scorecardresearch

सप्तपदीनंतर.. : सुखी.. समाधानी संसार!

 आमचा लग्नाआधीचा प्रवास सोपा नव्हता. वयाच्या १७ व्या वर्षी मी स्नेहलला भेटले आणि १८ व्या वर्षी एकमेकांशीच लग्न करणार असं ठरवलं होतं.

– चेतना गावडे

स्नेहल, माझा नवरा मला नेहमी सांगतो, की आयुष्य सोपं नसतं! कोणताच प्रवास सोपा नसतो आणि सोपा नसावा, मग त्याची मजा आणि महत्त्व राहत नाही.. आणि आज ते मला पटतंयसुद्धा.

 आमचा लग्नाआधीचा प्रवास सोपा नव्हता. वयाच्या १७ व्या वर्षी मी स्नेहलला भेटले आणि १८ व्या वर्षी एकमेकांशीच लग्न करणार असं ठरवलं होतं. आमच्या नात्याच्या पहिल्या ६ महिन्यांतच मी त्याच्याबद्दल माझ्या घरी सांगितलं होतं. कारण इतर कुणाकडून आमच्याबद्दल घरी कळावं हे मला नको होतं. म्हणून एक दिवस धाडस करून मी स्वत:हून माझ्या वडिलांना सांगितलं. माझे वडील आधीपासून जरा कडक. त्यांना ते फारसं पटलेलं दिसलं नाही. अर्थात त्या वेळी आम्ही खूप लहान होतो. नोकरी नव्हती, कॉलेजचं शिक्षण चालू होतं. त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया अपेक्षित होती. पण वडिलांना कळल्यामुळे घरातल्या परिस्थितीत बदल झाला, माझ्या बाहेर जाण्यावर मर्यादा आल्या. त्या काळात कॉलेजमधल्या मुलांकडे मोबाइल नसायचा, त्यामुळे बऱ्याचदा आमचा एकमेकांशी संपर्क व्हायचा नाही. मला घरातून सहजासहजी बाहेर जाणं, मित्रमैत्रिणींना भेटणं, अशी मोकळीक नव्हती. म्हणून मग आम्ही एकमेकांना पत्र लिहून मन मोकळं करायचो, ते पत्र देण्यासाठी आमची २-५ मिनिटं भेट व्हायची त्यातच समाधान मानायचो. त्या वेळी स्नेहल ऑटोमोबाईल क्षेत्रातील खासगी कंपनीत कामाला होता. नंतर मलाही एका चांगल्या बँकेत नोकरी मिळाली. त्या निमित्तानं आम्हाला थोडा जास्त वेळ भेटायला मिळायचं, पण नंतर मला ‘कॉल सेंटर’ची नोकरी करावी लागली, कारण पगार जास्त होता आणि तो गरजेचा होता. अर्थात घरच्यांनी मला कधीच भरीस पाडलं नाही, की माझ्यावर कसली जबाबदारी टाकली नाही. पण मीच आईवडिलांना मदत करता येईल म्हणून ‘कॉल सेंटर’मध्ये रात्रपाळीची नोकरी करायचं ठरवलं. त्या वेळेसही स्नेहलनंच मला साथ दिली. कधी अविश्वास दाखवला नाही, माझ्यावर कोणती बंधनं घातली नाहीत. त्याच्या पाठिंबा आणि विश्वासामुळे मी जवळपास २ वर्ष तिथे नोकरी केली. नंतर तब्येतीच्या अडचणींमुळे ती नोकरी सोडल्यावर एका नावाजलेल्या जिममध्ये नोकरीची संधी मिळाली. तिथे काम करत असताना अनेक प्रसिद्ध व्यक्ती, बॉलीवूड सेलेब्रिटींची ओळख व्हायची. पण त्या जगाची भुरळ पडली नाही. त्याच वेळेस स्नेहलचे खूप वर्षांपासून सरकारी नोकरीसाठी प्रयत्न चालू होते, त्यासाठी त्यानं अनेक परीक्षा दिल्या होत्या. अखेर मनासारखं झालं आणि स्नेहलला केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळाली. हा आमच्या आयुष्याचा ‘टर्निग पॉइंट’ होता.

 आम्ही लग्न करण्याचा विचार करायला लागलो होतो, पण माझ्या घरच्यांची मंजुरी मिळवण्याचा मोठा डोंगर आम्हाला पार करायचा होता. पण तो सहज पार पडला. कारण आई-वडिलांचं आपल्या मुलांवर नितांत प्रेम असतं हे १०० टक्के खरं आहे! आमचं लग्न अगदी व्यवस्थित पार पडलं. पण खरी परीक्षा पुढे होती..

लग्न झालं तेव्हा मला नोकरी नव्हती. पण नवीन संसार आणि नवीन घरात जुळवून घेताना नोकरीचं काही महिने लक्षात आलं नाही. नोकरी शोधायला सुरुवात केली, पण तोपर्यंत बाळाची चाहूल लागली होती. आता खर्च वाढणार होता आणि कमावणारा एकच. लग्नासाठी स्नेहलनं कर्ज घेतलं होतं. पण मी कमावत नसल्याची जाणीव त्यानं कधीही करून दिली नाही. काही महिन्यांनी मला एका ‘इंग्लिश स्पीकिंग’ वर्गात काही महिन्यांसाठी शिक्षिकेची नोकरी मिळाली, तेव्हा घरी थोडा हातभार लावता आला.

मग आमच्या मुलीचा,चार्वीचा जन्म झाला आणि मी तिच्या संगोपनात गुंतले. स्नेहलसाठी तो काळ खूप कठीण होता, कारण बाळ जन्मल्यावर पहिल्या दिवसापासूनच खर्च दुप्पट असतो. तरीही त्यानं बाळाला कधीच काही कमी पडू दिलं नाही किंवा काही बोलूनही दाखवलं नाही. त्याचवेळी मला नोकरीसाठी एक संधी चालून आली, पण चार्वी केवळ साडेचार महिन्यांची होती. नवऱ्याला त्याचं मत विचारलं तर एकदम अनपेक्षित उत्तर मिळालं. स्नेहल म्हणाला, की ‘‘तू ठरव. तुझी धावपळ नको. बाळाचं संगोपन आणि नोकरी तुला जमणार आहे का? केलंस तरी ठीक, नाही केलंस तरी आपण मॅनेज करू.’’ मी गोंधळले होते, कारण बाळ एवढं लहान असताना करिअरची सुरुवात हा स्वार्थीपणा वाटू शकतो. मग तोच म्हणाला, ‘‘तू करून बघ. जमलं तर ठीक. नाही, तरी काहीच समस्या नाही, आपण सर्व सांभाळू.’’ त्यानं हे आश्वासन दिलं नसतं तर मी कदाचित धाडस केलं नसतं. मग माझा एक नवीन व्यावसायिक प्रवास सुरू  झाला. दरम्यान, वैयक्तिक आयुष्यातले चढउतार सुरू होतेच. सासू-सासऱ्यांच्या काही तब्येतीच्या समस्यांमुळे आम्हाला अनेकदा रुग्णालयात जावं लागायचं. तेव्हा ऑफिस, घर, मूल सगळं सांभाळणं कठीण व्हायचं. पण आपण जी काही धावपळ करतोय, त्याची जाणीव असणारा माणूस आपल्याबरोबर आहे ही भावना वेगळीच असते. त्यात बरोबरीनं आम्ही चार्वीचा शाळेतला प्रवेश, तिचे सर्व वाढदिवस साजरे केले, आमची पहिली कार घेतली. चांगली गोष्ट म्हणजे, त्याच दरम्यान स्नेहलला बढती मिळाली. आणि २०१९ मध्ये आम्ही स्वत:चं पहिलं घर घेतलं. सगळी धावपळ त्यानंच केली. त्याची दूरदृष्टी, इच्छा आणि धाडस यामुळेच ते शक्य झालं. माझा पगार कमी असल्यानं मला त्याला हवी तेवढी आर्थिक मदत करायला जमत नव्हतं, पण जेवढं जमेल तेवढं मी करत असे. त्यानंतरच्या करोनाकाळात त्याच्या सरकारी नोकरीमुळे तो खंबीर होताच, पण माझीही नोकरी सुरू राहिली आणि आम्हाला आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागलं नाही.

  हल्लीच एका मोठय़ा कंपनीत नोकरीची संधी आली तेव्हा मी चिंतेत पडले, कारण कामाचं स्वरूप थोडं वेगळं होतं आणि अनेक वेळा ऑफिसमधून उशिरा घरी यावं लागण्याची शक्यता होती. माझा आतापर्यंतचा नोकरीतला ‘कंफर्ट झोन’, माझ्या ‘रूटिन’प्रमाणे बसलेलं मुलीचं रुटिन, घरातल्या जेवणाच्या वेळा हे सगळं बदलणार होतं. पण ही नोकरी म्हणजे माझ्यासाठी मोठी संधी होती. त्या वेळेसही माझा गोंधळ दूर करून मला आत्मविश्वास देणारा माझा नवराच होता. मी या संधीचं चीज करायला हवं, हे त्यानं मला पटवून दिलं. ‘‘मुलीचं रुटिन आपण सांभाळू, तुला ऑफिसमधून यायला जेव्हा वेळ होणार असेल तेव्हा मी वेळेत येईन.’’ या शब्दांत दिलेल्या प्रोत्साहन आणि पाठिंब्यावर मी नवी नोकरी सुरू केली. त्याला असलेल्या सरकारी नोकरीमुळे आम्ही मुंबईत सरकारी क्वार्टर्समध्ये राहतो. माझ्या नोकरीला जाणं-येणं सोपं आहे, माहेरही जवळ आहे.

आमच्या संसाराला १० वर्ष झाली आणि आम्हाला एकमेकांना भेटून साधारण १८ वर्ष झाली, पण आमच्यातली एकमेकांसाठीची ओढ तशीच आहे. प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा आणि एकमेकांसाठी काहीतरी करत राहण्याची भावनाही तेवढीच जिवंत आहे. संसारात दोघांचा सारखाच वाटा आहे. थोडंफार कमी-जास्त प्रत्येक संसारात असतं. मतभेद, भांडणं, चिडचिड हे आमच्यातही चालू असतं, पण तीच तर खरी मजा आहे. आम्ही आमच्या नात्यामध्ये मैत्री ही सर्वात प्रथम ठेवली आहे. मनात असेल ते प्रेमात आणि रागात बोलून मोकळे होतो. सुखी संसाराची व्याख्या मला ठाऊक नाही, पण समाधानी संसार म्हणजे काय याचा अनुभव गेल्या १० वर्षांत नक्कीच आला आहे.

chetnagawde5s@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Saptapadi happy satisfied world husband life fun significance marriage ysh

ताज्या बातम्या