scorecardresearch

Premium

संशोधिका : कुतूहलाचा वारसा जपताना!

सामान्य माणसांसाठी अवकाश विज्ञानाची दारे खुली करण्यासाठी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांची त्यांच्याशी भेट घडवून आणण्यासाठी ‘स्पेस हॅण्डशेक’ या फेसबुक मंचाची सुरुवात त्यांनी अवकाश विज्ञान पत्रकार श्रीनिवास लक्ष्मण यांच्यासमवेत केली आहे.

संशोधिका : कुतूहलाचा वारसा जपताना!

रुचिरा सावंत

रुचिरा सावंत या ‘मेकशिफ्ट’ या शिक्षण आणि इनोव्हेशन क्षेत्रातील ‘स्टार्टअप’च्या सहसंस्थापक आहेत. सामान्य माणसांसाठी अवकाश विज्ञानाची दारे खुली करण्यासाठी आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांची त्यांच्याशी भेट घडवून आणण्यासाठी ‘स्पेस हॅण्डशेक’ या फेसबुक मंचाची सुरुवात त्यांनी अवकाश विज्ञान पत्रकार श्रीनिवास लक्ष्मण यांच्यासमवेत केली आहे. आशियातील पहिल्या ‘सॅटनॉग्ज ग्राऊंड स्टेशन’ या उपग्रहाद्वारे माहिती मिळवण्यासाठीच्या खुल्या प्रकल्पातील केंद्राची निर्मिती करणाऱ्या टीमचा त्या भाग होत्या. अमेरिकन दूतावास, मुंबई येथे झालेल्या कृत्रिम उपग्रहसंबंधित कार्यक्रमासाठी पॅनलिस्ट म्हणून त्या सहभागी होत्या. ‘विविध वृत्तपत्रं व मासिकांमधून त्यांनी विज्ञान व अवकाश विज्ञानविषयक लिखाण केले आहे.

unique information, exhibition hall, State Excise Department
१८३९ नंतर मद्यपान करण्यासाठी १८ वर्षे वयोमर्यादा जगभरात लागू! नव्या राज्य उत्पादन शुल्क भवनातील खास दालनातील माहिती
satyashodhak kamaltai vichare, satyashodhak kamaltai vichare information in marathi,
स्त्रियांच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या सत्यशोधक कमलताई विचारे
maharshi dayanand saraswati marathi article, swami dayanand saraswati marathi news
वेदांमधून बुद्धिप्रामाण्याकडे नेणारे महर्षी दयानंद!
Another six thousand crores tender for road concretization Mumbai news
रस्त्यांच्या कॉंक्रीटीकरणासाठी आणखी सहा हजार कोटींच्या निविदा

विज्ञान क्षेत्रात जागतिक स्तरावरच स्त्रियांचा सहभाग कमी आहे आणि ज्या मोजक्या स्त्रिया या क्षेत्रात आहेत, त्यांना त्यांच्या कामाचं श्रेय मिळण्यासाठी अनंत अडचणी पार कराव्या लागतात, अशी ओरड सातत्यानं होत असते. मात्र स्त्रियांसाठी चित्र पूर्णत: निराशाजनक नक्कीच नाही. विज्ञानात अनेक स्त्रियांनी वर्षांनुवर्ष काम करून आपली स्वतंत्र ओळख तयार केली आहे. अनेकींनी मानवाला दूरगामी फायदे मिळतील इतकं महत्त्वाचं संशोधन केलं आहे. अपवादानंच प्रसिद्धीझोत वाटय़ास येणाऱ्या अशा अनेक स्त्रियांच्या आणि त्यांच्या शोधांच्या प्रेरणादायी कथा ‘संशोधिका’ या नव्याकोऱ्या सदरात दर पंधरवडय़ाने..

इयत्ता तिसरीत विज्ञान हा विषय नव्यानं अभ्यासक्रमात आला तेव्हा बाईंनी पहिल्या तासाला एक गोष्ट सांगितली होती. त्या गोष्टीतलं ‘दैनंदिन जीवन आणि विज्ञान एकमेकांशिवाय अर्थहीन व अकल्पनीय आहे.’ हे वाक्य माझ्या मनात कायमचं घर करून गेलं. आणि त्यासोबतच जगाला हा मंत्र देणारी रोझलिंड फ्रँकलिन माझ्यासाठी माझ्यावर विज्ञानाची जादू करणारी परिराणी झाली. ही परिराणी म्हणजे खरंतर एक वैज्ञानिक होती. विज्ञानासाठी आपलं सर्वस्व वाहिलेली, विज्ञानाला समाजाच्या उन्नतीसाठी आणि माणसाच्या भल्यासाठी समजणारी, आपल्या जगण्याचा भाग मानणारी व अनेकांना त्यासाठी प्रेरणा देणारी वैज्ञानिक. ‘डीएनए’च्या (जनुकीय संरचना) रचनेचं छायाचित्र घेण्यात तिला यश आलं. ज्यासाठीचं श्रेय मिळण्यापासून ती बराच काळ वंचित राहिली. विज्ञान विश्वात अत्यंत सन्मानाचा मानला जाणारा ‘नोबेल’ पुरस्कारही तिला मिळाला नाही. पण असं असलं, तरी जगभरातील लोकांसाठी फायदेकारक ठरू शकेल असं महत्त्वाचं छायाचित्र घेण्यात तिनं यश मिळवलं, असं म्हटलं जातं. ‘मानवहितासाठी विज्ञान’ हा आदर्श तिनं निर्माण केला, हे सुज्ञ नाकारू शकत नाहीत.

दरवर्षी डिसेंबरमध्ये नोबेल पारितोषिक वितरणाचा सोहळा साजरा होतो. ऑक्टोबर महिन्यात नोबेल पारितोषिकं जाहीर झाल्यापासून डिसेंबर महिन्यात ती प्रदान केली जाईपर्यंत दरवर्षी या दोन महिन्यांच्या काळात विविध माध्यमांतून त्याबद्दल चर्चा होत असतात. यात मूलभूत संशोधनाचं महत्त्व, नव्या आणि जुन्या संकल्पनांची व तंत्रज्ञानाची सांगड ते मानवाचं आणि या विश्वाचं भविष्य असे अनेकविध विषय असतात. या सगळ्याबरोबर प्रत्येक वर्षी न चुकता तितक्याच आवडीनं चर्चिला जाणारा विषय म्हणजे या क्षेत्रातलं स्त्रियांचं योगदान, त्यांना मिळत असलेलं महत्त्व, प्राप्त होणारी प्रतिष्ठा आणि क्षेत्रातील पुरुषी वर्चस्व.

२०२१चे नोबेल पुरस्कार जाहीर झाले आणि इतर बऱ्याच वर्षांप्रमाणे पुरस्कृत वैज्ञानिकांच्या यादीत एकाही स्त्रीचं नाव नव्हतं. विज्ञानातील हा श्रेष्ठ पुरस्कार प्राप्त करणारे सगळे पुरुषच होते आणि हे असं पहिल्यांदा घडत नव्हतंच. नंतर घडून आलेल्या चर्चा, संवाद, अभ्यास, यातून अनेक प्रकारचे मतप्रवाह दृष्टीस पडले. कुणी पुरुषी वर्चस्वाला दोष दिला, तर कुणी स्त्रियांच्या दुर्मीळ असलेल्या, मोजक्या सहभागाला कारणीभूत ठरवलं. कुणी स्त्रियांसाठी उपलब्ध असणाऱ्या अल्प संधी अधोरेखित केल्या, तर कुणी योगदानाचं गुणोत्तर मापलं. या चर्चा आपण प्रतिवर्षी ऐकतो. त्यातून पुढे निष्पन्न काय होतं, हे आणखी वेगळं कोडं व चर्चेचा एक भला मोठा अध्याय. या संवादांमुळे मला मात्र प्रेरणा देणाऱ्या अनेक कहाण्या आठवत राहतात. अगदी काही दिवसांपूर्वीच पहिले अमेरिकी अवकाशयात्री ठरलेल्या अ‍ॅलन शेपर्ड यांच्या कन्या लॉरा शेपर्ड अवकाशप्रवास करून आल्या. तेव्हा तो केवळ एका ७४ वर्षांच्या मुलीनं जपलेला आणि वाढवलेला आपल्या वडिलांचा अवकाशप्रवासाचा वारसा नव्हता. तर त्यापलीकडे जाऊन तो एका स्त्रीचा, तिच्याही नकळत उतारवयात तंत्रज्ञानासमवेत जुळवून घेण्याचा ध्यास झाला आणि आबालवृद्धांसाठी प्रेरणास्रोत ठरला. मला वाटतं, हा अनुभव म्हणजे त्यांच्या वतीनं त्यांनी साजरा केलेला विज्ञान सोहळाच होता.

मार्च २०१९ ची गोष्ट. तशी ती माझी आणि अनिताजींची तिसरी भेट. अनिताजी म्हणजे वैज्ञानिक डॉ. अनिता सेनगुप्ता. नेहमीप्रमाणे या वेळीही त्या एका नव्या विषयावर गप्पा मारत होत्या. प्रवासवेगाचं भविष्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘हायपरलूप’ या संकल्पनेवर त्या भरभरून बोलत होत्या. त्यांचं काम समजावून सांगत होत्या. अनेक ठिकाणी सादरीकरण करत होत्या. मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी धाडलेला ‘क्युरिऑसिटी’ हा रोव्हर मंगळ ग्रहावर उतरवण्यासाठीच्या पॅराशूट प्रणालीच्या निर्मितीत त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. विज्ञान व तंत्रज्ञानात नेमकं आणि लक्षणीय योगदान देणाऱ्या व्यक्ती म्हटल्या, की मला स्त्री-पुरुष यापलीकडे जाऊन आठवण होणाऱ्या काही माणसांपैकी त्या एक.

२००९ मध्ये रॉयल सोसायटीच्या ‘रोझलिंड फ्रँकलिन पुरस्कारा’नं गौरवलेल्या सुनेत्रा गुप्ता हे आणखी एक असंच प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व. संसर्गजन्य रोगांच्या प्रसाराबाबतचं त्यांचं योगदान महत्त्वपूर्ण आहे. नव्या वाटा धुंडाळणाऱ्या वैज्ञानिकांची आठवण आली की, आणखी एक चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येतो तो नीना टंडन यांचा. स्वत: बायोमेडिकल इंजिनीअर असणाऱ्या नीना या ‘एपीबोन’ कंपनीच्या संस्थापक आहेत. ही कंपनी प्रयोगशाळेमध्ये रुग्णांच्या ‘स्टेम सेल्स’चा (मूळ पेशी) वापर करून नवी सुदृढ हाडं तयार करण्यासाठी काम करते. ही हाडं रुग्णांच्याच स्टेम सेल्सपासून तयार केलेली असल्यामुळे रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती आणि शरीर त्या हाडांचा सहज स्वीकार करतं.

आणखी एक गोष्ट अमेरिकेतील कॅथरीन हंट  या तरुणीची. ती स्वत: पुरातत्त्वशास्त्रज्ञ आणि पॅलोपॅथोलॉजिस्ट आहे. वयाच्या बावीसाव्या वर्षी तिला अंडाशयाचा कर्करोग झाला. यामुळे कर्करोगाविषयी कुतूहल निर्माण होऊन तिनं कर्करोगाच्या अस्तित्वाविषयी आणखी खोलात जाऊन अभ्यास केला. या अभ्यासादरम्यान तिला ख्रिस्तपूर्व १५०० इतक्या जुन्या काळापासूनचे कर्करोगाचे पुरावे सापडले. पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यासासाठी पुरेशी साधनं उपलब्ध नसल्यामुळे आपल्या पुरातत्त्वशास्त्रज्ञ, कर्करोग विशेषज्ञ आणि कर्करोग अभ्यासक मैत्रिणींसमवेत तिनं ‘पॅलोऑन्कोलॉजी रीसर्च ऑर्गनायझेशन’ (Paleo-Oncology Research Organization) ही संस्था सुरू केली. या संस्थेमार्फत मुक्त स्रोत माध्यमातून कर्करोगाचे विविध काळांतील आणि भागांतील सर्व पुरावे, माहिती या संदर्भात अभ्यास करणाऱ्या माणसांसाठी उपलब्ध करून देण्यात येते. ही शाखा म्हणजे जीवशास्त्र व समाजशास्त्र यांचा सुरेख मेळ आहे. आधुनिक अभ्यासपद्धती आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन (मल्टिडिसिप्लिनरी अ‍ॅप्रोच) याचं हे देखणं उदाहरण.

ख्रिस्टेन मारहेव्हर या प्रवाळ जीवशास्त्रज्ञाच्या कामाचा उल्लेख या निमित्तानं व्हायलाच हवा. सध्याच्या बदलत्या वातावरणात, वाढत्या प्रदूषणात होणारी मासेमारी तसंच तापमानबदलासारखं मोठं आव्हान समोर उभं ठाकलं असताना प्रवाळ जीवसृष्टी तग धरण्यासाठी, प्रजननासाठी आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी काय करते आणि काय करायला हवं, याविषयी त्या काम करतात. पर्यावरण आणि निसर्गाला असलेलं महत्त्व, त्यासाठीचा संघर्ष आणि उभ्या राहू पाहात असलेल्या संघटनांचा आकडा पाहता या कामाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. प्रवाळांच्या वसाहती स्थापन करण्यासाठीचं आणि शाबूत ठेवण्यासाठीचं प्रशंसनीय काम त्या करतात.

पृथ्वीवरील सर्वात थंड, बर्फाच्छादित ठिकाणी प्रवास करणारी व तेथील हिमनद्यांचा अभ्यास करणारी हिमनद्याशास्त्रज्ञ (ग्लेशिओलॉजिस्ट)  मिशेल कोपिस ही अशीच एक साहसी स्त्री. हिमनद्यांचा अभ्यास करून त्यांचा प्रवाह, बदलत्या वातावरणाचा त्यांच्यावर आणि प्रवाहावर होणारा परिणाम, तेथील समुद्रपातळी, खडक, जमीन यांचा परस्परसंबंध व या साऱ्याचा तेथील जैवविविधता आणि पाण्याच्या स्रोतांवर होणारा परिणाम, असा अनेक आयामांचा ती अभ्यास करते. तिनं केलेला वेगळ्या पद्धतीचा, एकमेवाद्वितीय असा ‘हिमालयातील हिमनद्यांचा अभ्यास’ अनेक कारणांनी महत्त्वाचा आहे.

अशा असंख्य जणी. प्रेरणादायी स्त्री संशोधकांची यादी वाढतच चालली आहे. अवकाशापासून जीवशास्त्रापर्यंत, भौतिकशास्त्रापासून कृषिविज्ञानापर्यंत अनेक क्षेत्रातलं स्त्रियांचं महत्त्वाचं व कालातीत कार्य आपल्यासमोर उलगडत राहतं आहे. स्त्रियांचा संघर्ष, विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील आपलं स्थान मिळवण्यासाठीचा त्यांचा प्रवास खडतर आहे हे नक्की. पुरुषी अंकुश असणाऱ्या या क्षेत्रामध्ये स्वत:ला जोखणं आणि सिद्ध करणं मुळीच सोपं नाही. ती एक कठीण परीक्षा आहे. पण हसत हसत तिला सामोरं जात नव्या वाटा तयार करण्याची जिद्द आणि क्षमता यांची या स्त्रियांकडे मुळीच कमतरता नाहीये. शाळेत सहावीमध्ये विज्ञानाच्या पुस्तकात मला भेटलेल्या लिझ माइट्नरपासून भारतीय गगनयान मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या डॉ. ललिताम्बिका यांच्यापर्यंत अनेक रूपांत संशोधिका आपल्याला भेटतात. आजवर होत असलेल्या चर्चामधून केवळ नकारात्मक गोष्टी अधोरेखित करण्याऐवजी प्रेरणादायी कहाण्या सर्वासमोर यायला हव्यात, याची जाणीव त्या करून देतात. या कथा केवळ माहितीच्या कक्षाच रुंदावणार नाहीत, तर जगाच्या कानाकोपऱ्यातील अनेक लहान व मोठय़ा मुलींमधील भावी संशोधिका घडवण्यासाठी कारणीभूत ठरतील याची खात्री वाटते.

या संशोधिकांचं कार्य जाणून घेत असतानाच तितकाच महत्त्वाचा असणार आहे त्यांचा ‘स्व’च्या दिशेनं झालेला प्रवास. एक व्यक्ती म्हणून घडत असताना त्यांना आलेले अनुभव आणि दैनंदिन जीवनाच्या परिपाकाचं त्यांना उमगलेलं सार. या सदराच्या निमित्तानं संशोधनाच्या क्षेत्रात अनमोल योगदान दिलेल्या विविध क्षेत्रांतील संशोधिकांच्या कार्याचा परिचय करून देत असतानाच मी माझ्याबरोबरच्या त्यांच्या गप्पांमधून जाणवलेले काही अनुभव सांगणार आहे. त्यांना आलेल्या संकटांवर त्यांनी केलेली मात आणि त्यांना मिळालेली किंवा न मिळालेली त्यांच्या माणसांची व समाजाची साथ, हेही तुमच्यासमोर कथन करणार आहे.

समाज म्हणून अशा स्त्रियांसाठी योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी, त्यांच्यासोबत उभं राहण्यासाठी, केवळ तक्रारी न करता उपाय शोधण्यासाठी, नव्या पिढीला आशा आणि विश्वास देण्यासाठी आणि अनेक नव्या तरुण वैज्ञानिक घडवण्यासाठी संशोधन करणाऱ्या स्त्रियांच्या अतुलनीय कथा सांगायला हव्यात.. त्या सगळ्यांनी ऐकायला हव्यात.. आणि सगळ्यांपर्यंत त्या पोहोचायला हव्यात. त्यांचं कर्तृत्व एक व्यक्ती म्हणून, माणूस म्हणून आणि सजीव म्हणून साजरं करण्यासाठी आपण हे करायला हवं.postcardsfromruchira@gmail.com

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sanshodhika author ruchira sawant preserving legacy curiosity ysh

First published on: 01-01-2022 at 00:02 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×