मंगला जोगळेकर

‘‘स्मरणशक्तीच्या प्रश्नांबद्दल चर्चा करणारं ‘स्मृती आख्यान’ सांगायला मी सुरुवात के ल्यावर वाचकांनी वेळोवेळी जो प्रतिसाद दिला, त्यातून या विषयाची किती गरज होती हेच अधोरेखित झालं. ज्येष्ठापासून तरुणांपर्यंत अनेक जण ई-मेलद्वारे आपले अनुभव मला सांगत होते. काही नेहमीच्या विस्मरणाचे, तर काही विस्मरणाच्या आजाराचे. त्यावर ते स्वत:च्या पातळीवर काही उपाय करत होते हे मला सुखावून गेलं. स्मरणशक्तीच्या विविध प्रश्नांवर अधिक काम माझ्या हातून व्हावं असं उद्दिष्ट समोर ठेवत आता हे आख्यान संपवण्याची वेळ आली आहे. मात्र हा वाचकसंवाद समाधान देणारा ठरला हे मोलाचं..’’   

British scientist Peter Higgs waited 48 years to present his research
आइनस्टीनलाही प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागली होती; तर इतरांची काय कथा?
Man Commits Suicide, Killing Second Wife , Killing Son, Immoral Relationship, nagpur crime, Immoral Relationship crime, nagpur news, murder news, crime news, marathi news,
नागपूर : अनैतिक संबंधामुळेच घडले हत्याकांड, तिघांवर एकाच ठिकाणी अंत्यसंस्कार
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
Pune, Woman, Commits Suicide, Over Property Dispute, Case Registered, Brother, Relatives, police, crime news, marathi news,
पुणे : संपत्तीच्या वादातून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या; सख्या भावासह नातेवाईकांविरुद्ध गुन्हा

म्हणता म्हणता हे वर्ष सरलं. माझा तुमच्याशी नियमित होणारा संवाद आता संपेल. वाईट वाटणारच, पण समाधानदेखील वाटतं आहे. या निमित्तानं ‘स्मरणप्रश्न’ या नवीन विषयावर आपण बोललो. विस्मरणाचे अनेक अनुभव ‘शेअर’ केले, मेंदूच्या असामान्य कर्तृत्वाची तुम्हाला जाणीव करून दिली, मेंदूबद्दल तुमच्या मनात औत्स्युक्य जागवलं. मेंदूचं आरोग्य टिकवण्यासाठी काय चांगलं-काय वाईट याची ओळख झाली, जीवनशैलीत झालेले बदल आणि त्याचे धोके समजले, विविध संशोधनांची माहिती घेतली. स्मरण सुधारण्यासाठी उपाय समजून घेतले, त्यासाठी काय उपक्रम चालू आहेत ते बघितले.  हे सर्व तुम्हाला सांगण्यासाठी मीही सतत शिकत होते. मुख्य म्हणजे या सदराच्या माध्यमातून मेंदूच्या आरोग्याबाबत विचार करायला पाहिजे आणि तो पहिल्यापासूनच व्हायला पाहिजे, हा विचार सगळ्यांपर्यंत पोहोचला.

‘आता उशीर झाला’ हे वाक्य न म्हणता मेंदूचं आरोग्य सुधारण्यासाठी कधीही सुरुवात केली तरी मेंदू प्रयत्न नाकारणार नाही हेही कळलं. याबरोबर गंभीर विस्मरण म्हणजे काय, डिमेन्शिया म्हणजे काय, तो कसा ओळखावा, हे आपण बघितलं. अशा रुग्णाची काळजी घेणं म्हणजे काय, काळजीवाहक कुठल्या परिस्थितीतून जातो हेही समजून घेतलं. विस्मरणाचा प्रश्न तरुणांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्व स्तरांवर जाणवत आहे हे खरं, पण हतबल होण्याची परिस्थिती नाही आणि मेंदूला खूश ठेवणं बव्हंशी आपल्या हातात आहे हा विचारही महत्त्वाचा. मेंदूला टिकवायचं असेल तर जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलायला हवा, जीवनात आमूलाग्र बदल घडायला हवा हे कळलं. म्हटलं तर माहितीचा एक मोठा पल्ला आपण गाठला. या मंथनातून तुमच्या पुढील आयुष्यात मेंदूच्या आरोग्याकडे तुम्ही अग्रक्रमानं बघाल अशी मला आशा वाटते.

या लेखमालेच्या निमित्तानं वाचकांच्या ई-मेल्स येत राहिल्या. विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळ्यांना या प्रश्नांमध्ये कुठे ना कुठे स्वत:चं प्रतिबिंब दिसलं. लिखाण उपयुक्त वाटलं, असं खूप जणांनी कळवलं. बऱ्याच जणांशी संवाद घडला. महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आणि परदेशातूनही ई-मेल्स आल्या. विशेषत: गावागावांतून आलेल्या ई-मेल्स जास्त समाधान देऊन गेल्या. हा विषय राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचला हे या प्रश्नाबद्दल जागरूकता निर्माण होण्याच्या दृष्टीनं खूपच महत्त्वाचं. मेल्समध्ये बहुतेकांनी नवीन विषयाची हाताळणी, लिखाणाची पद्धत आवडली, असं लिहिलं होतं, पण स्व-निरीक्षणं, स्वत:ला जाणवणारे प्रश्न, त्यासाठी शोधलेली उत्तरं याबद्दलही काहींनी लिहिलं होतं. कित्येक जणांनी या लेखांमुळे दैनंदिन जीवनातील विस्मरणाचा अडसर दूर करण्यासाठी पावलं उचलली. फोनवरच्या संभाषणासाठी विषय मिळाला, यावर चर्चा झाल्या, असंही काहींनी कळवलं. ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक कार्यक्रमांत लेखांबद्दल बोललं गेल्याचं समजलं. मेंदू लवचीक असतो, कुठल्याही वयात शिकायला उत्सुक असतो, याबद्दल मध्यमवयीन लोकांचा आशादायी प्रतिसाद आला, तर एकटेपणाचा प्रश्न ज्येष्ठांमध्ये बराच मोठा आहे हे  पुन्हा एकदा समजलं. एकटेपणावरचा लेख एका जागरूक वाचकानं शंभराहून अधिक व्यक्तींना पाठवला. अशा काही प्रश्नांसाठी काही ठोस उपाय घडावेत, अशा अपेक्षा काही वाचकांनी प्रकट केल्या.  

काही जणांशी ई-मेलपलीकडे जाऊन ओळख झाली. विचारांची देवाणघेवाण घडली. काही लोकांना प्रत्यक्ष मदत करण्याचा प्रयत्न केला. नागपूरचे एक वाचक भाऊराव दर लेखानंतर सविस्तर विवेचन करून ई-मेल पाठवत राहिले. त्यांच्या विश्लेषणाचा मला फायदा झाला. जिल बोल्टी टेलर यांच्या जिद्दीची माहिती दिलेल्या लेखाला प्रतिसाद देताना विद्याधर भुस्कुटे यांनी स्ट्रोकनंतर जाणवलेल्या प्रश्नांवर विजय मिळवण्यासाठी कसा प्रयत्न केला हे सांगणारं स्वत: लिहिलेलं पुस्तक वाचायला दिलं. वाचकांबरोबर व्यावसायिक परिचितांचे कौतुकपर संदेश सातत्यानं येत राहिले. ‘मेमरी क्लब’बद्दल अनेकांची उत्सुकता वाढली. क्लबची माहिती विचारणारे संदेश अखंड येत राहिले. त्या निमित्तानं जवळजवळ पाचशे नवीन सभासद क्लबशी जोडले गेले.

लेखांसाठी माहिती जमवून ती माझ्या समजुतीनुसार मांडण्याचा माझ्याकडून मी एक प्रामाणिक प्रयत्न केला. वैद्यकीय क्षेत्रात माझं काम असलं, तरी त्यात शिक्षण नसल्यामुळे काही गोष्टींना न्याय दिला गेला नसेल, काही त्रुटी असतील, त्याबद्दल माफी मागायला हवी. लेख लिहिण्यासाठी मला बरंच काही नवीन वाचन करण्याची संधी मिळाली. बऱ्याच क्षेत्रांमध्ये होत असलेल्या मेंदूवरील नवीन संशोधनाची माहिती मिळाली, त्यातून मनात आशा जागवली गेली, प्रश्नांकडे बघण्याची नवीन दृष्टी मिळाली. तरीही यंत्रं ही भविष्यात मानवावर नियंत्रण करू शकतील, या शक्यतेची काळजी मनाला हलवून गेली. या विषयाचं लेखन करावं, असा विचार अनेक वर्ष मनात घोळत होता. या लेखमालेच्या निमित्तानं मात्र तो साकार झाला अधिक विस्तृतपणे मांडला गेला.आपण परीक्षा देऊन आल्यावर किंवा कुठे व्याख्यान देऊन आल्यावर काही तरी महत्त्वाचं सांगायचं राहिलं असं वाटतं ना, तसं मला आता वाटतं आहे. असं मनात येतं आहे की, ‘जीवनात उद्दिष्ट ठेवा’ हा विचार मांडायचा राहून गेला. यावर थोडं बोलतेच आता. निवृत्तीनंतरच्या वयात सगळं मिळवल्यावर पुढील जीवनसंघर्ष कशासाठी, याची रूपरेषा आपल्या मनात असावी. रोज सकाळी उठण्यासाठी एक कारण समोर असावं. ‘आज मला अमुक अमुक करायचं आहे,’ हा विचार आपल्याला उत्साह देतो, जीवन आशादायी बनवतो. हा जीवनाचा उद्देश फार मोठा, उदात्त वगैरे असायला हवा असं काही नाही. म्हणजे एखादी व्यक्ती सगळ्यांशी दयाळूपणानं वागायचं ठरवेल, दुसरा एखादा आपल्या सोसायटीमध्ये बगिचा उभारेल, तर एखादा हॉस्पिटलमधील रुग्णांना मदत करायची असं ठरवेल. एखादा गावाकडचा वारकरी पांडुरंगाचं देऊळ आरशासारखं लख्ख ठेवण्याचं मनात योजेल, एखादा मोठा डॉक्टर हृदयाची शस्त्रक्रिया करण्यासाठी वेगळी पद्धत शोधून काढण्याचा ध्यास ठेवेल.. शेवटी जीवनाचं फलित दिसावं असं प्रत्येकाला वाटतंच ना?

जीवनातील ध्येय हा अलीकडच्या काळात संशोधकांच्या आवडीचा विषय आहे. उद्दिष्ट असणं हे आपल्या मेंदूच्या आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं. त्यामुळे मेंदूचं, त्याच्या पेशींचं आरोग्य सुधारतं. शरीर आणि मन एकमेकांवर अवलंबून असतं हे आपण सगळे जाणतो. उद्दिष्टांचा अभ्यास म्हणजे एक प्रकारे मन आणि शरीर यांच्या नात्याचा अभ्यास. मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक विचारांचा मनावर, मेंदूवर काय परिणाम होतो याचा अभ्यास. जीवनात ध्येय असलेल्या व्यक्तींचं आरोग्य इतरांपेक्षा उजवं असतं, त्यांचं आयुष्यमान वाढतं असं दिसतं. ध्येय असणाऱ्या व्यक्तींमध्ये डिमेन्शिया, स्ट्रोक, इतर कार्डिओव्हॅस्क्युलर आजार कमी असू शकतील का? किंवा असं ध्येय ठेवल्यामुळे किंवा मनाला साद घातल्यामुळे डिमेन्शिया, पाठीच्या कण्याचे अपघात, इम्युनोलॉजिकल आणि कार्डिओव्हॅस्क्युलर आजारांच्या (रोगप्रतिकारशक्ती, हृदय आणि रक्ताभिसरणसंदर्भातील) उपचाराला वेगळी दिशा मिळेल का?, हा सध्या संशोधनाचा विषय आहे. उद्दिष्ट सापडल्यामुळे मेंदूला एक सुरक्षा कवच प्रदान होतं, असंच त्यांचं संशोधन सांगतं. त्याच्या तळाशी मनाजोगत्या कामातून मिळालेला आनंद आहे, आत्मिक समाधान आहे. ध्येयप्राप्तीच्या दिशेनं झालेल्या वाटचालीमुळे आयुष्य पूर्णत्वास जातं असं म्हणावं का? उद्दिष्ट माणसाच्या आयुष्याची गुणवत्ता ठरवू शकतं, याबद्दल तुमचं काय मत आहे? इतरांना काही वाटण्यापेक्षा आपल्या नजरेतून, आपल्या आयुष्यात काही तरी उपयुक्त करत आहोत, हे पटणं महत्त्वाचं असतं. त्यातून आपलं आयुष्य सार्थकी लागतं आहे, ही भावना दृढ होत जाते.

नुकतीच एक गोष्ट वाचण्यात आली. एका सत्त्याऐंशी वर्षांच्या ‘तरुणी’नं कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तिचं शहाणपण, अनुभव, तिची जीवनाकडे बघण्याची दृष्टी, यामुळे ती कॉलेजमधल्या मुलांची जणू हिरोईनच झाली! कॉलेजचं शिक्षण पूर्ण करण्याचं स्वप्न घेऊन ती कॉलेजमध्ये आली आणि तिथला काळ तिनं आनंदात जगला. आपला जीवनानुभव मांडताना ती म्हणाली, ‘जीवनात जर तुम्ही स्वप्न जगला  नाहीत, तर जिवंत असूनही तुम्ही मृतवतच असता.’ वयानं वाढणं आणि वयानुसार परिपक्व होणं यातला फरक तिनं आपल्या वागणुकीतून दर्शवला. शिक्षणाच्या जाहिराती काय करतील इतक्या मोठय़ा संख्येनं तिनं विद्यार्थ्यांना प्रेरित केलं. उद्दिष्टांसाठी तीन गोष्टी कराव्या लागतात- उद्दिष्ट ठरवणं, त्याला साजेशी विचारपद्धती अंगीकारणं आणि उद्दिष्टाचा पाठपुरावा करत राहणं. उद्दिष्ट गवसणं सगळ्यांना साध्य होईल का, असंही काही जण म्हटतील; पण शोधलं तर ते सापडणारच. ते शोधण्याची आंतरिक इच्छा तर हवीच. या उद्दिष्टाला जपानी भाषेत ‘इकिगाई’ (Ikigai) म्हणतात. ओकिनावा, जपान इथे राहणाऱ्या व्यक्ती दीर्घायुषी असतात, त्यापाठीमागे ‘इकिगाई’चा भाग मोठा आहे असंही मानलं जातं. उद्दिष्ट साधण्याच्या प्रवासात आपल्याला काय मिळत नाही असंच विचारायला पाहिजे! आपल्याला उत्साह मिळतो, मनात कल्पना जागतात, विचारांचा मीटर चालू राहतो, नवीन शिकणं होतं, नवीन ओळखी होतात, थोडं जरी यश मिळालं तरी मेंदू प्रफुल्लित होतो, अपयश मिळालं तर आणखीनच जोमानं काम चालू राहतं.. असो.

ही लेखमाला संपताना आणखी एक गोष्ट घडते आहे, ती म्हणजे माझ्या पुणे इथल्या कामाला बारा वर्ष पुर्ण होत आहेत. या बारा वर्षांचा लेखाजोखा इथे मांडायचा नाही; पण एक टप्पा पार पडतो आहे त्याचा जाता जाता उल्लेख करावासा वाटला. डिमेन्शिया रुग्ण आणि काळजीवाहक यांच्यापर्यंतच हे काम मर्यादित न राहता त्याचा ओघ आता मेंदूचं आरोग्य कसं जपावं इकडे वळत आहे. ज्यांना डिमेन्शियाव्यतिरिक्त इतर कारणांस्तव स्मरणशक्तीचे प्रश्न आहेत त्यांना योग्य ती मदत होत आहे. स्मरणशक्तीचे प्रश्न असणाऱ्यांना सर्व प्रकारची मदत एकाच ठिकाणी मिळावी असा प्रयत्न चालू आहे. ज्येष्ठांसाठी काही विशिष्ट योजना मनात आहेत. त्या तशाच न राहता त्याला ठोस रूप देण्याचा प्रयत्नही मी करणार आहे.

मेंदूचं आरोग्य कसं जपावं याची किल्ली आपल्या स्वत:च्या हातात आहे. आपण आपल्या आरोग्याची, मेंदूची काळजी घ्याल, आपल्या घरातील इतरांचं आरोग्यही जपाल असा विश्वास वाटतो. माझे लेख आपण उत्सुकतेनं वाचलेत याबद्दल आपणा सर्वाची मी आभारी आहे. लिहिण्याचा अनुभव नसलेल्या मला आपल्या प्रतिसादानं लिहितं केलं. एक नवीन अनुभव गाठीशी बांधता आला. आगामी वर्ष आपल्यासाठी खूशखबरींचा गुलदस्ता घेऊन येवो, अशा शुभेच्छा व्यक्त करून माझं ‘स्मृती आख्यान’ आता थांबवते.

mangal.joglekar@gmail.com

(सदर समाप्त)