शशिकांत सावंत
सिल्विया प्लाथ, प्रतिभावंत कवयित्री. नुकतीच तिच्या आत्महत्येला ६० वर्ष पूर्ण झाली. पण आजही तिच्या गूढगर्भ कवितांचा, तिच्या आयुष्याचा शोध घेतला जातोय. तिची चरित्रं लिहिणं अद्याप सुरूच आहे. तिच्या हजार पत्रांचे खंड हातोहात खपले जाणं आणि तिची एकमेव कादंबरी ‘द बेल जार’ची खास आवृत्ती निघणं हे तिच्या प्रतिभावंत असण्याची साक्ष देण्यास पुरेसे आहेत. फक्त ३१ वर्ष जगून आपल्या अस्तित्वाची दखल जगाला घ्यायला लावणाऱ्या सिल्वियाविषयी..
तिनं वयाच्या एकतिसाव्या वर्षी आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला.. त्या सिल्विया प्लाथच्या मृत्यूला नुकतीच साठ वर्ष पूर्ण झाली, पण ती अद्याप तिच्या चाहत्यांच्या मनात जिवंत आहे. याची साक्ष म्हणजे ‘द बेल जार’ या तिच्या एकमेव कादंबरीची पन्नास वर्षांनंतर पुनप्र्रकाशित झालेली खास आवृत्ती, तिच्या एक हजार पत्रांचे दोन खंड हातोहात खपणं आणि आजही वेगवेगळय़ा लेखकांकडून लिहिली जाणारी तिची चरित्रं आणि तिच्यावर केलं जाणारं संशोधन.. थोडक्यात, जगभरात तिच्या साहित्याबद्दल आणि तिच्या आयुष्याबद्दलचं कुतूहल आजही ताजं आहे.
एक विलक्षण बुद्धिमान कवयित्री, कादंबरीकार, सर्जनशील व्यक्ती असणाऱ्या सिल्विया प्लाथचा मूत्यूपूर्वी (मृत्यू ११ फेब्रुवारी १९६३) अवघा एकच कवितासंग्रह, ‘कोलॉसस अँड अदर पोएम्स’ (१९६०) प्रसिद्ध झाला होता. पण तिच्या प्रतिभेची पूर्ण जाणीव असलेल्या तिच्या घटस्फोटित नवऱ्यानं, टेड ह्युजनं तिच्या मृत्यूनंतर तिचा ‘एरिअल’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध केला आणि त्यानंतर काही वर्षांनी तिच्या समग्र कवितांचा संग्रहही प्रकाशित (१९८२) केला, त्याला अमेरिकेचा मानाचा ‘पुलित्झर’ पुरस्कार मिळाला. तिची लोकप्रियता इतकी होती, की तिच्या आयुष्यावर ‘सिल्विया’ याच नावाचा चित्रपटही बनवला गेला.
सिल्वियाचा जन्म अमेरिकेत, मॅसेच्युसेट्स येथे २७ ऑक्टोबर १९३२ मध्ये झाला. तिला लहानपणापासूनच कवितेची, लेखनाची, चित्र काढण्याची आवड होती. वयाच्या आठव्या वर्षी तिची कविता एका नियतकालिकात प्रसिद्ध झाली होती. कॉलेजमध्ये असताना सिल्वियानं एकदा साहित्य स्पर्धेत भाग घेतला. त्यात तिला पुरस्कारही मिळाला, तो म्हणजे प्रतिष्ठित न्यू यॉर्क येथील मॅडेमॉइजेल मॅगझिनची इंटर्नशिप. त्यामुळे तिला न्यूयॉर्कमध्ये काहीकाळ राहता आलं. तिच्याबरोबरच्या इतर मुलींचं जगणं अनुभवता आलं. मात्र न्यूयॉर्कचं मोठं जग पाहात असतानाच आपण सामाजिकदृष्टय़ा कमी पडतोय असं तिच्या लक्षात आलं. याशिवाय बरोबरीच्या मुलींचा लैंगिकदृष्टय़ा मोकळा दृष्टिकोन तिला स्वीकारता येईना. हळूहळू त्याचा तणाव इतका वाढला, की तिनं आत्महत्येचा प्रयत्न केला, रुग्णालयात दाखल केल्यामुळे ती वाचली. तेव्हा ती फक्त वीस वर्षांची होती. तिथे दिलेल्या ‘इलेक्ट्रिक शॉक थेरपी’नंतर ती बरी झाली. याच वेळी तिला भेटली मानसोपचारतज्ज्ञ रुथ बॉइशर. तिनं सिल्वियाच्या आयुष्यावर खूप प्रभाव टाकला. तिनं तिला लग्नापूर्वीच्या लैंगिक अनुभवाच्या अपराधभावातून मुक्त केलं. हा सगळा अनुभव तिनं तिची आत्मचरित्रपर कादंबरी, ‘द बेल जार’ (म्हणजेच बंद काचेच्या जारमधून मोकळं होणाऱ्या पाखराचा अनुभव) यात लिहिला आहे. या कादंबरीचा शेवट सुखान्त असला, तरी प्रत्यक्ष आयुष्यात मात्र ती निराशच राहिली. पुढे लंडनला गेल्यावरही सिल्वियानं बॉइशरला शेकडो पत्रं लिहिली, अगदी मरेपर्यंत ती लिहीत होती.
सिल्वियाचा हा अस्वस्थ मन:स्थितीचा काळच कलात्मकतेचा, साहित्याच्या बहुप्रसवतेचाही काळ होता. ती नव्या उत्साहानं कविता लिहू लागली. पण तिच्या कवितांना खरा अर्थ मिळाला तो प्रसिद्ध कवी रॉबर्ट लॉवेल यांच्यामुळे. लॉवेल यांनी अनेक शिष्योत्तम तयार केले. ते स्वत:देखील मानसिकदृष्टय़ा अस्वस्थ असत आणि त्यांनी हा अस्वस्थपणा व्यक्त करणाऱ्या, जसं चित्रकलेत ‘एक्स्प्रेसिझम’ नावानं एक पंथ आहे, तशा ‘एक्स्प्रेशनिस्ट’ कविता लिहिल्या. ज्याला नंतर ‘कन्फेशनल पोएट्री’ असं विशिष्ट नाव पडलं आणि त्याच नावानं हा कवितेचा प्रकार ओळखला जाऊ लागला. लॉवेल यांच्या संपर्कात त्या वेळी असणारे अनेक तरुण-तरुणी पुढे कवी म्हणून नावारूपाला आले. ‘कन्फेशनल पोएट्री’ ट्रेन्ड म्हणजे मानसोपचारतज्ज्ञांच्या समोर बसून माणूस जशा स्वत:च्या व्यथा कथन करतो, त्याला हवं तसं व्यक्त होतो, तशा लिहिल्या गेलेल्या या ‘कन्फेशनल’ कविता होत्या. अशाच कविता सिल्वियानं लिहिल्या असल्यामुळे तिच्या मृत्यूनंतर त्यांच्या अर्थासाठी तिच्या चरित्रात शिरण्याची गरज वाचकांना आणि समीक्षकांना वाटली असावी.
प्रसिद्ध कवी टेड ह्युजचं तिच्या आयुष्यात येणं चांगलं आणि वाईट या दोन्ही दृष्टीनं महत्त्वाचं होतं. जेव्हा ते पहिल्यांदा एकमेकांना एका पार्टीत प्रत्यक्ष भेटले तेव्हा दोघांच्या मनाच्या तारा सहज जुळल्या आणि ते प्रेमात पडले. त्यांची ‘कोर्टशिप’ सुरू झाली. टेड उंचापुरा, धिप्पाड. सहा फुटांपेक्षा उंच. सिल्वियाही दिसायला देखणी होती. दोघांकडे आदर्श दाम्पत्य म्हणून पाहिलं जाऊ लागलं. त्यांनी लग्न केलं, दोन मुलांना जन्म दिला. इंग्लंडमध्ये राहू लागले. सिल्वियाचं कविता करणं सुरू होतं, टेडही प्रतिभावंत कवी होता. ‘पोएट लॉरेट’ (राष्ट्रीय कवी) हा मानही त्याला मिळाला होता. दोघांच्या कविता कधी कधी ‘बीबीसी’वरून वाचल्या जात, अनेक नियतकालिकांमधून प्रसिद्ध होत. साहजिकच त्यांच्या मुलांना ‘टेड आणि सिल्वियाची मुलं’ म्हणूनच ओळखलं जाऊ लागलं. जे अनेकदा बालपणात सुखाचंही असतं आणि त्रासाचंही. उदाहरणार्थ, एकदा असं घडलं, की टेडच्या कविता त्याच्या मुलीच्या, फ्रेडीच्या अभ्यासक्रमात होत्या. त्यानं लेकीला विचारलं, ‘‘मी माझ्या कविता तुला शिकवू का?’’ तेव्हा मुलगी म्हणाली, ‘‘बाबा, पण जर शिक्षकांना अपेक्षित अर्थापेक्षा तुमचा अर्थ वेगळा असेल तर मला मार्क मिळणार नाहीत.’’ हे पटलेल्या टेडनं आपल्या कविता मुलीच्या अभ्यासक्रमातून वगळाव्यात, अशी विनंतीही मुख्याध्यापकांना केली होती.
त्या दोघांचा संसार सुरू होता, पण तो करायचा म्हणजे पैसे लागणारच. सिल्विया लेखन करायची, कॉलेजमध्ये शिकवायची, अनुवाद करायची, जाहिरातींसाठी जिंगल्ससुद्धा लिहायची आणि रात्री दोन्ही मुलं झोपल्यावर स्वत:साठी कविता, पत्रं लिहायची. सुरुवातीला कुठल्याही संसारात होते तशी धुसफुस त्यांच्याही संसारात सुरू झाली. पण नंतर नंतर तिचं रूपांतर वितंडवादात झालं. इतकं, की प्रचंड संतापात दोघं एकमेकांची हस्तलिखितं नष्ट करत. एकदा तर टेडनं तिनं लिहिलेली डायरीच नष्ट केली आणि नंतर कारण सांगितलं, ‘मुलांवर ती वाचून वाईट परिणाम होईल.’ तर दुसरीकडे एका पत्रात तिनं टेड आपल्याला मारतो, असं म्हटलं होतं. पण अनेकदा प्रतिभावान माणसं स्मरणशक्ती आणि कल्पना यात गल्लत करतात, तसं कदाचित तिचं झालं असावं, कारण टेडच्या मुलीनं नंतर सांगितलं होतं, की ‘माझ्या वडिलांनी कधीही तिच्यावर हात उगारला नव्हता.’ एक मात्र नक्की, की या सगळय़ाचा नकारात्मक परिणाम सिल्वियाच्या मनावर होत होता. ते तिच्या कवितेत उमटू लागलं होतं.
सिल्वियाचं आयुष्य कायम वादळी राहिलं. काफ्का, डेव्हिड फॉस्टर वॉलेससारखा लेखक असेल, वॅन गॉग, मार्क रोथकोसारखा चित्रकार असेल किंवा बेकेटसारखा नाटककार, अशा अनेक कलावंतांना एक अस्वस्थपण कायम लाभलेलं असतं आणि ते त्यांना खूप त्रास देतं असतं. या त्रासातून सिल्वियाही जात होती. त्यात भर म्हणजे तिच्या नवऱ्याचं, टेडचं दुसऱ्या स्त्रीच्या प्रेमात पडून लग्न करणं. त्याचा तिला फारच धक्का बसला होता. इतका, की तिनं स्वत:चं आयुष्य संपवायचं ठरवलं आणि ठरवल्याप्रमाणे संपवलंही.. तिनं स्वयंपाकघरातील ओव्हन गॅसमध्ये डोकं ठेवून आत्महत्या केली.
तिच्या मृत्यूनंतर दोन्ही मुलांना टेडनंच मोठं केलं, शिक्षणाचा खर्च तर केलाच, पण संगोपनही जबाबदारीनं केलं. टेडचं १९९८ मध्ये निधन झालं. सिल्वियाच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवलं गेल्याचे घाव त्यानं जन्मभर शांतपणे सोसले. लोकांनी त्याचा कायम राग केला. इतका, की तिच्या थडग्यावरचं त्याचं नावही अनेकदा घासून नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यानं आपल्या विरोधकांना कधी उत्तरं दिली नाहीत, की आपल्या वागण्याचं समर्थनही केलं नाही. कारण त्याचं तिच्यावर मनापासून प्रेम होतं. १९९८ मध्ये, म्हणजे सिल्वियाच्या मृत्यूनंतर ३२ वर्षांनी त्यानं ‘बर्थडे लेटर्स’ हा आपला कवितासंग्रह प्रसिद्ध केला. जो पूर्णत: त्या दोघांच्या प्रेमाला वाहिलेला आहे. पती-पत्नीच्या नात्यावरचं हे दीर्घ काव्य असून ते जगभरातील साहित्यातलं बहुदा एकमेव असावं. दोघांच्या सहवासातील, नात्यातील अनेक प्रसंगांचं चित्रण यात आहे. यातली पहिलीच कविता आहे, ‘फुल ब्राइट स्कॉलर’. ‘केंब्रिज’ची स्कॉलरशिप मिळवलेल्या सिल्वियाला पहिल्यांदा त्यानं कॉलेजच्या फोटोंत पाहिलं, नंतर त्यांची भेट कशी झाली. ते प्रेमात कसे पडले आणि मग दोघांचा संसार कसा सुरू झाला. हे सारं या दीर्घ कवितेत आहेच, याशिवाय तिचं तन्मयतेनं चित्र काढणं, घराला विशिष्ट रंग देण्याचा आग्रह करणं, बैलाची प्राणांतिक झुंज पाहून अस्वस्थ होणं, रानात प्रवास करताना अचानक गुहेतून बाहेर आलेली वटवाघळं पाहून अवाक् होणं, असे कितीतरी क्षण चित्रमय स्वरूपात या कवितासंग्रहात येतात. या दोघांचं विलक्षण नातं यात दिसतंच, पण लग्न तुटल्यामुळे किंवा व्यावहारिक संसार सुटल्यामुळे प्रेम संपत नाही, हे दाखवणारा हा कवितासंग्रह आहे. तो आपल्याला सिल्वियाच्या चरित्राचं जवळून दर्शन घडवतो.
म्हणूनच असेल कदाचित, सिल्विया गेल्यानंतर तिच्यावर, तिच्या लेखनावर खूप संशोधन झालं. तिला मानसिक आजार होता का? अनेकदा त्याची पाळंमुळं बालपणातल्या असुरक्षिततेत आढळतात, तसं तिचं बालपण होतं का? याबद्दल चरित्रकारांनी खूप तर्क-वितर्क लढवले आहेत. तसंच तिचा धर्म आणि त्याचा तिच्या कवितेवरचा परिणाम, यावरही संशोधन झालं आहे. तिची अनेक चरित्रं प्रसिद्ध आहेत.
अगदी अलीकडे २०२१ मध्ये ‘रेड कॉमेंट’ हे आणखी एक चरित्र प्रसिद्ध झालं. नव्वदच्या दशकात तिचं एक चरित्र प्रसिद्ध झालं होतं. ‘न्यू यॉर्कर’मध्ये जेनेट माल्कमनं तिच्यावर लिहिलेला लेख खूप लोकप्रिय झाला होता. तो नंतर पुस्तकाच्या रूपात प्रसिद्ध झाला, तो ऐंशी पानांचा आहे. त्याचबरोबर तिचं आणखी एक चरित्र तिच्या जवळच्या मैत्रिणीनं लिहिलं होतं. इतकंच नाही, तर ती वसतीगृहात ज्या मुलीबरोबर राहायची, त्या मुलीनंही तिचं अल्पचरित्र लिहिलं. मृत्यूनंतर तिच्या ज्या कविता प्रसिद्ध झाल्या त्यातल्या काहींचा अर्थ सहजपणे लागणं शक्य नव्हतं. यासाठीच तिच्या चरित्रात शिरण्याची गरज वाचकांना आणि समीक्षकांना वाटली असावी. उदाहरणार्थ, एका कवितेत तिनं वडिलांना ‘नाझी’ म्हटलेलं आहे. तिनं तसं का म्हटलं असावं, हा प्रश्नच होता. कारण सिल्विया वडिलांची खूप लाडकी होती. लहानपणापासून प्रत्येक गोष्ट ती त्यांच्यासाठीच करत असे. या अशा चरित्रात्मक गोष्टी अनेक दीर्घ लेखांमधून आणि चरित्रातून आल्या आहेत.
सिल्वियाच्या दीर्घ कवितेतील हा काही भाग.
Lady Lazarus
I have done it again.
One year in every ten
I manage it
A sort of walking miracle, my skin
Bright as a Nazi lampshade,
My right foot
A paperweight,
My face a featureless, fine
Jew linen.
असं स्वत:विषयी काही सांगणाऱ्या ओळी पुढे निराळे वळण घेतात.
And I a smiling woman.
I am only thirty.
And like the cat
I have nine times to die.
This is Number Three.
(मांजराला नऊ जन्म असतात हा संदर्भ येथे आहे.)
मृत्यू ही एक कला आहे आणि इतरांप्रमाणेच मीही आहे त्यात विलक्षण पारंगत.
सुरुवातीला तिनं लिहिलेल्या निसर्गाशी नातं सांगणाऱ्या कविता किंवा उत्कट प्रेमकविता नंतर अधिकाधिक आत्मचरित्रात्मक होत गेल्या. अधिक अर्थगहन होत गेल्या. आजही तिच्या या अर्थ शोधावा लागाव्या अशा कवितांचं उत्खनन सुरूच आहे. मृत्यूनंतर ६० वर्षांनंतरही तिच्या जगण्याचा, तिच्या कवितांचा शोध सुरू राहावा यातच तिचं प्रतिभावंत असणं दडलेलं आहे.