिला आवडणारे पिझ्झा, मॅगी, पाणीपुरीसारखे चटपटीत पदार्थ मिळतात हे तिला उमगलं आहे. आपण विनाअट प्रेम मुलांना द्यायचं म्हणून असो, की आपल्याकडे खूप आहे म्हणून ‘त्यांना नाही द्यायचं तर कुणाला द्यायचं’ या कारणासाठी असो, पण वाट्टेल ते लाड पुरवले जातात. त्यामुळे काहीही केलं आणि कसंही वागलं तरी सर्व मिळेल हा समज लहान वयातच मुलांमध्ये दृढ होतो. त्यांना या भ्रमातून बाहेर काढण्याची गरज असते आणि त्यासाठी ‘सशर्त लाड’ ही गोष्ट लहान वयातच रुजवली तर मोठेपणी उपयोगी पडते. कारण जगात विनाशर्त असं काहीच कुणालाही मिळत नसतं.

‘आईच्या शाळे’तला आणखी एक महत्त्वाचा धडा म्हणजे स्वत:च्या धारणा मुलांमध्ये रुजवण्यात होणाऱ्या गफलती. एकदा डोंबिवली येथे ‘भातुकली’चं खूप छान प्रदर्शन भरलं होतं. कल्पना अशी होती, की तिथे मातीचे, पितळय़ा-तांब्याचे आणि स्टीलचे खूपसे भातुकलीचे संच होते. त्या मोठय़ा सभागृहात मुलांना भातुकलीशी खेळता येणार होतं. माझ्या मुलीच्या एका मित्राच्या आईनं त्याला सांगितलं, ‘तू काय मुलगी आहेस का भातुकली खेळायला?’ त्यामुळे मुलामध्ये एक चुकीचा संस्कार रुजला. ही धारणा केवळ भातुकलीपुरती उरत नाही, तर ‘मुलींची कामं-मुलांची कामं’, ‘मुलींच्या क्षमता-मुलांच्या क्षमता’ अशा पातळीवर तो चुकीचा विचार पोहोचतो. मग त्यातून अनेक समस्या निर्माण होतात. याउलट दुसऱ्या एका मित्राच्या आईनं आपल्या मुलाला लहानपणापासून शेजारच्या मुलीबरोबर भातुकली खेळताना कधीच अडवलं नाही. त्यामुळे मुलगा-मुलगी भेदाचा चुकीचा संस्कार त्या मुलावर झाला नाही. पुढे काही वर्षांनी जेव्हा करोनाकाळात कणीक तिंबण्याची वेळ आली, तेव्हा त्या मुलाला त्यात कमीपणा वाटला नाही. उलट त्यातून घराला मदतच झाली. तीच गोष्ट मुलांना बाहुली देण्याबाबत असते. मुलींनी बाहुलीशी खेळावं आणि मुलानं गाडीशी असं आपणच ठरवून टाकतो आणि तसंच पूरक वातावरण तयार करतो. मानसशास्त्राच्या एका प्रयोगामध्ये एका दहा महिन्यांच्या मुलासमोर आणि मुलीसमोर गाडी आणि बाहुली ठेवण्यात आली. दोघांचंही दोन्ही खेळण्यांसाठी असलेलं आकर्षण हे सारखंच होतं. मुलगा आणि मुलगी हा भेद त्यात दिसला नाही, असा निष्कर्ष त्यातून निघाला. खेळण्यांमधला लिंगभेद हा मुलांची कामं आणि मुलींची कामं या पातळीवर पोहोचतो आणि मोठं होऊन लग्न झाल्यावर ते नवरा-बायकोतल्या संघर्षांचंही कारण ठरू शकतं. त्यामुळे आजही भातुकलीचा खेळ लहानपणापासून मुला-मुलींना आवर्जून खेळायला द्यायला हवा.

मुलगा आणि मुलगी यांच्यातला भेद ही एकच नाही, तर अशा प्रकारच्या अनेक धारणा आपण मुलांमध्ये नकळत रुजवत असतो. पहिल्या पाच वर्षांत मुलांसाठी आई-बाबा म्हणजे सर्वस्व असतं. त्या काळात तुम्ही जे बोलाल त्याला मुलं प्रमाण मानतात. अंधार झाला, की आपल्या सोयीसाठी आपण मुलाला ‘अंधारात बागुलबुवा आहे’ असं सांगतो. एकदा नाही, तर अनेकदा सांगतो. मग ती भीती त्याच्यात रुजली, की त्याला पुढे थोडा मोठा झाल्यावर ‘घाबरट’ म्हणायला सुरू करतो.

या वर्षांमध्ये मुलांना आपण काय देतो याबाबत पालकांनी आणि प्रामुख्यानं आईनं खूपच जागरूक राहिलं पाहिजे. आपली आई आपल्या घरात स्वयंपाक किंवा इतर कामं करण्यासाठी येणाऱ्यांशी कशी वागते, यावर मुलांचं बारकाईनं लक्ष असतं. तुम्ही त्यांना फक्त एक ‘कामगार’ म्हणून बघता, की एक माणूस म्हणून त्यांचा आदरही करता हे मुलं शिकत असतात. आनंदची आई गुढीपाडव्याला स्वत:च्या घराबरोबरच धुणीभांडी करण्यासाठी येणाऱ्या मावशींसाठीही एक श्रीखंडाचा डबा आणून त्यांना द्यायची. त्या मावशींनी कधी सुट्टी घेतल्यावर तिची तारांबळ उडायची, पण ‘आपल्याला लागते तशीच सुट्टी त्यांनाही लागते’ हे सहज जाताजाता आनंदला सांगून आई एक संस्कार करायची. आपल्या हाताखालच्या माणसांशी कसं वागावं याचं हे एक प्रकारचं प्रशिक्षण आहे. लक्षात घ्या, ‘लोकांना सन्मानानं वागवलं पाहिजे,’ ही धारणा या काळात मुलांमध्ये रुजते. मानसशास्त्राच्या एका प्रयोगात आयुष्यात शक्य तितक्या मागे जाऊन ‘सर्वात पहिली लहानपणीची आठवण काय,’ असं विचारलं गेलं, तेव्हा अनेकांच्या आठवणी या ते अडीच तीन वर्षांचे असतील त्या वेळच्या होत्या असं आढळून आलं. त्यामुळे ‘या वयातल्या मुलांना काय लक्षात राहाणार आहे?’ असं समजून त्यांच्यासमोर वाट्टेल तसं वागून चालणार नाही.

मुलांना आवडीनं सगळं खायला शिकवणं हे मोठं प्रशिक्षण देण्याची हीच योग्य वेळ असते. मुळात हल्ली अनेक मुलं बऱ्याचशा भाज्या खात नाहीत म्हणून आपल्याही लहान बाळाला ‘सगळय़ा भाज्या खायच्या हां..’ असं उगाच म्हणून भाज्या खाणं म्हणजे काही तरी विशेष आहे असं बिंबवण्याची गरज नाही. मूल घरात जे मिळेल ते खात असतं. त्यामुळे त्याचं जेवण सुरू झालं की रोज वेगवेगळय़ा भाज्या असतील तर ते मूल आपोआपच आई-वडिलांबरोबर त्या सर्व भाज्या खायला शिकतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणून आपण काय जेवत आहोत याबाबत मुलांमध्ये रस निर्माण करणं. टीव्ही बघत खाऊ घालणं हा खूप घातक प्रकार आहे. त्यातून मुलाला आपण काय खात आहोत हेच नीट समजत नाही.

याउलट माझी दीपाताई तिच्या मुलाला- चिन्मयला खाऊ घालताना तो पदार्थ कसा तयार केलाय हे खूप रंगवून सांगायची. म्हणजे आधी तेल गरम केल्यावर वाफ कशी दिसते, मग तेलात मोहरी टाकल्यावर ती कशी तडतडली, वगैरे. त्यातून त्या पदार्थाचा किंवा भाजीचा रंग, रूप, रस याबद्दल चिन्मयच्या मनात एक रसना जागृत व्हायची. त्यामुळे चिन्मयचं पोषण नीट व्हायचंच, शिवाय कुठेही गेला तरी ‘ही भाजी आवडत नाही’ वगैरे त्रासही नसायचा. टीव्ही लावून जेवण करणाऱ्या मुलांचं पोट भरत असेल, पण त्यांना जेवणात रस निर्माण होत नाही. ही मुलं पुढे जेवायला खूप त्रास देतात आणि त्यांच्या पालकांचा वेळ मुलानं नीट खावं यातच जातो, ती एक समस्या तयार होते, असा अनुभव अनेक पालक सांगतात. मग अभ्यासाकडे लक्ष देण्यात वेळ कमी पडतो. खाण्याबरोबरच पुस्तकं वाचणं, व्यायाम यांची आवडही अशीच रुजवता येते.

एकुलतं एक मूल असण्याचं प्रमाण जसजसं वाढत आहे, तसतसं मूल हे कुटुंबाच्या केंद्रस्थानी होण्याचं प्रमाणही वाढत आहे. अशा वेळी घरी आलेल्या एखाद्या नातेवाईकानं काही छोटंसं काम सांगितलं, तर ही मुलं टाळाटाळ करतात, स्पष्ट नकार देतात, असं खूप घरांत दिसतं. आई-बाबाही लाडानं ‘तो असाच आहे’ असं कौतुकानं सांगतात. ही मुलं पुढे स्वत:ची कामं करायलाही नाही म्हणतात. स्वावलंबनाची ओळख करून द्यायला आपली खेळणी उचलणं, भाजी आवरायला मदत करणं, कपडय़ांच्या घडय़ा करायला मदत करणं, या छोटय़ा गोष्टी आपण मुलांना करण्यास शिकवू शकतो. चिमुकल्या हातांनी कामं वेडीवाकडी होतीलही. पण त्या चिमुकल्या मनाला लोकांना मदत करणं, स्वावलंबन, या गोष्टींचा धडा मिळेल हे मात्र नक्की.

पाच वर्षांनंतर मूल बाहेर जायला लागतं. मग त्याच्यावर शिक्षकांचा, मित्रांचा आणि समाजातल्या इतरही घटकांचा प्रभाव पडायला सुरू होतो. तोपर्यंत तुमचं मूल पुरेपूर तुमच्याच हातात आहे. वरकरणी ही प्रामुख्यानं ‘आईची शाळा’ असली, तरी त्यात कुटुंबातल्या सगळय़ांचा समान सहभाग असू शकतो, हे लक्षात घेऊन मूल भविष्यात कसं व्हावं या दृष्टीनं त्याची जडणघडण आताच करता येते याचं भान ठेवणं आवश्यक आहे.
trupti.kulshreshtha@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-07-2022 at 00:03 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×