साधना तिप्पनाकजे
सदस्यांतून सरपंचपदी निवड आणि थेट जनतेकडून सरपंचपदी निवड या दोन्हींचा अनुभव असणाऱ्या नागपूरमधल्या मौदा तालुक्यातल्या आजणगावच्या नीता पोटफोडे. त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इंग्रजी साहित्य घेऊन बी. ए. केलं. डी.एड.ही केलं. या शिक्षणाचा फायदा घेत त्यांनी सरपंचपदाच्या माध्यमातून कामाचा धडाका सुरू केला. म्हणूनच सुशिक्षित लोकप्रतिनिधी असल्यास सुशासित गाव तयार होतो, याचं उत्तम उदाहरण त्या तयार करू शकल्या.
एका आटपाट नगरात ग्रामपंचायतीची निवडणूक लागली. या वेळी गावातली काही मंडळी एकत्र आली आणि त्यांनी विचार केला, आपल्या ग्रामपंचायतीत सुशिक्षित लोकप्रतिनिधी का नाहीत? आपला गावकारभार चालवायला किमान शिक्षित लोकप्रतिनिधी असल्यास प्रशासकीय बाबी चांगल्या पद्धतीने हाताळल्या जातील. मंडळींनी शोध घ्यायला सुरुवात केली. एक सदस्यपद महिला ओ.बी.सी. राखीव होतं. राखीव पदावर नुसतं निवडायचं म्हणून निवडलं असं व्हायला नको. त्या पदाचा फायदा गावासोबतच, त्या प्रतिनिधीच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही झाला पाहिजे, अशी या मंडळींची कळकळ होती. त्यांना आपल्या गावात बी.ए.डी.एड. झालेली एक गृहिणी असल्याचं लक्षात आलं. या गृहिणीच्या घरी जाऊन, तिच्या घरच्यांशी, तिच्याशी बोलून या मंडळींनी त्यांचा उद्देश सांगितला. नकारातून होकार आला आणि त्या निवडणुकही जिंकल्या. आता सरपंचपद खुल्या प्रवर्गात होतं. त्या वेळी ग्रामपंचायत सदस्यच सरपंच निवडत असत. बाईंनी सरपंचपदाचीही निवडणूक लढवली आणि विजयी झाल्या. मंडळींनो, हे आटपाट नगर म्हणजे नागपूरमधल्या मौदा तालुक्यातलं आजणगाव. आणि या गृहिणी आहेत, नीता पोटफोडे!
सप्टेंबर २०१३ ला नीता पोटफोडे पहिल्यांदा ग्रामपंचायत सदस्या म्हणून निवडून आल्या. डिसेंबरमध्ये आजणगाव, इसापूर या ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदीही निवडून आल्या. नीताताईंनी गावकऱ्यांनी ठेवलेला त्यांच्यावरचा विश्वास सार्थ करण्याचं ठरवलं. आजणगाव-इसापूर ग्रुप ग्रामपंचायत असली तरी या दोन गावांमध्ये जायला थेट रस्ताच नव्हता. रस्ता नसल्यामुळे २ किलोमीटरचं अंतर कापायला २५ किलोमीटर वळसा घालून जावं लागे. या २ किलोमीटरच्या अंतरात पायी जाणंही अवघड होतं. पावसात गुडघाभर चिखल असायचा. नीताताईंनी सर्वात आधी या दोन गावांना जोडण्याचं ठरवलं. त्यांच्या गावाजवळच ‘नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन’ म्हणजेच ‘एनटीपीसी’चा प्लान्ट आहे. ‘एनटीपीसी’नं त्यांच्या प्लान्टच्या आसपासच्या अकरा गावांच्या विकासाची जबाबदारी घेतली आहे. नीताताईंनी ‘एनटीपीसी’शी संपर्क साधून या दोन गावांना जोडण्याचा प्रस्ताव दिला. याचा पाठपुरावा करून तातडीने हा रस्ता तयार करून घेतला. दोन्ही गावांमध्ये रस्त्यांवरील दिव्यांची संख्या अपुरी होती. त्यामुळे रात्री अंधारात सापांची भीती असायची. स्त्रियांना एकटीने बाहेर पडायची भीती वाटायची. जिल्हा परिषदेकडून गावात दिव्यांचे ४३ खांब बसवून घेतले. नीताताईंमधली कामाची धमक काही दिवसांतच दिसून आली. ताईंनी सरपंचांचे अधिकार आणि कार्य, ग्रामपंचायतीची कामं जाणून घ्यायचं ठरवलं. ‘महिला राजसत्ता आंदोलना’ची याकरिता त्यांना मोठी मदत झाली. राज्यभरात महिला लोकप्रतिनिधींना प्रशिक्षण देणारं हे नेटवर्क आहे. त्याच्या माध्यमातून नीताताईंना गावकारभार, विविध जीआर, योजना, सरपंचांचे अधिकार, त्यांची कामं यांबाबत माहिती मिळाली. यामुळे त्यांच्यातला आत्मविश्वास वाढला. आपले अधिकार वापरून, सर्वाच्या सहकार्याने गावविकास करायचा वसा त्यांनी घेतला.
गावात ग्रामपंचायत येऊन तीस वर्ष झाली तरी ग्रामपंचायतीचं स्वत:चं कार्यालय नव्हतं. जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीमधील वाचनालयामध्ये ग्रामपंचायतीचा कारभार थाटला होता. नीताताईंनी ग्रामपंचायतीची स्वतंत्र वास्तू असायलाच हवी हे इतर सदस्यांना पटवून दिलं. जिल्हा परिषदेत जनसुविधेअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयाचा प्रस्ताव त्यांनी पाठवला. २०१४ मध्ये प्रस्ताव मंजूर झाला. प्रत्यक्ष निधी मिळून २०१८ मध्ये आजणगाव-इसापूर ग्रामपंचायतीचं स्वतंत्र कार्यालय तयार झालं. ग्रामपंचायतीचं जिथं स्वतचं कार्यालयच नाही, तिथं ग्रामसभेबाबतही असंच औदासिन्य होतं. १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला झेंडावंदन झाल्यावर, ग्रामसेवक जमलेल्या लोकांमध्ये सह्य़ांसाठी रजिस्टर फिरवायचे. अशा प्रकारे ‘कोरम’ दाखवून ग्रामसभा झाल्याचं सरकारदरबारी दाखवलं जायचं. नीताताईंनी सरपंच झाल्यावर, पहिल्याच प्रजासत्ताक दिनाच्या झेंडावंदनाला असं रजिस्टर फिरवून सह्य़ा घ्यायला विरोध केला. त्यांनी लोकांमध्ये ग्रामसभेबद्दल जागृती निर्माण केली, तिचं महत्त्व पटवलं आणि आजणगाव-इसापूरमध्ये ग्रामसभेला सुरुवात झाली.
ग्रामसभेमुळे न्याय कसा मिळतो याबद्दल त्यांनी एक घटना सांगितली. २ ऑक्टोबरच्या ग्रामसभेत एका व्यक्तीने वैयक्तिक मागणी केली. या व्यक्तीला वस्तीतून एका ठिकाणाहून दुसरीकडे जायला रस्ता हवा होता. पण हा मागणी केलेला रस्ता दुसऱ्या व्यक्तीच्या अगदी घराजवळून जात होता. मागणी करणाऱ्या व्यक्तीचं म्हणणं होतं की, हाच आमचा ये-जा करण्याचा रस्ता आहे. नीताताईंनी वाद टाळण्याकरिता सरळ मतदान घ्यायचं ठरवलं. मतदानात गावकऱ्यांनी कौल दिला, ‘उपरोक्त जागा ही दुसऱ्या व्यक्तीच्या घरासमोरील मोकळी जागा आहे. वहिवाट नाही.’ अशा प्रकारे वाद टाळून नीताताईंनी गावकऱ्यांकडूनच हा प्रश्न तडीस लावला.
स्त्रियांच्या सभेत त्यांना सहभागी करण्याकरिता जानेवारी २०१४ मध्येच एक चांगली शक्कल लढवली. सावित्रीबाईंना अभिवादन, जिजाऊंना वंदन आणि संक्रांतीचं हळदी-कुंकू या कार्यक्रमाचं संयुक्त आयोजन करून स्त्रियांना आमंत्रित केलं. याच कार्यक्रमात त्यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन कार्यक्रमही ठेवला. स्त्रियांना हा कार्यक्रम खूप आवडला. आरोग्य आणि अधिकार याबाबत स्त्रियांना माहिती असलीच पाहिजे, असं नीताताईंचं ठाम मत आहे. स्त्रियांना अधिकारांची जाणीव झाली तरच त्या पुढे येऊन आपलं म्हणणं मांडू शकतात. आपण स्वतंत्र व्यक्ती आहोत हे त्यांना जाणवलं पाहिजे. तेव्हाच त्यांच्यात आत्मविश्वास येईल. म्हणूनच महिला आरोग्य आणि कायदेविषयक सल्ला या विषयांवर आलटून-पालटून तीन-तीन महिन्यांच्या कालावधीने त्यांनी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले. शेतातल्या कामात व्यस्त असल्या तरी स्त्रिया या कार्यक्रमांमध्ये आवर्जून सहभागी झाल्या. आज दोन्ही गावं मिळून २० बचतगट कार्यरत आहेत. इसापूरमधली अंगणवाडी प्राथमिक शाळेतच भरायची. आता अंगणवाडीची स्वतंत्र सोय करण्यात आलीय. इथल्या भिंती मुलांना आकर्षक वाटणाऱ्या चित्रांनी रंगवण्यात आल्यात. त्यांना चांगल्या दर्जाचे शैक्षणिक खेळ उपलब्ध करून दिलेत. अन्नसुरक्षा योजनेच्या सुरुवातीलाच २०१४ मध्ये, २६ जानेवारीच्या ग्रामसभेत त्यांनी ७२ लोकांना योजनेचा लाभ मिळवून दिला. सध्या गावात या योजनेचे दीडशेहून अधिक लाभार्थी आहेत. ‘श्रावणबाळ योजना’, ‘संजय गांधी निराधार योजना’ यांची यशस्वी अंमलबजावणी गावात झालीय. ‘रमाई’ योजनेंतर्गत पाच घरकुलं झालीत. यापूर्वी या योजनांवर गावात काही काम झालं नव्हतं.
ही सर्व कामं करताना त्यांना विरोध झालाच नाही असं नाही. पण ‘सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा, विरोधकाला शांतपणे सामोरं जावं’ या प्रशिक्षणातील सूत्रांना त्यांनी पक्कं ध्यानात ठेवून कामं करवून घेतली. बऱ्याचदा गावात पाणी, नालेसफाई किंवा घरासमोरील लाइट बंद होतो यावरून तणाव निर्माण होतो. असा तणाव निर्माणच होणार नाही हे पाहावं, असं नीताताई सांगतात. त्यांच्या एका वॉर्डात उन्हाळ्यातले दोन महिने पाणीटंचाईची झळ बसते. विदर्भातला उन्हाळाच एवढा तीव्र असतो, त्यामुळे ‘जलशिवार’अंतर्गत ‘नाला खोलीकरण’ करण्यात आलंय.
नीताताईंचा कामातला उत्साह पाहून गावातल्या मुलांनी त्यांना साथ द्यायचं ठरवलं. मुलांनी रोज आपला एक तास गावाला द्यायचं ठरवलं. सकाळी पाचच्या सुमारास मुलं गाव झाडू लागली. गाव जागा होताना सर्वत्र स्वच्छता असायची. यामुळे मुलांमध्ये संघटितपणा, मत्रही वाढलं. घनकचरा व्यवस्थापनाकरिता कचराकुंडय़ा बसवण्यात आल्यात. आता त्यांना कंपोस्टकरिता शोषखड्डा आणि घंटागाडीची व्यवस्था करायची आहे. गावातल्या ५०-६० वाढीव कुटुंबांकडे घरात शौचालयाची सोय नाही. निर्मल ग्राम आणि ‘एनटीपीसी’च्या माध्यमातून या घरांमध्ये शौचालयाचं बांधकाम करण्यात येणार आहे. आजणगावात स्मशानघाट बांधण्यात आलाय तर इसापूरमध्ये काम सुरू आहे.
नीताताईंचा पहिल्या पाच वर्षांतला कामाचा धडाका जबरदस्त होता. त्यामुळे २०१८ ला जेव्हा सरपंचपदाची जनतेतून थेट निवडणूक झाली, त्यातही त्या विजयी झाल्या. ‘एनटीपीसी’कडे त्यांनी शाळेकरिता प्रोजेक्टरचा प्रस्ताव पहिल्या कालखंडात दिला होता, तो आता मंजूर झालाय. त्यामुळे लवकरच विद्यार्थ्यांना स्मार्ट क्लासमध्ये शिकता येणार आहे. संगणक प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना तालुक्याला, मौद्याला, जावं लागतं. नीताताईंना गावातच संगणक प्रशिक्षण सुरू करायचं आहे. वाचनालय अद्ययावत करून स्पर्धात्मक परीक्षांची तयारी गावातच करता येईल हेही अजेंडय़ावर आहे.
नीताताई सरपंच झाल्यावरचा सगळ्यात छान बदल म्हणजे आता गावातल्या स्त्रिया चावडीवर येऊन बसू लागल्या. पोळ्याला बलांना अलंकार घालून, रंगभूषा करून सुशोभित करतात. मग लहान मुलं आपापल्या बलांना घेऊन चावडीवर स्पर्धेकरिता येतात. या बलांच्या सौंदर्यपरीक्षणाकरिता नीताताईंसोबत स्त्रियाही असतात. पूर्वी हे सर्व त्या लांबूनच पाहत असायच्या. नीताताई सांगतात, स्त्रियांना खूप काही करायची इच्छा असते, पण पाठिंबा नसतो, मार्गदर्शन नसतं. पण आपल्यातीलच स्त्रिया या गोष्टी करतात हे पाहून त्यांनाही उत्साह येऊ लागलाय. येत्या काळात त्या स्त्रियांकरिता फिनेल, सॅनिटरी पॅड निर्मिती अशा प्रकारच्या कौशल्य प्रशिक्षण आणि मार्केटिंग कार्यशाळा घेणार आहेत. जेणेकरून स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होतील.
नीताताईंनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इंग्रजी साहित्य घेऊन बी.ए. केलं. मग डी.एड.ही केलं. त्यांच्या शिक्षणाचा फायदा त्यांना सरपंच म्हणून काम करताना नेहमीच होतो. सरपंच झाल्यावर त्यांनी सर्वात आधी प्रत्येक यंत्रणा माहीत करून घेतली. पंचायत समितीचे सर्व विभाग, वेगवेगळी खाती, त्यांच्याशी संबंधित अधिकारी यांची माहिती करून घेतली. त्यामुळे कोणतेही काम घेऊन थेट संबंधित विभागातच जाता येतं. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्या मांडतात. सर्व योजना, त्यांच्या अंमलबजावणीची माहिती असल्याने, अधिकारीही फसवू शकत नाहीत.
पतीच्या कामामुळे नीताताई आपल्या दोन मुलींसोबत तालुक्याला- मौद्यात राहतात. मौद्यापासून सहा किमीवर त्यांचं गाव आहे. दर दोन दिवसांनी त्या ग्रामपंचायत कार्यालयात आणि गावात येतात. गावात त्यांचं मोठ्ठं कुटुंब आहे. सात जावांमधल्या त्या धाकटय़ा आहेत. घरातल्या सर्वाची त्यांना चांगलीच साथ मिळते. महिला सभेच्या यशाकरिता त्यांच्या जावांनीही चांगली मदत केली. नीताताई तालुक्याला राहण्याचा गावकऱ्यांनाही फायदाच होतो. कारण गावकऱ्यांच्या पंचायत समितीतील प्रत्येक कामाकरिता त्या सोबत येतात.
नीताताई आपलं गाव तर सक्षम करीत आहेतच, सोबत इतर सरपंचांनाही सक्षम करण्याकरिता प्रशिक्षण देतात. २०१४ पासून नीताताई ‘यशदा’ आणि ‘सावित्री अकादमी’ यांच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींना त्यांचे अधिकार आणि कार्य याबाबत प्रशिक्षण देतात. पुस्तकासोबतच आपल्या आणि आजूबाजूच्या अनुभवांतून त्या मार्गदर्शन करतात. त्यामुळे सर्व वयोगट, वेगवेगळ्या शैक्षणिक पातळीच्या लोकप्रतिनिधींना त्यांची कामं, जबाबदाऱ्या समजणं सोपं जातं. नीताताई आता प्रशिक्षकांनांही प्रशिक्षण कसं द्यावं याचं प्रशिक्षण देतात. सदस्यांतून सरपंचपदी निवड आणि थेट जनतेकडून सरपंचपदी निवड या दोन्हींचा अनुभव असणाऱ्या नीताताई! गावगाडा चालवण्यासाठी अधिकाधिक सुशिक्षित लोकांनी पुढे यायला पाहिजे, असं त्यांचं ठाम मत आहे.
लोकप्रतिनिधी शिक्षित असल्याचा काय फायदा होऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण म्हणजे नीता पोटफोडे यांचा सरपंचपदाचा कार्यकाळ. ग्रामविकास शिक्षित सरपंचाच्या हातून होणं म्हणजे काय हे या गावाचा विकास पाहताना नक्कीच लक्षात येतो.
sadhanarrao@gmail.com
chaturang@expressindia.com