गिरीश कुबेर

‘पंचकन्या स्मरे नित्यम्’ असा एक श्लोक आजी म्हणायची. गंमत अशी, की कळत-नकळतपणे आमच्या घरात सर्व प्राणी कन्या आहेत. सखी, बेगम, सलमा, ठकी आणि ठमी या आमच्या पंचकन्या. प्रत्येकीचा बाज वेगळा, प्रत्येकीची तऱ्हा वेगळी. ठकीला घरातून निघताना सांगावं लागायचं, ‘मी येतो लगेच.’ नाही तर त्याची शिक्षा स्वत:ला करून घेणारी, मार्जारकन्या असूनही ‘श्वान सखी’ला लुचायला जाणारी ‘सलमा’ नि तिला ते प्रेमाने करू देणाऱ्या सखीला पाहाण्याचा आनंद शब्दातीत. तर दुसरीकडे आपल्या ताकदीचा अजिबात अंदाज नसल्याने उपद्वय़ाप करून मग ‘अरेच्चा, हे कसं काय झालं बुवा,’ अशा निरागस नजरेनं पाहाणारी ‘बेगम’ या सगळय़ांनी हेच शिकवलं, की चांगला माणूस होण्याचा मार्ग प्राण्यांच्या अंगणातून जातो. पाय जमिनीवर ठेवायला लावणाऱ्या या पाच कन्यकांचं स्मरण म्हणूनच आनंददायी!

२००५ मध्ये ‘ठकी’ गेल्यावर संपूर्ण कुटुंब दु:खात होतं. तेव्हा एका रविवारी आमच्या ख्रिश्चन स्नेहीस तिच्या चर्चच्या बोर्डावर एक वाक्य दिसलं. त्याचा फोटो तिनं पाठवला. त्यातली कुत्रा-पालक व्यक्ती परमेश्वरास म्हणते, ‘गॉड मेक मी द मॅन, माय डॉग थिंक्स आय अ‍ॅम’. यातल्या परमेश्वराला सोडून द्या; पण प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाचा प्रयत्न हाच असतो. चांगला माणूस होण्याचा मार्ग प्राण्यांच्या अंगणातून जातो. तो टाळून माणूसपणापर्यंत पोहोचणं अंमळ अवघडच.

एकदा आमच्या जवळच्या नात्यातलं नवनवं जोडपं पहिल्यांदाच घरी आलं होतं. उभयतांच्या वागण्यात अशांचे जे नवनवे बावळटपण दिसते, ते दिसत होते. दारासमोर आले तर ‘सखी’ तिच्या सवयीप्रमाणं जोरदार आवाजात भुंकली. खरं तर ‘सखी’ जाळीच्या दरवाजाच्या आत होती आणि ते बाहेर, पण तरी ती नवीनवी नवरी घाबरली. साहजिकच. भुंकताना ‘सखी’ मागच्या दोन पायांवर उभी राहायची आणि थेट सहा फुटांवर जायची, समोरचा घाबरणारच. तर आपल्या नव्या बायकोची काळजी घेणारा हा आमचा नातेवाईक माझ्या बायकोला, शमीला म्हणाला, ‘‘तुम्ही ‘सखी’ला बांधा नाही तर ही काही आत येणार नाही.’’

 ‘‘येऊ नका.’’ हे त्यावर बायकोचं उत्तर.  हा प्रसंग अशासाठी सांगितला, कारण त्यावरनं आमच्या घरातलं प्राणिवेड काय दर्जाचं आहे, याचा अंदाज येईल. सखी जर्मन शेफर्ड. ती आता नाही. तिच्यापाठीवरची तशीच ‘बेगम’ आहे. सलमा ही मार्जारसुंदरी (आपणच या आसपासच्यांना पाळलंय असा तिचा तोरा), खावो-पिओ-मज्जा करो अशा वृत्तीची भावाकडची ‘बेबो’ ही गोल्डन रिट्रीव्हर, माझी लेक, मनूकडची पूर्वी चाळीत सतत उत्साहानं मुसमुसणारा तरुण बबल्या असायचा तशी देशी ‘बर्फी’, स्वत:ची झोप झाल्यावर इतरांना चक्क थोबाडीत मारून किंवा पायाला चावून उठवणारी तिच्याकडचीच ‘मियॉँव’, फक्त द्विपादांनाच जवळ करणारी आणि सर्व चतुष्पादांना खाऊ की गिळू असं पाहाणारी, दामुअण्णा मालवणकरांच्या नजरेची मेव्हण्याकडची बॉक्सर ‘लैला’. असा हा महिन्या-सहा महिन्यांगणिक वाढत जाणारा गोतावळा! स्वत: प्राणी असूनही ‘लैला’ला इतर सर्वच प्राण्यांचा दुस्वास. ती आता नाही. तिच्या जागी ‘लिलीबेट’ची प्रतीक्षा आहे.

या गोतावळय़ाचे संस्थापक श्वान आणि मार्जार म्हणजे ‘ठकी’ आणि ‘ठमी’. ठकी पॉम होती. गोव्यात असताना ती घरी आली. खरं तर लहानपणापासनं घरी कुत्रा-मांजर असावी अशी इच्छा होती. डोंबिवलीत राहात होतो तेव्हा ते शक्य झालं नाही. गोव्याला गेल्या गेल्या स्थिरावल्यावर पहिलं काम हे केलं. ठकी घरी आली तेव्हा इतकी लहान होती की तिला वळता यायचं नाही. म्हणजे समजा उजवीकडे वळायचं असलं, तर आधी सरळ पुढे जायची आणि हळूहळू मागे येऊन मग वळायची. लेक मनू आणि ती एकाच वयाच्या, त्यामुळे ठकीनं आयुष्यभर कधीही मनूला मोठं मानलं नाही. चालताना मनूनं तिचा पट्टा धरला तर उलटी यायची आणि तिच्या हातून तो काढून घ्यायची. मनूला काही ते आवडायचं नाही. मग दोघींत भांडणं. ही काय म्हणते ते तिला कळायचं नाही आणि ती काय म्हणते हे हिच्या लक्षात यायचं नाही.

 गोव्यात असताना रोज सकाळी बायकोला बँकेत दुचाकीवरनं सोडायला जायचो. आमचं घर होतं पर्वरीत. बायकोची बँक अंजुनाला. तिला सोडायचं, घरी यायचं, आवरायचं, मुलीला सांभाळणारी फातिमा तोपर्यंत आलेली असायची. आणि मग पणजीत ऑफिसला जायचं असा परिपाठ. घर पहिल्या मजल्यावर. गॅलरी मोठी. दुचाकीवरनं निघताना ठकी आणि मुलगी दोघीही गॅलरीत आलेल्या असायच्या. ठकीला सांगावं लागायचं, ‘मी येतो लगेच.’ एक दिवस कसलीशी  घाई होती आणि मी निघताना ठकीला सांगायचं विसरलो. त्या दिवशी बायकोला सोडून थेट ऑफिसला जायचं होतं. पावसाळा होता. ऑफिसमध्ये थोडय़ा वेळात फातिमाचा फोन आला, ठकी गॅलरीतनं आतच यायला तयार नाहीये. पावसात बसून आहे, हे सांगणारा. मी तसाच घरी आलो. तोपर्यंत ठकी तश्शीच पावसात भिजत गॅलरीत बसून होती. माझ्या विसरण्याची शिक्षा तिनं स्वत: घेतली.

  त्या दिवसापासून आमच्या घरात कोणीही या मंडळीचं काहीही कधीही विसरत नाही. एकदा आमच्या इमारतीपाशी एकटं मांजरीचं पिल्लू बसलेलं मनूला दिसलं. बायको म्हणाली, ‘‘झालं. आणखी एक मेंबर वाढणार.’’ ती ‘ठमी’. ‘ठकी’ आणि ‘ठमी’ सगळय़ांना माहिती होत्या. ठकी तर फारच. गोविंदराव तळवलकर ते प्रमोद महाजन ते मनोहर पर्रिकर अशा सर्वाच्या शेजारी टेचात सोफ्यावर बसून चर्चेत आपणही सहभागी असल्यासारखी वागायची ती. स्वत:च्या मुलींनंतर गोविंदरावांकडून पाठीवरनं मायेनं हात फिरवून घेणाऱ्या काही मोजक्यांत ठकीची गणना होईल.

‘ठकी’ मोठी झाल्यावर आम्ही जोडीदार पाहिला. तोही गोड होता. ही पांढरीशुभ्र हिमकन्या तर तो काळाठिक्कर कोळसा. छान जमलं दोघांचं. यथावकाश पाळणा हलला. त्याचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतशी आमचीच हुरहुर वाढत होती. एक दिवस संध्याकाळी पत्रकार परिषदेला म्हणून निघालो तर बायकोनं गॅलरीतनं ओरडून परत बोलावलं. ठकीच्या बाळंतपणाचा क्षण आला बहुधा. आम्ही सज्ज होतोच. कात्री, फडकी वगैरे. आणि पोरं होळीत फेकतात तशा पाण्याच्या फुग्यासारखे छोटे छोटे गोळे एका पाठोपाठ एक बाहेर पडत गेले. एक आला की ठकी तो फोडायची. मग त्यातलं पाणी वाहून जायचं आणि मग त्याला चाटून ऊब आणून तो श्वास घ्यायला लागेपर्यंत दुसरा फुगा यायचा. अशा चार फुग्यांच्या बाळंतपणानं ती इतकी दमली की पडून राहिली. आम्हाला वाटलं झालं आता. मी हात धुऊन, साफसफाई करून पुन्हा निघालो. मोटारसायकलवर बसलो तर पुन्हा बायकोची हाक. धावत वर गेलो. ठकी गोल गोल फिरत होती. अंगात त्राण नव्हतं. तिला धरलं. आम्ही सांगत गेलो, ‘‘ठकी, जोर लाव.’’ वगैरे. ती तसं करत गेली. अर्धामुर्धा फुगा बाहेर आला. आता ठकीच्या अंगातले त्राण संपले होते. मी तो फुगा अलगद हातांनी बाहेर ओढला. असं होऊ शकतं याची कल्पना डॉक्टरांनी दिलेली होती. खरं आव्हान पुढचं होतं. तो फुगा ब्लेडनं फोडा, पाणी वाहू द्या आणि मग पिल्लाला ऊब देत घासा, असं डॉक्टरांनी सांगितलेलं. तिथे हात थरथरला. कापायचं कुठे? तोंड कुठलं, मागचा भाग कुठला, कळणार कसं? आणि ब्लेड डोळय़ाबिळय़ाला लागलं तर काय? हे प्रश्न. पण डॉक्टरांना बोलवायला वेळ नव्हता. पिल्लू आत गुदमरलं असतं. शेवटी धीर केला आणि तो फुगा फोडला. त्या पिल्लाला टॉवेलनं घासलं. हे सगळं ठकी काळजीनं पाहात होती. पण ज्या क्षणाला हातातल्या त्या गोळय़ातनं कुईकुई आवाज आला त्या क्षणाला तिच्यात एकदम उत्साह संचारला. लगेच पिल्लाला तिच्या तोंडाकडे नेलं. तिनं त्याला चाटलं आणि नंतर अशा काही नजरेनं माझ्याकडे पाहिलं की.. ते डोळे अजूनही आठवतात. प्राण्यांत थँक्यू वगैरे काही नसतं. पण हे जे काही असतं ते अशा सगळय़ा बुळबुळीत शब्दांच्या पलीकडे जातं.

नंतर घरभर काही महिने नुसता आनंदी-आनंद. ही पाच वाढती पिल्लं, त्यांची आई ठकी आणि मार्जारमावशी ठमी. नुसती मजाच मजा. पाहात बसावं अशी. मनू झोपली की तिच्या एका बाजूला ठकी आणि दुसरीकडे ठमी. हिनं कूस बदलली की ते स्वत:ला परत नव्या आकारात बसवून घ्यायचे. कॉटखाली ही पिलावळ. जाडसर गांडुळं वाटावीत अशी शी घरभर करून ठेवायचे. इकडे एकाची काढेपर्यंत दुसरा तिकडे जाऊन करायचा. अशा वेळी नोकरी-व्यवसायासाठी घराबाहेर पडावं लागतं याचं फारच दु:ख होतं. नंतर ही पिल्लं जवळच्यात देऊन टाकली. डॉक्टर म्हणाले, ‘‘एकदम सर्व देऊ नका. एकेक एकेक द्या.’’ तसंच केलं. हे काम करणारा आमचा परिचित ‘यामाहा’ मोटारसायकलवरनं यायचा. त्या मोटारसायकलचा आवाज, पाठोपाठ त्याचं येणं आणि आपल्या एका पिल्लाचं कमी होणं ठकीच्या मनात कायमचं बसलं. शेवटपर्यंत. आम्ही गोवा सोडून ठाण्याला आलो तरी ‘यामाहा’चा आवाज ऐकला, की ती एकदम हिंस्र व्हायची.

ते पाहून खूप वाईट वाटायचं. उगाच दिली ती पिल्लं! ही खंत आता कायमच बाळगावी लागणार आहे. ठमी याच्या बरोबर उलट. ठकीसारखं लाड वगैरे करून घेण्यावर तिचा विश्वास नव्हता. ‘तुम्ही कोण माझे लाड करणारे’ असा एक तुच्छतेचा भाव तिच्या चेहऱ्यावर कायम असायचा. फारच लहान वयात तिनं गोविंदरावांना पाहिल्यामुळे असं झालं असावं बहुधा. पण आताची ‘सलमा’ही तशीच. आपण मालक आहोत आणि हे सर्व द्विपाद आपल्या सेवार्थ इथे धाडलेले आहेत, अशी तिची खात्री आहे. त्यामुळे तिच्या जागेवर कोणी बसलेलं आढळलं तर ती सरळ उठवते. मग ती व्यक्ती संपादक आहे की कोणी कलाकार, अधिकारी वगैरे आहे याचा तिला काहीही फरक पडत नाही.

एकदा कॉलेजात निघालेली असताना मनूला घराखाली उभ्या एका मोटारीच्या मागच्या चाकाखालनं ‘म्याँव म्याँव’ ऐकू आलं आणि अर्थातच तिचं त्या दिवशी कॉलेज बुडालं. ‘सलमा’ घरी आली. ती सलमा झाली कारण आली तेव्हा तिचे डोळे सलमा आगासारखे हिरवे-निळे होते. आणि दिसायलाही ती सलमा हाएक सारखी, तशी. अजूनही तशीच आहे ती. ती आल्यावर पहिले दोन-तीन दिवस मी आणि सखी एका खोलीत आणि बायको-मुलगी ‘सलमा’सह दुसऱ्या खोलीत असे काढले. सलमाच्या संपूर्ण देहाकारापेक्षाही मोठा ‘सखी’चा फक्त जबडा होता. दोघींत मिलाप होईपर्यंत हे अंतर राखणं आवश्यक होतं. दोन-तीन दिवसांनी ‘सखी’नं ‘सलमा’ला स्वीकारलं. इतकं की ‘सलमा’ ही ‘सखी’ला लुचायला जायची आणि मग सखीही मागचा पाय वर करून सलमाला तसं करू द्यायची.

सखी जन्मत:च पोक्त. विचारी. मोजून-मापून बोलणारी. कुत्र्यांमधली तत्त्वज्ञान वगैरे वाचणारी असावी बहुधा. एकदम प्राध्यापकी. दिसायला भव्य. मला सगळेच कुत्रे, मांजरी आवडतात, पण त्यातही जर्मन शेफर्ड अत्यंत प्रिय. त्यांच्यात एक राजस अलिप्तपणा असतो. उगाच ते अंगाअंगाशी करत नाहीत आणि माणसांप्रमाणे ‘आपण किती तरुण आहोत’ वगैरे दाखवण्यासाठी शिंगं मोडून वासरांत शिरत नाहीत. आणि त्यांचं रूपच असं, की उगाच कोणी लगट करायलाही जात नाही. ‘सखी’च्या पाठीवरची ‘बेगम’ही तशीच. दोघींत फरक इतकाच की ‘बेगम’ला आपल्या ताकदीचा अजिबात अंदाज नाही. तिच्या शेपटाच्या एखाद्या किरकोळ फराटय़ानं टेबलावरचा पाण्यानं गच्च भरलेला दांडगा फ्लॉवरपॉट दोन-तीन फुटांवर जाऊन पडतो. त्यानंतर ‘अरेच्चा, हे कसं काय झालं बुवा,’ अशा निरागस नजरेनं ‘बेगम’ आपल्याकडेच बघते. घरात सगळे आहेत आणि तरीही आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, असं वाटलं की ती सरळ बेडरूममध्ये जाते आणि भलीथोरली उशी कॉलेज विद्यार्थ्यांनं वही भिरकवावी तशी भिरकावून देते. उशीच्या लँडिंग स्पॉटवर जे काही असेल ते मग अर्थातच जमीनदोस्त. पण ‘सखी’च्या तुलनेत ‘बेगम’ खाण्याबाबत अगदी निरिच्छ. सखीला खूप काही आवडायचं, विशेषत: आंबे. एकदा कोणी जेवायला येणार होतं  म्हणून बायकोनं रस काढण्यासाठी आंबे टेबलावर काढून ठेवले होते. आम्ही बाहेर सगळे गप्पा मारत बसलो होतो. आत येऊन पाहातो तर सखीबाईंनी सर्व आंबे अख्खेच्या अख्खे खाऊन टाकले. नंतर आम्ही

बाहेर पडणाऱ्या कोयींचा हिशेब लावत बसलो. ती गेल्यानंतर आमच्या घरात बराच काळ आंबा आला नाही. हल्ली आणला जातो, पण त्याचा गोडवा जरा कमीच झालाय. एकदा भलीथोरली पपई खाल्ली तर नंतर दोन-तीन दिवस तिची ‘शी’ म्हणजे पपईच्या बियांची रांगोळी होत होती. एकदा आईकडचं तांब्याभर विरजण तिनं ओटय़ावरनं बेडवर नेऊन, एक थेंबही न सांडता साफ करून टाकलं होतं. वरण-भातावर तूप घेतात तसं नंतर बरेच दिवस तिच्या ‘शी’वर चमचाभर तूप पडायचं.

आता ‘बेबो’ आणि ‘बर्फी’ अशा आहेत. त्यांना काहीही खायला आवडतं. स्वभावानं ‘बेबो’ शुद्ध गांधीवादी. रस्त्यात तिच्यावर अन्य एखादा कुत्रा भुंकला तर ‘बाबा रे कशाला अशी ऊर्जा वाया घालवतोस’ अशा भावनेनं त्याच्याकडे बघते आणि जुन्या नायिकांसारखी कंबर झुलवत तोऱ्यात पुढे निघून जाते. ‘बर्फी’चं वर्णन मनूच्या नवऱ्यानं चाळीतला कोणत्याही कामासाठी एका पायावर तयार असणारा बबन्या असं केलंय ते अगदी रास्त आहे. गणपतीची वर्गणी, होळीची लाकडं जमवण्यापासून कोणाच्या मयताच्या तयारीपर्यंत सर्व कामात त्या बबन्याला रस असतो तसा काहीही करायला बर्फीला उत्साह.

हे सर्व काही ना काही निमित्तानं एकत्र जमतात तेव्हा आमचं घर म्हणजे मानव आणि प्राणी साहचर्याचं मूर्तिमंत उदाहरण बनतं. ही सदस्यसंख्या आणखी वाढायला हवी अशी इच्छा. एखादं माकड असावं. पक्षी हवेत गच्चीत; पण पिंजरा मात्र नको. रात्रीच्या जेवणानंतर शतपावलीच्या वेळी एखाद्या घुबडाशी दोस्ताना हवा. एकूणच सरपटायच्या आणि सरपटणाऱ्यांच्या प्रवृत्तीशी माझं जमत नाही. म्हणून सापांचं तितकं आकर्षण नाही. पण त्यांना मारायला आम्हा सर्वाचा तीव्र विरोध. डॉल्फिन आणि हत्तीचं पिल्लू घेऊ या, असा  लहानपणी मनूचा हट्ट असायचा. तो मोठेपणीही कायम आहे. तेव्हाही तसं सर्वाना वाटायचं. आताही तसंच सर्वाना वाटतं. फक्त असे काही विषय निघाले, की ऐकून घ्यावं लागतं, ‘‘या सगळय़ांना आणू आपण, पण तू घरी बसू लागशील तेव्हाच. तू शहाणपणा सांगत हिंडणार आणि मी..’’

इत्यादी इत्यादी. ती निवृत्ती येईल तेव्हा सर्वात मोठं आकर्षण हे करायला मिळेल याचंच असेल. घरी किमान पाच-श्वान हवेत. क्रांती करून आपण सर्व व्यवस्था उलथून पाडाव्यात अशा चेहऱ्यानं, कपाळावरच्या सुरकुत्या वागवणारा रॉटवॉयलर हवा (ही जमात शिव्यांशिवाय भुंकत नाही), प्रत्येकाकडे सतत संशयी नजरेनं पाहणारा डॉबरमन (यांच्या भुंकण्यात दफा ३०२ वगैरे ऐकायला येतं) हवा, १२ महिने २४ तास ‘बहु मज्जामा’ राहात सतत चरणारा गोल्डन रिट्रिव्हर हवा, न्यायाधीशासारख्या अलिप्तपणे जगाकडे पाहणारा जर्मन शेफर्ड (हे आणि कायम डाएट पाळणारे, फिट्ट दिसणारे डॉक्टर यांच्यातही साम्य असतं) तर असायलाच हवा आणि सतत बालपण मिरवणारा अल्लड पॉमही हवा. वर हे सर्व श्वानपंथीय कसे बिनडोक आहेत अशा समीक्षी वृत्तीने वावरणाऱ्या आणि त्यांना जवळ करून तुम्ही किती मूर्खपणा करताय अशा नजरेनं आपल्याकडे पाहणाऱ्या अनेक मांजरी हव्यात.

 पाय जमिनीवर राहातात ते या मंडळींमुळे. तुम्ही श्रमिक आहात की संपादक काहीही देणं-घेणं नाही त्यांना. तुम्ही आमच्याबरोबर आहात हाच आनंद! गंमत अशी की कळत-नकळतपणे आमच्या घरात सर्व प्राणी कन्या आहेत. ‘पंचकन्या स्मरे नित्यम्’ असा एक श्लोक लहान होतो तेव्हा आजीला म्हणताना ऐकलं होतं अनेकदा. एकदा अर्थ विचारला तर ‘पंचकन्या स्मरे नित्यम, महापातक नाशनम्’ असं तिनं सांगितलं. इथे पाप-पुण्याची फिकीर नाही. पण या पाच कन्यांच्या स्मरणाइतकं दुसरं काहीही आनंददायक नाही, हे मात्र सत्य!

girish.kuber@expressindia.com

@girishkuber