राजगिरा किंवा अमरन्थ म्हणजे ग्रीकमध्ये ‘अमर’. शरीराच्या अनेक अवयवांना ताकद देणारा राजगिरा म्हणजे कॅल्शियम आणि लोहाचा मोठा स्रोत आहे. शिवाय मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम अशी शरीराला आवश्यक असलेली खनिजं राजगिऱ्यात पुरेशा प्रमाणात आहेत. इतर धान्यात नसलेलं ‘क’ जीवनसत्त्वही राजगिऱ्यात आहे. यात चोथा, कबरेदकं आणि रिबोफ्लोविनही आहे. शिवाय पचनाला हलका असल्याने केवळ उपासालाच नव्हे तर सर्वानी विशेषत: वयस्कर लोकांनी राजगिरा रोजच्या आहारात अवश्य घ्यावा. राजगिऱ्याच्या लाह्य़ा तर पचायला आणखी हलक्या. लाडू, धिरडी, थालिपीठं, डोसे, उपमा अशा पदार्थात जमेल तिथे थोडय़ा प्रमाणात राजगिऱ्याच्या पिठाचा वापर केला तर त्याचा फायदा होऊ शकेल.
राजगिरा पिठाची उकड
साहित्य : १ वाटी राजगिरा पीठ, दीड वाटी ताक, एखादी हिरवी मिरची, एक चमचा आल्याचा कीस, पाव वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, चवीला मीठ, फोडणीसाठी एक मोठा चमचा तूप, १ चमचा जिरं, कोथिंबीर.
कृती : तुपाची जिरं घालून फोडणी करावी, त्यात मिरच्यांचे तुकडे परतावेत, आलं घालावं, ताकात पीठ आणि मीठ मिसळून फोडणीत ओतावं आणि ढवळत राहावं, पीठ शिजलं की खाली उतरून दाण्याचं कूट आणि कोथिंबीर मिसळावी.
वसुंधरा पर्वते -vgparvate@yahoo.com