१८० सालापूर्वी कोकणातून देशावर विक्रीसाठी फक्त पंचाचे गठ्ठे घेऊन आलेले गणेश नारायण गाडगीळ यांची सांगलीत सातवी आणि पुण्यात सहावी पिढी दागिन्यांच्या व्यवसायात उत्तरोत्तर प्रगती करत आहे. पु.ना.गाडगीळ अर्थात ‘पीएनजी’ हा ब्रँड तर झालाच, त्याबरोबर ‘गाडगीळ कॅपिटल सव्र्हिसेस’, ‘गाडगीळ कमोडिटी सव्र्हिसेस’, ‘पोस्ट ९१’ हॉटेल, दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स प्रा.लि., ‘सीमलेस एज्युकेशन अकादमी’, अशा नानाविध संस्थांनी व्यवसाय विस्तारत गेला. या व्यवसायावर आपली लखलखती नाममुद्रा कोरणाऱ्या गाडगीळ कुटुंबाविषयी..हा तात फक्त लोटा घेऊन आले, आपल्याकडे स्थिरावले अन् उद्योगसम्राट बनले. महाराष्ट्रानं अशा कथा अनेकांच्या अनेक प्रकारे सांगितल्या, ऐकल्या, पाहिल्या. हे सारं करताना मराठी माणसांना नाही उद्योग जमत अशी एक नाराजीची भावना मनात तुणतुणत असते किंवा असायची असं म्हणू या. आणि मग त्याला छेद देणारी कहाणी सापडली की ती ऐकायचा उत्साह आपोआपच द्विगुणित होतो. नकळत कान टवकारले जातात. आपण त्यात गुंगून जातो. सुमारे १८० वर्षांपूर्वी कोकणातल्या ित्रबक गावावरून नशीब काढण्यासाठी गणेश नारायण गाडगीळ नावाचे सत्शील ब्राह्मण देशावर आले. खांद्यावर पंचांचा गठ्ठा आणि हाताशी आपला मुलगा. उदरनिर्वाहासाठी पंचे विकायचे म्हणून एक छोटंसं गाव निवडलं. सांगली (सहा गस्ती) पंचे विकता विकता लोठे सावकारांनी दिलेले छोटे छोटे सोन्याचे दागिने विकायचेही मान्य केले. मंडईच्या बाहेर आलं, मिरचीचे वाटे विकायला बसावं तसं सोन्याची टीक, मणीमंगळसूत्रं, बाळलेणी असे छोटे छोटे वाटे घेऊन रस्त्याच्या कडेला बसून विक्री करायची. ब्रिटिश राजवट होती. धाक होता. सुरक्षित वाटायचं. वाटे विकता विकता थोडाफार पसा मिळाला. मग छोटंसं दुकान सुरू झालं. आजुबाजूच्या खेडय़ातली माणसं यायची. त्यात या दुकानानं चांगला जम बसवला. २९ नोव्हेंबर १८३२ रोजी गणेश नारायण गाडगीळ सराफ व ज्वेलर्स या नावानं पेढी सुरू झाली.गणेशपंतांचा या व्यवसायात चांगलाच जम बसला. १८६० साली त्यांनी सांगलीत वाडा विकत घेतला. आपल्या तीन मुलांना तूप, सराफी आणि कापड व्यवसायात गुंतवलं. सांगली संस्थानचा महसूल गोळा करून सरकारी खजिन्यात भरण्याचं कामही स्वीकारलं. यातून मोठी विश्वासार्हता संपादन केली. त्या काळात प्रवासाच्या सोयी नसताना मुंबईहून सोन्याची ने-आण केली. जिवाला जीव देणारी माणसं त्या पिढीनं जोडली. बाळनाना गाडगीळांच्या तीनही मुलांनी सराफी व्यवसायाची ध्वजा उंचावली. पुरुषोत्तम नारायण, गणेश नारायण आणि वासुदेव नारायण या त्रयीनं सांगली परिसरात व्यवसायात आणि सामाजिक कार्यात मोठीच कामगिरी केली. प्रतिष्ठा मिळवली. यातल्या पुरुषोत्तम नारायण यांना सोन्याची, रत्नांची पारख चांगली अन् त्यांच्या हाताला यश आहे अशा भावनेनं पुढे पेढीचं नाव पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ व ज्वेलर्स ठेवलं गेलं. अन् पुढच्या चार पिढय़ांना ते किती लाभलं ते आपण पाहातोच आहोत. विश्वासार्हता आणि ग्राहकाभिमुखता हा सराफी व्यवसायाचा प्राण असतो. ही विश्वासार्हता गाडगीळांनी किती मिळवली असेल? त्या काळात संपूर्ण देशात म्हणजे काशीपासून रामेश्वपर्यंत कुठेही गाडगीळांची हुंडी स्वीकारली जाई. गावावर काही संकट आलं.. तापाची साथ, पूर अशा वेळी साऱ्यांची मौल्यवान चीजवस्तू गाडगीळ वाडय़ात सांभाळली जाई. गावावरच्या आपत्तीत आधार ठरणाऱ्या गाडगीळ कुटुंबानं पुढे वेळोवेळी सांगली बँकेलाही आधार दिल्याचं आढळून येतं.गाडगीळांच्या त्रिमूर्तीची म्हणजे आबा, दादा आणि बापूकाका यांची पुढची पिढी.. मुलं मोठी होऊ लागल्यावर साऱ्यांना एकाच व्यवसायात गुंतवणे योग्य नव्हते. आता साऱ्यांना व्यवसायवृद्धी आणि विस्ताराचे वेध लागले आणि पुण्यात लक्ष्मीरोडवर गाडगीळांनी दुकान सुरू केलं, १९५८साली! सांगलीच्या राजेसाहेबांच्या हस्ते पुण्यातल्या दुकानाचं उद्घाटन झालं. अल्पावधीतच छान जम बसला. त्याचं नाव होतं पु.ना.गाडगीळ आणि कंपनी.सांगलीहून आल्यावर दुकानाची घडी बसवतानाच ज्यानं त्यानं आपल्या कामाची आखणी करून घेतली, त्यामुळे कधी संघर्ष तर सोडाच, पण वादाचे वा मतभेदाचे प्रसंगही आले नाहीत असं दाजीकाका सांगतात. नानासाहेब हिरे, मोती. सोनं दाजीकाकांनी आणि चांदी तसंच सारे हिशेब विसूभाऊंनी बघायचे असं ठरलं. आणि अशाच पद्धतीची व्यवस्था-कामाची वाटणी आज समजुतीनं सहाव्या पिढीतही चालू आहे. दाजीकाका गाडगीळ यांच्यानंतर म्हणजे पाचवी आणि सहावी पिढी उच्च विद्याविभूषित आहे. पण लहानपणापासूनचं दुकानात जाणं-येणं, सणावाराला दुकानात मदत करणं यानं सारी मुलं दुकानाशी जोडलेली राहिली. मग ती सांगली असो वा पुणं. त्यामुळे शिक्षण झाल्यावरही सारे आपल्या घरच्या व्यवसायाकडेच वळले.दुकानातही प्रशिक्षण कसं नकळत मिळायचं. पराग, जे आता लक्ष्मीरोडवर काऊंटर्सवर देखरेख ठेवतात त्यांनी अनुभवलंय. सोनं विकायला आलेल्यांना दाजीकाका कसा धीर द्यायचे, आज मोडताय उद्या दामदुपटीनं नवे दागिने करू या म्हणत उमेद वाढवायचे. हा व्यवसाय फक्त चमकत्या धातूचा नाही तर माणसांच्या आशा-आकांक्षांचा आहे. स्वप्नांशी निगडित आहे याचं भान नेहमीच ठेवायला हवं. हे प्रशिक्षण कोणत्या स्कूलमध्ये मिळणार ?हे आपण मुलांबाबत बोललो. मुलींचे काय? पूर्वीचा तर काळच निराळा होता. सांगलीत गाडगीळांच्या घरातील स्त्रिया विनाकारण बाहेर पडत नसत. त्यामुळे दुकानात मदत करणं दूरच. तरीही कमलताईंना म्हणजे दाजीकाकांच्या पत्नीला दुकानाशी संबंधित माणसं, कारागीर, नातेवाईक जेव्हा जेव्हा जा-ये करत त्यांची उस्तवार करावी लागायची. तेव्हा सरसकट हॉटेल किंवा लॉजमध्ये उतरायची पद्धत नव्हती. त्यामुळे दूरवरून आलेला कारागीर .. त्याचं जेवणखाण पाहणं, त्यानं आणलेला माल नीट पाहून-मोजून घेणं अशी कामं कमलताईंनी पुष्कळ केली. खऱ्या अर्थानं त्या गृहलक्ष्मी ठरल्या. लग्नात त्यांना २५० तोळे सोनं घातलं होतं गाडगीळांनी. नमस्कार करायला नीट खाली वाकताही येत नव्हतं, जिना चढताना ताठ होता येत नव्हतं अशी आठवण त्यांनी लिहून ठेवली. पण त्याच कमलाताईंनी पुढे साठ-पासष्ठ र्वष कुटुंबाचा मोठा गोतावळा ताठ मानेनं आणि मोठय़ा मायेनं जपला.गाडगीळ कुटुंबात खऱ्या अर्थानं व्यावसायिक कामात शिरणारी पहिली स्त्री म्हणजे दाजीकाका गाडगीळांची सून वैशाली. एका कार्यक्रमात सूनबाईंच्या कॉलेजचे प्राचार्य दाजीकाकांच्या समोरच तिला म्हणाले, ‘‘एम्.कॉम्. होऊन घरात नको बसू, कॉलेजात ये शिकवायला.’’ घरचा व्यवसाय विस्तारत असताना सुनेनं बाहेर नोकरीला जाण्याची गरज काय? म्हणून दाजीकाकांनी दुकानाचे अकाऊंटस् बघण्याचा प्रस्ताव ठेवला अन् वैशालीनं ते काम पंचवीस र्वष चोखपणे केलं. त्यांचे पती विद्याधर यांनी त्यांना कौतुकानं साथ दिली. वैशालीमुळेच दुकानाच्या काऊंटरवर मुलींना काम मिळू लागलं. अन् हे काम मुली अधिक चांगलं करतात हेही सिद्ध झालं.पुण्याच्या दुकानात नानासाहेबांचे चिरंजीव श्रीकृष्ण हे हिऱ्यांचा विभाग सांभाळायचे. त्यांना हिऱ्यांची उत्तम पारख होती. मुलं शाळेत जाऊ लागल्यावर त्यांच्या पत्नी पद्मिनी या संध्याकाळी थोडावेळ दुकानात येऊ लागल्या आणि अचानक श्रीकृष्ण गाडगीळांचं अल्प आजारानं निधन झालं. अशा वेळी पद्मिनी वहिनींना मानसिक आधार म्हणून हेच हौसेचं काम उपयोगी पडलं. त्यात त्यांनी मनापासून प्रगती केली. आज पुण्यात लक्ष्मीरोडवरच्या पेढीचा हिऱ्यांचा विभाग त्या स्वतंत्रपणे सांभाळतात. आता त्यांची दोन्ही मुलं अश्विन आणि रोहित, जेमॉलॉजीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेऊन आईला मदत करत आहेत. पुणे शहरात गाडगीळ सराफांनी चांगलाच नावलौकिक मिळवला. पण त्यांची दुसरी शाखा निघायला २००० साल उजाडावं लागलं. सरकारी नियंत्रण, जाचक कायदे आणि अस्थिर पररिस्थिती ही जशी त्याला कारणीभूत होती, तशीच आपले ग्राहक बांधलेले आहेत, दुकानात भरपूर गर्दी आहे हा आत्मविश्वासही अडसर ठरला असेल कदाचित. पण विद्याधर आणि वैशालीचा मुलगा सौरभ एमबीए होऊन आला अन् त्यानं स्वॅट (रहडळ) अॅनलिसिस करून कुठे सुधारणेला, विस्ताराला वाव आहे त्याचा लेखाजोगा घेण्यास सुरुवात केली. त्यापूर्वीच्या दशकात खुल्या अर्थकारणाच्या वाऱ्यांनी परिस्थिती बदलली होती. मध्यमवर्गाचा उच्च मध्यमवर्ग झाला होता. अन् टायपिस्टची नोकरी करणाऱ्या मुलीही भिशी लावून हिऱ्याच्या कुडय़ा खरेदी करू लागल्या होत्या. गाडगीळांचे हक्काचे ग्राहक म्हणजे सदाशिव पेठ, नारायण पेठ, शनिवार पेठ ही मंडळी कोथरूडकडे सरकली होती. त्यामुळे विस्तारातलं पहिलं पाऊल अर्थातच कोथरूडमध्येच पडलं आणि आता पुणे परिसरात सात, औरंगाबादला एक आणि ठाण्यात एक तसंच कॅलिफोíनयात सनी वेल इथं एक अशा त्यांच्या शाखा आहेत.या विस्तारीकरणाच्याच वेळी व्यावसायिक सोयीसाठी गाडगीळांची एक पाती वेगळी होऊन अजित आणि अभय उभयतांनी सिंहगड रोड, चिंचवड, नाशिक, सातारा रोड इथे आपल्या शाखा काढल्या आहेत.दाजीकाका गाडगीळांच्या मार्गदर्शनाखाली नव्या पिढीचा विस्ताराचा वेग थक्क करणाराच आहे. पण विविध उद्योगांतला शिरकावही चकित करणारा आहे. दागिन्यांच्या प्रांतात वेगवेगळी कलेक्शन्स आणून राष्ट्रीय पातळीवरचे सन्मान मिळवतानाच ‘पीएनजी’ हा ब्रँड ठसवणं हे आवश्यकच होतं. त्याबरोबरच सोनं ही गुंतवणूक म्हणून स्वीकारायला त्यांनी मध्यमवर्गाला मदत करायचं ठरवलं. २००१ साली ‘गाडगीळ कॅपिटल सव्र्हिसेस’ तर २००७ साली ‘गाडगीळ कमोडिटी सव्र्हिसेस’ ची स्थापना झाली. २००७ मध्येच ‘पोस्ट ९१’ हे हॉटेल कोरेगांव पार्क, पुणे इथे उघडलं आणि उद्योगजगतात ते लोकप्रिय झालं. दाजीकाका गाडगीळ डेव्हलपर्स प्रा.लि. हेही पीएनजीचंच भावंड आहे. या गृहबांधणीचं वैशिष्टय़ असं की पहिल्याच प्रकल्पात गाडगीळ सराफांच्या अनेक कारागिरांचं स्वत:च्या घराचं स्वप्न साकार झालं. आपण गाडगीळ कुटुंबाचा ६-७ पिढय़ांविषयी बोलत आहोत. पण आज त्यांच्याकडे काम करणाऱ्या कारागिरांचीही तिसरी, चौथी पिढी त्यांना जोडून आहे. त्यांचीही आíथक भरभराट झाली आहे. जिथे कारागीर हातानं वेढणी करायचे, ते मशिन्स घेऊन आता किलो किलो सोन्याची वळी स्वत:च्या घरात बनवताहेत. फक्त ब्राह्मणी पद्धतीचे दागिने बनवण्यावर भर न देता साऱ्या देशातून वेगवेगळे कलाकार गाडगीळांशी जोडले गेले आहेत. त्यांच्या व्यावसायिक कुटुंबाचा भाग झाले आहेत.आधुनिक ज्ञानशाखांचं जीवनोपयोगी प्रशिक्षण देणारी संस्था ‘सीमलेस एज्युकेशन अकादमी’ हेही एक दाजीकाकांचंच स्वप्न साकारलं आहे. त्यात जेमॉॅलॉजीपासून साऊंड इंजिनीअिरगपर्यंत अनेक शास्त्रांचं प्रशिक्षण मिळत आहे.‘बदलत्या परिस्थितीला हेरून स्वत:मध्ये बदल घडवणारेच उद्योग व्यवसायात तरतात’ हे सार्वकालिक सत्य आहे. ‘पीएनजी’ ने हे बदल स्वीकारले. पण परंपरा न तोडता अन् समाजकल्याणाच्या मूल्यांना धक्का न लावता. देशभरातल्या अनेक संपन्न देव-देवतांचे दागिने घडवायला अन् व्हॅल्युएशनला गाडगीळांकडेच येतात. हा विश्वासही त्यांची अनेक पिढय़ांची कमाई आहे.आज विविध संस्थांकडून, विविध संघटनांकडून दाजीकाका गाडगीळांना अनेक सर्वोच्च सन्मान मिळालेत ते व्यावसायिक कौशल्याबरोबरच सामाजिक बांधिलकीसाठीही! अन् तोच आदर्श तोच वसा त्यांनी पुढच्या पिढय़ांना सुपूर्द केला आहे. सांगलीत गाडगीळांची सातवी पिढी व्यवसाय सांभाळते आहे, तर पुण्यात सहावी पिढी. पीएनजीनी काळावर एक लखलखीत नाममुद्रा उमटवली आहे. काळावर अशी अक्षरं कोरण्यासाठी केवळ हिरे-मोती उपयोगी नाहीत तर विश्वास, सचोटी, सातत्य, कष्ट .. सारं सारं पणाला लावावं लागतं, तेव्हाच ती अक्षरं प्रकटतात. पीएनजी म्हटलं की लोक डोळे मिटून विश्वास ठेवतात तो याच पुण्याईच्या बळावर !