ममता रिसबूड
मांजरं आणि कुत्री यांचं आत्यंतिक प्रेम असलेली अनेक मंडळी असतात. पण तब्बल २९ मांजरं आणि २ कुत्री अशी ३१ ‘बाळं’ वाढवण्यासाठी मुद्दाम शहराच्या बाहेर वेगळं घर बांधलेल्या.. आणि हे कमीच, म्हणून त्याबरोबर रस्त्यावरच्या कुत्र्यांनाही खायला घालणाऱ्या ममता रिसबुड यांचं ‘प्राणीवेड’ जगावेगळं आहे. शेजाऱ्यांना मांजरांचा त्रास होऊ नये म्हणून घरं बदलणाऱ्या, प्रसंगी मांजरांसाठी माणसांचं कुटुंबच समजदारीनं वेगवेगळय़ा ठिकाणी राहण्यास तयार झालेल्या ममता यांची ही गोष्ट.
मांजरांविषयी ओढ माझ्या रक्तातच आहे बहुधा. या आकर्षणाला खतपाणी मिळालं ते माझ्या माहेरच्या माटेवाडय़ात. पुण्यात तुळशीबागेजवळ असलेल्या आमच्या त्या कौलारू वाडय़ात २०-२५ बिऱ्हाडं एकोप्यानं राहात असत. आम्हा मुलांसाठी तर ‘प्रत्येक घर आपलं’ असा जिव्हाळा. आमच्याबरोबर ५-६ मांजरंही सर्व घरांत सुखेनैव संचार करत. शाळेव्यतिरिक्तचा माझा सारा वेळ त्या मांजरांशी खेळण्यात, त्यांना खाऊपिऊ घालण्यात जात असे.
मी पहिली-दुसरीत असतानाचा, म्हणजे जवळजवळ ५५ वर्षांपूर्वीचा एक प्रसंग माझ्या चांगला लक्षात आहे. आमचं एक मांजर खूप मलूल झालं होतं. काहीच खात नव्हतं. अंगाचं मुटकुळं करून कोपऱ्यात पडून राही. ते पाहून माझा जीव कासावीस होत होता. प्राण्यांसाठी वेगळा डॉक्टर असतो, हेदेखील तेव्हा माहीत नव्हतं. मग कोणी जे जे सुचवेल ते ते आम्ही केलं. अगदी नारळाची करवंटी उगाळून ते चाटण त्याला चाटवेपर्यंत! या प्रयत्नांचा काही उपयोग झाला नाही. फक्त एकच घडलं, ते म्हणजे माझं आत्यंतिक मार्जारप्रेम आई-वडिलांच्या लक्षात आलं आणि ते जोपासण्यासाठी त्यांनी मला कायम प्रोत्साहन दिलं.
माझे वडील रामकृष्ण माटे एका मार्केटिंग कंपनीत मॅनेजर होते, तसेच ते जनसंघाचे खंदे कार्यकर्तेही होते. दुहेरी जबाबदारीमुळे त्यांच्यापाशी फावला वेळ अजिबातच नसे. पण जर का एखादं मांजर कुठे अडचणीच्या जागी अडकून पडलं असेल, तर त्याची सुटका केल्याशिवाय त्यांना चैन पडत नसे. आमच्या घरात माणसांची ये-जा खूप. तरीही आई आलागेला सांभाळून मांजरांसाठी सकाळ-संध्याकाळ चार ते पाच पोळय़ा जास्तीच्या करे. त्या दुधात भिजवून वेगवेगळय़ा ताटल्यांत ठेवून त्यांना खाऊ घालण्याचं काम माझं!
पुढे शिक्षण, नोकरी आणि लग्न या चढत्या भाजणीत नवरा मिळाला तो शेजारच्या वाडय़ात राहाणारा. माझ्या भावाचा मित्र, संजय रिसबूड. तो अभ्यासाला, खेळायला रोजच आमच्या वाडय़ात येत असे. त्यामुळे त्यानं मला माझ्या मांजरांवरच्या प्रेमासकट आपलं म्हटलं. लग्नानंतर आम्ही कर्वे रोडवरच्या संजयच्या ‘वन बीएचके’ फ्लॅटवर राहायला आलो. इथे आसपास मांजर दिसलं नाही, तरी दूधपोळीची ताटली दाराबाहेर ठेवल्याशिवाय माझा पाय घराबाहेर पडायचा नाही. माझी ही युक्ती लागू पडली. महिनाभरातच दोन-तीन भटकी मांजरं मला येऊन चिकटली. एक तर चक्क कडी वाजवून दार उघडायला लावे! संजय म्हणे, ‘‘सगळी मांजरं चुंबकानं खेचल्यासारखी तुझ्याच पाठी कशी काय येतात?’’ यावर माझं उत्तर असे, ‘‘अरे, आपलं नशीब किती चांगलं आहे ते बघ. त्यांना खाऊ घालण्याइतके आपण सक्षम आहोत. त्या मुक्या प्राण्यांचं प्रेम आपल्याला मिळतंय. त्यामुळे रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या आपल्याला शांत झोप लागतेय..’’ अर्थात त्याचा मला पूर्ण पाठिंबा होता. हळूहळू आमच्या त्या तीन खोल्यांच्या घरात ५-६ मांजरं नांदू लागली. एकजात सर्व गावठी. रस्त्यावरून घरात आलेली. काही बोके होते, काही मांजरी. त्यांना घरात सामावून घेताना एक गोष्ट मात्र मी आवर्जून केली, ती म्हणजे एक पशुवैद्य शोधून प्रत्येकाचं संतती नियमनाचं ऑपरेशन करून घेतलं. हे निसर्गनियमाच्या विरुध्द आहे हे मला माहीत आहे, पण होणारी पिलावळ कुठेतरी सोडून देण्यापेक्षा आणि माता-पिल्लांची ताटातूट करण्यापेक्षा आहेत त्यांना मायेनं वाढवणं मला जास्त सयुक्तिक वाटलं. प्रारंभी प्रत्येक शस्त्रक्रियेचा खर्च दीड-दोन हजार येत असे, आता चार ते पाच हजार रुपये येतो.. तरीही!
काही वर्षांनी आम्ही राहात होतो त्या इमारतीचा पुनर्विकास करायचं ठरलं, म्हणून आम्ही जवळच्या एका सोसायटीत पाच खोल्यांचा एक ब्लॉक भाडय़ानं घेतला. खाली पार्किंगसाठी मोकळी जागा होती. त्यामुळे मांजरांची संख्या दहावर गेली. माझी मुलगी मुग्धा घरातल्या मांजरांबरोबरच वाढली. ती दहावीत असतानाची गोष्ट. एकदा भांडारकर रस्त्यावरून येताना तिला रस्त्यावरच एका कोपऱ्यात नुकतीच जन्मलेली मांजरीची चार पिल्लं एका खोक्यात ठेवलेली दिसली. डोळेसुध्दा पुरते न उघडलेली ती बाळं कोणीतरी निर्दयपणे सोडून दिली होती. मुग्धानं त्यांना रिक्षात घालून घरी आणलं. मग त्यांना जगवण्यासाठी माझा आटापिटा! या घटनेला चौदा वर्ष झाली. त्यातली दोन मांजरं- टिल्लू आणि लोला आजही माझ्याजवळ आहेत. मांजरांचं आयुष्य चौदा-पंधरा वर्षांचं असतं म्हणतात.
२००८ मध्ये आमचं घर बांधून पूर्ण झालं, पण त्या इमारतीच्या प्रवेशद्वाराला ‘इलेक्ट्रॉनिक सिक्युरिटी सिस्टीम’ बसवली होती. मग माझी मांजरं कशी जा-ये करणार? हे मला सहन होण्यासारखं नव्हतं. म्हणून मी वारज्याला चार खोल्यांचा ब्लॉक भाडय़ानं घेतला.. निव्वळ माझ्या मांजरांसाठी! नवरा आणि मुलगी मात्र आपली पूर्वापार मध्यवर्ती ठिकाणची जागा सोडायला तयार नव्हते. म्हणून ते बापलेक तिथे, तर वारज्याच्या जागेत मी आणि माझी मांजरं, असा आमचा दुहेरी संसार सुरू झाला. हे शिवधनुष्य एकटीनं पेलता यावं, म्हणून मी ऑफिसकडून (बीएसएनएल) वसुली विभागात बदली मागून घेतली. या खात्यात वेळेचं बंधन नसतं. दिलेलं लक्ष्य पूर्ण केलंत की झालं. तरीही सकाळी दहाला घर सोडावंच लागे. म्हणून मी पहाटे साडेचार-पाचलाच उठून मांजरांना बाहेर सोडत असे. ती खालीच फिरत असत. पावणेदहा वाजता हाळी दिली, की घरात हजर. मग त्यांना पोटभर खायला घालून, घरात बंद करून मी निघत असे. घरात माती भरलेले काही टब ठेवले होते. ती शहाण्यासारखी त्यातच शी-शू करत. मूळ घरी मी आमच्या दोन्ही वेळच्या स्वयंपाकासाठी बाई ठेवली होती. मी घराबाहेर पडले की तिथे जाऊन माझा जेवणाचा डबा घेऊन ऑफिसला जात असे. येतानाही रात्रीचा डबा घेऊन सातच्या आत पुन्हा वारज्याच्या घरी! माझे ‘सगेसोयरे’ माझी वाटच बघत असत. ‘भेटाभेट’ झाली की थोडा वेळ खाली खेळून ती झोपायला परत वर येत.
या जागेत मी तीन वर्ष राहिले. मात्र हळूहळू आजूबाजूच्या बिऱ्हाडकरांच्या तक्रारी वाढत गेल्या. ‘जे आपल्या प्रेमाचं निधान असतं ते दुसऱ्याच्या रागाचं कारण बनू शकतं’ याचा अनुभव येत गेला. त्यांचंही चूक नव्हतं म्हणा. कारण काही स्कूटर्सची सीट कव्हर्स आमच्या महाशयांनी खेळता खेळता फाडली होती. मी त्या तक्रारदारांना कळवळून सांगे, ‘‘तुमची सर्व नुकसानभरपाई मी देते, पण कृपा करून त्यांना मारू नका.’’ पण तक्रारी वाढत गेल्या, तसं मी घर बदलण्याचा निर्णय घेतला. धायरीत एक नवी जागा भाडय़ानं घेतली. बाकी सर्व दिनक्रम पूर्वीसारखाच. या जागेत मी दीडएक वर्ष राहिले असेन.
दरम्यान, मुग्धाचं लग्न झालं. त्यानंतर संजयनं स्वेच्छानिवृत्ती घेतली (२०१५). मग आम्ही विचारपूर्वक एक निर्णय घेतला. भोरपासून दहा किलोमीटर अंतरावरच्या चिखलवडे गावात एका वसाहतीत आम्ही नऊ गुंठय़ांचा प्लॉट घेतला. त्यातल्या तीन गुंठे जागेवर सहा खोल्यांचं ऐसपैस घर बांधून आमच्या १५-१६ मांजरांसह इथे राहायला आलो. त्यानंतर नोकरीची शेवटची ५ वर्ष मी तिथून भोर शाखेत स्कूटरनं जात-येत असे.
हळूहळू माझं कुटुंब वाढत गेलं. आज माझ्याजवळ २९ मांजरं आणि दोन देशी कुत्रे आहेत. यातल्या काहींना कोणी ना कोणी आणून दिलेलं, तर काहींना जखमी अवस्थेत रस्त्यावरून उचललेलं. सगळं छान मार्गी लागलं. २०२० मध्ये मीही स्वेच्छानिवृत्ती घेतली. जोडीदाराच्या आनंदात आनंद शोधणारा संजयसारखा सखा सोबत होता, पण या सुखाला कोणाची दृष्ट लागली कोणास ठाऊक? त्याच वर्षी एक जबरदस्त तडाखा बसला. हसताखेळता संजय हार्ट अटॅकनं आम्हाला अचानक सोडून गेला. त्या धक्यातून मी केवळ माझ्या मुक्या प्राण्यांमुळेच सावरले. तेव्हापासून हे चार पायांचे स्नेहीच माझे सोबती बनलेत. आता तेच माझ्या जगण्याचं निधान बनलंय.
आमची वसाहत मनुष्यवस्तीपासून दूर असल्यानं आजूबाजूला शेती, झाडी आहे. साहजिकच साप आणि नाग मधूनमधून दर्शन देत असतात. त्यांच्या भीतीनं मी मांजरांना बाहेर सोडतच नाही. कुत्रे मात्र घराबाहेर (मात्र कुंपणाच्या आत) राहून राखण करत असतात. बाहेर गेली नाहीत तरी माझ्या बच्चेकंपनीला घरबसल्या बाहेरचा निसर्ग, मोकळं आकाश दिसावं यासाठी आम्ही प्रत्येक खोलीतल्या खिडकीला जोडून एक पिंजरा बनवून घेतलाय. त्यामुळे कधी ती शेपटी उंचावून ‘कॅटवॉक’ करत घरभर डौलात फिरतात, तर कधी पिंजऱ्याच्या जाळीला धरून बाहेरची झाडं, पक्षी, पाऊस बघत बसतात. या पिंजऱ्यात खाली माती (कॅट लिटर) टाकलीय. त्यामुळे त्यांची नैसर्गिक विधींची सोय झालीय. उडय़ा मारण्यासाठी एका बाजूला लाकडी ओंडके ठेवलेत. झालंच तर पावसाच्या सरीनं आतली माती ओली झाली, तर बसायला सुकी जागा हवी म्हणून भिंतीला टेकून छोटय़ा खुर्च्या मांडल्यात. त्यावर बसण्यासाठी त्यांची चढाओढ लागते.
इथे जे काही तुरळक बंगले आहेत ते सगळे दूरदूरच्या अंतरावर! त्यातही कायमस्वरूपी राहाणारी बहुधा मी एकटीच. त्यामुळे शनिवार-रविवार वा सुट्टीच्या दिवशीच माणसं दिसतात. मात्र मांजरप्रेमाचा माझा वारसा माझ्या नातीत, आर्यात उतरल्यामुळे शाळेला सुट्टी लागताच ही साडेचार वर्षांची मुलगी पुण्याहून इथे येण्यासाठी हट्टच धरते. दिवसभरासाठी मी दोन बायका कामाला ठेवल्यात. एक जिजाऊ आणि दुसरी संगीता. त्या गावातून येतात. एक पूर्ण दिवस आणि दुसरी अर्धा दिवस. त्यांनाही मांजरांचा लळा लागलाय. दोघीही खूप प्रेमानं त्यांची देखभाल करतात. त्या घरात असताना मी गाडीनं भोरला जाऊन काय हवं ते घेऊन येते. मात्र संध्याकाळी सहा वाजता त्या गेल्या, की घरात फक्त मी आणि माझी सेना! बाहेर रस्त्यांवर दिवेही नाहीत, त्यामुळे सर्वत्र गुडूप अंधार.
मी घरात इन्व्हर्टर बसवलाय. तरीही एका रात्री अचानक दिवे गेले. हाक मारून येण्यासारखं कोणी जवळपास नाही. मांजरांचा आरडाओरडा सुरू झाला. मी प्रसंगावधान राखून बॅटरीच्या उजेडात सर्व जोडण्या (कनेक्शन्स) तपासल्या. तेव्हा कळलं, की विद्युत पुरवठय़ाचं नियमन करणारी बटणं (एमसीबी) ट्रिप झाली होती. त्यांना जागेवर आणताच घर पुन्हा प्रकाशानं उजळून निघालं. पण तो मधला पाच-सात मिनिटांचा काळ माझी सत्त्वपरीक्षा पाहाणारा होता. माझ्या लक्षात आलं, की हे आमच्या ‘बारकी’चे प्रताप! तिला उडय़ा मारून भिंतींवरच्या पालींच्या मागे धावायची सवय. तीच नडली. अशा परिस्थितीत मन शांत ठेवून मार्ग काढण्याचं धैर्य माझ्यात आहे याचं श्रेय मी माझ्या खेळाच्या पार्श्वभूमीला देते. आधी शाळा कॉलेजमधून आणि नंतर ऑफिसतर्फे मी बॅडिबटन खेळत होते. या खेळानं शारीरिक तंदुरुस्तीबरोबर मनही कणखर केलंय एवढं खरं!
माझ्या या सर्व बाळांना मला बिलगून, म्हणजे माझ्या कुशीत, नाहीतर माझ्या डोक्याशी, पायांशी अथवा पोटावर किंवा किमान हाताला चिकटून झोपायचं असतं. ते एकाच वेळी शक्य नसल्यानं मी एक शक्कल लढवलीय. त्या २९ जणांना मी झोपण्यापुरतं तीन बॅचेसमध्ये विभागलंय. दहाची पहिली बॅच रात्री दहा ते साडेबारा या वेळात माझ्याशेजारी डबलबेडवर विसावते. साडेबाराला त्यांना हलवून एका खोलीत बंद केलं की साडेबारा ते पहाटे तीन दुसऱ्या तुकडीचा हक्क. शेवटी तीन ते साडेपाच तिसरा ग्रुप! आधी मी गजर लावून ही अदलाबदल करत असे. आता आपोआप जाग येते. ही तडजोड आता त्यांच्याही अंगवळणी पडलीय. मी झोपेत असले तरी मला नुसत्या स्पर्शानं कळतं कोण कुठे बिलगलंय ते!
संध्याकाळी टीव्ही बघायला बसले की सर्वजण माझ्या आसपास बैठक जमवून पडद्यावरची चित्रं बघत बसतात. मी पाणी प्यायला किंवा इतर कशाहीसाठी उठले की माझ्या पाठोपाठ वरात फिरते. त्यामुळे मी एकटी आहे असं मला वाटतच नाही. माझ्याकडे कोणी पाहुणे आले की ते शेजारी मुलीनं बांधलेल्या बंगल्यात उतरतात. मी दिवसभर त्यांच्यासमवेत असते. मात्र रात्र होताच या घरी परत! मी बऱ्याच वेळानं दिसले, की आपला आनंद ही सेना अनेक प्रकारे व्यक्त करते. कधी डोळे मिचकावून, कधी घरभर नाचून, तर कधी पोटातून चित्रविचित्र आवाज काढून!
आता मला मांजरांची डॉक्टर म्हणावं इतकी त्यांच्या आजारांवरची औषधं पाठ आहेत! माझ्या लेकरांना काय होतंय ते मला नुसत्या नजरेतून कळतं. मांजरांना जंत पटकन होतात. त्यासाठी दर तीन-चार महिन्यांनी एक औषध नियमितपणे द्यावं लागतं. ते मी प्रत्येकाला पकडून ड्रॉपरनं पाजते. शिवाय ‘कॅट फ्ल्यू’सारखे आजार होऊ नयेत म्हणून लसीकरण करावं लागतं. त्यासाठी मी एक पशुवैद्य जोडून ठेवलेत. ते घरी येऊन हे काम प्रेमानं करतात. मांजरांच्या खाण्याचा खर्चही खूप असतो. पण एकदा ‘आपलं’ म्हटलं की त्यांना लागणाऱ्या सर्व गोष्टींना आपोआप प्राधान्य दिलं जातं. अर्थात माझा वैयक्तिक खर्च नगण्य असल्यानं माझ्या पेन्शनमधून मी हे भागवते.
माझ्या प्रत्येक मांजराला आणि कुत्र्यांनाही स्वत:चं नाव आहे आणि ते त्यांना माहीत आहे. माझी राखाडी रंगाची आणि काळय़ाभोर डोळय़ांची ‘जेरी’ दिसायला खूप सुंदर आहे. जणू ब्युटी क्वीनच! गंमत म्हणजे याची तिला जाणीव आहे. कोणी घरी आलं, नि तिला हाक मारली, तर समोर यायला प्रचंड भाव खाते!
‘जिजा’ आमच्याकडे आली ती एका अपघातातून! माझ्या ऑफिसमधल्या एका सहकाऱ्याच्या गाडीच्या बॉनेटमध्ये ही शिरून बसली होती. त्याला हे माहीत नसल्यानं त्यानं गाडी सुरू केली. थोडय़ा वेळानं म्याव-म्याव ऐकू आल्यावर बघितलं, तर ते पिल्लू भाजलेलं. जखमी पिल्लाला घेऊन तो तडक माझ्या घरी आला. काळजीपूर्वक सेवाशुश्रूषा केल्यावर ते बरं झालं. नंतर या अपघाताचा मागमूसही उरला नाही. माझ्या प्रत्येक मांजराची अशी काही ना काही कथा आहे. दोन वर्षांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी घराच्या पायरीवर बसले असताना लांबून कुठूनतरी मांजराच्या विव्हळण्याचा आवाज माझ्या कानांनी टिपला. त्वरित जाऊन बघितलं, तर एक बोका, कुत्रा चावल्यानं मरणप्राय स्थितीत पडला होता. जखम चिघळून त्यात अळय़ा झाल्या होत्या. त्याला उचलून मी घरी आणलं. ‘हायड्रोजन पेरॉक्साईड’नं जखम धुतली. त्या जागी ‘सल्फा पावडर’ टाकली, मेलेल्या अळय़ा चिमटय़ानं काढून टाकल्या. मनापासून केलेल्या माझ्या उपचारांना त्यानं प्रतिसाद दिला. आमचा हा ‘बिल्लू’ आता बाकीच्यांवर दादागिरी करत असतो.
‘बिंगो’ आणि ‘मिंगो’ हे कुत्रेही माझ्याकडे अपघातानंच आले. साधारण दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. आमच्या घराजवळ मृतवत पडलेली कुत्र्याची दोन पिल्लं मला दिसली. मंद श्वास सुरू होता, पण त्यांना डोळे उघडायचीही ताकद नव्हती. त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं पापच होतं. मी त्यांना उचलून घरात आणलं आणि साखर-पाण्याचं घरगुती सलाइन तयार केलं. नंतर सगळी कामं बाजूला ठेवून मी पुढचा दीड तास त्यांना ते शक्तिवर्धक द्रावण चमच्यानं पाजत बसले होते. जेव्हा त्यांनी डोळे उघडून माझ्याकडे पहिलं, तेव्हा कुठे माझ्या जीवात जीव आला आणि मगच मी त्यांच्या जवळून हलले. आज या राखणदारांच्या जीवावर मी निर्धास्त राहू शकतेय.
याआधीच, म्हणजे इथे राहायला आल्यापासून अंगवळणी पडलेला, रस्त्यावरच्या कुत्र्यांना दोन वेळा खाऊ घालण्याचा माझा नेम अखंड सुरूच आहे. त्यासाठी माझ्या घरी सकाळ-संध्याकाळ नऊ वाटय़ा भात शिजतो. या भातात डॉग फूड, चवीसाठी काही बिस्किटं (चुरून) आणि थोडं दूध एकत्र केलं की त्यात घरातली आणि बाहेरची अशा दहा-बारा कुत्र्यांचं पोट भरतं. मग संध्याकाळपर्यंत निश्चिंती! मी भोर किंवा पुण्याला गेले की माझ्या खरेदीच्या यादीत ‘कॅट फूड’ आणि ‘डॉग फूड’ प्रथम क्रमांकावर असतं. दूधही रोजचं चार लिटर. अर्थात या दुधात सिंहाचा वाटा माझ्या मांजरांचा!
मला लोक विचारतात, ‘मांजर हा काही कुत्र्यासारखा एकनिष्ठ प्राणी नाही. ती सदैव आपल्याच तोऱ्यात असतात. तरी तुम्हाला ती एवढी का आवडतात?’ याचं उत्तर देताना मला एक गोष्ट आठवते- एका सज्जन माणसाकडे कुत्रा आणि मांजर हे दोन्ही प्राणी होते. तो त्या दोघांवर जीवापाड प्रेम करी. ते पाहून एकदा कुत्रा मांजराला म्हणाला, ‘‘इतकी भूतदया अंगी असलेला हा कोणी तरी देवच असला पाहिजे!’’ यावर मांजर म्हणालं, ‘‘मला नाही तसं वाटत.. माझं असं मत आहे, की तो माझी एवढी सेवा करतोय, म्हणजे मीच देव असले पाहिजे!’’ हा जो मांजरांमधला ‘मिजाज’ (खरं सांगायचं तर माज!) आहे ना, तो मला अतिशय आवडतो. हा शिष्टपणा त्यांना शोभून दिसतो असं माझं प्रामाणिक मत आहे.
शेवटी एक मनातली गोष्ट सांगते. गेली अनेक वर्ष एक सुप्त इच्छा मनात घर करून आहे. एखादा ‘बिछडा हुआ वाघाचा बच्चा’ काही काळासाठी सांभाळायला मिळाला, तर हे आव्हान स्वीकारण्याची मला खुमखुमी आहे. माझी ‘मार्जारसेना’ त्याला सामावून घेईल असं वाटतं. शेवटी त्या त्याच्या मावशाच ना! पाहूया कधी योग येतोय ते..
mumpy_28@yahoo.co.in
शब्दांकन- संपदा वागळे