सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
आपली शेकडो कामं मेंदू बिनबोभाट करत असतो. एखादी समस्या आली तरच आपल्याला या अवयवाची जाणीव होते; इतका हा मेंदू दुर्लक्षित असतो. आपला चेहरा, पेहराव यांची जेवढी काळजी घेतो, त्यापेक्षा मेंदूची अधिक काळजी घ्यायला हवी.
मागील लेखामध्ये (१८ मे )आपण मेंदूला काय हवं, हे बघितलं. या लेखात मेंदूला घातक ठरणाऱ्या काही गोष्टींविषयी सांगितलं आहे. या लेखात सुचवलेल्या गोष्टी प्रामुख्याने लहान मुला-मुलींच्या संदर्भातल्या आहेत. मात्र प्रौढ मेंदूसाठीदेखील याच गोष्टी घातक ठरतात.  
१) आपण आनंदी, मोकळ्या वातावरणात राहिलो तर साहजिकच आपल्याला बरं वाटतं. पण जर वातावरण कंटाळवाणं असेल तर मनावर-मेंदूवर ओझं येतं. एखाद्याच्या सहवासात अर्धा तासही नकोसा वाटतो, कारण तो सहवास कंटाळवाणा असतो. ज्या ठिकाणी प्रेम नाही, तिथे राहणं- थांबणं नकोसं वाटतं.  बंदिस्त वातावरण असेल तर तिथून लगेच निघून यावंसं वाटतं. कारण आनंदाची भावना मेंदूत सुखद हार्मोन्स निर्माण करते. हेच हार्मोन्स पुन्हा पुन्हा हवेसे वाटतात. याउलट जेव्हा कठोर वागणूक मिळतो, तो नकारात्मक अनुभव टाळावासा वाटतो. तिथून सुटका करून घ्यावीशी वाटते. कंटाळवाण्या वातावरणात कसलेच आव्हान नसते. ज्यात आव्हान नाही, तिथे कंटाळा येणारच. मुलांना कंटाळा आला तर ते एक मिनिटही थांबू शकत नाहीत. आई-बाबांच्या मागे लागून आपली सुटका करून घेतात.    
२) शाळेतल्या वर्गामध्येही बऱ्याचदा बंदिस्त वातावरण असते. प्राथमिक शाळेतल्या मुलांना केवळ खडू-फळा यांच्या सहाय्याने शिकवलं, दिवसभर बाकांवर जखडून ठेवलं तर ते त्यांच्या मेंदूसाठी घातक आहे. पाय मोकळे करायला, मित्र-मत्रिणींशी बोलायला-खेळायला फक्त मधल्या सुट्टीचाच वेळ असेल तर अशी मुलं कंटाळणारच. त्यामुळेच शाळा सुटल्यानंतर आनंदाने मोठ्ठा आवाज करत मुलांचा लोंढा वेगात बाहेर पडतो, कारण त्यांची सुटका झालेली असते!
३) चुकीचा आहार मेंदूला आणि संपूर्ण शरीराला संकटात लोटत असतो. ते कित्येकदा आपल्या लक्षात येत नाही. काही मुलं अऊऌऊ (अफेक्शन डेफिसिट हायपर अ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर)ने ग्रासलेली असतात. ही मुलं एकाजागी बसू शकत नाहीत. एखाद्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. मेंदूतला प्री-फ्रंटल कॉर्टेक्स हा भाग अद्याप पुरेसा विकसित झालेला नसल्यामुळे हे घडतं. यावर उपचारासाठी केल्या जाणाऱ्या संशोधनातून असं आढळलं की, आहारात कृत्रिम रंग, कृत्रिम चवी आणि प्रिझव्‍‌र्हेटिव्ह असलेले पदार्थ जास्त असले तर त्याचा दुष्परिणाम होतो.
सध्या शालेय मुलांचा ताबा ज्या पदार्थानी घेतला आहे, त्याचे घातक परिणाम असे साऱ्या शरीरावर होऊ शकतात. त्यामुळेच पदार्थ खाण्याआधी त्यातला धोका लक्षात घ्यायला हवा. असे पदार्थ टाळायला हवेत. हे पदार्थ मेंदूसाठी अयोग्य असतात. ज्यांना बौद्धिक कामांसाठी बुद्धी तरतरीत ठेवण्याची गरज असते, त्या सर्व वयाच्या लोकांनी हे टाळलं पाहिजे. या गोष्टी का टाळायला हव्यात, याचं कारण आपल्या मेंदूच्या रचनेत आहे.
 मेंदूच्या चार पोकळ्यांमध्ये असलेला एक विशिष्ट प्रकारचा द्रव. या द्रवात ग्लुकोज, कॅल्शिअम, प्रथिने, सोडियम असे काही घटक असतात. हा द्रव शरीराच्या कोणत्याही कामासाठी अतिशय महत्त्वाचा असतो. शरीराचं, बुद्धीचं सर्व काम याच्या मार्फतच चालतं. बुद्धी तरतरीत राहण्यासाठी जो चांगला खाऊ पेशींना द्यायला हवा, तो द्यायचं काम हा द्रवपदार्थ करत असतो.
परंतु समजा चुकून या द्रवातल्या घटकांमध्ये काही प्रमाणात बदल झाला तर लहान मोठे घोटाळे व्हायला लागतात. मेंदूच्या पेशीच्या अंतर्गत जे संदेशवहनाचं काम अव्याहत आणि बिनबोभाटपणे चाललेलं असतं त्यात अडथळे येतात. म्हणूनच या द्रवाचं प्रमाण योग्य राहील याची काळजी आपलं शरीर घेत असतं. आपल्या शरीराला या कामासाठी मदत करायची तर योग्य आहार घ्यायला हवा.
४) कोणत्याही वयात खेळ-व्यायाम यांची कमतरता असेल तर ते मेंदूसाठी घातकच आहे. डाव्या आणि उजव्या मेंदूच्या मध्यभागी कॉर्पस कलोझम हा भाग असतो. मुलं जेवढी खेळतील तसा कॉर्पस कलोझम सक्षम होतो. म्हणून मुलांसाठी खेळ- हालचाल- व्यायाम महत्त्वाचा!
 मेंदू सशक्त आणि तरतरीत ठेवायचा असेल तर मुलांनी खेळायला हवं. विविध प्रकारचे व्यायाम करायला हवेत. यामुळे मेंदूतला रक्तप्रवाह वाढतो. पेशींना ऑक्सिजन मिळतो. विविध मदानी खेळ, व्यायाम यालाच नृत्याचीही जोड देता येते. सॅन्ड्रा मिन्टन या संशोधिकेने एक प्रायोगिक अभ्यास केला. त्यात असं दिसलं की एका गटातल्या मुलांना पारंपरिक पद्धतीने शिकवलं, तर दुसऱ्या गटाला या शिकवण्याच्या जोडीला नृत्यात सहभागी करून घेतलं. जी मुलं नृत्यात सहभागी होती, त्या मुलांच्या विविध क्षमतांमध्ये वाढ झाली. उदा. विविध दिशांनी विचार करण्याची क्षमता, कल्पनाशक्ती, समस्या सोडवण्याची क्षमता अशा अनेक क्षमता वाढल्या. नृत्यामुळे लयबद्ध हालचालींना संगीताची- तालाचीदेखील मदत झाली.  सुसंबद्ध हालचाली आणि नृत्य यातून मेंदूच्या विविध क्षमता वाढतात, हे संशोधिकेने केलेलं संशोधन बघितलं तर असं दिसतं की, संशोधिकेने प्रत्यक्ष प्रयोग आणि अनेक संशोधनांमधून सिद्ध केलं आहे. या मागचं कारण देताना त्या म्हणतात की, आपलं मन- मेंदू आणि शरीर हे एकच असतं. या घटकांची एकात्मता असेल तर त्याचा चांगला परिणाम होणारच.
५) वास्तविक भावना आणि स्मृतींची जवळीक हा दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे. मात्र या भावनांमध्ये सकारात्मक भावनांचा वाटा जास्त असायला हवा. विशेषत: लहान मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत तर नक्कीच.
अमिग्डाला हे भावनांचं केंद्र आहे. पण भीती ही भावना त्याला चटकन कळते. विशेषत: विविध प्रकारच्या भीतींची सवय करून घेणं. आणि योग्य वेळेला भीतीच्या पूर्वानुभवांची सर्वशक्तिनिशी जाणीव करून देणं हेही याचंच काम.
शिकत असताना मुलं अनेक अनुभवांना घाबरत असतात. मार देणाऱ्या शिक्षकांचा यात पहिला क्रमांक असतो. मार खाताना ज्या दु:खद आणि अपमानित करणाऱ्या भावना सहन केलेल्या असतात त्या स्मरणात पक्क्या असतात. त्यामुळे ते शिक्षक बघितले की त्या भावना आठवतात.
दुसरं म्हणजे, विविध प्रकारच्या शारीरिक आणि शाब्दिक शिक्षा या दु:खद भावनांशी जोडल्या गेल्यामुळे लक्षात राहतात. शिक्षा म्हणून एखादा गृहपाठ पुन्हा करायला सांगितला तर त्या गृहपाठातला मजकूर किती लक्षात राहतो हे बघायला पाहिजे. त्याऐवजी अशी शिक्षा झाली म्हणून राग, अपमान, धुसफूस, रडारड हे लक्षात राहतं. पण त्यातला अभ्यासाचा भाग मात्र लक्षात राहणं अवघड.
ज्या कोणामुळे आणि ज्या कशामुळे पूर्वी भीती वाटलेली होती, तो घटक समोर आला की मेंदूकडून सूचना मिळते-लांब राहा. पूर्वीच्या अनुभवांची आठवण करून दिली जाते. ज्या मुलांच्या शालेय जीवनात असे शिक्षक, अपमानित करणाऱ्या शिक्षा, कमी गुण, सततचं अपयश, पालकांची सततची बोलणी असं सगळंच असेल त्यांची शिक्षणाविषयी एकूण गोळाबेरीज दु:खी भावनांभोवती एकवटली जाते. आणि म्हणून फारच पक्केपणाने स्मरणात जाते. असे अनुभव येणं हे शालेय जीवनासाठी तर घातक असतंच. पण एकूण पुढच्या आयुष्यासाठी सुद्धा!
म्हणून मुलांनी चांगलं शिकावं अशी इच्छा असेल तर स्मृतींभोवती भावनांची गुंफण हवी. पण त्या सुखद, उत्साहित करणाऱ्या भावना असायला हव्यात.
६) जेव्हा आपल्याला कसली तरी चिंता वाटायला लागते, तेव्हा ताणतणाव उत्पन्न होतात. एखादी चिंताजनक परिस्थिती ओढवली की आपली जीभ कोरडी पडते, छातीत धडधडते, घाम फुटतो, झोपेवर परिणाम होतो, अस्वस्थता वाढते. पाय जड होतात, हातांचे चाळे सुरू होतात, पोटात गोळा उठतो, म्हणजेच ताणाचा आपल्या संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. हे केवळ प्रौढ व्यक्तींच्याच बाबतीत घडते असे नाही. मुलांनादेखील विविध ताणतणावांना सामोरे जावे लागते. ज्या प्रकारच्या तणावामुळे मनावर आणि शरीरावर घातक परिणाम होतात, असे तणाव नेहमीच नकारात्मक असतात. असे तणाव कोणाहीवर वारंवार येत असतील तर त्याचा आधी मेंदूवर आणि कालांतराने शरीरावर वाईट परिणाम होतो.
तणावाच्या वेळेस काही व्यक्ती येरझाऱ्या घालतात, असे आपण पाहिले असेल. ताणाची तीव्रता कमी करण्याचा हा एक सोपा उपाय आहे. कारण यामुळे शरीराची हालचाल वाढते, त्यामुळे रक्ताभिसरण वाढते. ताण हलका होतो. ताण आलाच तर त्याचा योग्य पद्धतीने निचराही झाला पाहिजे. मेंदूला आवडणाऱ्या गोष्टी केल्या व न आवडणाऱ्या गोष्टी टाळल्या तर तो कायम तत्पर राहील. मात्र रोजच्या जगण्या-वागण्यात आपण काही गोष्टी पूर्णत: टाळू शकत नाही. अशा वेळेला त्या कमी करण्याचा प्रयत्न तर नक्कीच करता येईल.