साधना तिप्पनाकजे

२४ नोव्हेंबर २०१७ ला सुमनताईंची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आणि कामाने वेग घेतला. निधीतून आदिवासींच्या घरांवर पत्रे बसवण्यात आले. गावात गटार, अंतर्गत रस्ते बांधण्यात आले, नळजोडणी, शाळेसाठी ई-लìनग संच, अंगणवाडीत खेळणी, राहुरी कृषी विद्यापीठात शेतकरी अभ्यासदौरा.. सुमनताईंच्या कामांची एक्स्प्रेस वेगाने धावू लागली. पण या प्रवासात अनेक अडचणी आल्या, येत आहेत तेही गावातल्याच पदाधिकाऱ्यांकडून. त्यावर खंबीरपणे मात करणाऱ्या पुण्यातील शेवाळवाडीच्या सरपंच सुमनताई थोरात यांच्याविषयी..

स्त्रियांना राजसत्तेत आरक्षण मिळालं आणि होतकरू स्त्रिया यशस्वीपणे कारभार करू लागल्या. मात्र कितीही कायदे, आरक्षण आलं तरी जोपर्यंत ‘पुरुषी अहंकार’ आपल्या समाजातून जात नाही, तोपर्यंत स्त्रीला मोकळेपणाने काम करता येणं कठीण आहे.  याच पुरुषी अहंकारामुळे पुण्यातील शेवाळवाडीच्या सरपंच सुमनताई थोरात यांना अवघ्या सहा महिन्यांतच अविश्वास ठरावाला सामोरं जावं लागलं. पण त्यांच्या विकासकामाच्या धडाक्यामुळे हा अविश्वास ठराव फेटाळला गेला. आजही शेवाळवाडीत प्रस्थापितांचा ‘पुरुषी अहंकार’ आणि ‘महिला सरपंच’ हा लढा सुरूच आहे.

आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडीत साधारण १९८९ च्या दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉ. कटारिया यांच्या नेतृत्वाखाली थोरात दाम्पत्याने दारूबंदी, कुऱ्हाडबंदी, चरईबंदी, श्रमदानातून स्वच्छता अभियान ही कामं करायला सुरुवात केली. गावात त्यांचं काम खूप चांगल्या पद्धतीनं सुरू होतं. आपला शेती व्यवसाय सांभाळून थोरात कुटुंबीय हे काम करत असत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा. वाढलेल्या कुटुंबाकडे आणि त्यांच्या गरजांकडे लक्ष देणं जास्त गरजेचं होतं. त्यामुळे समाजकार्यातून थोरात पतीपत्नीने जरा उसंत घेतली.  दहावीपर्यंत शिक्षण झालेल्या सुमनताईंना शिवणकाम येत होतं. त्यांनी बारावीची परीक्षा दिली आणि फॅशन डिझाइनचा डिप्लोमा केला. सुमनताईंनी गावात शिवणकामाचं दुकान सुरू केलं. दोन जणी मदतनीस म्हणून ठेवल्या. गावात शिवणकामाची इतर दुकानं नसल्यामुळे त्यांचा चांगला जम बसला. त्यांच्या दुकानात आजूबाजूच्या गावांमधून, वस्त्यांमधून आदिवासी, कष्टकरी स्त्रिया कपडे शिवून घ्यायला येत असत. पण शिलाई द्यायला त्यांच्याकडे पैसेच नसत. सुमनताई या स्त्रियांना ‘शिवणकाम शिका,’ असं सांगू लागल्या. त्यावर या स्त्रिया म्हणत, ‘‘आम्ही शिवणकाम करून दिलं तरी आमच्या आजूबाजूला शिलाईचे पैसे देण्याइतपत परिस्थिती कोणाचीच नाही.’’ यावर सुमनताईंनी त्यांना सांगितलं की, ‘‘शिवणकाम शिकलात तर व्यवसाय म्हणून नाही तर वैयक्तिकरीत्या तुमचा फायदा होईल. किमान घरातल्यांचे कपडे तुम्ही शिवू शकाल, फाटलेला कपडा तुमचा तुम्हालाच जोडता येईल. अशा रीतीने तुम्ही घराचे पैसे वाचवू शकता.’’ स्त्रियांना सुमनताईंचं बोलणं पटू लागलं. सुमनताईंनी या स्त्रियांना मोफत प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. २००६ मध्ये या कामाला सुरुवात झाली. ‘शाश्वत’ संस्थेच्या मदतीने

२२ गावांतील सुमारे शंभर स्त्रियांना या काळात सुमनताईंनी शिवणकामाचं प्रशिक्षण दिलं.

सुमनताई स्वत:चा संसार, दुकान सांभाळून हे सर्व करत होत्या. सुमनताईंनाही हुरूप आला. तसंही समाजसेवेचं बीज त्यांच्यामध्ये होतंच. पंचायत समिती, जिल्हा परिषदेतर्फे शिवणकामाच्या प्रशिक्षणाकरता सुमनताईंना प्रशिक्षक म्हणून बोलावण्यात येऊ लागलं. एका वर्गाचं प्रशिक्षण चार महिने चालत असे. ‘ज्ञानशक्ती विकास वाहिनी’सोबत त्यांचे बचतगट तयार करणे, ‘बेटी बचाव’, ‘पाणी अडवा-पाणी जिरवा’ हे उपक्रमही सुरू होते. प्रशिक्षण मिळालेल्या काही स्त्रिया ‘इरलं’ शिवून विकू लागल्या. सुमनताई लोकांचे अर्ज भरून देणं, सरकारी योजनांची माहिती सांगणं या गोष्टीही करत होत्या. सामाजिक कामाचा धडाका सुरू होता. २०१२ मध्ये आजारामुळे त्यांच्या पतीचं निधन झालं. सुमनताई आणि त्यांच्या कुटुंबावर आघात झाला. मुलींचं शिक्षण सुरू होतं. सुमनताईंनी स्वतला सावरलं. मोठी मुलगी बी.फार्म. झाली, दुसरी मुलगी बीएस्सी. झाली. मुलाचं शिक्षण अजून सुरू आहे. दोन्ही मुलींची लग्न झाली. सुमनताईंचं काम सुरूच होतं. सुमनताई ‘महिला राजसत्ता आंदोलना’च्या सक्रिय सभासद बनल्या. महिला लोकप्रतिनिधींना पंचायतराज प्रशिक्षण आणि सक्षम गावकारभाराकरता ‘महिला राजसत्ता आंदोलन’ राज्यात जोमानं काम करतं.

ऑगस्ट २०१५ मध्ये शेवाळवाडीत ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली. गावातल्या काही लोकांनी सुमनताईंना निवडणूक लढवायला सांगितली. ताईंनी नम्रपणे नकार दिला. ‘मला समाजकारण करायचंय, राजकारणात रस नाही,’ असं त्यांनी सांगितलं. गावकरी म्हणाले, ‘‘ताई तुम्हाला गावकारभाराचं ज्ञान आहे, लोकांकरता तुम्ही इतके वर्षे इतकं चांगलं काम करत आहात. तुम्ही ग्रामपंचायतीत आलात, तर गावाचं भलं होईल.’’ शेवटी सुमनताई तयार झाल्या. पण पशांची अडचण होती. निवडणूक लढवायची तर प्रचारसाहित्याकरता पैसे हवेत. कार्यकर्त्यांना किमान चहा तरी द्यायला हवा. गावकऱ्यांनी सुमनताईंकरता उत्स्फूर्तपणे प्रचार केला. या निवडणुकीचं वैशिष्टय़ म्हणजे शून्य रुपयांमध्ये सुमनताईंनी ही निवडणूक लढवली आणि जिंकली. सरपंचपद खुल्या गटातील स्त्रीकरता राखीव होतं. एक स्त्री सदस्य सरपंचपदी निवडून आल्या. पण या बाईंनी वैयक्तिक कारणांवरून सरपंचपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे सरपंचपद रिक्त झालं. दरम्यान, सदस्य म्हणून काम करतानाच सुमनताईंनी गावातला जुगाराचा अड्डा बंद पाडला. त्या वेळी मिळालेल्या धमक्यांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं.

साहजिकच गावकऱ्यांनी आणि गावातील प्रतिष्ठितांनी सुमनताईंना परत विनंती केली, ‘तुम्ही सरपंच व्हा.’ सुमनताईंनी हा प्रस्ताव स्वीकारला. २४ नोव्हेंबर २०१७ ला सुमनताईंची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. सुमनताईंच्या कामाचा धडाका सुरू झाला. १५ टक्के निधीतून आदिवासींच्या घरांवर पत्रे बसवण्यात आले. चौदाव्या वित्त आयोगातून गावात गटार बांधण्यात आली, गावातील अंतर्गत रस्ते बांधण्यात आले, नळजोडणी, शाळेसाठी ई-लìनग संच, अंगणवाडीत खेळणी, राहुरी कृषी विद्यापीठात शेतकरी अभ्यासदौरा.. सुमनताईंच्या कामांची एक्स्प्रेस वेगाने धावू लागली. ही पहिल्या सहा महिन्यांतली कामं. पण इथेच माशी शिंकली. गावातल्या प्रस्थापितांना फायदा मिळणे बंद झाला. साहजिकच त्याच्याविरोधात आवाज उठू लागला. आधीच्या स्त्री सरपंचाच्या सव्वादोन वर्षांच्या कालावधीत गावात फारसं काम झालं नव्हतं. ग्रामपंचायतीच्या सभेत सरपंचपतीच येऊन बसत असे आणि बोलत असे. माजी सरपंचबाई फक्त उपस्थित राहत असे. सह्य़ांकरताची कागदपत्रंही बऱ्याचदा त्यांच्या घरी किंवा शेतावर न्यावी लागायची.

सुमनताईंमुळे शेवाळवाडीला कार्यक्षम स्त्री सरपंच मिळाली. पण सुमनताईंची कार्यक्षमताच प्रस्थापितांना नको होती. प्रस्थापितांच्या एका गटाच्या ३० वर्षांच्या एकाधिकारशाहीला सुमनताई सुरुंग लावत होत्या. सुमनताईंवर उपसरपंच आणि माजी सरपंच दबाव टाकू लागले. ‘आम्ही सांगू तिथं सह्य़ा करायच्या,’ असं म्हणू लागले. सुमनताईंनी ठाम नकार दिला. सुमनताईंनी ठणकावलं, ‘‘माझ्या कारकिर्दीत भ्रष्टाचाराचं नामोनिशाण असणार नाही.’’  गावातल्या आणखीही काही प्रतिष्ठित व्यक्तींनी सुमनताईंना त्रास द्यायला सुरुवात केली. धमक्या द्यायला सुरुवात झाली. हे लोक ग्रामपंचायत सदस्यांमध्येही फूट पाडू लागले. ‘पाच रुपयांच्या खरेदीकरता पन्नास रुपये बिल लावायचं,’ असा तगादा हे लोक सुमनताईंकडे लावू लागले. सुमनताई बधत नव्हत्या. त्यांच्या पवित्र्यामुळे मग पुरुषी अहंकार दुखावू लागला. हे लोक सुमनताईंविरुद्ध गावात अपप्रचार करू लागले. ‘बाई कोणाचं ऐकत नाहीत, चांगल्या नाहीत, स्वत:च निर्णय घेतात.’ इतर ग्रामपंचायत सदस्य कागदपत्रांवर, बिलांवर सही द्यायला नकार देऊ लागले. ग्रामसेवकावरही हे लोक दबाव टाकायचे. बिलावर सही करेनात आणि गावात सांगू लागले, ‘सरपंचबाई काम नाही करत.’ सुमनताईंची कोंडी करायला सुरुवात केली गेली. हे लोक सुमनताईंना राजीनामा द्यायला सांगू लागले. सुमनताईंनी वृक्षारोपणाकरता रोपं विकत आणली तर सदस्यांनी त्यांना ‘आम्ही सांगू ती रक्कम बिलावर लिहा नाहीतर, वैयक्तिकरीत्या पैसे द्या.’ असं सांगितलं. ग्रामपंचायत सदस्यांतील एका महिला सदस्याचीच काय ती त्यांना साथ होती. सुमनताई राजीनामा देत नाहीत आणि दबावालाही झुकत नाहीत म्हटल्यावर, या लोकांनी अविश्वास ठरावाची चाल केली.

सुमनताईंना त्यांच्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी अविश्वास ठराव मांडत असल्याची नोटीस  ६ ऑगस्ट २०१८ ला संध्याकाळी मिळाली. सुमनताईंनी ‘महिला राजसत्ता आंदोलना’च्या राज्य शाखेशी संपर्क साधला. आणि अविश्वास ठरावाबद्दल कळवलं. म.रा.आं.कडून त्यांना अविश्वास ठरावाबद्दल, त्यांच्या नियमाबद्दल सविस्तर माहिती मिळाली. दुसऱ्या दिवशी सुमनताई अविश्वास ठरावाला सामोऱ्या गेल्या. काही गावकऱ्यांनी सुमनताईंना भेटून, ते त्यांच्यासोबत असल्याचं सांगितलं. शेवाळवाडीत सरपंच धरून नऊ ग्रामपंचायत सदस्य आहेत. ठरावावर मतदान झालं. महिला सरपंचांच्या बाजूने एक तृतीयांश मत असेल तर अविश्वास ठराव फेटाळला जातो. सुमनताईंच्या बाजूने तीन मतं पडली. त्यामुळे सुमनताईंविरोधातला अविश्वास ठराव फेटाळण्यात आला. ग्रामपंचायतीतील विरोधी गटातील सदस्यांनी सुमनताईंना पाठिंबा दिला. ‘तुम्ही गावविकासाचं चांगलं काम करत आहात त्यात आमची तुम्हाला साथ आहे,’ असं त्यांनी सांगितलं. गावातील आणखी एका प्रस्थापित गटाचाही सुमनताईंना पाठिंबा मिळाला.  उपसरपंच आणि माजी सरपंचपतीने स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी ग्रामपंचायतीत येऊन सुमनताईंना स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करायचं नाही, असं बजावलं. याही वेळी सुमनताई त्यांना पुरून उरल्या. सुमनताईंनी याबाबत स्थानिक पोलीस स्थानकात, तहसीलदार आणि पंचायत समितीत पत्र दिलं. प्रशासनाने याची तात्काळ दखल घेत, सुमनताईंना पोलीस संरक्षण दिलं. पूर्ण संरक्षणात सुमनताईंनी ग्रामपंचायतीत आपला झेंडावंदनाचा हक्क बजावला.

यानंतरही या लोकांचे उपद्व्याप सुरूच आहेत. ताईंना काम करण्यात ते आडकाठी आणतच आहेत. प्रत्येक बठकीत भांडणं करणं, आरडाओरड करणे हे प्रकार सुरूच आहेत. बिलावर सह्य़ा करत नाहीत आणि काम करण्याला मज्जाव करतच आहेत. एक स्त्री आपल्याला अजिबात बधत नसल्याचा प्रचंड त्रास या लोकांना होतो आहे. सुमनताई या पुरुषी अहंकाराकडे अजिबात लक्ष देत नाहीत. त्यांनी या प्रस्थापितांची संबंधित पक्षाच्या वरिष्ठांकडे तक्रार केली. पण गटातटाच्या राजकारणात या वरिष्ठांनी फारसं लक्ष नाही घातलं. यामुळे गावातली कामं मात्र खोळंबायला लागली. सुमनताईंनी मग थेट तत्कालीन स्थानिक खासदारांची मदत मागितली. त्यांच्या खासदार निधीतून ग्रामपंचायत आवारात पेव्हरब्लॉक आणि सौरदिवे बसवण्याचं काम करण्यात आलं. जानेवारी महिन्यात जिल्हा परिषदेकडून निधी मिळवून प्राथमिक शाळेची दुरुस्ती करण्यात आली. शाळेची दारं, खिडक्या बदलून, प्लास्टर करून नवीन पत्रे बसवण्यात आले. शाळेसमोर व्यासपीठ उभारलं, प्रसाधनगृहाचीही डागडुजी करण्यात आली. सुमनताई आता ग्रामसभेत प्रत्येक विषय मांडत आहेत. त्यातून गावकऱ्यांना प्रत्येक विषयाची माहिती होईल आणि गावविकासाच्या कामाला लोकांची मान्यता मिळेल. त्या आता गावकऱ्यांचाच दबावगट तयार करत आहे. गावकऱ्यांची आणि ग्रामसेवकांचीही त्यांना साथ मिळत आहे.

शेवाळवाडी मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटर अंतरावर डोंगरावर वसलीय. गावातून बाहेर जायला खासगी वाहन, सायकल किंवा पायी असे मार्ग आहेत. रस्ता नसल्याने एसटीची सोय नाही. या रस्त्यासाठी ताई प्रयत्न करत आहेत. संपूर्ण गाव शेती आणि शेतमजुरीवरच अवलंबून आहे. त्यामुळे त्यांना स्त्रियांकरता गावातच रोजगारनिर्मिती करायची आहे. गावातील अंतर्गत रस्ते जोडणी करायची आहे. गावात सप्ताहानिमित्त अनेक वारकरी येतात. त्यांच्याकरता शौचालयाची गरज आहे. चौदाव्या वित्त आयोगातून निधी मंजूर करण्यात आलाय. पण विघ्न येत आहेत. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी व्यवस्था करायची आहे. गावात प्राथमिक आरोग्यकेंद्राचीही गरज आहे. सुमनताई एक रुपयाही वेतन न घेता ही सर्व कामं करत आहेत. आपल्या पदाला पूर्ण न्याय देण्याकरता सरपंचपदी आल्यावर शिलाई प्रशिक्षण देणं त्यांनी बंद केलंय. मुलाचं शिक्षण, घरखर्च आणि कामाकरता होणाऱ्या प्रवासाकरता त्यांनी आता स्वत:चे दागिने गहाण ठेवले आहेत.

सुमनताईंसारख्या कणखर स्त्रीमुळे पंचायतराजची पाळंमुळं घट्ट होत आहेत. पण पंचायतराजच्या सक्षमीकरणासाठी केलेल्या

७३ व्या घटनादुरुस्तीचा उद्देश सफल करायचा असेल तर पुरुषी अहंकाराला विधायक कार्याकडे वळवता यायला हवं मग राज्याचाच नाहीतर देशाचाही  विकास कुणाला थांबवता येणार नाही.

sadhanarrao@gmail.com