मी तुला पाहत होतो, तुझं विश्लेषण करत होतो आणि तुझ्या नकळत तू मला आरसा दाखवत आलीस. मलाच नकोशा वाटणाऱ्या माझ्या रूपाचं मला दर्शन घडवत राहिलीस. मुलीने वडिलांना हरवणे? हे माझ्यासाठी आक्रित, अघटित होतं. अपशकुनी होतं. म्हणून मी कुठं कुणाला जिंकू दिलं? तुझ्याशी भांडत रालो, वाद घालत राहिलो. तुझं जिंकणं ही माझी हार कशी असू शकते ना? किंवा खरंतर कुणाचंही जिंकणं ही दुसऱ्या कुणाचीही हार असत नाही हे आत्ता आत्ता समजतंय.

सान्या,

तुला पूर्णत: शुद्धीवर यायला अजून वेळ आहे. आत्ता तुला काही ऐकू येत नाहीये म्हणून तुला काही सांगणार आहे. आज तुला मुलगी झाली; मी आजोबा झालो. निवृत्तीनंतरच्या आयुष्यात एक दिलासा मिळाला. तुला वाटेल की बाबा काय इमोशनल झालाय. पण खरं सांगू? एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना आत दाटून येतीये.

तुला अनाथाश्रमातून आणल्यानंतर, बाप म्हणून तुला माझे नाव लावल्यानंतर, शाळेत प्रवेश घेताना, कधी रुग्णालयात दाखल करताना, दरवेळेस माझा अट्टाहास असायचा, तुझं संपूर्ण नाव लिहायचा! त्यात माझं नाव पाहण्याची माझी हौस मी पूर्ण करून घेत होतो. तुला अर्थात कसलंच सोयरसुतक नव्हतं. आजही ही जी वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना म्हणतोय ना, त्यातही माझा स्वार्थच आहे. माझ्या नावाचा खुंटा एकदम स्थिर आणि बळकट झालाय.

तुला माहितीये आम्ही तुलाच का निवडलं होतं ते?

आम्हाला मूल होणार नाही हे समजल्यावर तुझी आई कोलमडली. आणि माझ्या तथाकथित पौरुषावर आख्खं जग शंकेखोर नजरेने पाहील अशा भीतीने मीही ग्रासलो होतो. आम्ही तेव्हा लाचार आणि दीन होतो. सगळे उपचार, उपासतापास, गंडेदोरे, बाबाबुवा, हकीम, ज्योतिषी करून पुरते ग्रासलो होतो. जेव्हा दत्तक घ्यायचा निर्णय झाला तेव्हा तुझी आई म्हणत होती मुलगा घेऊ. तुझी आई व्यवहाराला कच्चीच बघ. मग एका मुलीला दत्तक घेण्याचा व्यवहार्य निर्णय मी तिला पटवला. पण तूच का? याचं उत्तर जरा अवघड आहे. पण तुझ्या मानेवरच्या छोटय़ाशा काळ्या जन्मखुणेचं त्यात मोठं योगदान आहे. तुझ्या मुलीने तुझी ही ओळख हुबेहूब उचललीये. पण तिलासुद्धा त्याच्या शेजारी यथावकाश भेसूर कोड येणार का? आणि माझ्या मनातून ही कीड जाणार का?

तू तिसरीत गेल्यावर जेव्हा एक पांढरा ठिपका तुझ्या मानेवर उमटला होता, माझ्या पायाखालची जमीन सरकली होती; आणि तू नेहमीप्रमाणे निवांत होतीस. काळ्या जन्मखुणेशेजारी पांढरा-फटक डाग जास्तच वाकुल्या दाखवत होता. अर्थात मला. माझी निवड चुकली असं ओरडून सांगत होता. म्हणजे तू माझ्या लेखी एक निवड मात्र आहेस हे थंड सुरीसारखं चर्रकन जाणवलं होतं तेव्हा. बालसुलभ स्वभावाला अनुसरून तू कधीचंच आम्हाला तुझे आई-बाबा मानलं होतंस. मी मात्र दत्तक या संकल्पनेलाच दत्तक गेलो!

तुला पहिल्यांदा पाळी आली तेव्हा ‘‘मुलींनाच का हा त्रास?’’ असा प्रश्न सर्वासमक्ष तू आईला विचारला होतास. आणि माझ्या लक्षात आलं की हे पाणी जरा वेगळंच आहे. मग तू कायमच निरुत्तर करणारे प्रश्न विचारत राहिलीस. अगदी मूलभूत प्रश्न. पुरुषी नजरा, स्पर्श, त्यांचे अर्थ, भाषा, शिव्या आणि पुन्हा त्यात येणारे स्त्री अवयवांचे उल्लेख. माझ्या परीने मी प्रयत्न करत होतो, तुझ्या आईच्या परीने ती. पण तुझं समाधान क्वचितच होत असे. तुला आठवतं सान्या?  मग तू सातवीत असताना घडला तो किळसवाणा प्रसंग. तुझ्या लांबच्या काकाने केलेलं हिणकस कृत्य. मला वाटलं तू भेदरून जाशील. पण तू निडरपणे त्याच्या कृत्यांचे पाढे वाचलेस. आणि मी? त्याच्याशी संबंध तोडण्यापलीकडे काय केले? तथाकथित अब्रूला घाबरून तक्रार केली नाही. तक्रार करण्याने तुझी नाही तर त्याची अब्रू गेली असती हे लक्षातच आलं नाही. ‘कोण्या दुसऱ्याच्या कर्माची तू का लाज बाळगावीस?’ हा प्रश्न तेव्हा पडला नाही. तू थेट माझी मुलगी नाहीस म्हणून? की मी जात्याच घाबरट आहे म्हणून? काहीही असलं तरी माझं वागणं भ्याडपणाचंच होतं. मला हे आठवूनही मेल्याहून मेल्यासारखं होतं, की तेव्हा थोडीशी शंका मला तुझ्या वागण्याबाबतही आली होती. त्याच्या घाणेरडय़ा कृतीचं नकळत मी समर्थन करू पाहत होतो का? उथळ मनाचा खोल तळ!

तुझं कोड जसं वाढत होतं तशी माझ्या जिवाची घालमेल होत होती. आपण किती त्वचारोगतज्ज्ञ केले, वैद्य केले, होमिओपॅथी, निसर्गोपचार, रेकी. काय नाही केलं! तुला कुठं काही चिंता होती? ती मलाच! का माहितीये? तुझं लग्न कसं होणार याची! आणि झालं भलतंच. तुझं आणि कुणालचं जमलं तेव्हा मला कुणालच्या हेतूंबद्दल शंका होती. अजून ‘आतली’ गोष्ट सांगायची तर मला तुझ्या मुळा-कुळाबद्दलही शंका आली. आणि पुन्हा मला माझी शरम वाटली. मी तुला पाहत होतो, तुझं विश्लेषण करत होतो आणि तुझ्या नकळत तू मला आरसा दाखवत आलीस. मलाच नकोशा वाटणाऱ्या माझ्या रूपाचं मला दर्शन घडवत राहिलीस. तुला मी ‘आतून’ कधी आपली मानली? तू मला माझी पोर नक्की कधीपासून वाटलीस? आणि ‘आत्तातरी तू माझी पोर मला वाटतीयेस का?’ याचं ठाम उत्तर मला देता येणार नाही. कारण एखादा प्रसंग अचानक अगदी मूळ गृहीतकांवर हल्ला करतो. आता तू मला दुष्ट म्हण किंवा दगड म्हण.

मला तुझ्याबद्दल कधी प्रेम होतं का? अगदी असा प्रश्न विचारू नकोस. मला मुळात प्रेम या भुताबद्दल शंका आहेत. आकर्षण, ममता, भूतदया, आपुलकी, जिव्हाळा यापेक्षा प्रेम हे काही वेगळं असतं का? मला माहीत नाही, मला तसा अनुभवही नसावा. माझी आई माझ्या लहानपणीच वारली म्हणून असेल, लवकर लग्न, जबाबदाऱ्या होत्या म्हणून असेल किंवा अजून कुठलं कारण असेल, पण प्रेम असं कधी कुणाबद्दल वाटलंच नाही बहुधा, आणि जगण्याच्या व्यवस्थेमध्ये प्रेमाची गरज फारशी उरली नाही. ना वाटण्याची, ना बोलण्याची. आत्ता विचार करताना, तुझ्याशी मन मोकळं करताना जाणवतंय की मला कायम गरज वाटली ती घाबरण्याची.

एखाद्या गोष्टीत जीव लावून काम करायची तुझी पद्धत, हातात घेतलेले तडीस नेण्याची सवय, तरीही असलेली बेफिकिरी वृत्ती, तुझा खळाळता उत्साह यामुळे माझ्या मध्यमवर्गीय वृत्तीला हादरे बसत होते. मी अजून अडकलो होतो तुझ्या मानेवरच्या कोडात. एक स्त्री असून तू ज्या भराऱ्या घेत होतीस त्याने मी व्यथित होत होतो का? मला माहीत नाही. शिष्याने गुरूला आणि मुलाने वडिलांना हरवणे यात गुरू आणि वडिलांची जीत असते असं ऐकलं होतं. पण मुलीने वडिलांना हरवणे? हे माझ्यासाठी आक्रित, अघटित होतं. अपशकुनी होतं. म्हणून मी कुठं कुणाला जिंकू दिलं? तुझ्याशी भांडत रालो, वाद घालत राहिलो. तुझं जिंकणं ही माझी हार कशी असू शकते ना? किंवा खरंतर कुणाचंही जिंकणं ही दुसऱ्या कुणाचीही हार असत नाही हे आत्ता आत्ता समजतंय. तुला अशा सगळ्या गोष्टींचं भान आपोआप कसं आलं गं? कुणाकडून? कारण तुझी आईसुद्धा बऱ्यापैकी माझ्याच जातकुळीतली. नेमस्त म्हणावी अशी. नेटाने संसार करणारी. मला त्याकाळी नोकरी करणाऱ्या मुलीही चालून आलेल्या. पण माझी कशी हिम्मत होईल सांग! असो. पण ती आज किती खूश आहे तुला याचा अंदाज नाहीये. तिला स्वत:ला नाही झालं तरी ‘तिच्या’ सान्याला मूल झालंय! मला शंका नाहीये आणि तुलाही चांगलंच माहितीये की तू तिची सान्या अगदी पहिल्या दिवसापासून झालीस. मनाचं अक्राळविक्राळ रूप तुला फक्त मलाच दाखवायचं होतं का गं? काही असेल ते असो, तुझ्या निमित्ताने खरंतर ती मातृत्व अनुभवते आहे आज. तिची आई व्हायची हौस तू पूर्ण करून दिलीस. तुझी आई ही अशी आणि तुला मात्र मूल नको होतं आजिबातच! मला माहीत आहे सान्या. तुझ्या आईसाठी तू तुझ्या मनाला मुरड घातलीस. अगदी सहज आणि आपसूक. हे असं इन्टेन्स जगणं कुठून शिकलीस? मला हेवा वाटतो अशा जगण्याचा.

माझ्या मनातील उलघाल, माझ्याच मनात तुला मी दिलेलं अंतर हे तुला समजतं की काय हीसुद्धा एक भीती माझ्या मनात असायची. बुडत्याच्या पायाप्रमाणे माझं वागणं विचित्र होत असणार आणि त्याचं कारण अर्थात तुला समजलं असणार.

माझी आई खूप कर्तबगार आणि धडाडीची बाई होती असं सगळ्यांकडून कायम ऐकत आलोय. तिची आठवण माझ्या मनात अगदी धूसर आहे. पण तुझ्याकडे बघितल्यावर मला तिचा भास होत राहतो, आणि मी कोषात जाऊ  पाहतो. निडरपणे जगलं की माझ्या आईसारखं, माणूस लवकर जातो अशी विचित्र खूणगाठ मी मनाशी बांधली आणि घाबरत राहिलं तर लव्हाळ्यासारखं तग धरून राहता येतं हे मनाशी ठरवून टाकलं. जसं जसं वय वाढत चाललंय, गात्रं थकत चाललीयेत, जगण्याची इच्छा फोफावत चाललीये. पण त्यामुळे तळघरातली भीती, अविश्वास यांच्यावर दुर्दैवाने काहीच परिणाम झालेला नाही. खरं सांगू? मला एक दिवस तुझ्यासारखं जगायचंय आणि वास्तव असं आहे की हे स्वप्नही मी घाबरतच बघतोय. तुझ्या पिल्लूला तुझ्यासारखंच बनव डिट्टो, आणि तिच्यासोबत असताना अनुभवेन मी माझं मोकळंढाकळं अस्तित्व!

हृषीकेश रांगणेकर

dr.rangnekar@gmail.com