ओझं उतरवा मनावरचं!

आपल्या घरात साप, विंचू आला किंवा एखादा उपद्रवी प्राणी आला तर आधी आपण त्यांना घराबाहेर काढून टाकतो. त्या वेळी, आज राहू दे त्याला आपल्या घरात.

आपल्या घरात साप, विंचू आला किंवा एखादा उपद्रवी प्राणी आला तर आधी आपण त्यांना घराबाहेर काढून टाकतो. त्या वेळी, आज राहू दे त्याला आपल्या घरात. उद्या घेऊ त्याचा समाचार, असा विचारही आपल्या मनात येत नाही, कारण ते प्राणी घरात राहिल्याने आपल्याला फक्त नुकसानच पोहोचेल हे आपल्याला माहीत असतं. त्याच प्रकारे जुन्या दु:खद आठवणी, भूतकाळातील काही कटू अनुभव, स्वत:च्या किंवा इतरांच्या झालेल्या चुका यासुद्धा त्या घातक प्राण्यांसारख्याच असतात. जर त्या पुन:पुन्हा मन:पटलावर येत राहिल्या तर आपल्याला नवीन काहीच दिसणार नाही आणि मिळणारही नाही. त्या काढून टाका आणि पाहा..
पृथ्वी, सूर्य, चंद्र, नदी किंवा हवा कोणीही आपल्या कर्तव्यात कधी चुकत नाही. आपल्यावर सोपवलेलं काम ते निर्धोकपणे पार पाडतच असतात. निसर्गसंपत्ती हातची न राखता भरभरून लुटत असतात. मग अनेक माणसं अशी का वागतात? त्यांना भरभरून देण्याचं निसर्गाकडून शिकता आलेलंच नसतं का? देण्यातला आनंद अनेकांपासून कोसो दूर का असतो?
एक कथा सांगावीशी वाटते. एक फकीर रोज भिक्षा मागून पोट भरायचा. कधी या घरी तर कधी त्या घरी. त्याला सहसा रिकाम्या हाताने परतावं लागत नसे. परंतु गावातील एका उच्चभ्रू माणसाच्या घरातून मात्र त्याला नेहमी रिकाम्या हाताने परतावं लागत असे. इतकंच नव्हे तर त्याला त्या घरातून शिव्यांचा आहेरही मिळत असे. एक दिवस नित्यनेमाप्रमाणे त्या फकिराने श्रीमंत माणसाच्या घराचं दार ठोठावलं. घराची मालकीण बाहेर आली. त्या फकिराला पाहताच तिने अपशब्दांचा मारा सुरू केला. तरीही फकीर नम्रतेने म्हणाला, ‘माई, मला तुझं जेवण नको, गडूभर पाणीही नको. धान्य अथवा पीठही नको. तुझ्या अंगणातील मूठभर माती तेवढी माझ्या झोळीत घाल.’ मालकीण गोंधळली, आश्चर्याने म्हणाली, ‘तुझं डोकं ठिकाणावर आहे ना?’ पण त्याचा आग्रह पाहून तिने अंगणातील मूठभर माती फकिराच्या झोळीत टाकली. फकिरानेही झोळी पसरून मातीचा नतमस्तक होऊन स्वीकार केला. मालकिणीने हैराण होऊन विचारलं, ‘तू माती का मागितलीस माझ्याकडून? कारण सांग.’ त्यावर फकीर म्हणाला, ‘तुझ्या हातांना काही ना काही देण्याची सवय व्हावी इतकाच माझा शुद्ध हेतू आहे.’ फकीर निघून गेला, पण त्या मालकिणीमध्ये आमूलाग्र बदल करून.
तात्पर्य, कुणाला काही चांगलं देताना कंजूसपणा न करता द्यायला हवं. देण्यासारखं आपल्याजवळ खूप काही असलं तरी अनेकदा आपण हात आखडता घेतो, पण चुकीच्या गोष्टी किंवा चुकीचे विचार अवलंबविण्यात मात्र मोठेपणा दाखवतो. थोडं आपल्याकडचं देऊन बघा. खूप आनंद असतो देण्यात!
 मूल्यमापन करणारा स्वभाव
 माणसाचा स्वभाव नेहमी मूल्यमापन करणाराच असतो. समोरची व्यक्ती कशी आहे, याचा अंदाज बांधत, त्याचं मूल्यमापन तो करून टाकतो आणि त्यावर ठाम राहतो. एखाद्याला काही व्यक्तींबरोबर राहणं अजिबात आवडत नाही. त्या व्यक्ती त्याला आसपासदेखील असू नयेत असं वाटतं, तर काहींची त्याला भीतीदेखील वाटते. कारण त्या व्यक्तीबरोबरचा मागील भेटीतला जो अनुभव असतो तोच त्याच्या मनात थांबून राहिलेला असतो. त्याचं बोलणं, वागणं त्याला खटकलेलं असतं आणि कालांतराने जेव्हा ती व्यक्ती त्याच्यासमोर येते तेव्हा गतकाळातील अनुभवामुळे त्या व्यक्तीबद्दल एक विशिष्ट रंगाचा चष्मा त्याने घातलेला असतो. खरं तर एखादी व्यक्ती एखाद्या वेळी असं का वागली याचं कारण फक्त तीच व्यक्ती देऊ शकते. उदा. असंही असू शकतं की, त्या वेळी त्या व्यक्तीची मन:स्थिती चांगली नसेल, त्या व्यक्तीचं मन काही कारणास्तव दुखावलेलं असेल किंवा त्याच्या बाबतीत काही अप्रिय घटना घडलेल्या असतील. म्हणूनच त्या वेळच्या त्याच्या मन:स्थितीप्रमाणे त्याने आपल्याला थोडी वेगळी वागणूक दिली असेल. त्या वेळी तो तसा वागला याचा अर्थ आजही तो तसा वागेलच असं नाही. पण आपण आपल्या विचारांप्रमाणे, पूर्वअनुभवानुसार त्या  व्यक्तीचं मूल्यमापन करून मोकळे होतो. आणि त्या विचारांचा चष्मा घट्ट करतो. म्हणूनच आज जर तो तुमच्यासमोर चांगल्या मन:स्थितीत आला तरी तुम्ही पूर्वअनुभवाच्या चष्मातून त्याच्याकडे पाहणार आणि त्याच्याशी बोलणार नाही. त्याने होतं काय, की तुमच्या नात्यात दुरावा येतो.
   एखादी वस्तू कापल्यावर आपण चाकू धुऊन घेतो. कारण दुसऱ्या कापलेल्या वस्तूंवर पहिल्या वस्तूची चव राहू नये. समजा, प्रथम आपण सुरीने मिरची कापली. चाकू धुतला नाही. त्याच चाकूने सफरचंद कापलं, तर सफरचंदाला मिरचीचा तिखटपणा लागणारच. खाणारी व्यक्ती सफरचंदाचा तुकडा म्हणून तोंडात घेईल त्याच क्षणी तो फेकूनही देईल. म्हणजे असेल सफरचंद, पण प्रतिक्रिया मात्र मिरचीसारखी. कारण पूर्वी कापलेल्या मिरचीचा प्रभाव त्यावर तसाच राहिला. म्हणून प्रत्येक वस्तू कापल्यावर जसे सुरी धुणे अनिवार्य आहे, त्याच प्रकारे प्रत्येक कर्म केल्यावर आपल्या मनालासुद्धा चांगल्या स्मृतींनी उजाळणं गरजेचं आहे. एक सुंदर वाक्य या ठिकाणी आठवतं, Instead of questioning the Past, Put a fullstop to it.
   बऱ्याच लोकांना रात्री डायरी लिहिण्याची सवय असते. डायरी लिहिताना नेमकं काय करतात? तर दिवसभरातल्या वेगवेगळय़ा परिस्थितीबद्दल लिहितात. आज आपणासोबत काय काय झालं हे लिहितात. याला आपण काय म्हणू? तर रेकॉर्ड! पण याने आपण काही शिकतो का? लिहिणं जरूर चांगलं आहे. पण लिहिण्याबरोबरच दिवसभरात आपल्यासोबत घडलेल्या घटनांना एक-एक करून आठवा, त्यांचा आढावा घ्या. आज मी कोणाला दुखावलं तर नाही ना, कोणाबद्दल माझ्या मनात तिरस्कार तर उत्पन्न झाला नाही ना, याचे स्वचिंतन करा. त्या वेळच्या परिस्थितीला पुन्हा आठवा व नंतर स्वत:कडे पाहा. कारण घटनांचं पुनरावलोकन करीत असताना आपलीदेखील काही चूक असेल तर तीही लक्षात येते. सुधारण्याची संधी मिळते. मी माझा विचार थोडा बदलला असला तर दुरावलेल्या संबंधांना मी ठीक करू शकले असते, अशीसुद्धा जाणीव आपल्या मनात निर्माण होते. जर मी हे सर्व आजच्या आज नीट केलं नाही तर या हार्डडिस्कवर जे सर्व एकत्र झालं आहे ते सर्व तसंच कॅरी फॉर्वर्ड होत जाईल. म्हणून मनरूपी हार्डडिस्कची रोज साफ-सफाई करणं गरजेचं आहे. प्रत्येक दिवशी आपल्या मनाला स्कॅन करा. समोरच्या व्यक्तीने जे केलं ते केलं, पण मला मात्र ते तसंच पुढे घेऊन जायचं नाही. हे आपण तेव्हाच करू शकू, जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने आनंदाची प्राप्ती होईल.
परिस्थिती किंवा व्यक्ती यांना बदलण्याची गरज नाही. कारण ते माझ्या ताब्यात नाही. लोक काय म्हणतील याचं चिंतन योग्य नाही तसं अशी परिस्थिती माझ्याच वाटय़ाला का, याचंही चिंतन उपयोगी नाही. फक्त समोर आलेल्या परिस्थितीला मी कसा प्रतिसाद (Response) देऊ शकते-तो हे महत्त्वाचं आहे. आपण खरं तर आजपर्यंत फक्त दिवस आला तसा घालवत गेलो. कुठंही थांबून आपल्या विचारांना तपासलं नाही व त्यामुळे आपण विचारांना बदलू शकलो नाही.
आपल्या घरात साप, विंचू आला किंवा एखादा उपद्रवी प्राणी आला तर आधी आपण त्यांना घराबाहेर काढून टाकतो. त्या वेळी, आज राहू दे त्याला आपल्या घरात. उद्या घेऊ त्याचा समाचार, असा विचारही आपल्या मनात येत नाही. कारण ते प्राणी घरात राहिल्याने आपल्याला फक्त नुकसानच पोहोचेल हे आपल्याला माहीत असतं. त्याच प्रकारे जुन्या दु:खद आठवणी, भूतकाळातील काही कटू अनुभव, स्वत:च्या किंवा इतरांच्या झालेल्या चुका यासुद्धा त्या घातक प्राण्यांसारख्याच असतात. जर त्या पुन:पुन्हा मन:पटलावर येत राहिल्या तर आपल्याला नवीन काहीच दिसणार नाही आणि मिळणारही नाही.
आता एकच करायचं, थोडंसं थांबायचं, बऱ्याच वर्षांचे, बऱ्याच जणांचे जुने-पुराणे हिशेब जे मनात साचून राहिले असतील ते आवर्जून पाहायचं. कळेल, आपण ते नाहक जमा करीत आलो आहोत. त्या सर्व दुखऱ्या आठवणींना आपल्या मनातून कायमचं डिलिट करायचंय. अंतर्मुख बनून स्वत:शी संवाद साधत परिस्थितीला दुसऱ्यांच्याही नजरेतून बघायचंय, मग लक्षात येईल की, आपण खरोखरीच खूप हलके झालोय, बऱ्याच वर्षांपासूनची ओझी उतरवल्याचा व त्यामुळे हलके झाल्याचा आनंद निश्चितच चेहऱ्यावर दिसू लागेल. आणि आयुष्यातला हा आनंदाचा ठेवा कायमचा तुमचा असेल. 
(प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या ओम शांती मीडिया या वृत्तपत्र विभागाद्वारा प्रकाशित झालेल्या आध्यात्मिक प्रवचनांचा मराठी अनुवाद)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Release the burden of yourself

ताज्या बातम्या