खरी मुक्ती ही बंधनाच्या क्षेत्राच्या बाहेरच असते. संपूर्ण संस्कारबद्धतेच्या क्षेत्राचे समग्र आकलन करून त्या पलीकडे पाऊल टाकणे हीच मुक्तीची सुरुवात आहे. या ठिकाणी पहिले पाऊल हेच मुक्तीकडे नेणारे अंतिम पाऊल ठरते.
माणसाला , राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, वैचारिक, इत्यादी अनेक प्रकारचे स्वातंत्र्य असले तरी तो खरोखर स्वतंत्र आहे का? माणूस जोपर्यंत मनाला येईल ते करू शकतो तोपर्यंत तो स्वत:ला स्वतंत्र, मुक्त समजत असतो. परंतु त्याच्या या मनमानीमध्ये थोडा जरी अडथळा आला तर तो आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आल्याची तक्रार करू लागतो. स्वातंत्र्य किंवा मुक्तीसंबंधीची माणसाची संकल्पना ही त्याच्या आवडीनिवडीवर आधारित असते. दिलेल्या परिस्थितीत नेमके काय करायचे यासंबंधी अनेक पर्याय माणसापुढे असतील व त्यातून तो हवा तो पर्याय कोणत्याही आडकाठीशिवाय निवडू शकत असेल तर तो स्वत:ला स्वतंत्र अथवा मुक्त समजतो. परंतु कोणता पर्याय निवडायचा हे अन्य व्यक्ती अथवा परिस्थिती ठरवत असेल तर तो स्वत:ला मुक्त समजत नाही. परंतु पर्यायनिवडीचे पूर्ण स्वातंत्र्य असले तरी माणूस पूर्णपणे मुक्त आहे का?  
कोणताही पर्याय निवडण्याचे माणसाला स्वातंत्र्य असेल तर तो नेमका कोणता पर्याय निवडेल? त्याची निवड कशावर आधारित असेल? या प्रश्नांच्या अनुषंगाने थोडा शोध घेतला तर आपल्या असे लक्षात येईल, की माणसाची निवड ही त्याच्या संस्कारबद्धतेवर (कंडिशिनग) आधारित असते. संपूर्ण मानवजातीने पृथ्वीतलावरील आपल्या आतापर्यंतच्या अस्तित्वातून जे काय मिळवले आहे त्या सर्वाचा वारसा घेऊनच प्रत्येक माणूस जन्माला येत असतो. जन्माला आल्याक्षणापासूनच त्याच्यावर घरातील वातावरणाचे, घरातल्या व्यक्तींच्या मानसिकतेचे संस्कार होऊ लागतात. पुढे त्याला देण्यात आलेल्या शिक्षणाचे त्याच्यावर संस्कार घडतात. शाळेतून बाहेर पडल्यावरदेखील तो जेव्हा स्वत:चे जीवन जगू लागतो तेव्हा स्वत: अनुभवलेल्या प्रसंगांचे संस्कार घडतात. अशाप्रकारे संस्कारबद्धतेची एक पाश्र्वभूमीच त्याच्या आत तयार होते. मग माणसाचे सर्व विचार, त्याच्या आवडीनिवडी, त्याने केलेली कृत्ये सर्व काही या पाश्र्वभूमीनुसार ठरते. ही पाश्र्वभूमीच त्याच्या संपूर्ण जीवनाचा आधार असते. साहजिकच उपलब्ध अनेक पर्यायांपकी एक निवडण्याची वेळ येते, तेव्हा माणूस नेमका कोणता पर्याय निवडणार हे ही पाश्र्वभूमीच ठरवते. मग माणसाला स्वातंत्र्य कसले? एखाद्या माणसाची पाश्र्वभूमी पूर्णपणे माहीत असेल तर दिलेल्या परिस्थितीत तो कोणता पर्याय निवडणार हेही अगोदरच माहीत असते. तसेच माणसाची पाश्र्वभूमी माहीत असेल तर आपल्याला हवी तशी कृती त्याच्याकडून घडेल अशी परिस्थितीदेखील निर्माण करता येऊ शकते. याचा अर्थ असा होतो, की दिलेल्या परिस्थितीत माणसाला अनेक पर्याय दिसत असले तरी त्याच्यासाठी एकच पर्याय असतो व तो त्याच्या पाश्र्वभूमीनुसार अगोदरच ठरलेला असतो. अशा प्रकारे स्वत:च निर्माण केलेल्या स्वत:च्या पाश्र्वभूमीने आज्ञाबद्ध (प्रोग्रॅम्ड) झालेला मनुष्य कोणत्या अर्थाने मुक्त म्हणता येऊ शकेल?
या संस्कारबद्धतेचा विळखा माणसाभोवती इतक्या बेमालूमपणे पडलेला असतो, की त्याला आपण बद्ध आहोत याची जाणीवदेखील नसते. ही संस्कारबद्धताच आपले जीवन आहे अशी त्याची समजूत झालेली असते. ती इतकी मायावी असते, की माणसाला बंधनात ठेवूनदेखील तो मुक्तच आहे असे त्याला भासवत असते. या संस्कारबद्धतेचे स्वरूप स्पष्ट करणारा एक प्रयोग या ठिकाणी उद्धृत करणे अप्रासंगिक होणार नाही.     
काही शास्त्रज्ञ एका पॅरासाइटचा (परोपजीवी जीव) जीवनक्रम अभ्यासत होते. हा पॅरासाइट प्रथम गोगलगायीच्या शरीरात वाढत असे. तेथील वाढ पूर्ण झाल्यानंतर तो गोगलगायीच्या शरीरातून स्रवणाऱ्या द्रवावाटे बाहेर पडत असे. हा द्रव मुंग्या खात असत व त्यामुळे हा पॅरासाइट मुंग्यांच्या शरीरात पोचत असे. तेथे त्याची वाढ पूर्ण झाल्यानंतर त्याचा पुढचा जीवनक्रम गायीगुरांच्या शरीरात होत असे. शास्त्रज्ञांना हे जाणून घ्यायचे होते, की मुंग्यांच्या शरीरातून हा पॅरासाइट गुरांच्या शरीरात कशाप्रकारे शिरतो. म्हणून मग त्यांनी मुंग्यांचे निरीक्षण सुरू केले. त्यांच्या असे लक्षात आले, की शरीरात पॅरासाइट असलेल्या मुंग्या दिवसाखेरीस गवताच्या पात्याच्या टोकावर जाऊन बसत असत व दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा गुरे चरावयास येत असत तेव्हा गवताबरोबर हे पॅरासाइट गुरांच्या शरीरात प्रवेश करीत असत व अशा प्रकारे त्यांचा पुढचा जीवनक्रम गुरांच्या शरीरात सुरू होत असे. शास्त्रज्ञांना असेही आढळून आले, की शरीरात पॅरासाइट नसलेल्या मुंग्या मात्र गवताच्या टोकावर जाऊन बसत नसत. मग या पॅरासाइट आलेल्या मुंग्याच असे का करतात, याचा शोध घेतल्यानंतर त्यांना असे दिसून आले, की मुंग्यांच्या शरीरात शिरल्यानंतर हे पॅरासाइट त्यांच्या मेंदूचा ताबा घेत व त्यात अशा प्रकारे बदल करीत, की या मुंग्या दिवसाखेरीस गवताच्या टोकावर जाऊन बसतील. पण मुंग्यांना मात्र याचा थांगपत्ताही नसे. त्यांच्या दृष्टीने गवताच्या टोकावर जाऊन बसणे ही एक नित्याची सामान्य बाब असे.
संस्कार, सवयी, परंपरा यांच्या बंधनात अडकलेल्या मनुष्याला आपण बंधनात आहोत याची जाणीवदेखील असत नाही. त्याच्या दृष्टीने असे बंधनकारक जीवन हेच सामान्य जीवन असते व तशा प्रकारे ते जगता येणे हेच आपले स्वातंत्र्य आहे असे तो मानत असतो. असा मनुष्य परिस्थितीचा गुलाम असतो. त्याच्या जीवनात काय घडेल, तो काय करेल, कसा विचार करेल, त्याला काय आवडेल, काय आवडणार नाही हे त्याच्या भोवतीची परिस्थितीच ठरवत असते. यामध्ये त्याच्या आतील पाश्र्वभूमीची प्रमुख भूमिका असली, तरी ही पाश्र्वभूमीदेखील बाह्य परिस्थितीतूनच निर्माण झालेली असते. अशा प्रकारे माणसाचे जीवन हे सर्वस्वी परावलंबी म्हणजे परिस्थितीवर अवलंबून असते. अशा प्रकारचे चाकोरीबद्ध जीवन परिस्थितीनुसार हेलकावे खात जगत राहणे हेच मानवाचे भवितव्य आहे का? असे जगता येणे हेच त्याचे स्वातंत्र्य म्हणायचे का?
मनुष्याला जेव्हा त्याच्या बंधनांचा जाच होऊ लागतो, तेव्हा त्याला त्यांची जाणीव होऊ लागते. मग त्यातून सुटण्याची त्याची धडपड सुरू होते. खूप धडपड करूनही जेव्हा त्याची सुटका होत नाही तेव्हा तो बाह्य मदतीची अपेक्षा करू लागतो. मित्र, गुरू, देव ही संकल्पना, विविध कर्मकांडे अशा अनेक गोष्टींच्या सहाय्याने तो स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न करू लागतो. यामुळे त्याला होणारा जाच काही अंशी कमी झाल्यासारखेदेखील त्याला वाटते. परंतु बंधनातून त्याची सुटका मात्र होत नाही. सर्वतोपरी प्रयत्न करूनदेखील सुटका न झाल्याने हताश होऊन तो शेवटी काहीही न करता शांत बसतो. ही मृतवत झालेली स्थितिशील शांती नसते तर क्षणात गतिशील होऊ शकणारी सजग शांतता असते. अशा शांततेतच जाणीव होऊ लागते, की संस्कारबद्धतेशी झगडण्यात काही अर्थ नाही. त्यातून फक्त ऊर्जेचा अपव्यय व दु:खच निर्माण होते. संस्कारबद्धतेतून मुक्तीचा मार्ग हा झगडण्यातून नव्हे तर संस्कारबद्धतेच्या आकलनातून आहे. संस्कारबद्धतेच्या अवलोकनातून त्याला जाणवू लागते, की ही संस्कारबद्धता व त्यातून स्वत:ला सोडवू पाहणारा या दोन वेगळ्या गोष्टी नसून त्या एकच आहेत. या जाणिवेबरोबरच संस्कारबद्धतेचे पाश गळून पडतात. याचा अर्थ संस्कारबद्धता संपते असा नव्हे तर ती बंधनकारक होत नाही. जसे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचे आकलन झाल्याने गुरुत्वाकर्षण संपून जात नाही तर ते बंधनकारक होत नाही कारण त्याच नियमाचा उपयोग करून त्याच्या बंधनातून पलीकडे कसे जायचे याचे ज्ञान माणसाला झालेले असते.
मुक्ती ही ‘कशापासून तरी मुक्ती’ अशा स्वरूपात नसते. कशापासून तरी मुक्ती ही सापेक्ष असते व म्हणूनच ती बंधनाच्या क्षेत्रातीलच असते. एका संस्कारातून मुक्त होण्यासाठी दुसऱ्या संस्कारांच्या आहारी जाणे, एका बंधनातून मुक्त होण्यासाठी दुसरे बंधन स्वीकारणे, एका आज्ञांकनाच्या जागी (प्रोग्रॅम) दुसरे आज्ञांकन आणणे म्हणजे मुक्ती नव्हेच. ती तर बंधनांच्या क्षेत्रात राहून त्यातील गोष्टींशी केलेली तडजोडच होय. खरी मुक्ती ही बंधनाच्या क्षेत्राच्या बाहेरच असते. संपूर्ण संस्कारबद्धतेच्या क्षेत्राचे समग्र आकलन करून त्याच्या पलीकडे पाऊल टाकणे हीच खऱ्या मुक्तीची सुरुवात आहे. या ठिकाणी पहिले पाऊल हेच मुक्तीकडे नेणारे अंतिम पाऊल ठरते. कारण पहिलेच पाऊल मुक्ततेत असल्याने त्यासाठी आणखी पावले टाकण्याची गरजच उरत नाही. अशा प्रकारे मुक्त असलेल्या माणसाचे कार्य हे पूर्वनिश्चित नसते. कारण ते सभोवतालच्या परिस्थितीला संस्कारबद्धतेने दिलेले प्रत्युत्तर नसून सभोवतालच्या परिस्थितीला उन्मुक्त सर्जनशीलतेने दिलेला प्रतिसाद असतो. हा प्रतिसाद स्थलकालनिरपेक्ष असतो. म्हणूनच तो सर्वकाळ व सर्वपरिस्थितीत अपरिवर्तनीय असतो. अशा उन्मुक्ततेत त्या प्रेमाचा स्पर्श असतो जे करुणामय, प्रज्ञायुक्त व सौंदर्यपूर्ण असते. हे प्रेम म्हणजे विशिष्ट संवेदना किंवा भावविवशता नव्हे, विचाराने उराशी बाळगलेली स्मृती नव्हे अथवा दोन व्यक्तींमधील लंगिक आकर्षण पण नव्हे. हे प्रेम म्हणजे तो जीवनस्पर्श होय जो माणसाचे सर्व जीवनच बदलून टाकतो व खऱ्या अर्थाने त्याला सजीव बनवतो. हा प्रेमस्पर्श नसेल तर मानव व यंत्रमानव यात काहीच फरक उरणार नाही.
kkishore19@gmail.com