लैंगिकतेचे शमन की दमन?

अलीकडे लैंगिक गुन्हे वाढलेले दिसत आहेत. पण दुर्दैवाने हे तपासलं जात नाही की मुळामध्ये स्त्री-पुरुष शरीरसंबंधांच्या नियमनाची केलेली पायाभरणी चुकलेली तर नाही ना? लैंगिक भुकेसंदर्भात निसर्गाने केलेली योजना आणि आपण आपल्यावर घालून घेतलेली शरीरसंबंधाची बंधने, यामुळे स्त्री-पुरुषांच्या लैंगिक गरजेचे शमन किती होते की फक्त दमनच होत आहे ?

अलीकडे लैंगिक गुन्हे वाढलेले दिसत आहेत. पण दुर्दैवाने हे तपासलं जात नाही की मुळामध्ये स्त्री-पुरुष शरीरसंबंधांच्या नियमनाची केलेली पायाभरणी चुकलेली तर नाही ना? लैंगिक भुकेसंदर्भात निसर्गाने केलेली योजना आणि आपण आपल्यावर घालून घेतलेली शरीरसंबंधाची बंधने, यामुळे स्त्री-पुरुषांच्या लैंगिक गरजेचे शमन किती होते की फक्त दमनच होत आहे ? स्त्रियांवरील अन्यायाबद्दल अनेकदा चर्चा होतात. त्या व्हायला पाहिजेतच. पण पुरुषाची कामेच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी हा विषय कधी चर्चेच्या ऐरणीवर येत नाही. त्यानिमित्ताने पुरुषांच्या लैंगिकतेविषयीचे खास लेख, दोन भागात.
निसर्गाने सजीवांच्या जगण्यासाठी दोन मुख्य आधारस्तंभ निर्माण केलेले आहेत. त्यापैकी एक अन्नाची भूक आणि दुसरी लैंगिक भूक! प्राणी व्यक्तिश: जगण्यासाठी अन्नाची भूक आणि दुसरी लैंगिक भूक ही संपूर्ण प्राणिजात टिकून राहण्यासाठी, अशी निसर्गाची व्यवस्था आहे. या दोन्ही भुका ‘पेरिफेरल नव्‍‌र्हस सिस्टीम’ आणि ‘सेंट्रल नव्‍‌र्हस सिस्टीम’ यांच्या दरम्यान होणाऱ्या संदेश-आदेशाच्या परिवहनातून परस्पर सहकार्याने विशिष्ट हार्मोन्स निर्मितीद्वारे निर्माण केल्या जातात आणि त्यानुसार प्राणिजातीला पवित्रे घेण्यास भाग पाडले जाऊन शमविल्या जातात. त्याकरिता ब्रेनमध्ये, या दोन भुकांचा ‘प्रीवायिरग सेटअप’ उत्क्रांतीमधून नक्की झालेला असतो; त्यामुळे त्या कोणत्याही प्राण्यांच्या ऐच्छिक नियंत्रणाखाली नसतात. शिवाय या दोन भुकांअभावी सजीव प्राणी विनाशाकडे जातात. मात्र विनाशाप्रती संघर्ष करण्याच्या सजीवांच्या आंतरिक गुणधर्मातून या भुका शमविण्याचा प्रयत्न सर्व प्राणी करतात. बुद्धिमान मनुष्यप्राणी तर हा प्रयत्न आटोकाट करतो. जसं, अन्नाच्या भुकेसाठी चोरी, मारामारी आणि लैंगिक भुकेसाठी जबरदस्तीच्या संबंधाची गुन्हेगारी!
ब्रेनमधील प्रीवायिरग संदर्भात संशोधक मांजराचे उदाहरण देतात. घरातील खातंपितं मांजर, त्याला उंदीर वा पक्षी दिसल्यास त्यावर झडप घालतं, त्याला ठार मारतं आणि त्याला खाण्याचाही प्रयत्न करतं. हे मांजर भुकेलेले नसते, तरी अन्न म्हणून त्याचे ठरलेले भक्ष्य मिळवून खाण्याचा त्याच्या मेंदूमध्ये सेट झालेला प्रोग्राम आणि त्यानुसार त्याच्या वर्तन-प्रेरणा (instinct) त्याला नियमित खाणे मिळूनही बदललेल्या नसतात. मालकाला कितीही वाटलं की, आपल्या पोट भरलेल्या मांजराने उंदराच्या वाटेला जाऊ नये, तरी निसर्गापुढे ना मांजराचे काही चालत, ना माणसाचे! हे उदाहरण आपल्याला बरंच काही सांगून जातं. उदा. स्त्री-पुरुष शरीरसंबंधाचा मुद्दा ‘खात्या-पित्या मांजरा’प्रमाणे विवाहाची सोय करून सोडविण्याचा माणसाने प्रयत्न केलेला असला तरी, स्त्री-पुरुष मुक्तआकर्षण आणि मुक्त शरीरसंबंधाकडे असणारी त्याची ओढ, याबाबतच्या नैसर्गिक मेंदूच्या कार्यप्रणालीाुढे आपले कुणाचेच काही चालत नाही; आणि विवाहबाह्य़ संबंधाच्या वाढत्या प्रमाणामुळे विवाहप्रथेची हतबलता उघड होते. विवाह हा नैसर्गिक मुक्त शरीरसंबंध काबूत ठेवण्याचा एक संस्कार असला, तरी मेंदूच्या कार्यपद्धती बदलण्यास तो असमर्थ ठरतो.
भारतासारख्या देशात विवाहप्रथा अनिवार्य म्हणून ठामपणे पाय रोवून असूनसुद्धा लैंगिक गुन्हे आणि िहसा-हत्येचे अन्य गुन्हे यांचे प्रमाण सतत वाढत चाललेले आपण पाहतो.  यामागे अनेक कौटुंबिक, सामाजिक,आर्थिक, मानसिक आणि विषमतेची कारणे आहेतच. पण त्याचबरोबर गेली अनेक शतके आपण लैंगिकतेबाबत बाळगत असलेला सदोष, चुकीचा दृष्टिकोन, हे एक महत्त्वाचे कारण आपण लक्षात घेतलेलं नाही. विनयभंग, बलात्कार, मुलींची छेडछाड यांसारख्या गुन्ह्य़ांवर होणाऱ्या चर्चा आणि प्रतिक्रियांमधून कायदे कडक होणे वा त्याची कठोर अंमलबजावणी, पोलीस संरक्षण वाढविणे, पुरुषांची मानसिकता बदलणे अशा सूचना पुढे आणल्या जातात. हेल्पलाइन वाढवल्या जातात. शहरात निषेध फलकांसहित मोर्चे काढले जातात. पण दुर्दैवाने केव्हाही असं तपासलं जात नाही की लैंगिक गुन्हे वाढण्यामागे मुळामध्ये स्त्री-पुरुष शरीरसंबंधांच्या नियमनाची केलेली पायाभरणी चुकलेली तर नाही ना? लैंगिक भुकेसंदर्भात निसर्गाने केलेली योजना आणि आपण आपल्यावर घालून घेतलेली शरीरसंबंधाची बंधने, यामुळे स्त्री-पुरुषांच्या लैंगिक गरजेचे शमन किती होते की फक्त दमनच होत आहे ? अन्याय होत राहिला आहे का? स्त्रियांवरील अन्यायाबद्दल अनेकदा चर्चा होतात. त्या व्हायला पाहिजेतच. पण पुरुषाची कामेच्छा, त्याच्या कामपूर्तीतील अडथळे आणि त्यातून त्याची होणारी लैंगिक आणि मानसिक कोंडी हा विषय कधी चर्चेच्या ऐरणीवर येत नाही. वर्षांनुवर्षे ‘विवाह’ या असमान मापदंडाने स्त्री व पुरुषांची लैंगिकता समान करण्याचे अशक्य प्रयास चालूच राहिलेले आहेत.
पहिल्या प्रथम एक लक्षात घेतलं पाहिजे की विवाहप्रथा ही समाजात नैतिकता आणण्यासाठी योजलेली नाही. तर नांगराच्या शोधानंतर उदयास आलेल्या जमीनदारशाहीमधील जमीनदारांच्या मालमत्तेला वारसा मिळावा आणि त्याकरिता जमीनदारांचे पितृत्व समजण्यासाठी आणली गेली आहे.
विवाहप्रथा नसताना प्राचीन काळात स्त्री-पुरुष संबंध मुक्त होते. तेव्हा स्त्रियांना मुले होत होती. ती मातृकुळात प्रेमाने वाढवली जात होती. स्त्री व पुरुष हे एकमेकांना कोणत्याही बंधनाविना प्राप्त होत असल्यामुळे लैंगिक चारित्र्य असा काही वेगळा विषय तेव्हा चर्चेला नव्हता. सर्व स्त्रिया-पुरुष एकमेकांना उपलब्ध असणे हे ऐच्छिक असल्यामुळे वेश्याव्यवसाय असा शरीरसंबंधाचा वेगळा फाटा नव्हता. पुरुषांना त्यांची कामवासना फसवणूक करून शमविण्याची वेळ येत नव्हती. पती संकल्पना नसल्यामुळे गर्भधारणेचा विषय स्त्रीच्या इच्छेवर होता. लेकुरवाळ्या स्त्रिया खूण म्हणून डोक्यावर मातीचा पट्टा ओढून पुरुषांना ‘शरीरसंबंध नको’ चा इशारा देण्याची प्रथा आफ्रिकेच्या आकिक्य जमातीत आढळते; असे इव्हलीन रीड नोंदवते. आज यापैकी काही जमातींनी विवाहप्रथा स्वीकारली. पण तत्पूर्वी तरुण मुला-मुलींना विवाहपूर्व शरीरसंबंधाची संधी देऊन लग्नाचा निर्णय होत असतो. शिवाय पुरुष कुळाला वारस देणे हा त्यांच्या लग्नाचा मूळ हेतू नसल्याने, मुलीला लग्नापूर्वी कोणापासूनही झालेली संतती पुढे होणाऱ्या नवऱ्याकडून सहजपणे स्वीकारली जाते. अर्थात् त्यामुळे अनाथ मुले ही संकल्पना तिथे अज्ञात आहे. थोडक्यात ‘स्त्री-पुरुष मुक्त शरीरसंबंध’ ही निसर्गाची नैतिक कल्पना जिथे स्वीकारलेली आहे, तिथे वरील प्रकारची समाजव्यवस्था आपोआप आकाराला येते.
आपण विवाहाद्वारे स्त्री-पुरुष मुक्त संबंधाची नैसर्गिक कल्पना झुगारून दिलेली आहे. आणि स्त्री-पुरुष निष्ठेच्या संबंधावर समाज उभारण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु निसर्गाने पतीशिवाय अन्य पुरुषापासून स्त्रीला मूल होऊ नये, असे तद्अनुषंगिक बदल स्त्री-शरीरात किंवा तिच्या मेंदूमध्ये नवे प्रोग्राम आणून केलेले नाहीत. त्यामुळे मानवीजीवनात स्थिती अशी झालेली आहे की, माणसाला मूल होण्याचे शरीरनियम निसर्गाचे, परंतु शरीरसंबंधाचे नियम मात्र माणसाचे! यामुळे मानवीमनात आणि शरीरात जो एक आंतर्विरोध निर्माण झालेला आहे, त्याला सामोरे जाताना, त्याचा तत्काळ परिणाम हा समाजातील लैंगिक गुन्हेगारीत परावर्तित होणं अपरिहार्य ठरतं. कारण शरीरसंबंधावर विवाहाच्या बंधनामुळे मेंदू आणि हार्मोन्सच्या नैसर्गिक कार्यात हस्तक्षेप केल्यासारखे होते. ज्याचे परिणाम निव्वळ लैंगिकतेपुरते मर्यादित न राहता, ते स्त्री-पुरुषांमध्ये मानसिक अशांती, अस्वस्थता, प्रक्षोभ, विकृती अशा पद्धतीने दृश्य होऊ लागतात. हे समजण्यासाठी थोडी हार्मोन्सबद्दल माहिती होणं आवश्यक आहे. हार्मोन म्हणजे शरीरग्रंथीतून स्रवणारी केमिकल्स वा रसायनं!
माणसामध्ये टेस्टास्टेरॉन हे कामवासना जागृत करणारं ‘सेक्स हार्मोन’ आहे. हे हार्मोन अतिप्राचीन असून, ते मणकेधारक प्राणिजातीपासून उत्क्रांत झालेलं आहे. ते स्त्री व पुरुष दोघांमध्येही आहे. पुरुषांमध्ये ते स्त्रीपेक्षा २० ते ४० पटीने जास्त असतं. अर्थात पुरुषाची कामेच्छा ही स्त्रीच्या तुलनेत तीव्र आणि तातडीची (urgent) असते. पुरुषामध्ये शरीरसंबंधाची आतुरता असणे आणि त्याने त्याकरिता पुढाकार घेणे, हे टेस्टास्टेरॉन या रसायनांचे परिणाम असतात. याउलट स्त्रीची कामवासना सौम्य असते. तिच्यामध्ये टेस्टास्टेरॉनचं प्रमाण अल्प असतं. आणि तिला लैंगिक उत्तेजित होण्यास टेस्टास्टेरॉनबरोबर इस्ट्रोजन आणि ऑक्सिटोसीन या हार्मोन्सचीसुद्धा गरज असते. त्यामुळे कामातुर होण्यास स्त्री थोडा अधिक वेळ घेते. पुरुषाच्या तीव्र कामवासनेतून स्त्रीवर लैंगिक हल्ले होऊ नयेत याची काळजी निसर्गाने स्त्री-पुरुष संबंध मुक्त ठेवून घेतलेली आहे. आजच्या विवाहाच्या पाश्र्वभूमीवर, जिथे विनयभंग, छेडछाड, बलात्कार, ब्लॅकमेलिंगसारखे गुन्हे घडतात. तिथे निसर्ग स्त्री पुरुषाच्या कामवासनेचे शमन कसं करतो हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे.
स्त्री व पुरुषाची सेक्स अर्र्ज (आवेग)आणि सेक्सपूर्तीची गरज ही त्यांच्या प्रजोत्पादनामधील भूमिकेनुसार निसर्गाने नियोजित केलेली दिसते. एक तर, मूल झाल्यावर त्याचे पालनपोषण व संगोपन हे निसर्गत: स्त्रीचे कार्य, निसर्ग समजतो. त्याकरिता तिला वेळ, मानसिक निवांतता आणि मोकळेपणा मिळावा म्हणून पुढील बाळंतपण रोखण्यासाठी, स्त्रीबाजूने कामवासनेचे नियंत्रण होत असते. माता स्त्री, बाळाला जोपर्यंत अंगावर पाजते तोपर्यंत तिच्यामधील प्रोलॅक्टिन हार्मोन स्त्री बीजनिर्मिती (म्हणून मासिकपाळी) रोखून धरतं हा त्याचा पुरावा आहे. आणि आफ्रिकन आकिक्यू जमातीतील स्त्री कपाळावर मातीचा पट्टा लावून पुरुषांना इशारा देते, हे या निसर्गनियमाचं सोशल वर्जन आहे. त्याकरिता स्त्रीची सेक्स ड्राइव्ह मंदावण्याची गरज असते. विवाहित पुरुषांना मूल झालेल्या आपल्या पत्नीबाबत हा अनुभव येत असतो.
शिवाय निसर्गनियमाप्रमाणे बहुतेक प्राणिजातीतली मादी स्वत:च्या इच्छेनुसार नराला समागमासाठी जवळ येऊ देते. मनुष्यप्राणी हा ‘नॉन सीझनल ब्रीडर’ अर्थात कोणत्याही काळात प्रजोत्पादन करू शकणारा आहे आणि कोणत्याही हंगामात तो प्रेम आणि सेक्स करू शकतो, असं असलं तरी समागमाची इच्छा अन्य मादींमध्ये ज्याप्रमाणे तिच्या हार्मोनल लेव्हल प्रमाणे ठरते, तेच तत्त्व स्त्रीमध्ये शिल्लक आहे. पण फक्त मुक्त शरीरसंबंध असणाऱ्या समाजव्यवस्थेत, स्त्रीवरील आफ्रिकन स्त्रीप्रमाणे पुरुषाला दूर ठेवू शकते. मात्र विवाहप्रणीत कुटुंबात जिथे स्त्रीला शरीरसंबंधासाठी एका पुरुषाबरोबर बांधून टाकलेली आहे, त्या समाजात स्त्रीची समागमाची नैसर्गिक इच्छाप्रवणता मारली जाते. ती पुरुषाहाती देऊन, स्त्रीची कामेच्छा नियंत्रित करणाऱ्या हार्मोनल लेव्हलकडे पूर्ण दुर्लक्ष केलं जातं. त्याचे परिणाम स्त्री-पुरुष दोघांनाही भोगावे लागतात. पुरुषाची कामवासना उद्दीपित झाली, तरी त्याच्या पत्नीची हार्मोनल पातळी समागमासाठी सुसंगत असेल असं नाही. परंतु समाजातील अन्य कुणा स्त्रीची हार्मोनल पातळी, समागमासाठी त्या वेळेस अनुकूल असू शकते स्त्री-पुरुष मुक्त शरीरसंबंधाचा निसर्गाचा उद्देश नेमकेपणाने इथे लक्षात येतो. आपली कामवासना, पत्नीची अनुकूलता नाही म्हणून दडपून टाकण्याचा अन्याय पुरुषावर होऊ नये पण त्याचबरोबर पुरुषाच्या तीव्र कामवासनापूर्तीसाठी कोणत्याही स्त्रीला लैंगिक जबरदस्तीचा सामना करावा लागू नये म्हणून मुक्त संबंधांद्वारे अन्य स्त्रियांची उपलब्धता वाढवून निसर्ग समतोल साधत असतो.
निसर्गाची मुक्त संबंध व्यवस्था स्वीकारलेल्या आपल्या पूर्वजांच्या आजच्या आदिवासी रूपातल्या अवशेषात लैंगिक गुन्हे म्हणूनच आढळत नाहीत. एच. एल. देवराय हे मेघालयातील अशा जेन्शिया ट्राइबबद्दल लिहितात,  “sex crimes like rape, abduction, seduction etc. are unknown here.”
विवाहनिर्मित समाजव्यवस्थेत सेक्स क्राइम मुक्त समाज हे स्वप्नरंजन आहे. कारण विवाहाला पुरुषाचे पितृत्व अपेक्षित असल्याने, स्त्रीच्या मुक्त लैंगिक इच्छेवर पुरुष गेले अनेक शतके ताबा ठेवून आहे. हा ताबा घट्ट धरून ठेवण्याच्या प्रयत्नातून प्रथम लैंगिक आणि मग त्यातून पुढे मानसिक समस्या व गुन्हे आकाराला येतात. विवाहपूर्व संबंधाला सुद्धा आपल्या समाजाची मान्यता नसल्यामुळे, तरुणांना चोरून कराव्या लागणाऱ्या संबंधातून, गुन्ह्य़ाची साखळी कशी तयार होते, ते पुढील लेखात पाहणारच आहोत.
पुन्हा हार्मोनवर येताना, सांगावं लागेल की टेस्टास्टेरॉन हे सेक्स हार्मोन पुरुषाची कामवासना ज्वलंत ठेवत असलं तरी, ते पुरुषाने स्त्रीवर बलात्कार करावा किंवा हिंसक व्हावं, याकरिता पुरुषाला प्रोत्साहन देणारं नाही. हे महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे. तसं असतं तर सर्वच पुरुष हिंसक दिसले असते. सर्व पुरुष बलात्कार करणारे झाले असते. पुरुषांमध्ये टेस्टास्टेरॉन हार्मोन हे स्त्रीच्या पातळीपेक्षा वरच्या पातळीत जरी असलं तरी, पुरुषाला त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडता येण्यासाठी ती पातळी मेन्टेन असणं आवश्यक आहे.
तरीसुद्धा टेस्टास्टेरॉन हे खूप संवेदनशील केमिकल आहे. समाजातील बऱ्या-वाईट घटना, प्रगतीला मारक आणि संघर्षांचं वातावरण, कौटुंबिक वाईट परिस्थिती, अपमानित जीवन, शिवाय प्रसारमाध्यमातून सेक्स किंवा हिंसक घटनांचं प्रसारण अशा प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत पुरुषांमधील टेस्टास्टेरॉन नॉर्मल पातळीपेक्षा खूप वर चढतं. त्याचप्रमाणे शरीरातील अन्य हार्मोन्स जी आपल्यामध्ये लय साधत असतात, त्यापैकी एक सेरॉटोनीन हार्मोन हे माणसाला वास्तवतेचं भान, सारासार विचारशक्ती देणारं आहे. मेंदूला शांत ठेवणारे ते रसायन आहे, जे स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा मूलत: जास्त असते. पण ते टेस्टास्टेरॉनशी फटकून असतं. अर्थात् समाजातील प्रतिकूल वातावरणामुळे टेस्टास्टेरॉन जेव्हा वर चढतं तेव्हा सेरॉटोनीन हार्मोन्सची पातळी खाली घसरते आणि पुरुषाच्या सारासार विचारशक्तीवर परिणाम होतो. मेंदू अशांत आणि प्रक्षुब्ध होतो. सेरॉटोनीनचा प्रभाव गेल्यामुळे टेस्टास्टेरॉनचा पुरुषावरील अंमल वाढतो आणि तो आक्रमकता व हिंसकता याचा बळी होतो.
आपल्या मेंदूच्या क्रिया आणि हार्मोन्स लेव्हल यांच्या निकोप परिणामांसाठी शास्त्रज्ञ भोवतालाचं महत्त्व का सांगतात? ते पुढील शनिवारच्या लेखात पाहू.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sexual satisfaction or aggression

ताज्या बातम्या