scorecardresearch

संशोधिका: लेझर तंत्रज्ञानाच्या दुनियेत..

लेझर तंत्रज्ञान आताच्या तुलनेत खूपच नवीन असतानाच्या काळात असंख्य अडचणींचा सामना करत ज्या मोजक्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं,

रुचिरा सावंत
लेझर तंत्रज्ञान आताच्या तुलनेत खूपच नवीन असतानाच्या काळात असंख्य अडचणींचा सामना करत ज्या मोजक्या वैज्ञानिकांनी या क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं, त्यातल्या डॉ. ललिता धारेश्वर या एक. ‘भाभा अणू संशोधन केंद्रा’च्या (बीएआरसी) एकूण प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या, संस्थेचा पाया बळकट करणाऱ्या वैज्ञानिकांपैकी एक ठरलेल्या आणि पुढेही विज्ञानप्रसारात कार्यरत राहिलेल्या डॉ. ललिता यांचा हा प्रेरणादायी प्रवास..
बंगळूरुच्या मल्लेश्वरम परिसरात १९११-१२ पासून डौलात उभं असलेलं ‘पंचवटी’ हे एक छानसं टुमदार घर अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे. घराभोवतीच्या बागेबरोबरच त्या घराचं मुख्य आकर्षण म्हणजे घरात असणारं प्रशस्त वाचनालय. या वाचनालयानं त्या भागातल्या लहान मुलांना आणि तरुणांनाही स्वप्नं पाहायला प्रवृत्त केलं.
तर झालं असं, की साधारण १९४२ मध्ये ते घर एका सन्माननीय व्यक्तीनं विकत घेतलं आणि पुढे मल्लेश्वरममध्ये राहणाऱ्या लहान मुलांसाठी दर शनिवारी आपल्या या वाचनालयाची दारं ते खुली करू लागले. ते वाचनालय म्हणजे अलिबाबाची गुहाच होती! तिथे जगभरातली अनेक दर्जेदार पुस्तकं होती; मुख्यत्वे विज्ञान विषयाची. प्रत्येक शनिवारी परिसरातल्या लहान मुलांना अगदी हवं ते पुस्तक निवडून बागेत वाचत बसण्याची मुभा असे. मल्लेश्वरममधील किशोरवयीन आणि तरुण मुलं यासाठी शनिवारची चातकासारखी वाट पाहत. त्या घरात राहणारे गृहस्थ म्हणजे कुणी सर्वसामान्य व्यक्ती नव्हतीच मुळी. आपल्या घरातलं आपलं वैयक्तिक वाचनालय मुलांसाठी खुलं करणारी आणि जगभरातल्या सर्वोत्तम साहित्याचा आस्वाद घेण्याची संधी मुलांना उपलब्ध करून देणारी ती महनीय असामी म्हणजे दस्तुरखुद्द नोबेल पारितोषिक विजेते एकमेव भारतीय वैज्ञानिक डॉ. सी. व्ही. रमण! ‘पंचवटी’पासून काही पावलांच्या अंतरावर राहणारी आणि ‘मल्लेश्वरम् लेडीज असोसिएशन स्कूल’मध्ये नववीत शिकणारी ‘ललिता’ या अनुभवांमुळे भारावून जाणाऱ्या तरुणांपैकी एक. आपल्या शालेय दिवसांत डॉ. सी. व्ही. रमण यांच्यासारख्या सन्माननीय व्यक्तीच्या वैयक्तिक वाचनालयातून हवं ते पुस्तक मिळवून, त्यांनीच फुलवलेल्या बागेत ते वाचत बसणं हा तिच्या बालपणीच्या दैनंदिनीतला महत्त्वाचा भाग झाला. तिथे वाचलेल्या विज्ञानविषयक पुस्तकांमुळे, वैज्ञानिकांच्या कथांमुळे तिला विज्ञानाविषयी गोडी निर्माण झाली आणि आपल्या जीवनाचं उद्दिष्ट तिला तिथे त्या बागेतच, पुस्तकांच्या सान्निध्यात गवसलं.
संशोधक व्हायचं ठरलं असलं, तरी संशोधन कोणत्या विषयात करायचं हे मात्र अजून तिचं ठरायचं होतं. त्याला बराच अवकाश होता. या प्रसंगीही डॉ. सी. व्ही. रमणच तिच्या मदतीला आले. बंगळूरुमधल्या ‘सेंट्रल कॉलेज’मध्ये ती पदवी अभ्यासक्रमाचं शिक्षण घेत असताना एकदा डॉ. रमण तिथे विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधण्यासाठी आले. त्या व्याख्यानादरम्यान
डॉ. रमण यांनी एका फारच वेगळय़ा आणि चित्तवेधक विषयावर विद्यार्थ्यांशी गप्पा मारल्या. त्या संवादानं बालपणीच्या अनुभवासारखाच कायमस्वरूपी ठसा ललिताच्या आयुष्यावर उमटवला. तो विषय होता- ‘लेझर्स’. १८ वर्षांच्या त्या मुलीला त्या दिवशी आपलं कार्यक्षेत्र सापडलं. पुढे याच क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत ‘भाभा अणू संशोधन केंद्रा’च्या (बीएआरसी) एकूण प्रवासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या, संस्थेचा पाया बळकट करणाऱ्या वैज्ञानिकांपैकी एक ठरलेल्या डॉ. ललिता धारेश्वर म्हणून त्या ओळखल्या जाऊ लागल्या.
डॉ. ललिता यांचं बालपण अनेक अर्थानी समृद्ध होतं. याचं बरंचसं श्रेय त्यांच्या समृद्ध कौटुंबिक पार्श्वभूमीलाही जातं. त्यांचे वडील डॉ. पंडित सत्येंद्रराव पशुवैद्यक शास्त्रज्ञ होते. तेव्हा देशातल्या लहान लहान ठिकाणी दुग्ध व्यवसायासारख्या विषयात बदल घडवून आणण्यासाठी त्यांची नियुक्ती होत असे. यामुळे १९५६ पर्यंत ते कायम फिरतीवर असत. देशातल्या एखाद्या लहानशा गावी ते राहात. या अनुभवामुळे डॉ. ललिता आणि त्यांची इतर भावंडं वेगळय़ा अर्थानं घडत होती. देशातल्या राज्यांच्या पुनर्रचनेच्या काळात त्यांची नियुक्ती बंगळूरुमध्ये झाली आणि त्यांचा परिवार मल्लेश्वरमला एका जागी स्थायिक झाला. ललिता यांच्या आई हेही एक अफाट व्यक्तिमत्त्व. त्या काळात जे. कृष्णमूर्ती यांच्या तत्त्वज्ञानावर आधारित असणाऱ्या वाराणसीमधल्या शाळेत त्यांनी शिक्षण घेतलं. महाराणी विजयाराजे सिंधिया यांच्यासारख्या वर्गमैत्रिणी त्यांना तिथे भेटल्या. जे. कृष्णमूर्ती यांच्या तत्त्वज्ञानानं प्रभावित झालेल्या परिवारामुळे आणि आईमुळे ललिता यांच्या जीवनाला आकार मिळाला. शालेय शिक्षण झाल्यानंतर वर्षभरासाठी ‘नॅशनल कॉलेज’मध्ये झालेलं शिक्षण त्यांना व्यक्ती म्हणून समृद्ध करणारं ठरलं. त्या महाविद्यालयाच्या स्वातंत्र्यसैनिक असणाऱ्या प्राचार्यानी विद्यार्थ्यांमध्ये मूल्याधिष्ठित जीवनप्रणाली रुजवली. आजची त्यांची वैचारिक बैठक ही याच अनुभवांचं संचित आहे.
सेंट्रल कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांच्या महाविद्यालयात ‘भाभा अणू संशोधन केंद्रा’तून वैज्ञानिकांचा एक चमू आला होता. त्या काळात अणुऊर्जा विभागाकडून विज्ञानाच्या काही निवडक विद्यार्थ्यांना तीन वर्षांची शिष्यवृत्ती देण्यात येत असे. मुलाखतीनंतर त्या वर्षी त्या शिष्यवृत्तीसाठी ललिता यांची निवड झाली. वयाच्या १९ व्या वर्षी पदवीचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढे काय करावं यासाठी फारसा विचार त्यांना करावा लागला नाही. त्या काळात ‘बीएआरसी’च्या प्रशिक्षण केंद्रात एक वर्षांचा ‘ओरिएंटेशन कोर्स’ (अभिमुक्तता अभ्यासक्रम) असायचा. या अभ्यासक्रमासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वेगवेगळय़ा शाखांतील विद्यार्थ्यांची निवड केली जायची. ललिता यांची या अभ्यासक्रमाची १९६९ ते १९७० मधील ती तेरावी तुकडी. विविध शाखांचे २०० विद्यार्थी त्या वर्षी अभ्यासक्रमाचा भाग होते. विषयानुरूप त्यांना प्रशिक्षण देण्यात येत होतं. भौतिकशास्त्र विषयातलं प्रशिक्षण घेण्यासाठी निवडलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ललितांसह केवळ पाच विद्यार्थी पदवी अभ्यासक्रमाचे होते. इतर सारे विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षण घेतलेले होते आणि त्यांच्या अभ्यासाशी वेग जुळवण्यासाठी पदवीच्या विद्यार्थ्यांना अतिरिक्त मेहनत घेण्यावाचून पर्याय नव्हता. या अभ्यासानं त्यांना त्यांच्या मर्यादा ओलांडण्याचं बळ दिले. (गंमत म्हणजे भौतिकशास्त्राच्या वर्गात पदवी अभ्यासाच्या पाच जणांपैकी एक असणाऱ्या संजना जोग या मुलीनंच पहिला क्रमांक पटकावला आणि वय, िलग यापलीकडे कर्तृत्वाचं स्थान अधोरेखित केलं.) अभ्याक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांचं वर्गातलं स्थान आणि उपलब्ध पदं यांच्या आधारावर संस्थेबरोबर संलग्न होण्यासाठीची निवड प्रक्रिया होणार होती. त्या वेळी तिथे नव्यानं उदयास येत असलेल्या लेझर विभागामध्ये एक रिक्त जागा होती. सी. व्ही. रमण यांच्या व्याख्यानानंतर लेझर या विषयात निर्माण झालेल्या रुचीमुळे ललिता यांनी या
संधीकडे झेप घेतली.
विद्यार्थ्यांना क्षेत्रनिवडीचा निर्णय घेण्यापूर्वी आपण आपल्या आयुष्याचा बराचसा काळ ज्या प्रयोगशाळेत घालवणार आहोत तिथे भेट देण्याची मुभा तेव्हा संस्थेत असायची. विविध विभागांना आणि प्रयोगशाळांना भेटी देण्याच्या या प्रक्रियेदरम्यान लेझर विभागातलं वातावरण ललिता यांना आवडलं. तिथली पाच-सहा जणांची लहानशी, पण त्या विषयाबद्दल प्रचंड कुतूहल असलेली टीम, त्या टीमचं नेतृत्व करणारे वयाच्या तिशीतले प्रचंड उत्साही डॉ. दिलीप, या सर्वच गोष्टी त्यांना भावल्या. आपण इथेच काम करायचं असं त्यांनी ठरवलं.
त्यांच्या एकूण कर्तृत्वामुळे त्या विभागात त्यांची निवडसुद्धा झाली. सगळंच छान जमून आलं. वैज्ञानिकांच्या ज्या समूहाबरोबर ललिता यांनी काम करण्यास सुरुवात केली होती, त्या गटानं ‘पोखरण १’मध्ये ‘ट्रिगिरग मेकॅनिझम’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली होती. अशा अनुभवसंपन्न लोकांबरोबर काम करण्यास ललिता फारच उत्साही होत्या. याच दरम्यान पोखरण चाचणीमुळे भारतावर अनेक निर्बंध लागले. ‘बीएआरसी’मधल्या या वैज्ञानिकांना परदेशातून काहीही मागवणं अशक्य झालं; पण ही आव्हानं त्यांच्यासाठी वेगळय़ा पद्धतीनं उपयोगी पडली.
१९६० मध्ये थिओडोर हेरॉल्ड मेमन यांनी पहिला लेझरचा प्रयोग करून दाखवला. तो एक ‘सॉलिड स्टेट लेझर’ होता. त्याच्या निर्मितीत लाल रंगाच्या ‘रुबी रॉड’चा वापर करण्यात आला होता. ‘बीएआरसी’मधल्या त्या प्रयोगशाळेत त्यानंतर आठ-नऊ वर्षांमध्ये असाच एक लेझर बनवण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. संशोधनानंतर इतक्या कमी कालावधीत हा प्रयत्न करणं म्हणजे एक धाडसच होतं; पण वैज्ञानिकांनी ते निभावून नेलं. परदेशातून काहीच मागवता येत नसल्यामुळे सगळं स्वत:च शोधायचं आणि बनवायचं होतं. हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. डॉ. दिलीप यांनी पूर्वी कधी तरी लंडनहून आपल्याबरोबर आणलेल्या एकमेव लेझर रॉडचा अभ्यास आणि वापर करून या चमूनं देशातला पहिला ‘रुबी सॉलिड स्टेट लेझर’ ‘बीएआरसी’मधल्या त्या प्रयोगशाळेत बनवला. ज्या दिवशी तो लेझर तयार झाला तेव्हा वैज्ञानिकांच्या त्या संपूर्ण समूहाला झालेला आनंद शब्दात व्यक्त करण्यापलीकडे होता. खऱ्या अर्थानं हे वैज्ञानिक आत्मनिर्भरतेचे धडे तेव्हा गिरवत होते. हा प्रसंग म्हणजे किचकट आव्हानांचं, समस्येचं संधीत झालेलं रूपांतर होतं. त्यानंतर वैज्ञानिकांचा हा गट ‘निओडियम ग्लास लेझर’च्या निर्मितीकडे वळला. या लेझरचं वैशिष्टय़ म्हणजे यामध्ये मोठय़ा प्रमाणावर ऊर्जा साठवता येते. देशातला पहिला निओडियम ग्लास लेझर बनवण्यातही या गटाला यश प्राप्त झालं. आत्मनिर्भर होऊन काम करत असताना त्यांनी आपल्या प्रयोगशाळेच्या आणि बीएआरसीच्या शिरपेचात अभिमानाने एक तुरा खोवला. सुरुवातीला पाच जणांच्या साथीनं सुरू झालेल्या या प्रयोगशाळेत पाहता पाहता १९७९ पर्यंत २५ हून अधिक वैज्ञानिक नियुक्त करण्यात आले. लेझरचा विविध क्षेत्रांतला उपयोग आणि महत्त्व लक्षात घेऊन लेझर या विषयावर काम करण्यासाठी एक स्वतंत्र केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला आणि १९८४ मध्ये इंदोरमध्ये ‘राजा रामण्णा सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी’(RR CAT) ची स्थापना झाली. दरम्यानच्या वर्षांत आपला संसार आणि दोन लहान मुलं सांभाळत ललिता यांनी ‘पीएच.डी.’ पदवी संपादन केली आणि त्या
डॉ. ललिता धारेश्वर झाल्या. या प्रवासात वित्त व्यवस्थापक म्हणून मोठय़ा कंपनीत कार्यरत असणाऱ्या, विज्ञानावर प्रेम करणाऱ्या आणि आपल्या पत्नीचा अभिमान बाळगणाऱ्या त्यांच्या पतीनं, जयंत धारेश्वर यांनी त्यांना लाखमोलाची साथ दिली. आपली मुलं, इथला संसार सोडून इंदोरला जाऊन नव्या केंद्रासाठी काम करणं
डॉ. ललिता यांना व्यवहार्य वाटलं नाही. अशा वेळी त्यांची आणि इतर अनेक वैज्ञानिकांची ही समस्या ध्यानात घेऊन डॉ. आर. चिदम्बरम आणि डॉ. दिलीप यांनी ‘बीएआरसी’मध्ये एक समांतर प्रयोगशाळा सुरू ठेवण्यास दुजोरा दिला. इंदोरमधील केंद्रात पुढे संशोधन होऊ शकेल अशा पर्यायी लेझसर्वंर, त्यांच्या मूलभूत गुणधर्मावर आणि विविध प्रणाली विकसित करण्यावर इथे लक्ष केंद्रित केलं गेलं. ‘राजा रामण्णा सेंटर फॉर अॅधडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी’च्या मुख्य गटाचा भाग होता येण्याचा आनंद आणि अभिमान डॉ. ललिता यांच्या बोलण्यात जाणवतोच, पण त्याबरोबर आपल्याला ही संधी देणाऱ्या, आपल्या प्राधान्यक्रमांचा स्वीकार करणाऱ्या वरिष्ठांविषयी प्रचंड कृतज्ञताही आहे.
डॉ. ललिता ‘बीएआरसी’मधल्या ‘लेझर आणि न्यूट्रिनो फिजिक्स’ विभागाच्या प्रमुख म्हणून २०१० मध्ये निवृत्त झाल्या. त्यानंतर ‘डिपार्टमेंट ऑफ अॅेटोमिक एनर्जी’मधल्या ‘बीएआरसी’मध्ये पाच वर्षांसाठी त्या
‘राजा रामण्णा फेलो’ म्हणून नियुक्त होत्या. त्यांच्याबरोबर अनेक तरुण वैज्ञानिकांनी या काळात काम केलं. निवृत्तीपूर्वी त्यांनी विविध खंडांतील अनेक देशांमध्ये लेझर तंत्रज्ञानासाठीच्या अद्ययावत प्रयोगशाळांमध्ये काम केलं. तसंच अनेक परदेशी विद्यार्थ्यांनी त्यांच्या ‘बीएआरसी’मधल्या प्रयोगशाळेत येऊन काम करण्याचा अनुभव घेतला.
आजपर्यंत ७५ हून अधिक शोधप्रबंध प्रकाशित केलेल्या डॉ. ललिता यांनी २०१५ मध्ये तिथून निवृत्तीनंतर ‘इंडियन विमेन सायंटिस्ट असोसिएशन’मध्ये (आयडब्ल्यूएसए) कार्य सुरू केलं. समाजाकडून आपण जे मिळवलं आहे ते समाजाला परत करायला हवं, असा त्यांचा विचार आहे. मागील बरीच वर्ष ‘आयडब्ल्यूएसए’ ही संस्था सर्वसामान्यांपर्यंत विज्ञान पोहोचवण्यासाठी, स्त्री सबलीकरणासाठी आणि तरुण, तसंच लहान मुलांना विज्ञानाची गोडी लागावी यासाठी कार्यरत आहे. या संस्थेचे विज्ञान प्रसार संस्थेबरोबर संबंध प्रस्थापित करून महत्त्वपूर्ण कार्यक्रम राबवण्यात त्यांचा खारीचा वाटा आहे.
एक वैज्ञानिक म्हणून, व्यक्ती म्हणून घडत असताना येणाऱ्या आव्हानांमुळे व्यथित न होता, तिथेच थांबून न राहता आपण सतत पुढे चालत राहिलं पाहिजे म्हणजे रस्ता सापडतो, ही आपल्या अनुभवांती ध्यानात आलेली बाब त्या हसत हसत सांगतात. आपले प्राधान्यक्रम ठरवल्यानंतरही सर्वोत्तम काम करून समाधान मिळवता येतं, याचं उदाहरणही त्या आपल्यासमोर आपल्या प्रवासातून ठेवतात. निवृत्ती हा शब्द शब्दकोशातच नसणाऱ्या डॉ. ललिता अखंड कार्यरत राहण्यासाठी प्रेरणा देतात.
postcardsfromruchira@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Researcher in the world of laser technology laser technology scientists barc amy

ताज्या बातम्या