मनीषा बोरकर

हो खरंच, आमचं आयुष्य म्हणजे ‘जिंदगी मिली हैं दोबारा!’ असंच आहे. मी आणि रवींद्र वाघमारे (रवी), माझा नवरा, दोघांचा हा पुनर्विवाह आहे. तोही त्याच्या वयाच्या ५४ व्या आणि माझ्या ४६ व्या वर्षी! आमची कहाणी थोडी वेगळी आहे.

Pune Lok Sabha, Ravindra Dhangekar,
पुणे लोकसभा : पराभवाच्या भीतीपोटी रविंद्र धंगेकर हे आरोप करीत आहे – भाजप प्रवक्ते संदीप खर्डेकर
sharda madeshwar upsc marathi news, sharda madeshwar upsc marathi news
चंद्रपुरची कन्या शारदा मादे्शवार केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण
Rajyog Lakshmi Narayan Rajyoga
मे महिन्यात निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! या तीन राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ, मिळेल बक्कळ पैसा
What Devendra Fadnavis Said?
“पंतप्रधान मोदींच्या आशीर्वादाने चांद्रयान चंद्रावर उतरलं, त्याचप्रमाणे चंद्रपूरचं यान..”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य चर्चेत

रवीच्या प्रथम पत्नीचं २१ वर्षांच्या सुखी संसारानंतर एका दुर्दैवी अपघातात निधन झालं होतं आणि मी लग्नाच्या अत्यंत वाईट अनुभवातून बाहेर पडले होते. मी माझ्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. आई-वडील देवाघरी गेलेले. मी एकटी, स्वतंत्र राहत होते. आम्हा दोघांना आपलं उर्वरित आयुष्य व्यतीत करण्यासाठी एक योग्य जीवनसाथी हवा होता. वाढलेल्या वयात आपल्याला दुसऱ्या माणसाबरोबर तडजोड करणं जमेल का, हा प्रश्न मला नेहमी पडत होता. पुन्हा एकदा लग्नाची ‘रिस्क’ घ्यावी की नाही, हे विचार सतत मनात घोळत होते. मी ‘सीए’ असून एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये वरिष्ठ पदावर कार्यरत होते. माझ्या व्यग्र करिअरला पाठिंबा देणारा जोडीदार मला मिळेल का, हा महत्त्वाचा प्रश्न होता.

रवी ३५ वर्ष कॉर्पोरेटमध्ये मनुष्यबळ विभागात वरिष्ठ पदावर कार्यरत होता. आम्ही दोघे एकमेकांना भेटलो आणि मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं मला सापडली. रवीचा मनमोकळा, मदत करणारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला पत्नीला एक माणूस मानण्याचा स्वभाव मला भावला. आता आम्हाला एकाच व्यक्तीची संमती हवी होती, ती म्हणजे ऋता. रवीची तेव्हा २२ वर्षांची असलेली मुलगी. ऋतानंच आपल्या बाबांना परत लग्न करण्यास सुचवलं होतं. ती तेव्हा पुण्यात डेक्कन महाविद्यालयात पुरातत्त्व विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत होती. मी आणि ती भेटलो आणि आमच्या मनमोकळय़ा गप्पा झाल्यावर तिच्याकडून आम्हाला लग्नासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळाला! आम्ही २० जून २०११ ला नोंदणी पद्धतीनं विवाहबद्ध झालो.

आता आमचा दोन ठिकाणी संसार सुरू झाला. मी दादरला- कारण माझी नोकरी १० ते ११ तासांची आणि ऑफिस घरापासून जवळ होतं. रवी वाशीला एका व्यवस्थापन महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून त्या वेळी कार्यरत होता. मी आणि रवी ज्याला जमेल त्याप्रमाणे दादर आणि वाशीत ये-जा करत होतो. दोघांकडे कार असल्यानं आम्ही बहुतेक वेळा शनिवार-रविवार आणि इतर सुट्टीच्या दिवशी एकत्र असायचो. हळूहळू कुटुंब म्हणून जवळ येत होतो.
२०१३ मध्ये माझ्या वार्षिक आरोग्य चाचणीत मला स्तनाचा कर्करोग असल्याचं कळलं. मी सुन्नच झाले, पण रवीनं या काळात मला खूप मानसिक आधार दिला. माझ्या प्रत्येक किमोथेरपीच्या, रेडिएशनच्या उपचारांच्या वेळी तो माझ्याबरोबर रुग्णालयात सोबत राहात होता. माझे केस दुसऱ्या किमोथेरपीनंतर गळाले. पण तो माझी समजूत घालत होता, ‘‘अगं, केस ही तर घरातली शेती आहे! येतील परत. त्यात काय एवढं!’’ ऋता तिचा अभ्यासक्रम संपवून मुंबईतल्या एका संग्रहालयात काम करू लागली होती आणि आम्ही सर्वजण एकत्र दादरमध्ये राहू लागलो होतो. दु:ख आपल्या माणसांना जवळ आणतं आणि कोणत्याही आजाराचा मुकाबला करण्यास मदत करतं.

माझे सर्व औषधोपचार संपवून मी परत माझ्या कामात २०१४ पासून व्यग्र झाले. आता आम्ही ठरवलं होतं, की आता हा देवानं मला दिलेला दुसरा जन्म छान जगायचा! आम्ही दोघंही भरपूर प्रवास करतो. निरनिराळय़ा सांस्कृतिक कार्यक्रमांना हजेरी लावतो. वाचन करतो. रवीनं मध्यंतरी अशी नोकरी घेतली, ज्यातून त्याला त्याचं आवडतं समाजोपयोगी कार्य करायला वेळ मिळाला. मीही आता स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे. आमच्या राहत्या घरी आम्ही एक छोटीशी बाग केली आहे. बागेतल्या झाडाफुलांची निगा राखण्यात आम्हाला मजा येते. करोनाकाळात आमच्या गल्लीतल्या लोकांना एकत्र आणून एकमेकांना सहकार्य करण्यात रवीनं खूप छान काम केलं. पुढेही प्लास्टिक आणि ‘ई-वेस्ट’ रिसायकिलगसाठी गोळा करणं आणि ते एका सरकारमान्य संस्थेत देणं हा उपक्रम तो अतिशय तळमळीनं चालवत आहे. आमच्या परिसरात खूप ज्येष्ठ, नामांकित, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेली मंडळी राहातात. त्यांच्या छोटेखानी मुलाखतींचे व्हिडीओ तयार करून त्या संग्रहित करण्यासारखे बरेच उपक्रम आता आम्ही करतो. गंमत म्हणजे, ज्या परिसरात मी लहानपणापासून राहाते तिथे आता माझ्यापेक्षा रवीलाच सगळे जास्त ओळखतात. या सगळय़ात मी माझ्याकडून त्याला सर्वतोपरी साथ देत असते. ऋतानंही तिच्या पसंतीचा, तिच्या व्यवसायातलाच जोडीदार निवडला आहे. ती तिच्या आयुष्यात मग्न आहे.

आम्ही दोघं एकमेकांना साथ देत आयुष्यात मार्गक्रमण करत आहोत. आता आमच्या लग्नाला ११ वर्ष पूर्ण झाली. आमचा हा प्रौढावस्थेतला विवाह आणि नंतरचा काळ एकमेकांच्या साथीनं छान चालला आहे. प्रत्येक संसारात तडजोडी असतातच. पण आम्ही दोघांनीही त्या फार सहजपणे केल्या आणि अंगीकारल्या. याचं मुख्य कारण म्हणजे या प्रौढ वयात लग्न करताना प्रगल्भता, अनुरूपता (कम्पॅटिबिलिटी) आणि तडजोड (कॉम्प्रमाईज) यांबरोबरच एकमेकांच्या चांगल्या गुणांना प्रोत्साहन आणि आपापसांतले अवगुण मान्य करत ते कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला. आम्हा दोघांना एकत्र आणण्यात माझ्या आणि रवीकडच्याही नातलगांचा खूप पािठबा होता. आम्ही दोघं त्यासाठी त्यांचे ऋणी आहोत. आयुष्याची ‘दुसरी इिनग’ आम्ही दोघंही उत्तमरीत्या खेळत आहोत.. आणि ‘जिंदगीमिलती हैं दोबारा’ हेही खरंच आहे!

ऋणानुबंधाच्या गाठी – सायली वझे पानसे
‘सप्तपदीनंतर’साठी लिहायचं ठरवल्यावर आठवणींचा एक चित्रपटच डोळय़ांपुढे आला. मी नुकतीच इंजिनीअर होऊन एका खासगी कंपनीत नोकरी करत होते. घरात अजून लग्नवारे वाहायला सुरुवातदेखील झाली नव्हती, तोच एका ओळखीतून पुष्करचं स्थळ आलं.पुष्कर तेव्हा सिंगापूरला कार्यरत होता. सिंगापूर म्हटल्यावर तर मी लगेच ‘नाही’ म्हणून मोकळी झाले. पण ‘ओळखीतून आलंय, तर बघायला काय हरकत आहे?’ असं घरी म्हणणं पडल्यावर तयार झाले. पुष्करसाठी तर हा अगदी ‘एनआरआय’ सोहळा होता. सुट्टीत येऊन साखरपुडा करून जायचं आणि मग ६ महिन्यांनी लग्न. बऱ्याच मुली बघितल्या त्यानं. मी मात्र फक्त हे एकच स्थळ पाहिलं होतं. पहिल्याच भेटीत वर्षांनुवर्ष ओळख असल्यासारखी मनमोकळी बोलले मी. हेच त्याला भावलं आणि मलाही तो आवडला. आठवडाभरातच साखरपुडा करून तो सिंगापूरला रवाना झाला. त्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये विधिवत लग्न झालं आणि ‘सायली वझे’ची ‘सायली पानसे’ झाले.

लग्नानंतर १० दिवसांतच आम्ही सिंगापूरला गेलो. खूप माणसांच्या सहवासात राहिलेल्या मला स्थिरस्थावर व्हायला थोडा वेळ लागला. सुरुवातीचे राजाराणीचे गुलाबी दिवस भुर्रकन उडून गेले. स्वभाव जुळण्यापेक्षा ते एकमेकांना पूरक असतील तर जास्त चांगलं असं वाटतं. गुणांचं कौतुक करत आणि दोष स्वीकारत आमचा संसार सुखानं सुरू झाला.मला काहीतरी करावं असं वाटू लागलं. पुष्करचाही पािठबा होताच. पण तिथले नियम, माझा व्हिसा, अशा काही कारणांस्तव तिथे नोकरी करता आली नाही. पुष्करला काही वेळा ऑफिसमधून घरी आल्यावरदेखील रात्रभर कॉल असत. त्याच्या बरोबरीनं मीदेखील रात्रभर जागीच. त्यात भर म्हणजे काही वेळा तर रात्रीतून उठून तडक ऑफिस गाठावं लागे. मीदेखील त्याच्या कामाच्या वेळेनुसार माझी कामं जुळवून घेत होते. गमतीत कधी तरी त्याला म्हणायचेदेखील, ‘‘तू झोप. तुझ्या ऑफिसचा फोन आला, तर काय बोलायचं असतं सगळं पाठ आहे मला!’’ परदेशात वरकरणी दिसायला सगळं चांगलं असलं, तरी कुठल्याही कामांसाठी सहजी मदतनीस मिळत नाही. साहजिकच सगळी कामं मीच करत होते. कपडय़ांना इस्त्री- विशेष करून नवऱ्याच्या ऑफिसच्या शर्टाना इस्त्री करणं अतिशय कंटाळवाणं काम होतं. पण आधीपासूनच पडेल ते काम करायची सवय असल्यामुळे मी कुठल्याही कामाचा बाऊ केला नाही. दिवसभर एकटीच असायचे घरी. कंटाळाही यायचा. पण वाचनात, व्यायामात वेळ जायचा, मन रमवायचे. तिथेही मी मैत्रिणी जमवल्या, म्हणूनच राहणं सुलभ झालं. काही वर्ष तिथे राहून पैसे साठवू, हा निर्णय दोघांचाही होता. माझी साथ होती म्हणूनच तिथे राहू शकलो, बऱ्यापैकी पैसे साठवता आले आणि त्यामुळेच पुण्यात घर घेणं शक्य झालं.

दोन वर्षांनी भारतात सुट्टीसाठी आलो, तेव्हा येणाऱ्या बाळाची चाहूल लागली. डॉक्टरांनी ‘बेडरेस्ट’ सांगितल्यामुळे पुष्कर एकटाच सिंगापूरला परतला. खरंतर तेव्हा नवरा जवळ असावा असं खूपदा वाटायचं, पण इलाज नव्हता. ‘दोन ध्रुवांवर दोघे आपण’ असं काहीसं झालं. त्याच्याशी बोलले की मला खूप आधार वाटायचा, तर तिकडे तो माझ्या आठवणीत एकेक दिवस ढकलायचा. मध्ये एक आठवडा सुट्टी काढून तो खास माझ्याबरोबर वेळ घालवता यावा म्हणून आला. आम्हा दोघांच्याही आयुष्यातले सोनेरी दिवस होते ते. खूप लाड करून घेतले त्याच्याकडून! दोघंही क्षण अन् क्षण जगलो.नंतर दोन महिन्यांत साकेतचा- आमच्या मुलाचा जन्म झाला. साकेत अडीच महिन्यांचा असतानाच त्याला घेऊन मी सिंगापूरला गेले.

साकेत पाच वर्षांचा झाल्यावर आम्ही भारतात परतलो. माझ्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग करावा असं मला आणि पुष्करलाही वाटत होतं. मी घरच्या घरी टय़ुशन्स घेऊ शकेन हा पर्याय त्यानं मला सुचवला. सुरुवातीला ३-४ मुलांपासून सुरू झालेला माझा क्लास ३ बॅचेसपर्यंत वाढला. त्या बरोबरीनंच घरच्या सगळय़ा जबाबदाऱ्या मी पार पाडतच होते. एकदा माझ्यावर कुठलंही काम सोपवलं की ते व्यवस्थित पूर्ण केल्याशिवाय मी शांत बसत नाही. पुष्करलाही हे चांगलंच माहीत असल्यामुळे तो निर्धास्त असतो.

पुष्कर ‘आयटी’मध्ये नोकरीला असल्यामुळे घरी यायच्या वेळा अजिबात निश्चित नाहीत. कधी कधी तर एकमेकांशी पाच मिनिटं निवांत बोलणंही होत नाही. पुष्कर मला बऱ्याच वेळा म्हणतो, ‘‘तू घरी असल्यामुळे साकेतकडे व्यवस्थित लक्ष देता येतंय. त्याचं जेवणखाण, शाळा, अभ्यास, याकडे जातीनं लक्ष देता येतंय. दोघं दिवसभर बाहेर असतो तर हे शक्यच नव्हतं.’’ साकेतच्या अभ्यासातल्या प्रगतीचं श्रेय तो सर्वस्वी मला देतो.

करोनाकाळात मी पुन्हा एकदा पुष्करच्या पाठिंब्यामुळेच ऑनलाइन क्लास घेऊ लागले. माझी स्वत:ची अशी ओळख निर्माण करू शकले. पुष्करचंही ‘वर्क फ्रॉम होम’ असल्यामुळे त्याचंही काम जवळून पाहता आलं. त्याच्याबद्दलचा आदर वाढला. त्याच्या प्रोत्साहनामुळे लिहायला सुरुवात केली. आता तर लिहिण्याचं जणू व्यसनच जडलंय मला. स्वयंपाकघरात नवनवीन प्रयोग करायला आणि शक्यतो सगळं घरी करायला मला आवडतं. पुष्करला त्याचं कौतुक आहे. हल्ली तर बऱ्याचदा तोही स्वयंपाकघराचा ताबा घेतो. ती जबाबदारीदेखील उत्तम पार पाडतो. माझा प्रियकर, मित्र, तर कधीकधी वडील अशा वेगवेगळय़ा भूमिका तो लीलया निभावतो. करोनाच्या सुरुवातीलाच आम्हाला तिघांनाही करोना झाल्याचं निदान झालं. तेव्हा आम्ही तिघंही तेव्हा खूप सकारात्मक राहिलो. एकमेकांना मानसिक आधार देत त्याला धैर्यानं सामोरे गेलो. त्यातून खूप काही शिकलो. इतक्यातच साकेतचं मोठं आजारपण पार पडलं. खरंतर आम्हा दोघांनाही खूप टेन्शन आलं होतं. घरचे, नातेवाईक, मित्रमैत्रिणी मदतीला, धीर द्यायला होतेच. दोघांना एकमेकांकडे पाहूनही आधार वाटायचा, धीर यायचा. त्या बळावरच ते आजारपण निभावून नेलं. आमच्यातही वाद, मतभेद, रुसवेफुगवे होतात आणि थोडेफार व्हायलाच हवेत, त्याशिवाय संसारात मजा नाही! अलीकडे तर एकमेकांना काय म्हणायचंय हे न बोलताही कळतं. एखाद्या परिस्थितीत कोण कसं ‘रीअॅक्ट’ होईल याचा अंदाज आधीच असतो.

यासाऱ्यातून ‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी भेटीत तुष्टता मोठी..’ या ओळींची सार्थकता पटते. संसाराचा वृक्ष प्रेम, कर्तव्य, त्याग, समर्पण या चार गोष्टींवर तग धरतो. एकमेकांवरचं प्रेम, प्रेमापोटी कर्तव्य, कर्तव्यापोटी त्याग आणि त्यागापोटी समर्पण, यातून मिळणारं समाधानच संसारातली गणितं सहज सोडवतं.
sayalivaze@yahoo.com
mvborkar@gmail.com