scorecardresearch

गद्धेपंचविशी : स्वभान देणारे अस्वस्थ दिवस!

कॉलेज व हॉस्टेलच्या दर महिन्याच्या फीची जबाबदारी बाबांनी घेतली आणि पॉकेटमनीची जबाबदारी माझ्या धाकट्या आत्यानं आणि धाकट्या काकांनी घेतली.

गद्धेपंचविशी : स्वभान देणारे अस्वस्थ दिवस!
१९८५ मध्ये पहिला कवितासंग्रह ‘निरन्वय’च्या प्रकाशकांना भेटायला पती राजन आणि चार महिन्यांची अनीहा यांच्यासह नीरजा पुण्याला गेल्या होत्या.

|| नीरजा

‘‘ गद्धेपंचविशीचा माझा सारा काळ सामाजिक जाणिवा धारदार होण्याचा आणि परमेश्वराविषयी प्रश्न पडण्याचा  होता. नंतर लग्न करून ‘आदर्श सून’ होण्याचा प्रयत्न करणं आणि वास्तवात ते शक्य नाही, ही जाणीव झाल्यावर त्या विचारातून बाहेर पडणंही याच काळात घडलं. मधल्या काळात कथा दुरावलीही, पण कवितेनं साथ दिली. त्या कविता ‘स्त्रीवादी’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. समीक्षक म. सु. पाटील यांची मुलगी ते कवयित्री नीरजा ही स्वतंत्र ओळख कमावण्याचे हे अस्वस्थ दिवस माझं स्वभान जागवणारेच होते. ’’

बायकांच्या आयुष्यात असा काही काळ असतो का? ‘गद्धेपंचविशी’चा?

की त्यांना परवानगीच नसते कसलाही गाढवपणा करायची, मनमुक्त जगायची, चुकीचे किंवा बरोबर निर्णय घेण्याची?

आजच नाही, तर अगदी प्राचीन काळापासून या गद्धेपंचविशीच्या काळात पुरुष स्वत:ला आईबापापासून सोडवून घराबाहेर पडत होते, बरेवाईट निर्णय घेत आयुष्यात उभे राहात होते आणि मनमुक्त जगतही होते. कधी मित्रांच्या गराड्यात एखाद्या व्यसनाच्या आधीन होताना त्यातून सावरत होते, तर कधी आपल्या आयुष्याची दिशा ठरवत होते. काही जगण्याचे वेगवेगळे प्रयोग करताना स्वत:चं काही सापडेपर्यंतचा काळ स्वत:लाच शोधत राहात होते. अर्थात या काळात घरातल्या वडिलधाऱ्यांशी त्यांचा संघर्ष होत होता. पण आपले सारेच वीरनायक बापाची सावली नाकारत त्याच्याशी असलेलं नातं सैल करून घराबाहेर व स्वत:बाहेरही पडत होते आणि त्यांनी तसं पडावं हे गृहीतही धरलं जात होतं. बायकांना मात्र अशा प्रकारच्या सवलती क्वचितच असल्याचं दिसतं. स्वत:चा शोध घेण्यासाठी बाहेर पडण्याची, मनमुक्त जगण्याची, चुका करत पुढे जाताना आपला मार्ग शोधण्याची इच्छा असली, तरी ही व्यवस्था बाईला परवानगी देत नव्हती. त्यामुळे आपल्याकडच्या अनेक बायका ऐन विशी ते तिशीच्या काळात मुलाबाळांनी भरलेल्या गोकुळात समाधान मानून  निगुतीनं संसार करत होत्या आणि अनेक जणी आजही करताहेत. अर्थात ज्या घरातले आईबाप मुलींच्या पायात व्यवस्थेनं बांधलेले दोर सैल करत होते, त्या अपवादात्मक घरांतील मुली आपला शोध घेण्यासाठी बाहेर पडत होत्या. पण अशी उदाहरणं फारच कमी असल्याचं  आपला इतिहास सांगतो.

मी मात्र मुलींनी आपले पंख पसरावेत, असं मानणाºय़ा घरात जन्माला आल्यानं गद्धेपंचविशीचा काळ बऱ्यापैकी भोगला आहे. माझ्यासाठी हा काळ सुरू झाला, तो माणसाचं साधं सरळ जगणं कठीण करण्यासाठी आपल्या सोयीची नियमावली तयार करणाऱ्या व्यवस्थेविषयी प्रश्न पडायला लागले तेव्हापासून. ठेंगण्याठुसक्या बांध्याच्या नाजूक मुलींची वर्णनं कथाकादंबऱ्यांतून लोकप्रिय होण्याच्या काळात माझ्यासारख्या वयाच्या मानानं जरा जास्तच उंच आणि थोराड वाटणाऱ्या मुलीला शाळेत कायम शेवटच्या बाकावर बसावं लागलं. कधी झुडपांसारखे ताठ उभे राहाणारे कुरळे केस, तर कधी नाजूकपणा नसलेलं भलंमोठं नाक, यामुळे अनेकदा थट्टेचा विषय झाले. शाळेतले काही शिक्षक तर कपाळावर उभे राहाणारे केस धरून गदागदा हलवत आणि ‘नाकाला जरा मीठ लावून मासे सुकवतात तसं सुकवलंस तर ते बारीक होईल,’ असं म्हणत. त्यामुळे मी कायमची आत्मविश्वास गमावलेली ‘बॅकबेंचर’ झाले. पण एक चांगली गोष्ट झाली. त्या शेवटच्या बाकावर बसून  बाबूराव अर्नाळकर, चंद्रकांत काकोडकर, वि. स. खांडेकर, ना. सी. फडके  यांच्यापासून अण्णाभाऊ साठे, जी. ए. कु लकर्णी, विजय तेंडुलकर, यांच्यापर्यंत हातात येईल त्या लेखकाचं पुस्तक अभ्यासाच्या पुस्तकात घालून चोरून वाचण्याचा आनंद घेता आला आणि ‘अशी पाखरे येती’मधल्या मुशाफिरासारखा कोणीतरी आपल्या आयुष्यात येईल, अशी स्वप्नं पाहाता आली…

तो सगळा काळ वाचून रवंथ करण्याचा आणि तलत मेहमूद, महमंद रफी, गीता दत्त, आशा भोसले यांच्या प्रेमात पडून साहीर लुधियानवी, मजहूर सुलतानपुरी, शैलेंद्र यांच्यासारख्या गीतकारांची गाणी वहीत उतरवून घेत, मदनमोहन, नौशाद, एस.डी.,आर.डी. बर्मन यांनी दिलेल्या संगीताच्या तालावर जुनी हिंदी गाणी गुणगुणण्याचा काळ होता. पण याच काळात थोडंफार लिहायला लागले होते. बाबांच्या दृष्टीनं मुलगी वाचतेय, विचार करतेय, काहीतरी खरडतेय हे महत्त्वाचं होतं. त्यामुळेच ‘एस.वाय. बी.ए’ला एका विषयात ‘एटीकेटी’ लागूनही मी जग पाहावं म्हणून त्यांनी मला बंगळूरू-उटीच्या सहलीला पाठवून दिलं होतं. तिथून आल्यावर मी लिहिलेल्या थोड्या धारदार, पण उपहासात्मक प्रवासवर्णनाची शैली पाहून त्यांच्या माझ्याकडून अपेक्षा वाढायला लागल्या होत्या. ठाण्याच्या बेडेकर महाविद्यालयाच्या वार्षिक अंकात सलग दोन वर्षं माझ्या कथा आणि कविता प्रकाशित झाल्या होत्याच, पण वार्षिक स्नोहसंमेलनात कथेसाठी आणि कवितेसाठी त्या वेळच्या कुलगुरूंच्या- म्हणजे डॉ. राम जोशी यांच्या हस्ते पारितोषिकही घेतलं होतं.

सुरुवातीपासूनच मी स्कॉलर विद्यार्थिनी नसल्यानं विसाव्या वर्षी कशीबशी बी.ए. झाले. मुंबईच्या घरात आई, आजी, आत्या आणि आम्ही चार मुली, अशा केवळ बायकांच्या घरात राहिल्यानं मिळालेला मोकळा अवकाश आणि  बाबांनी ( समीक्षक व लेखक म. सु. पाटील) मनमाडला उभ्या केलेल्या सांस्कृतिक वातावरणात कुसुमाग्रज, नरहर कुरुंदकर, प्रभाकर पाध्ये, बा. भ. बोरकर, नारायण सुर्वे अशा अनेक साहित्यिकांचा सहवास लाभल्यानं हवं तसं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य, यामुळे त्या काळात वीरनायकांप्रमाणे मलाही बंध सैल करून बाहेरचं जग पाहाण्याचे वेध लागले होते. पुढचं शिक्षण हॉस्टेलमध्ये राहून पूर्ण करण्याची स्वप्नं पडायला लागली होती. त्यासाठी मुंबई सोडून जाणं भाग होतं. पुणे विद्यापीठात इंग्रजी विभागात प्रवेश घेते असं मी बाबांना म्हटलं. पण चार मुलींचं शिक्षण आणि मनमाड व मुंबईतली दोन घरं चालवताना आईबाबांची होणारी दमछाक यामुळे दोन वर्षांचा वसतिगृहाचा खर्च कसा परवडणार हा प्रश्न होता. मी इंग्रजीत ‘एम.ए.’ करावं अशी माझ्या आईची तीव्र इच्छा असल्यानं ‘करू काहीतरी, पण तिची चांगली वाढ होण्यासाठी  विद्यापीठातच पाठवू,’ हे तिनं बाबांना पटवून दिलं आणि आर्थिक परिस्थिती नसतानाही केवळ माझ्या इच्छेखातर बाबांनी मला इंग्रजी विभागात प्रवेश मिळवून दिला. आणि त्याबरोबरच सावित्रीबाई मुलींच्या वसतिगृहात प्रा. स. शि. भावे यांना सांगून जागाही मिळवून दिली.

वळकटी बांधून दोन वर्षांसाठी मी पुण्यात आले आणि पाच मुली राहात असलेल्या मेसजवळच्या हॉलमध्ये एका कोपऱ्यात टाकलेली एक कॉट आणि टेबल-खुर्ची एवढ्या जागेची एका वर्षासाठी मालकीण झाले. कॉलेज व हॉस्टेलच्या दर महिन्याच्या फीची जबाबदारी बाबांनी घेतली आणि पॉकेटमनीची जबाबदारी माझ्या धाकट्या आत्यानं आणि धाकट्या काकांनी घेतली. दर महिन्याला या दोघांकडून येणाऱ्या पन्नास रुपयांत माझं रविवार संध्याकाळचं बाहेरचं जेवण आणि महिन्यातून एक-दोन (पुढे त्याचं प्रमाण आठवड्याला एक-दोन झालं) चित्रपट पाहाणं सहज होऊ लागलं.

पुणे विद्यापीठातला तो दोन वर्षांचा काळ माझ्या आयुष्याला खऱ्या अर्थानं वळण देणारा काळ ठरला. मनमुक्त जगतानाच ते जगणं समजून घेण्यासाठी  आणि सांस्कृतिक व सामाजिकदृष्ट्या समृद्ध होण्यासाठी तुम्हाला जे वातावरण लागतं, ते मला या विद्यापीठात, विशेषत: जयकर ग्रंथालयात आणि  वसतिगृहातील वातावरणात मिळत गेलं. इथं मला मिळालेल्या मित्रमैत्रिणींचा देखील माझ्या या घडणीत हातभार लागला. बी.ए. होईपर्यंत अभ्यासक्रमातील ज्या पुस्तकांचा रट्टा मारून अभ्यास केला होता, त्यांचा नव्यानं अभ्यास करायला लागले. त्यातले बारकावे जाणून घ्यायला लागले. टी. एस. इलिएटच्या ‘ द वेस्ट लँड’नं तर इतकं वेड लावलं होतं, की त्याच्यासारखी एखादी कविता आपल्या हातून लिहून व्हावी असं आजही वाटतं. त्या वेळी ‘सेक्श्युअल इमेजरी इन द वेस्ट लँड’ यावर टर्म पेपर लिहिला होता. त्या काळात परीक्षेसाठी आम्हाला ‘क्वे श्चन बँक’ मिळायची. त्यातले सगळे प्रश्न आम्ही ग्रुपमध्ये चर्चेला घ्यायचो. या चर्चा ज्यांची घरं पुण्यात होती असे आमचे वर्गमित्र अनिल टाकळकर (पत्रकार), रेखा सावकार, सुचित्रा राणे, मीनाक्षी देव, रोहित कावळे यांच्या घरी व्हायच्या. माझे वर्गमित्र प्रकाश पगारिया, विशेषत: रोहित कावळे आणि रुक्शाना नांजी  हे अत्यंत हुशार विद्यार्थी. त्यांचा या चर्चांमध्ये महत्त्वाचा सहभाग असायचा. हे चर्चांचे दिवस म्हणजे माझ्यासाठी आणि माझ्यासोबत हॉस्टेलमध्ये राहाणारी माझी मैत्रीण माधुरी देशपांडे हिच्यासाठी पर्वणीचे दिवस असायचे. कारण त्या निमित्तानं आम्हाला घरगुती पक्वांन्नांची मेजवानी मिळायची. हॉस्टेलमध्ये आपण खातो ती भाजी वांग्याची, दुधीची की कोबीची आहे हे कळू न देणाऱ्या आचाऱ्यांच्या हातचं जे लोक जेवले आहेत त्यांना आमच्या या आनंदाचं कारण नक्की कळू शकेल. रेखाकडे तर त्या काळात मध्यमवर्गीयांच्याही घरी सहजासहजी न दिसणारे केक, पेस्ट्रीज् वगैरे मुबलक मिळत. त्यामुळे बुद्धीची आणि पोटाची अशा दोन्ही भुका या चर्चांच्या वेळी सहज भागल्या जात.

हे सगळे दिवस फार चांगले गेले. मी आणि माझ्या हॉस्टेलच्या मैत्रिणींनी वेळीअवेळी केलेली विनाकारण भटकंती असो, जयकर वाचनालयात वाचलेले मराठी, अमेरिकन, युरोपियन लेखक असोत, ‘कमला’, ‘घाशीराम’सारखी नाटकं असोत, की पुण्यातल्या चित्रपटगृहांमध्ये पाहिलेले ‘हॅम्लेट’, ‘उंबरठा’, ‘गांधी’ यांसारखे चित्रपट असोत.  माक्र्ससिझम किंवा अस्तित्ववादावर होणाऱ्या चर्चा असोत, की इंग्रजी विभागानं आयोजित केलेली भालचंद्र नेमाड्यांसारख्या व्याख्यात्यांची व्याख्यानं असोत. हा सारा काळ सामाजिक जाणिवा धारदार होण्याचा आणि परमेश्वराविषयी प्रश्न पडण्याचा काळ होता. मी कविता लिहीत होते ते माझ्या अनेक मित्रांना माहीत नव्हतं. कायम मस्ती आणि विनोदाच्या मूडमध्ये असणारी नीरजा कवयित्री कशी असेल, असा प्रश्न पडायचा त्यांना. कवयित्री म्हणजे निसर्गात रमणारी, संध्याकाळची लाली क्षितिजावर पसरलेली असताना त्याचा आनंद घेणारी, असं काहीसं वाटत होतं माझ्या मैत्रिणींना. पण मला संध्याकाळच्या लालीत ‘हिरोशिमात पेटलेले निखारे’ किंवा ‘भुकेनं तळमळणाऱ्या पोटाची आग’ दिसायला लागली होती तेव्हा. या काळात मी लिहिलेल्या कवितांमध्ये पाश्चात्त्य आणि भारतीय मिथकांचा वापर खूपच झाला. बेकेटचं ‘वेटिंग फॉर गोदो’ अभ्यासक्रमात होतं. त्याचा इतका परिणाम झाला होता, की

इथूनच भीष्मानं त्याच्या बापाची वरात आणली

अन् इथूनच इव्ह आणि

साप हसत हसत गप्पागोष्टी करत गेले

इथंच कुणा द्रौपदीची वस्त्रं फेडली

अन् त्याच्याच पताका करून

इथूनच पंढरपूरची दिंडी गेली.

अजूनही तो आला नाही.

यासारखी कविता त्या काळात लिहून झाली.

याच काळात ‘महाराष्ट्र साहित्य परिषदे’नं आयोजित केलेल्या काव्यस्पर्धेत भाग घेऊन तिसरं बक्षीस मिळवलं होतं.  हळूहळू ‘अक्षरवैदर्भी’, ‘अक्षरचळवळ’ आणि ‘अनुष्टुभ’सारख्या नियतकालिकांत माझ्या कविता प्रसिद्ध व्हायला लागल्या होत्या. ‘अनुष्टुभ’ला पहिली कविता पाठवली ती या हॉस्टेलमधूनच. त्या वेळचे संपादक पुरुषोत्तम पाटील यांना मी म. सु. पाटील यांची मुलगी आहे हे कळू नये, माझ्या कवितेच्या गुणावर ती स्वीकारली जावी, म्हणून केवळ ‘नीरजा’ नाव लिहून माधुरीच्या अकोल्याच्या (संगमनेरजवळील) घराचा पत्ता दिला होता. तेव्हापासून माझं लेखन नीरजा नावानंच प्रसिद्ध व्हायला लागलं.

हा काळ खरं तर प्रेमातही पडण्याचा काळ होता. आई तर सांगत होती, पुण्यातच मुलगा शोध. पण नाहीच जमलं. आजूबाजूला अनेक मुलं होती. काहींनी संकेतही दिले. पण माझ्या मनातला मुलगा नाहीच सापडला त्यांच्यात. पुढे वरसंशोधनाचा कार्यक्रम सुरू झाल्यावर चांगल्या चार-पाच मुलांना नकार देऊन शेवटी ‘एम.ए.’च्या शेवटच्या सेमिस्टरची परीक्षा देऊन आल्यावर एका लग्नात पाहिलेल्या राजनला पसंत के लं आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी लग्न करून पारंपरिक सुनेच्या भूमिकेत शिरले. माझ्यासारख्या मुलीनं ठरवून कसं काय लग्न केलं आणि ते निभावणार कसं, हा प्रश्न माझ्या पंचविशीत आमच्या काही कवींमित्रांनाही पडला होता. पण गद्धेपंचविशीच्या काळात राजनशी लग्न करण्याचा घेतलेला निर्णय मात्र अजिबात चुकीचा ठरला नाही.

त्या वेळी कनिष्ठ महाविद्यालयात नोकरीला लागले होते. मनात स्त्रीच्या पारंपरिक भूमिकेविषयी अनेक प्रश्न असले तरी प्रत्यक्षात आदर्श सूनेची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या आजूबाजूच्या नात्यानं जोडलेल्या स्त्रिया आणि पुरुषही चांगले होते, पण त्यांच्या माझ्याकडून ज्या अपेक्षा होत्या आणि त्या पूर्ण करताना होणारी दमछाक जाणवायला लागली होती. नोकरी, गृहिणीची कर्तव्यं आणि वर्षभरात झालेली मुलगी यातून वेळ काढून वाचन करणं किंवा लिहिणं शक्य नव्हतं. वाचन ही फावल्या वेळात करण्याची गोष्ट असते असं समजणाऱ्या लोकांना लिहिणं ही माझ्यासाठी श्वास घेण्याइतकीच महत्त्वाची गोष्ट असू शकते हे कळणं शक्यच नव्हतं. त्यामुळे या काळात कथा बाजूला पडली. पण कविता मात्र घट्ट धरून राहिली. प्रवासात कधी बसच्या तिकिटावर किंवा रात्री अंधारात वहीच्या पानावर शब्द उमटायला लागले.  ‘सावित्री’, ‘आईस पत्र’,  यांसारख्या कविता याच काळात लिहिल्या. हळूहळू जाणवायला लागलं, की आपण प्रत्येकाला खूश नाही करू शकत. या नादात स्वत:चं स्वत्व हरवून बसू. आणि ते हरवू द्यायचं नसेल तर

‘आदर्श सून’ वगैरेच्या भ्रमातून बाहेर यायला हवं. त्या काळात या भ्रमातून बाहेर येण्यासाठी राजननं खऱ्या अर्थानं मदत केली.

गद्धेपंचविशीच्या या दहा वर्षांत प्रामुख्यानं कविताच लिहिली. त्या काळात ‘महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळा’कडे पहिला कवितासंग्रह शंभर टक्के अनुदानासाठी १९८४ मध्ये पाठवला होता. त्याला अनुदान मंजूर झालं. तो प्रकाशित करणाऱ्या प्रकाशकांना भेटायला १९८५ मध्ये  मी, राजन आणि चार महिन्यांची अनीहा पुण्याला गेलो होतो. पुस्तकाचं काम सुरू झालं तेव्हा आपलं स्वत:चं घर घेण्याचा निर्णय झाला आणि एकत्र कुटुंबातून बाहेर पडल्यावर मला माझा कोपरा मिळाला. दूर गेलेली कथा पुन्हा एकदा आसपास फिरकू लागली. मुंबईत विश्राम बेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संमेलनात नवोदितांच्या कविसंमेलनाचं आमंत्रण आलं होतं. तिथं वाचलेली ‘व्यथा’ ही कविता बऱ्यापैकी गाजली. सत्ताविसाव्या वर्षी माझा पहिला काव्यसंग्रह ‘निरन्वय’ हा सुप्रसिद्ध कवी रमेश तेंडुलकर यांच्या हस्ते प्रकाशित झाला.

साहित्यक्षेत्रातील काही लोक कवयित्री म्हणून ओळखायला लागले असले तरी त्या अर्थानं दखल घेतली गेली नव्हती. ती घेतली गेली ती १९९० मध्ये झालेल्या रत्नागिरीच्या ६४ व्या साहित्य संमेलनात. त्या वेळी साहित्यिक

मधु मंगेश कर्णिकांच्या सूचनेप्रमाणे प्रथमच नवोदितांच्या काही कविता मागवून त्यांना सकाळच्या संमेलनात सादरीकरण करायला सांगितलं होतं. मी ‘सावित्री’ ही कविता पाठवली होती. ती स्वीकारली गेली. पण तिथं जाण्याची व राहाण्याची सोय आम्हालाच करायची होती. कोणी ओळखीचं नव्हतं. शेवटी माझी मोठी बहीण अस्मिताताई माझ्यासोबत आली. बाबांचे मित्र मधू पाटील यांची सून विजया रत्नागिरीची होती. तिला सांगितल्याबरोबर तिच्या माहेरी आमची व्यवस्था झाली. संमेलनाच्या दिवशी सकाळी नारायण सुर्वे, दया पवार आणि            प्र. श्री. नेरुरकर अशा दिग्गजांसमोर कवितांचं सादरीकरण केलं. त्यातून  संध्याकाळी निमंत्रितांच्या कविसंमेलनात कविता वाचण्यासाठी पाच कवींची निवड करण्यात आली. त्यात मीही होते. संध्याकाळच्या कविसंमलनाचे अध्यक्ष वसंत बापट होते. ‘आईस पत्र’ या कवितामालिकेतल्या तीन कविता सादर केल्या, तेव्हा पुरुषोत्तम पाटलांना (पुपाजींना) वसंत बापटांनी ‘ही मुलगी कोण?’ असं विचारल्याचं मला पुपाजींनी नंतर सांगितलं. ‘मसुं’ची मुलगी कळल्यावर त्यांनी मला भेटायला बोलावलं. दुसऱ्या दिवशी सकाळी विद्या बाळ स्वत:हून मला भेटायला आल्या आणि ‘मिळून साऱ्याजणी’साठी कविता मागितली. त्या वर्षीच्या अनेक वर्तमानपत्रांत माझ्या ‘सावित्री’ या कवितेचा उल्लेख आवर्जून झाला. ‘लोकसत्ता’मधील साहित्य संमेलनावरील रविवारच्या पुरवणीत आलेल्या लेखाची सुरुवातच माझ्या कवितेनं केली होती. या संमेलनानंतर माझ्या कवितेवर चर्चा सुरू झालीच, पण हळूहळू ती स्त्रीवादी कविता म्हणून ओळखली जायला लागली. यानंतरच्या ‘वेणा’ या संग्रहाचं प्रकाशन विजय तेंडुलकरांच्या हस्ते झालं. त्या पुस्तकाला अनेक पुरस्कार मिळाले.

गद्धेपंचविशीचे हे सारेच दिवस स्वत:ला तपासायचे, शोधायचे आणि सिद्ध करायचे दिवस होते. वेगवेगळ्या चौकटीतून स्वत:ला मोकळं करण्याचे दिवस होते. ही दहा वर्षं माझ्या लेखनालाही वळण लावणारी, विचारांची दिशा पक्की करणारी होती. परंपरांच्या चौकटी मोडताना शब्दांतून व्यक्त झालेलं माझं बंड समजून न घेणारी माणसं जशी या काळात भेटली, तशीच या बंडाला बळ देणारी माणसंही भेटली. माझ्या सगळ्या जगण्यावर आणि लेखनावर बाबांचा हात जसा फिरत राहिला, तसा राजनचाही हात फिरत राहिला.

म.सु. आणि विभावरी पाटील यांची मुलगी ते कवयित्री नीरजा अशी स्वतंत्र ओळख मिळवण्याच्या झालेल्या प्रवासाची सुरुवात ज्या काळात झाली तो काळ अनेकार्थानी परीक्षा पाहाणारा, अस्वस्थ करणारा असला, तरी माझं स्वत्व जागवणारा आणि आत्मभान देणारा काळ होता.

nrajan20@gmail.com

 

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Social awareness adarsh soon uneasy days of self consciousness feminist akp

ताज्या बातम्या