आरती अंकलीकर

‘‘एका गुरूनं आपल्या शिष्याला दुसऱ्या गुरूकडे नेऊन सुपूर्द करण्यासारखं भाग्य नाही त्या शिष्याचं! माझ्या पहिल्या गुरू विजयाबाई जोगळेकर यांनी मला पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे असंच पाठवलं होतं. गुरूशी व्यक्ती म्हणून असलेलं नातं, त्यांच्या सुरांशी असलेलं नातं तोडून दुसऱ्या गुरूबरोबर तेच नातं प्रस्थापित करताना खूप मानसिक त्रास होऊ शकतो. कोणत्याही दडपणाशिवाय हे झालं, तरच शिकणं एकसंध, अखंड होतं..’’

up pharmacy college latest news
पेपरमध्ये लिहिलं ‘जय श्रीराम, पास होऊ देत’, विद्यार्थी ५६ टक्क्यांनी उत्तीर्ण! दोन प्राध्यापकांची झाली गच्छंती
lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Nita ambani in paithani
Video: पैठणी, चंद्रकोर अन् मराठमोळा साज! NMACC च्या वर्षपूर्ती कार्यक्रमात नीता अंबानी मराठीत म्हणाल्या…

एका कार्यक्रमाचं आयोजन होत होतं, ‘दूरदर्शन’वर. पं. विद्याधर व्यास, पं. राजा काळे, पंडिता अश्विनी भिडे आणि मी. आम्ही सगळे ‘मल्हार के प्रकार’ गाणार होतो. मी होते १५-१६ वर्षांची. बहुधा पं. अशोक रानडे सूत्रसंचालक होते. आम्ही सगळे भेटलो ‘दूरदर्शन’ केंद्रावर. मल्हार प्रकारांवर विचारमंथन झालं. माझ्या वाटय़ाला ‘मियाँ मल्हार’ आणि ‘नट मल्हार’ हे राग आले. द्रुत बंदिश गायची होती. माझे गुरुजी पं. वसंतराव कुलकर्णी यांच्याकडे मी गेले आणि राग ‘नट मल्हार’ शिकवण्याची विनंती केली.

  ‘मियाँ मल्हार’ मी  शिकले होते आणि गातही होते. ‘नट मल्हार’ची तालीम नव्हती मिळाली मला. पं. वसंतराव, त्यांना आम्ही ‘सर’ म्हणत असू, अतिशय कडक शिस्तीचे. पांढरं धोतर, नीळ घातलेलं- निळसर झाक असलेलं. अतिशय चापूनचोपून नेसत. निळसर झाक असलेलाच पांढरा झब्बा. त्याला सोन्याची बटणं. गळय़ात एक जाडसर सोन्याची साखळी. कुरळे केस, रंगवलेले. चष्मा. मितभाषी. तोंडात तंबाखू असे बऱ्याच वेळा. आग्रा-ग्वाल्हेरची तालीम मिळाली होती त्यांना. पं. गजाननबुवा जोशी यांचे वडील अंतूबुवा जोशी हे त्यांचे पहिले गुरू. त्यानंतर पं. जगन्नाथबुवा पुरोहित आणि उस्ताद खादीम हुसेन खान यांच्याकडे त्यांची तालीम झाली. ‘नट मल्हार’चा विषय काढताच सरांनी मला माणिकताई वर्माकडे पाठवलं. सर आणि माणिकताई गुरुबंधू-भगिनी. दोघंही जगन्नाथबुवांकडे शिकत.

पं. सी. आर. व्यास, पं. जीतेंद्र अभिषेकी, पं. यशवंतबुवा जोशी ही सगळी जगन्नाथ-बुवांची शिष्यमंडळी. एक कुटुंब होतं हे!  माणिकताईंनी ‘नट मल्हार’ शिकवला मला. अतिशय प्रेमानं, आत्मीयतेनं आणि साधेपणानं. कुठेही आपल्या मोठेपणाचा अभिनिवेश नाही. इतकी मोठी गायिका! गोड गळा आणि कुशाग्र बुद्धीची; पण स्वभाव मृदू आणि निगर्वी. हा त्यांचा स्वभाव त्यांच्या प्रत्येक गाण्यात दिसतो. स्वभावातला गोडवा प्रत्येक स्वरात आणि कितीही वळणदार, पेचदार तान त्यांनी गायली, तरी ऐकताना सोपी वाटे. गायला गेलं की कळे त्यातली कठीणाई! ‘मल्हार के प्रकार’ हा कार्यक्रम उत्तम पार पडला. वेळोवेळी मिळणाऱ्या या संधी किती शिकवून जातात. 

 मी बारा वर्षांची होईपर्यंत विजयाबाईंकडे (विजया जोगळेकर) शिकले. त्या ‘दूरदर्शन’च्या नोकरीत खूप व्यग्र होऊ लागल्या आणि त्यांना वेळ कमी पडू लागला. त्या सरांकडे (पं. वसंतराव कुलकर्णी) शिकत होत्या त्या वेळी. त्या स्वत: मला सरांकडे घेऊन गेल्या आणि त्यांना मला शिकवण्याची विनंती केली. एका गुरूनं आपल्या शिष्याला दुसऱ्या गुरूकडे नेऊन सुपूर्द करण्यासारखं भाग्य नाही त्या शिष्याचं! गुरू बदलताना खूप मानसिक त्रास होऊ शकतो. गुरूशी व्यक्ती म्हणून असलेलं नातं, त्यांच्या सुरांशी असलेलं नातं तोडून दुसऱ्या गुरूबरोबर तेच नातं प्रस्थापित करताना.. पण कोणत्याही दडपणाशिवाय हे झालं, तर शिकणं एकसंध, अखंड होतं. बहुतेक वेळा आधीचे गुरू नाराज होतात आणि त्यामुळे पुढच्या प्रवासात काही काळ नकारात्मकता असते. शिकण्यात मानसिक अडथळे येतात. आमच्या सरांचा क्लास प्रसिद्ध होता. २००-२५० विद्यार्थी येत शिकायला. बरेच शिक्षकही होते शिकवायला. सीनियर विद्यार्थ्यांना सर शिकवत. सरांच्या क्लासमध्ये फ्रॉक घालून गेलेलं त्यांना चालत नसे. सलवार कमीझ किंवा परकर- पोलकं घालत असे मी. क्लासमध्ये अनेक मोठे, बुजुर्ग कलाकार येत असत सरांना भेटायला. अशा वेळी मला माझा हातखंडा असलेला राग गायला लावत असत सर आणि सरांच्या चेहऱ्यावर दिसणारा अभिमान, आनंद सुखावत असे मनाला. सरांच्या पावतीसाठी रियाझ, आलेल्या कलाकारांची उत्तम दाद मिळावी यासाठी रियाझ, नवीन राग गळय़ावर चढवण्यासाठी रियाझ, एकंदर काय, रियाझ आणि रोज रियाझ!

माझा क्लास सकाळी ९ वाजता असे. वेळ पाळण्याबद्दल कटाक्ष होता सरांचा. गाताना ‘सम’ पहिल्या मात्रेवर असते. मुखडा गाऊन सम गाठताना पाव मात्रासुद्धा पुढे जाऊन चालणार नाही. ती पहिल्या मात्रेवरच गाठावी लागते. वेळेचं महत्त्व आणि सम गाठण्याचं महत्त्व एकच नाही का! ‘९ हे ९ वाजताच वाजतात; ९ वाजून १ मिनिटांनी नाही,’ अशी तंबी देत ते शिष्यांना. ताल म्हणजे वेळेचं विभाजन आहे. आग्रा घराण्याची तालीम असल्यानं सर उत्तम लयकारी करत. माझ्या सुरुवातीच्या शिकण्याच्या काळात मी माझ्या क्लासनंतर येणाऱ्या काही विद्यार्थ्यांच्या तासाला बसत असे थोडा वेळ. एकदा विद्यार्थी भैरव रागातला विलंबित ख्याल गात होते. ठाय लय म्हणजे तबल्याच्या ठेक्याच्या मात्रा या विलंबानं वाजतात. मात्रांच्या दोन आघातांमध्ये तीन सेकंदांचं अंतर. गंभीर, शांत लय; पण विद्यार्थ्यांसाठी तणाव निर्माण करणारी! एकदा बंदिश गाऊन झाल्यावर एक विद्यार्थी आलाप गाऊ लागला. बाराव्या मात्रेवर मुखडा गाऊन लगेच एका मात्रेनंतर सम गाठायला हवी होती त्यानं; पण एक सम गेली, दुसरी सम गेली.. तीन आवर्तनं गेली; पण त्याला काही केल्या बाराव्या मात्रेवर आलाप संपवता येईना. कधी पाचव्या मात्रेवर, कधी आठव्या मात्रेवर संपे. रागसंगीत हे शिवधनुष्यच आहे. तानपुऱ्याच्या सुरावर लक्ष. आपला आवाज त्यात सुरेलपणानं मिळवण्याकडे लक्ष. बंदिशीच्या शब्दांवर लक्ष. तालावर लक्ष. रागचलनावर लक्ष. भावनिर्मितीवर लक्ष. मन एकाग्र की अनेकाग्र?.. लक्ष देण्याची आवश्यकता असणारे वेगवेगळे बिंदू, वेगवेगळी स्थानं! एकेकावर विजय मिळवत, एकेक गोष्ट अचूक करत पुढे जायचं.. आणि सगळं जिंकल्यावर सादरीकरणाच्या वेळी त्या विजयाचा, विजयाच्या अहंकाराचा त्याग करून सुरावटीच्या भावावर लक्ष केंद्रित करायचं, मन एकाग्र करायचं.. त्या विद्यार्थ्यांला काही जमेना ते. दोन-तीन वर्षच शिकत होता. तालाच्या आवर्तनाचं, मात्रांचं भान ठेवत आलाप कुठे संपवायचा हे कळण्यासाठी सर म्हणाले, ‘‘वा! सायकलवर बसलात. आता फिरताय, फिरताय.. एक चक्कर मारलीस, दुसरी झाली; पण सायकलवरून उतरता येत नाहीये. म्हणून सायकल चालवणं सुरूच आहे. थांबायचं कुठे कळत नाहीये..!’’

  माझे वडील (मोहन अंकलीकर) मला लहानपणापासून गाण्याचे कार्यक्रम ऐकायला नेत असत. कधी छबिलदास, कधी रंगभवन, दादर-माटुंगा सेंटर, वल्लभ संगीत विद्यालय.. दर शनिवार-रविवारी जात असू. कार्यक्रमाबरोबरच मध्यंतरात मिळणारा बटाटावडा हे मोठ्ठं आकर्षण असे मला! बटाटावडा, त्यातलं तेल आणि आपला आवाज, याचा संबंध प्रस्थापित होण्याच्या आधीचे स्वच्छंदी दिवस होते ते. मनात असलेल्या नकारात्मकतेच्या कोषात शिरला नव्हता बटाटावडा! त्यावेळी रात्रभर चालणाऱ्या एका कार्यक्रमामध्ये मी सुप्रसिद्ध गायिका अंजलीबाई लोलेकरांच्या मांडीवर निर्धास्तपणे झोपल्याची आठवण त्या अनेक वेळा करून देत असत. अशी अनेक गाणी ऐकली. अनेक गायकांना ऐकलं. पं. कुमार गंधर्व, पं. भीमसेन जोशी, डॉ. प्रभाताई अत्रे, गानसरस्वती किशोरीताई आमोणकर, विदुषी मालिनीताई राजुरकर, पं. जीतेंद्र अभिषेकी, पं. राम मराठे.. माझी तालीम आग्रा-ग्वाल्हेरची होती, परंतु माझ्या आवाजाचा पोत लक्षात घेऊन सरांनी मला शुद्ध आकाराची गायकी शिकवली. उत्तम गुरू होते सर. त्यांची गायकी, आवाजाचा लगाव माझ्या गळय़ात उतरवण्याऐवजी माझ्या आवाजाचा नैसर्गिक लगाव ऐकून त्याला वळण देणारे. कोणतीही गायकी सहजपणे गाता येईल असा गळा तयार करून घेणारे सर, पं. वसंतराव कुलकर्णी!

वेगवेगळय़ा मैफली ऐकता ऐकता माझं मन किशोरीताईंच्या गायकीकडे आकर्षित होऊ लागलं. काळीज छेदून जाणारा त्यांचा प्रभावी स्वर, अचाट बुद्धिमत्ता आणि पाण्यासारखा लीलया फिरणारा आवाज! सगळंच मन मोहून टाकणारं! यादरम्यान मला १९८० मध्ये ‘केसरबाई केरकर शिष्यवृत्ती’ मिळाली ‘एनसीपीए’ची ( नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिग आर्ट्स). आनंद झाला. मन उडय़ा मारू लागलं. वाटलं, आता किशोरीताईंकडे शिकायला मिळण्याची संधी चालून आली आहे.. शिष्यवृत्तीच्या बहाण्यानं सरांना सांगावं माझ्या मनातलं आणि ताईंकडे शिकावं. माझ्या प्रथम गुरू विजयाताई तेव्हा किशोरीताईंकडे शिकत असत. त्यांना मी माझा विचार सांगितला आणि त्या मला ताईंकडे न्यायला तयार झाल्या.

मी सात वर्ष सरांकडे शिकत होते. त्यांनी खूप प्रेमानं शिकवून मला तयार केलं होतं. अनेक कार्यक्रमांमध्ये गाण्याची संधी दिली मला. मी आणि आई-बाबांनी ठरवलं, की एक दिवस सरांकडे जाऊन त्यांना माझ्या किशोरीताईंकडे शिकण्याच्या इच्छेबद्दल सांगावं. प्रचंड तणाव होता. पोटात भीतीनं गोळा आला होता. सरांपासून तुटण्याची भीती वाटत होती. कारण सर रागीट होते खूप. ते रागावतील असं वाटत होतं. गुरू बदलताना अनेक गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. आवाजाचा लगाव, गायकी, आवड, काबिलीयत.. अशा सगळय़ाच गोष्टी. मी जड पायांनी सरांकडे जाणं चालू ठेवलं होतं. त्या वेळी पु. ल. देशपांडे ‘एनसीपीए’चे संचालक (डायरेक्टर) होते. रागसंगीतावर अफाट प्रेम त्यांचं. त्यांनी बसवलेल्या अनेक कार्यक्रमांत मी भाग घेतला. वाटलं, की त्यांचा सल्ला घ्यावा ताईंकडे शिकण्याबद्दल. त्यांना ते कळल्यावर त्यांनी आग्रहच केला. मन सैरभैर झालं. सरांना दुखावण्याच्या विचारानं ताईंकडे जायला पाय वळेनात! द्विधा मन:स्थिती. शेवटी एक दिवस निग्रह केला आणि सकाळी ९ वाजता सरांच्या क्लासवर गेलो, आम्ही तिघं- मी आणि आई-बाबा..