यशवंत मनोहर

मी अस्वस्थच आहे. तडफड होतेच जिवाची, पण मला मन:शांती नकोच असते. कळायला लागले तेव्हापासून नवनव्या विपरीतांनी मला स्वस्थ होऊ दिले नाही. मी त्यामुळे समृद्ध होत गेलो. मी या अस्वस्थतेचीच निष्पत्ती आहे. सूर्य होऊन आयुष्यभर पेटत राहणाऱ्या बुद्ध, सॉक्रेटिस, महात्मा फुले, बाबासाहेब अशा प्रज्ञांचा मी कृतज्ञ आहे. या अस्वस्थ सूर्यासोबत नाते जोडण्याचा मी सतत प्रयत्न केला. नऊ  ते दहा पुस्तके या वर्षांत प्रकाशित होत आहेत. लिहिले गेले त्याहूनही अधिक चांगले लिहिले जावे यासाठी वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षीही मी निर्वाण मांडतो आहे..

मला जगायचे होते, पण जगण्यासाठी माझ्याजवळ जीवनच नव्हते. मग जीवन निर्माण करण्यासाठीच मला रक्त आटवावे लागले. जीवनच खुद्द आपल्याला नाकारत आहे हे कळले आणि जीवनाच्या विरोधात जीवन निर्माण करण्याच्या कामाला मी लागलो. मी नकारांना सर्जनशील करीत गेलो. आज वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षीही ते अविरत सुरू आहे..

आपण कोणीही नाही हे मला कळत नव्हते त्याच वयात कळले. मी नकारांचे सतत वाचन आणि पुनर्वाचनही केले. माझ्या लेखनात या वाचनाचे अन्वयार्थ आहेत. या नकारांचा आशय आणि त्यांच्याशी द्यावी लागलेली झुंजच माझ्या लेखनात आहे. त्यामुळे माझ्या लेखनाएवढेच माझे जगणे आहे. ही जीवननिर्मिती अजून थांबत नाही. मीही तिला थांबू देत नाही. त्यामुळेच आजही मी माझे समुद्र होऊन उडणे बघू शकतो. सूर्य उराशी कवटाळून मरणे तुडविण्याची भाषा बोलू शकतो..

आयुष्यात आलेल्या नकारांमुळे पर्यायशोध अपरिहार्यच ठरला. पर्यायाची मूल्यघटनाही ठरली. संघर्षांने मला टणक केले. उपेक्षेने मला भक्कम केले आणि दिशाहीनतेत सर्वन्यायित्वाची दिशा उगवत गेली, ती पूर्ण इहवादीच होती. काय जगायचे, कशासाठी जगायचे आणि कसे जगायचे यासंबंधीचे भान क्रमाने समृद्ध होत गेले. स्वातंत्र्यनिर्मितीची आणि अस्तित्वबुद्धीची मीच एक प्रक्रिया झालो. वृद्धीची अंतहीन प्रक्रिया सुरू करतो तो वृद्ध होतो. मी कळायला लागले तेव्हापासून वृद्धीचा सखा झालो. माझे वृद्धत्व असे सारखे समृद्ध होत आलेले आहे. ‘बुढ्ढा’ हा शब्दही वृद्ध या शब्दाचाच अपभ्रंश आहे. थांबणाऱ्यांची किंवा कधीही बदलत नाहीत त्यांची वृद्धी होत नाही. त्यांच्या देहाचे वय वाढते. मनाची वाढ त्यांनीच स्वत: नाकारलेली असते. अशी माणसे वृद्ध होत नाहीत. ती फक्तच वयस्कर होतात.

माझे मन सतत उगवते. दिवसातून असंख्य वेळा माझ्या मनात पहाट होते. नको ते सतत अस्ताला जाते. उपकारक असे काही सतत जन्मत असते. मन असे नवनवोन्मेषशालीच आहे. नवा उन्मेष हा नवा जन्मच असतो. मी असा अनंतजन्मा आहे. ‘सर्वच अनित्य आहे’ या तंद्रीतच मी जगतोही आणि लिहितोही. ही तंद्री मला वयातीतच करून टाकते. वृद्धी ही घडणशीलतेची वा ‘बिकमिंग’चीच प्रक्रिया आहे. ती माणूस होण्याची वा मानव अस्तित्वाच्या उज्ज्वल निर्मितीचीच प्रक्रिया आहे. म्हणून वय झाले की मनुष्य वृद्ध होत नाही तर तो वृद्ध होण्याची प्रक्रिया जिथून सुरू होते तिथून त्याच्या समृद्धीचे पर्व सुरू होते.

उदाहरणार्थ, मी गावागाडय़ाच्या निर्वातात जन्माला आलो. विचार करण्याची आणि स्वप्न पाहण्याची इथे बंदीच होती. आठवी-नववीत शिकत असताना मी पहिल्यांदाच स्वप्न बघितले. हे स्वप्न शिक्षक होण्याचे होते. पुढे बाबासाहेबांच्या ‘मिलिंद’ महाविद्यालयात शिकत असताना कवी, लेखक होण्याचे स्वप्न लपून-चोरून पाहणे सुरू झाले. पुढे एम. ए. झाल्यावर मनात अनेक  स्वप्नांतरेही  झाली. मन अनिश्चिततेतून बाहेर पडायला लागले. लिहायला आठवी पासूनच सुरुवात झाली होती. ‘मिलिंद महाविद्यालय’मध्ये लेखनाला नवे आयाम मिळाले. प्राध्यापक झाल्यावर लेखनाचा निर्धार मनात उगवला.

मी पूर्ण इहवादी, रॅशनल, विज्ञानशील आणि पुनर्रचनशील आहे. आदिसांख्य, लोकायन, बुद्ध, हिरॉक्लिटस, सॉक्रेटिस, जॉन डय़ुई आणि बाबासाहेब आंबेडकर ही तत्त्वज्ञान परंपरा माझ्या भूमिकेच्या मुळाशी आहे. माणूस हाच जीवनाचा एकमेव अधिनायक आहे. त्याच्या स्वयंपूर्णतेच्या कलानेच तत्त्वज्ञाने आणि साहित्य निर्माण व्हावे. सर्व जीवन हा अणूचाच फुलवरा आहे या विज्ञानाच्या म्हणण्यात मला समतेची नीती दिसते. माणूस हा मूलत: विवेकी आहे या विज्ञानाच्या सांगण्यात मला जीवनाच्या उज्ज्वलतेच्या शक्यता दिसतात. मला कोणतीही विषमता आणि शोषण मान्य नाही. त्यांचे समर्थन करण्यासाठी निर्माण केलेले धर्म, ईश्वर, तत्त्वज्ञाने या गोष्टी मला अजिबात मान्य नाहीत. जिच्यात बंधूता आणि भगिनीता आहे, अशी सेक्युलर आणि समाजवादी संस्कृतीच मला मानवी जीवनाच्या संवर्धनासाठी मोलाची वाटते. त्यातूनच माझं लेखन सलग चालूच राहिलं.  ‘तत्त्वज्ञानी बुद्ध’, ‘जोतीराव फुले’, ‘भारतीय संविधान’, ‘तत्त्वज्ञानी बाबासाहेब आंबेडकर’, ‘अण्णाभाऊ साठे’, ‘सत्याचे सौंदर्य’, ‘शिवराय आणि भीमराय’ (कविता), ‘सूर्यपालवी’ (ललित बंध), ‘अग्निपरीक्षेचे वेळापत्रक’ (कविता) अशी काही पुस्तके या वर्षांत प्रकाशित होत आहेत. माणसांच्या हिताचे काय आणि अहिताचे काय हे नि:स्पृहपणे सतत सांगायला हवे असे मला नम्रपणे वाटते.

जे साहित्यिक जातींचे, अंधश्रद्धांचे आणि स्थितीशील गावगाडय़ाचे समर्थन करतात ते शोषणसत्ताच मजबूत करत असतात. असे साहित्यिक व्यवस्थेने निर्विचारी करून ठेवलेल्या सर्वहारांच्या विरोधातच काम करतात. हे शोषणव्यवस्थेचे प्रवक्तेच असतात. सत्ता या बेइमानीची किंमत त्यांना देते. अशाच मान्यतेसाठी हपापलेले मिंधे, बिनकण्याचे आणि विकाऊ साहित्यिक व्यवस्थेचे ढोलही बडवत असतात. या सर्व अनैतिकतेतून या शूरवीर दासांना मुक्त करण्याचा ‘भारतीयत्व’ हा एकच मार्ग आहे असे मला वाटते. संविधानात हे भारतीयत्व आहे. ही मूल्यांचीच घटना आहे. लोकशाही समाजवादाची, समान न्यायाची, समान सन्मानाची, दर्जाची, भगिनीत्वाची आणि बंधुत्वाचीच ही परंपरा आहे. संपूर्ण आधुनिक मूल्यांची उपस्थिती तिच्यात आहे.  सवरेपकारतेची, सतत अद्ययावत असण्याची तिची प्रकृती आहे. या भारतीयत्वाची कळकळ, तिच्या हाका सर्वांपर्यंत पोचविण्यासाठी मी लिहितो.. हे सर्वावधानी भारतीयत्व वैश्विकही आहे. मी या भूमिकेवरील निष्ठेने आजही कार्यरत आहे. तडजोडी करणारे, दमनकारी सत्तेला गौरव वाटेल असे लिहिणारे अनेक लेखक आहेत. त्यांच्या जमावाला जाण्याचे कुकर्म माझ्याकडून कधीही घडणार नाही. मी अप्रिय लिहितो तरी असंख्य वाचकांना मी प्रियच वाटतो.

लिहिले गेले त्याहूनही अधिक चांगले लिहिले जावे यासाठी वयाच्या सत्त्याहत्तराव्या वर्षीही मी निर्वाण मांडतो. मान, पाठ आणि गुडघे यांच्या यातनांना समजावत लिहितो. सततच्या बैठकीमुळे पायांवर सूज येते कधी टाचेच्या दुखण्याने जीव कासावीस होतो पण अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचे कौशल्यही माझ्यात आहे. कविता आणि मॅक्झिम ही माझी मुले माझी खूप काळजी घेतात. कविता मुंबईवरून सतत तब्येती संदर्भात सूचना करते. मॅक्झिम दवाखान्यात नेणे आणि औषधं आणणे या गोष्टी आग्रहाने करतो. मी नको म्हणतो तरी कविता-मॅक्झिम माझ्यासाठी भारी कपडे आणतात. टाचेचे दुखणे उफाळले आणि पायही टेकता येत नाही अशी अवस्था आली की मग मॅडम बेडवरच माझ्या जेवणाची व्यवस्था करतात. मी तब्येतीकडे दुर्लक्ष करीत लेखन करतो आणि डॉक्टरांकडे जाणे टाळतो यामुळे माझ्यावर रागावण्याच्या हक्काचा पूर्ण वापर त्यांना छान करता येतो.

डीटीपीसाठी लेखन पोचवणे, प्रुफं आणणे, पोचवणे, बिलं भरणे, स्पीडपोस्ट करणे आणि हवी ती पुस्तके आणून देणे ही कामे सूरज बालपांडे, वैभव आसटकर, सर्जनादित्य मनोहर, अक्रम पठाण, प्रकाश राठोड, प्रफुल्ल फुसाटे, नितीन हनवते आणि प्रामुख्याने मॅक्झिम ही मंडळी आदरपूर्वक करतात. ‘जीवनी’ लिहायला घेतली आहे.  ‘बाबासाहेब’,‘माणूस’ या दोन कादंबऱ्यांची जुळवण सुरू आहे.

मन संयमी झाले आहे पण मी समाधानी मात्र नाही. खूप अस्वस्थ आहे. मुले, पत्नी, मित्र, माझे अनेक वाचक, नातेवाईक आणि माझे अनेक विद्यार्थी मला अतोनात जपतात. हे सर्व प्रेम मला अपार ऊर्जा देते. आता सहसा कोणाचा राग येत नाही, पण दिवसातून काही लिहून झाले नाही तर स्वत:चाच मात्र खूप राग येतो.

हे खरे, की लहानपणी गरिबीने आणि सामाजिक विषमतेने जाळले. त्यावेळच्या खेडय़ातला अंधार आजही जिवाचा थरकाप उडवतो. खूपदा अपमानांनी तडफडलो. मग काही स्वप्ने स्वत:च जाळून टाकली. काही इच्छा, काही भावना गाडूनच टाकल्या आणि लिहिण्याचे व्यसन जडवून घेतले.

‘मी शब्दात शिरलो

आणि स्वत:ला वाचविले,

जहर मी प्यालो

आणि शब्दांनी ते पचविले.’

साहित्याने माझे असे पुनर्वसन केले. भोवतीचे विस्कटलेले जीवन असत्यांनी चिरडायला प्रारंभ केला आहे. वेगवेगळे आयाम लाभून अज्ञान अधिकच बेताल होत आहे. सत्य दयनीय झालेल्या काळात माणसे तत्त्वज्ञान शून्यतेच्या महापुरात वाहून चालली आहेत. फसव्या आनंदाने फटाके फोडत आहेत आणि फसवणारे उत्सवांचे उत्पादन वाढवीत आहेत. संकटांच्या झुंडी धुडगूस घालीत आहेत. अशा वेळी कार्यक्षम राहून पूर्ण ताकदीने लिहिणे मला गरजेचे वाटते. सज्जनत्व अनाथ होऊ नये. गांभीर्य दिवाळखोरीत जाऊ नये. जबाबदारी भंगारात जमा होऊ नये. जे समरस होणार नाहीत त्यांना ‘सरळ करण्यासाठी’ निर्माण होणारा दहशतवाद हा जगातला आणखी एक नवा खतरनाक दहशतवाद आहे. या दहशतवादाला प्रश्न विचारण्यासाठी आणि सकल मुक्तीच्या राजकारणाचे कंगालीकरण होऊ नये यासाठी मी लिहायलाच हवे आहे आणि मी लिहितो आहे..

हा सत्याची अन्वर्थकता संपुष्टात आणण्याचा काळ आहे. आधुनिक मूल्ये, मानवाधिकार आणि समता-स्वातंत्र्य ही मूल्येच कालबाह्य़ झाली हे जाहीर करण्याची घाई झालेला हा काळ आहे. पण जीवनच या मूल्यांची पुन्हा प्रस्थापना करील ही खात्री मला आहे. अशा वेळी सत्य सांगणे म्हणजे अप्रियता पत्करणेच असते. पण सर्वन्यायाच्या नीतीचा ध्वजच आपल्या शब्दांच्या हातात असावा असे मला नम्रपणे वाटते. खूप स्नेह आहेत जे सतत मला ऊर्जेची रसद पोचवतात. खूप वाचक आहेत ज्यांना माझे वाटणे त्यांचे वाटणे वाटते.

मी अस्वस्थच आहे. तडफड होतेच जिवाची पण मला मन:शांती नकोच असते. कळायला लागले तेव्हापासून नवनव्या विपरीतांनी मला स्वस्थ होऊ दिले नाही. मी त्यामुळे समृद्ध होत गेलो. मी या अस्वस्थतेचीच निष्पत्ती आहे. सूर्य होऊन आयुष्यभर पेटत राहणाऱ्या बुद्ध, सॉक्रेटिस, महात्मा फुले, बाबासाहेब अशा प्रज्ञांचा मी कृतज्ञ आहे. या अस्वस्थ सूर्यासोबत नाते जोडण्याचा मी सतत प्रयत्न केला.

..खूपदा आयुष्यात दिवस उगवलाच नाही. रात्रच उगवली. अंधाराच्या विजयाचे समारंभ उगवले. बलात्कार, मॉब लॉचिंग, धर्मक्रौर्य आणि खोटेपणाचे विक्रमी उत्पादन यांची नियोजनबद्ध वाटावी अशी पुनरावृत्तीच होताना दिसते. नोटाबंदी आणि सभ्यताबंदी, आर्थिक मंदी आणि सौजन्य मंदी ही आहे. त्यामुळे दिवसाबदली आता मंदीच उगवते. वाताहत, धर्मदहशत, असहिष्णुता आणि द्वेषाची काळी विवरेच उगवतात. उजेडाचं तोंड बंद करणारी कारस्थानेच उगवतात. आता फक्त विज्ञाननिष्ठ वस्त्यांमध्ये आणि चिकित्सक मोहोल्ल्यांमध्येच दिवस उगवतात. अजून या दिवसांचा वाचाघात झाला नाही.

संभ्रमांची घनता वाढवणारा हा संक्रमणकाळ आहे. तरी परिस्थितीत बदलतेच. ती कालही बदलली. आजही बदलेलच आणि भविष्यातही बदलणारच आहे. इतिहासाचेच हे कळकळीचे सांगणे आहे. काहीही विपरीत घडले तरी माणूस स्वप्नशून्य होत नाही. त्याच्या उमेदींची हत्या तो होऊ देत नाही. संकटे हरण्यासाठी असतात आणि माणूस जिंकण्यासाठीच असतो. मी फार मोठा साहित्यिक नाही. पण मी सतत ‘माणूस जिंकेल’ असाच शब्द लिहिला. हेमिंग्वे म्हणाले, त्याप्रमाणे – ‘माणसाला कोणी उद्ध्वस्त करू शकतील, पण त्याला पराभूत नाही करता येत.’ या सत्याचा पाठपुरवठा करणारेच लेखन मी आजवर करतो आहे.. करीत राहाणार आहे..

yashwantmanohar2012@gmail.com

chaturang@expressindia.com