शांततेचं अद्भुत गाणं!

तळ ढवळताना

(संग्रहित छायाचित्र)

नीरजा

शांतता ही आई आहे, असं इस्रायली कवयित्री अदा आहरोनी तिच्या ‘पीस इज अ वुमन’या कवितेत सांगते. आई सर्जनशील असते. तिचा विनाशावर विश्वास नसतो तर सर्जनावर असतो. आणि जोवर हे जगातील युद्धखोरांना कळणार नाही तोवर हे जगच संपून जाण्याचं भय घेऊन आपण जगत राहू असं म्हणणारी अदा गेली अनेक वर्ष जगभरात शांतता नांदावी म्हणून काम करते आहे. शांतता आणि संस्कृती कशा एकमेकांशी निगडित आहेत हे सांगते आहे.

गेल्या दोन महिन्यात दोन अतिरेकी हल्ले झाले. एक आपल्या देशात पुलवामा येथे आणि दुसरा न्यूझीलंडमध्ये. या दोन्ही हल्ल्यांचा जगभर निषेध केला गेला. वंशवर्चस्वानं झालेल्या हत्येचा निषेध करताना न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डन म्हणाल्या की ‘हल्लेखोराने आमच्या मुस्लीम समाजातील पन्नास जणांचे प्राण घेतले.’ खरं तर या हल्ल्यात मारले गेलेले अनेकजण निर्वासित म्हणून त्यांच्या देशात आलेले असताना आणि त्या स्वत या धर्माच्या नसताना मृतांना आपला एक भाग समजणं आणि ‘वी आर वन, दे आर अस.’ असं म्हणणं ही गोष्ट त्यांच्यात असलेल्या सुसंस्कृत आणि प्रगल्भ नेतृत्वाचं लक्षण दाखवते. दहशतवादाला वंश, रंग, वर्ण, धर्म किंवा लिंग आणि जातही नसते हे जाणून असलेल्या जेसिंडा आर्डन संपूर्ण जगाला भावल्या. त्याचं कारण परिस्थिती हाताळण्याचं त्यांचं कौशल्य. चुकीच्या लोकभावनांपुढे मान झुकवण्यापेक्षा जेव्हा आपण निरपेक्षपणे निर्णय घेतो तेव्हा ते तात्कालिक न राहता पुढच्या काळावर प्रभाव करणारे असतात, हे या बाईंनाच नाही तर अगदी आस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनाही चांगले ठाऊक असल्याने त्यांनी हा अतिरेकी त्यांच्या देशाचा आणि श्वेतवर्णीय असूनही त्याला योग्य ती शिक्षा झाली पाहिजे अशी भूमिका घेतली. तो श्वेतवर्णीय असला तरी त्यानं केलेलं कृत्य हे उत्क्रांत झालेल्या मानवजातीला काळिमा फासणारंच आहे हे मान्य करणाऱ्या जेसिंडा आर्डन आणि हल्लेखोर ऑस्ट्रेलियाचा आहे म्हणून शरमून जाणारे आणि माफी मागणारे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा पाहिल्यावर आपण आपल्याकडच्या गोरक्षा, ऑनर किलिंग, लव्ह जिहाद यांसारख्या अनेक कारणांच्या नावाखाली सामान्य माणसांच्या हत्या करणाऱ्या स्वधर्मीयांच्या झुंडीचा निषेध करणार आहोत का हा प्रश्न मनात येतो. ज्यावेळी आपल्या विचारवंतांच्या हत्या झाल्या तेव्हा आपल्या राष्ट्रप्रमुखांनी अशी दिलासा देणारी विधानं केली होती काय, हे आठवण्याचा प्रयत्न करताना बाबरी मशीद आणि गोध्राच्या वेळी केली गेलेली समर्थनं आठवलीच, पण मालेगावच्या बॉम्बस्फोटात निर्दोष सुटलेले लोकही आठवले. मूलतत्त्ववादी आणि धर्म किंवा वंश यांच्या वर्चस्वातून हल्ला किंवा हत्या करणारे लोक मग ते कोणत्याही धर्माचे असोत, ते दहशतवादीच असतात आणि त्या त्या धर्माला काळिमा फासणारेच असतात हे आपल्या देशातील आणि आपल्या बाजूच्या पाकिस्तानातील लोकांनी, नेत्यांनी आणि पंतप्रधानांनी मान्य केलं तर तेही जेसिंडा आर्डन यांच्यासारखा या स्वधर्मीय दहशतवाद्यांचा निषेध करू शकतील. असा निषेध केल्यानं तुमचा जो काही धर्म आहे त्या धर्माची बदनामी होत नाही तर तुमच्या मनात दुसऱ्या कोणत्याही धर्माच्या माणसाच्या जगण्याच्या हक्काप्रति आदरच दिसून येतो. असा आदर न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी दाखवून सर्वापुढे एक उत्तम उदाहरण ठेवले.

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवादी तळावर केलेल्या कारवाईचा आनंद आपण व्यक्त केला आणि तो  रास्तच होता. पण त्याच वेळी या आनंदाचं आपल्या माध्यमांनी जे बीभत्स प्रदर्शन केलं ते अस्वस्थ करणारं होतं. समाजमाध्यमांवरील वाचाळवीरांची पाकिस्तानबरोबर युद्ध करण्याची वाढती मागणी पाहिल्यावर वाटलं नेमकं कोणाचं अघ्र्य देऊन पुण्य पदरी घेणार होते हे लोक? आपले जवान तिथं आपल्या सुरक्षेसाठीच तनात आहेत. अपुऱ्या सुविधा असतानाही डोळ्यात तेल घालून आपल्या सीमेचं रक्षण करताहेत. पण त्यांनी रक्षणापेक्षा युद्ध पुकारावं, असं टीव्हीच्या पडद्यासमोर चहाचा तर कधी बीअरचा घोट घेत चर्चा करणारे लोक त्यांना सांगताहेत. ऊठसूट युद्ध करण्याची मागणी करणारे हे लोक स्वतच्या घरात सुरक्षित बसून आपला आर्थिक आलेख कसा वाढेल आणि आपली पोरं अमेरिकेला कशी आणि किती पैसे भरले तर जातील याचा विचार करतात तेव्हा आपली या जवानांप्रति असलेली आणि देशाप्रति असलेली जबाबदारी लक्षात घेतात का असा प्रश्न मनात येतो. घरात टीव्हीसमोर मॅच पाहत सचिननं किंवा विराटनं कसं खेळायला हवं याची चर्चा ते जितकी सहज करतात तेवढय़ाच सहजतेने मिलिटरीनं अशा परिस्थितीत काय करायला हवं याचेही सल्ले देत असतात. पण कोणत्याही युद्धात कोणत्याही देशाला काय किंमत मोजावी लागते याचा अंदाज आपल्याला नसतो. आपल्या जवानांनी पाकिस्तानला दिलेल्या चोख उत्तराबद्दल त्यांचं अभिनंदन करायलाच हवं. पण मनातून या जवानांना माहीत असतं की शेवटी युद्ध सगळ्या जगाचा विद्ध्वंसच करत असतं. ब्रिटिश कवी विल्फ्रेड ओवेन या पहिल्या महायुद्धात कामी आलेल्या, केवळ २५ वर्षांच्या सोल्जर कवीनं काही कविता लिहिल्या आहेत. त्यातल्या एका कवितेत तो म्हणतो,

Why should I kill this young German

who is in the field in front of me

If I have met him in the bar

I would have invited him to a beer.

आपल्यासमोर असलेला हा माणूस नेमका कोण आहे, त्यानं आपलं काय नुकसान केलं आहे हे दोन्ही बाजूच्या सनिकांना माहीत नसतं. वरून आदेश आले आणि युद्ध पुकारलं गेलं की समोरच्याला मारणं ही ‘डय़ुटी’ समजणाऱ्या या सनिकांच्या आत लपलेला माणूस आपण अनेकदा विसरतो. ‘स्ट्रेंज मीटिंग’ या दुसऱ्या एका कवितेत याची चर्चा विल्फ्रेडनं अतिशय मार्मिकपणे केली आहे.  युद्धभूमीवर एकमेकांना मारल्यावर जे सैनिक मरतात ते या कवितेत एकमेकांना काल्पनिक नरकात भेटतात. कदाचित हा युद्धानंतरचा माणसानं तयार केलेलाच नरक असावा. तिथं ते जगण्याविषयी बोलतात. युद्धाविषयी बोलतात, या युद्धानं जे काही बिघडवून ठेवलं आहे त्यावर लोकांची प्रतिक्रिया काय असेल याची चर्चा करतात. पुढच्या काळात जगात नेमकं काय असेल, समाधान की असमाधान, शांतता की अधिकाधिक कौर्य आणि विध्वंस याविषयी बोलत असताना अचानक यातल्या एकाच्या लक्षात येतं की ज्याच्याबरोबर तो गप्पा मारतो आहे तो समोरचा माणूस त्याच्या शत्रूपक्षातला आहे. तो म्हणतो, I am  the enemy  you killed, my friend. ज्यानं मारलंय त्याला मित्र म्हणून संबोधणाऱ्या या सैनिकात आपल्याला जय-पराजयाच्या पलीकडे पोचून माणसाचा विचार करणारा माणूस सापडतो.

युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यावर त्याच्या विरोधात खऱ्या अर्थानं उभ्या राहतात त्या सर्वसामान्य स्त्रिया. कारण अनेक युद्धांत त्या आपला पती, मुलगा किंवा बाप गमावत असतातच, पण कित्येकदा शत्रूपक्षातील पुरुषांच्या वासनेच्या बळीही त्यांना व्हावं लागतं. कदाचित म्हणूनच त्यांना युद्धापेक्षा शांततेची गरज वाटत असते. आपल्याकडे नेमका जागतिक महिला दिनाच्या काळात हा युद्धज्वर पसरला होता. तेव्हा काही महिला संघटनांनी ‘युद्ध नको शांती हवी’ असं म्हणत मोर्चा काढला होता. त्याचं कारण स्त्री ही विद्ध्वंसापेक्षा निर्मितीवर भर देते. नवनिर्मिती करण्यासाठी कोणत्या वेणांतून जावं लागतं हे केवळ स्त्रीला माहीत असतं आणि विशेषत जी आई होणार असते, त्या गर्भवती स्त्रीला जास्त माहीत असतं. इस्रायली कवयित्री अदा आहरोनी तिच्या ‘पीस इज अ वूमन’या कवितेत  म्हणते,

All the rest of her children, she said     are on the nuclear

blacklist of the dead

All the rest, unless

The whole world understands –

That peace is a woman.

Peace is indeed a pregnant woman Peace is a mother

शांतता ही आई आहे असं तिला वाटतं. कारण आई ही सर्जनशील असते. तिचा विनाशावर विश्वास नसतो तर सृजनावर असतो. आणि  जोवर हे जगातील युद्धखोरांना कळणार नाही तोवर हे जगच संपून जाण्याचं भय घेऊन आपण जगत राहू असं म्हणणारी अदा आहरोनी गेली अनेक वर्ष जगभरात शांतता नांदावी म्हणून काम करते आहे. शांतता आणि संस्कृती कशा एकमेकांशी निगडित आहेत हे सांगते आहे. मला वाटतं, आज वीरमरण आलेल्या आपल्या देशातीलच नाही तर सगळ्याच देशांतील प्रत्येक जवानाच्या आईची, बायकोची किंवा मुलीचीही हीच भावना असेल.

आपण एक लक्षात घ्यायला हवं की आपल्या देशात वॉर किंवा आर्म फोस्रेस मिनिस्ट्री नाही तर डिफेन्स मिनिस्ट्री आहे. आपण युद्ध करण्यापेक्षा संरक्षणावर भर दिला आहे. कारण आपला देश हा बुद्ध, गांधी यांनी दिलेल्या अिहसेच्या शिकवणीवर उभारला गेला आहे.  धर्म अथवा वंशभेदावर आधारित हत्या होणं ही कोणत्याही सुसंस्कृत नागर समाजाला मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे. माणसाचा इतिहास पाहिला तर अशा प्रकारच्या हत्या, हल्ले, युद्ध, संघर्ष होत राहिले आहेत. कधी ते राजकीय हेतूनं प्रेरित होते तर कधी धार्मिक अथवा आर्थिक सत्तासंघर्षांनंही. पण तरीही सुरुवातीच्या काळात होणाऱ्या टोळीयुद्धांचे किंवा होणाऱ्या सततच्या संघर्षांचे प्रमाण कमी होत गेले, कारण माणसाची पशूपातळीवरून एका नागर समाजाचा प्रतिनिधी होण्यापर्यंत उत्क्रांती होत गेली. विचार करायला लागलेला माणूस हळूहळू त्याच्या आत लपलेल्या जनावराला मारून माणूसपणाच्या गोष्टी करायला लागला. मानवता, भूतदया, अिहसा यासारखे शब्द त्याने जन्माला घातले. सम्राट अशोकासारखा योद्धा जिंकल्यानंतरही किलगाच्या युद्धभूमीवर पसरलेल्या दोन्ही बाजूच्या सनिकांची मृतदेहं पाहून व्यथित झाला आणि युद्ध जिंकल्यानंतरही विजय साजरा न करता करुणेच्या शोधात बाहेर पडला आणि शांतीच्या गोष्टी करायला लागला. हा आपलाच इतिहास आहे. माणसातल्या माणूसपणाचा शोध घेण्याचा प्रयत्न या देशात सतत झाला आहे. कदाचित त्यामुळेच आपल्या देशात कितीही युद्धे झाली तरी ओळखला गेला तो प्रेम, करुणा, अिहसेचा मंत्र देणाऱ्या लोकांमुळे. अगदी बुद्धापासून गांधींपर्यंत झालेला आपल्याकडचा करुणेचा प्रवास जगभरातील लोकांनी आपलासा केला. त्यामुळेच कदाचित टी.एस. इलियट त्याच्या ‘वेस्ट लॅण्ड’ या कवितेच्या शेवटच्या भागात दत्त (दिलेले), दयध्वम (करुणा), आणि दाम्यता (संयम) या बौद्ध तत्त्वज्ञानातील संकल्पना वापरतो. एवढंच नाही तर या कवितेचा शेवट ‘शांती शांती शांती’ या भारतीय तत्त्वज्ञानाचं सार असलेल्या शब्दांनी होतो. अनेक पाश्चात्त्य कवी या अशा अिहसेला सर्वोत्तम स्थान देणाऱ्या आपल्या संस्कृतीनं भारावून जातात. केवळ कवी आणि लेखकच नाही तर मार्टनि ल्युथर किंग ज्युनिअरसारख्या अमेरिकन नेत्याला किंवा अगदी मंडेलांसारख्या नेत्यालाही महात्मा गांधीकडून अिहसेची प्रेरणा घ्यावीशी वाटते. अिहसा हे सगळ्यात प्रभावी हत्यार मानणाऱ्या बुद्ध आणि गांधी यांच्या देशात आज दहशतवादानं प्रेरित झालेली हिंसा वाढते आहेच, पण या हिंसेला हिंसेनेच उत्तर द्यायला हवे अशी मानसिकताही वाढते आहे. १९७१ नंतर आपल्या देशानं त्या अर्थानं युद्ध पाहिलं नाही. त्यामुळे आजच्या पिढीला युद्ध कोणत्या विनाशाच्या टोकावर घेऊन जाऊ शकतं याची कल्पना नाही. त्यांना खरं तर हे सांगायला हवं की युद्धे केवळ विद्वंस करतात. शत्रूचा देश असो की आपला देश असो, माणसं मरतात ती दोन्हीकडची. आर्थिक घडी विस्कटते ती दोन्हीकडची. मनं कडवट होतात ती दोन्हीकडची. बायकांना सोसावं लागतं ते दोन्हीकडच्या. दोन्हीकडच्या बायका विधवा होतात, आयांची मुलं रणांगणावर देह ठेवतात किंवा दोन्हीकडच्या मुलांना वडिलांना गमवावं लागतं. हे सत्य आपल्यालाही ठाऊक असतं.

खरं तर विविध युद्धांची कारणं आणि त्याचे परिणाम यांचा इतिहास शिकतच आपली प्रत्येक पिढी मोठी झाली आहे. तरीही आपण दुसऱ्या देशातल्या लोकांच्या उद्ध्वस्ततेच्या कहाण्यांनी का सुखावून जातो? केवळ सुखावून जात नाही तर अत्यंत बीभत्स रीतीने आपला आनंद का साजरा करतो? शेवटी संस्कृती म्हणजे तरी काय असतं? अनेक धर्म, त्यांची शिकवण, आपली जीवनशैली, आपल्या चित्र, शिल्प, स्थापत्य यांसारख्या कला, आपलं संगीत, आपलं साहित्य, निर्मितीशी जोडली गेलेली प्रत्येक गोष्ट म्हणजे असते संस्कृती. आज प्रत्येक देशानं आपल्या शेजाऱ्याची संस्कृती जाणून घेतली तर आपण प्रेमाचा पूल बांधू शकतो. तो बांधायचा असेल तर प्रथम मनात रुजलेलं विद्वेषाचं झाड तोडून टाकायला हवं. ते तुटलं तर आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक देशातून हिरवा प्रसन्न वारा वाहत राहील आणि आपल्यापर्यंत घेऊन येईल शांततेचं अद्भुत गाणं!

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Tal dawaltana article by neerja

ताज्या बातम्या